Kyle Rittenhouse : कोर्टाच्या 'या' निकालामुळे अमेरिकेतलं वातावरण का तापलं?

पोर्टलंड ओरेगॉन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पोर्टलंड ओरेगॉन येथे जवळपास 200 लोक रस्त्यांवर उतरले आणि खिडक्यांची तोडफोड केली.

काईल रिटनहाऊस या 18 वर्षीय मुलानं गेल्या वर्षी वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून झालेल्या तणावाच्या काळात दोघांची गोळ्या घालून हत्या आणि एकाला जखमी केलं होतं. हा प्रकार स्वसंरक्षणातून केला असल्याचं त्यानं कोर्टात सांगितलं आहे.

त्यानंतर त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानं अमेरिकेत तणाव निर्माण झाला आहे.

अधिकारी आणि पीडितांच्या कुटुंबीयांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

आता आणखी हिंसाचाराची नव्हे तर न्यायाची आवश्यकता आहे, असं पीडिताच्या वकिलांनी म्हटलं आहे.

शुक्रवारी सायंकाळी ओरेगॉन येथे जवळपास 200 लोक रस्त्यांवर उतरले आणि खिडक्यांची तोडफोड केली. तसंच न्यायालय (जस्टीस सेंटर) जाळण्याची धमकीही दिली. त्यामुळं पोलिसांनी पोर्टलँड शहरात दंगल जाहीर केली.

त्याचबरोबर शिकागो आणि न्यूयॉर्कमध्येही निदर्शनं झाली. पण यापूर्वी अमेरिकेत निर्माण झालेल्या अशांततेच्या वातावरणाच्या तुलनेत हे कमी होतं.

अँथनी हुबरची गर्लफ्रेंड हॅना गिटींग्स आणि जेकब ब्लेकचे काका जस्टिन ब्लेक यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांचं मत मांडलं.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, अँथनी हुबरची गर्लफ्रेंड हॅना गिटींग्स आणि जेकब ब्लेकचे काका जस्टिन ब्लेक यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांचं मत मांडलं.

केनोशा शहरामध्ये ऑगस्ट 2020 मध्ये रिटनहाऊस यांनी गोळ्या घालून 36 वर्षीय जोसेफ रोझनबाम आणि 26 वर्षीय अँथनी हबर यांची हत्या केली. तर 28 वर्षीय गेग ग्रॉसक्रेऊत्झ यांना जखमी केलं होतं. त्यांनी हे स्वसंरक्षणासाठी केल्याचं कोर्टाला सांगितलं. त्यावर त्यांच्यावरील सर्व आरोप वगळण्यात आले.

त्यांनी गोळ्या घातलेले तरुण आणि पुरुष हे सर्व श्वेतवर्णीय होते. जॅकब ब्लेक या कृष्णवर्णीयाला एका श्वेतवर्णीय पोलिस अधिकाऱ्यानं गोळ्या घातल्या होत्या. त्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान ही घटना घडली होती.

हा निकाल देण्यात आला, त्यावेळी जॅकब ब्लेक यांचे काका कोर्टाबाहेर उभे होते.

"आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहोत आणि तेही शांततेच्या मार्गाने करणार आहोत," असं जस्टीन ब्लेक म्हणाले.

रोझनबाम यांचे वकील आणि ग्रॉसक्रेऊत्झ यांनीदेखील शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. "आम्हाला आता शांतता हवी आहे. आणखी हिंसाचार नको," असं ते म्हणाले.

"या निर्णयामुळं, शस्त्र असलेले नागरिक कोणत्याही ठिकाणी त्याचा वापर करून हिंसाचार करू शकतात. तसंच स्वतःला धोका असल्याचा बनाव करून लोकांना रस्त्यांवर गोळ्या घालणं योग्य ठरवू शकतात, असा चुकीचा संदेश जाईल," असं हबर यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं.

रिटनहाऊस हे सध्या गोपनीय ठिकाणी असल्याचं त्यांच्या कुटुंबाच्या प्रवक्त्यांनी सीबीएसशी बोलताना सांगितलं.

"या संपूर्ण परिस्थितीत कोणीही जिंकलेलं नाही. दोन लोकांनी त्यांचा जीव गमावला आहे. त्यांचा पराभव हेऊ शकत नाही," असं ते म्हणाले.

