तब्बल 52 वर्षांनी पटली 'या' बँक चोराची ओळख, सिनेमा पाहून केली होती चोरी

टेड कॉनराड

फोटो स्रोत, US MARSHALS SERVICE

अमेरिकेतील आजवरच्या बँकेतील चोरी किंवा दरोड्याच्या घटनांपैकी सर्वांत गाजलेल्या घटनांपैकी एका घटनेच्या 52 वर्षांनंतर यामागं असलेल्या व्यक्तीची माहिती मिळाली आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

टेड कॉनराड अमेरिकेच्या ओहायो राज्यातील क्लिव्हलँड शहरात सोसायटी नॅशनल बँकेत काम करत होते. अधिकाऱ्यांच्या मते त्यांनी जुलै 1969 मध्ये या बँकेत मोठी चोरी केली होती.

त्यावेळी कॉनराड बँकेतून 2 लाख 15 हजार डॉलर घेऊन फरार झाले होते. सध्याच्या काळात या रकमेचं मूल्य 17 लाख डॉलर एवढं असतं.

युएस मार्शल सर्व्हिसच्या तपास अधिकाऱ्यांच्या मते, या घटनेनंतर कॉनराड अत्यंत शांत आणि सरळमार्गी जीवन जगले. यावर्षी मे महिन्यात फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळं त्यांचं निधन झालं. त्यांनी बँकेत चोरी केली त्यावेळी त्यांचं वय अवघं, 20 वर्षं होतं.

बँकेच्या अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेचा त्यांनी फायदा उचलला आणि एका शुक्रवारी सायंकाळी कागदाच्या एका बॅगमध्ये पैसे भरून अगदी शांतपणे ते बँकेतून निघून गेले.

दोन दिवसांनंतर बँकेच्या इतर कर्मचाऱ्यांना पैशाच्या चोरीबाबत माहिती मिळाली तोपर्यंत कॉनराड फरार झाले होते. त्यानंतर 50 वर्ष तपास संस्था त्यांना शोधत होत्या. त्यांच्या कथा 'अमेरिकाज मोस्ट वॉन्डेट' आणि 'अनसॉल्व्हड मिस्ट्री' या टीव्ही शोमध्येही दाखवण्यात आल्या.

कॉनराड यांनी बँकेतील मित्रांना चोरी करण्याचा विचार असल्याचं सांगितलं होतं आणि ते अगदी सोपं आहे, असा दावा केला होता, असं मार्शल सर्व्हिसचं मत आहे. त्यांना 1968 मधील स्टिव्ह मॅक्वीन यांचा चोरीवर आधारित 'द थॉमस क्राऊन अफेयर' चित्रपट खूप आवडत होता. बँकेतून पैसे चोरी करण्याची तयारी करताना त्यांनी अनेकदा हा चित्रपट पाहिला होता.

डॉलर्स

फोटो स्रोत, Getty Images

कॉनराड यांनी त्यांचं नाव बदलून थॉमस रन्डेल केलं होतं आणि चोरीनंतर लगेचच ते वॉशिंग्टन आणि लॉस एंजल्सला पळून गेले, असं मार्शल सर्व्हिसनं म्हटलं. काही काळानंतर ते बोस्टनच्या बाहेरच्या भागात कायमस्वरुपी स्थायिक झाले. हे ठिकाण बँकेपासून 100 किलोमीटर अंतरावर होतं.

त्यानंतर ते अत्यंत शांत आणि सरळमार्गी जीवन जगत होते, असं तपास करणाऱ्यांचं मत आहे. गेली 40 वर्षं ते व्यावसायिक गोल्फपटू आणि जुन्या कारचे डिलर म्हणून जगले, असं न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

हे प्रकरण अनेक दशकांपर्यंत थंड होतं. पण जेव्हा तपासकर्त्यांनी एका वृत्तपत्रात 'रन्डेल' नावासह त्यांच्या मृत्यूची बातमी वाचली तेव्हा तपासाला वेग आला. 1960 च्या दशकादरम्यान त्यांनी सादर केलेली कागदपत्रं आणि सध्याची कागदपत्रं जुळवून पाहिली असता. रन्डेल आणि कॉनराड दोन्ही एकच व्यक्ती असल्याचं लक्षात आलं.

मार्शल पीटर एलियट या प्रकरणाच्या प्रमुख तपास अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. अशा गुन्हेगारांचा शोध घेण्याची कला त्यांना वडिलांकडून अवगत झाली. त्यांचे वडील कायम हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असायचे की, एखादा व्यक्ती नीडर चोर कसा बनतो. त्यामुळं ते या प्रकरणाच्या तपासातही सहभागी झाले होते.

"माझ्या वडिलांनी कधीही कॉनराड यांचा शोध बंद केला नाही. 2020 मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना या केसचा तपास लागावा हेच वाटत होतं. आज मी केलेला तपास आणि अमेरिकेच्या मार्शल सर्व्हिसमुळं अनेक दशकांपासूनचं हे प्रकरणं सोडवलं आहे, हे समजल्यानंतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल," असं एलियट म्हणाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)