देशात मत-मतांतरं

या निकालानंतर दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

रिटनहाऊस हे जर कृष्णवर्णीय असते, तर त्यांची कधीही निर्दोष मुक्तता झाली नसती, अशी प्रतिक्रिया अनेक लोक देत आहेत.

"हा निकाल म्हणजे न्याय व्यवस्थेतील श्वेतवर्णीयांचा वरचष्मा आणि त्यांना मिळणाऱ्या फायद्यामुळं होणारा विश्वासघात याची आठवण करून देणारा आहे," असं नागरी हक्क संघटना NAACP चे अध्यक्ष डेरीक जॉन्सन एका ट्विटच्या माध्यमातून म्हणाले.

काईल रिटनहाऊस आता अज्ञातस्थळी असल्याचं त्याच्या कुटुंबाने CBS ला सांगितलं.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, काईल रिटनहाऊस आता अज्ञातस्थळी असल्याचं त्याच्या कुटुंबाने CBS ला सांगितलं.

हा धोकादायक आणि अपमानास्पद निकाल हिंसक प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्या शक्तीचा गैरवापर करण्याचं प्रोत्साहन देईल," असं मानवी हक्क कार्यकर्ते अल शार्पटन म्हणाले.

"आमच्या प्राणांचे काहीही मूल्य नाही अस समजणाऱ्यांच्या हातून मृत्यू होणाऱ्या कृष्णवर्णीयांसाठी हे काळे दिवस आहेत," असं त्यांनी एका निवेदनात म्हटलं.

निकाल स्वतःच सर्वकाही सांगत आहे. मात्र गुन्हेगारी न्यायव्यवस्था अधिक न्याय्य बनवण्यासाठी बरंच काम करावं लागणार असल्याचं, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं.

भविष्यातील प्रकरणांसाठी यामुळं तयार होणाऱ्या कायदेशीर मार्गाचा विचार करतादेखील, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

"आज अमेरिकेत तुम्ही कायदा मोडू शकता, लष्करासाठी तयार केलेली शस्त्र बाळगू शकता, लोकांना गोळ्या घालून त्यांची हत्या करू शकता आणि त्यातून बाहेरही पडू शकता," असं कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेव्हिन न्यूसम यांनी म्हटलं.

या निकालावर संतप्त असून काळजीही वाटते, पण ज्युरीनं निकाल दिला आहे, असं राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले.

रिटनहाऊस हा घटनेच्या वेळी 17 वर्षांचा होता आणि कायदेशीररित्या अशाप्रकारचं शस्त्र बाळगण्यास त्याचं वय कमी होतं. तरीही कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या मते तो देशभक्त आणि हिरो असून शस्त्र बाळगणं आणि स्वसंरक्षणासाठी त्याचा वापर करणं हा त्याचा अधिकार आहे, असं मत पक्ष मांडत आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. "जर हे स्वसंरक्षण नाही, तर काहीच स्वसंरक्षण नाही," असं त्यांनी समर्थकांना पाठवलेल्या इमेलमध्ये म्हटलं.

रिपब्लिकन पक्षाच्या काही संसद सदस्यांनी रिटनहाऊसला काँग्रेसची इंटर्नशिप देण्याची इच्छा व्यक्त केली.

"तुम्हाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे, शस्त्र बाळगा, धोकादायकही बना आणि मूल्ये जपा," असं उत्तर कॅरोलिनाचे प्रतिनिधी मॅडिसन कॉथर्न यांनी इन्स्टाग्रामवर म्हटलं.

या निर्णयानंतर उजव्या विचारसरणीचे फॉक्स न्यूजचे होस्ट टकर कार्लसन यांनी रिटनहाऊसच्या विशेष मुलाखतीतील एक व्हीडिओ क्लिप पोस्ट केली. ही मुलाखत सोमवारी प्रसिद्ध होणार आहे.

"ज्युरी योग्य निर्णयावर पोहोचली आहे. स्वसंरक्षण बेकायदेशीर नाही," असं रिटनहाऊस या व्हीडिओमध्ये म्हटला असल्याचं दिसत आहे. निकालानंतर काही क्षणांनंतर दिलेली ही प्रतिक्रिया आहे.

जर मी गंभीर जखमी झालो असतो किंवा मृत पावलो असतो तर काय झालं असतं, अशा भयावह स्वप्नांबद्दलही रिटनहाऊस त्यात बोलत आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)