अमरावती दंगल: रझा अकादमी काय आहे? त्यांनी दंगल खरंच भडकवली का?

अमरावती

फोटो स्रोत, BBC/Nitesh Raut

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

"रझा अकादमी हे महाविकास आघाडीचं पिल्लू आहे. दंगलीच्या मागे तेच आहेत. इस्लामच्या नावाखाली राज्यात तणाव निर्माण करणारी संघटना आहे. आमच्याकडे रझा अकादमीची माहिती आहे. लोकांना भडकवलं गेलं. आमच्याकडे त्यांच्या कंप्लेंट्स आहेत," असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उलटा आरोप केलाय की 'रझा अकादमी हे भाजपचंच पिल्लू असून भाजपला जे हवं असतं तेच रझा अकादमी करते.'

रझा अकादमीने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. जे कमजोर असतात त्यांनाच लक्ष्य केलं जातं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बीबीसी मराठीशी बोलताना रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी म्हणाले, "आमचा या हिंसाचाराशी काहीही संबंध नाही. आम्ही केवळ मुंबईत बंद पुकारला होता. शांततेत बंद पाळावा असं आवाहन मुंबईत आम्ही केलं होतं. इतर ठिकाणी झालेलं आंदोलन आम्ही केलेलं नाही. हिंसाचाराला आमचं समर्थन नाही."

जहाल आणि पुराणमतवादी रझा अकादमीवर अशाप्रकारे तणाव निर्माण करण्याचा आरोप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2012 मध्ये दक्षिण मुंबईतील आझाद मैदान येथे एका आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यासाठी रझा अकादमी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता.

आता पुन्हा एकदा राज्यातील हिंसाचाराच्या घटनांमागे रझा अकादमी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यानिमित्त रझा अकादमीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

रझा अकादमी म्हणजे काय आहे? ही संस्था कोणाची आहे? त्यांची कार्यपद्धती काय? रझा अकादमी राजकीय पक्षाशी संबधित आहे का?

रझा अकादमी कुठे आणि कशी सुरू झाली?

रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांनी 1978 साली मुंबईत रझा अकादमीची स्थापना केली. ते एक सुन्नी पंथीय मुस्लीम नेते आहेत.

रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी

फोटो स्रोत, Twitter / @razaacademyho

फोटो कॅप्शन, रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी

अहमद रझा खान यांची पुस्तकं छापण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली असं सईद नुरी सांगतात.

ते म्हणाले, "अहमद रझा खान हे एक विद्वान लेखक होते. 1857 साली उत्तर प्रदेशातील बरेली शहरात त्यांचा जन्म झाला. त्यांनी इस्लाम धर्म, विज्ञान, गणित अशा 60 हून अधिक विषयांवर 1 हजारहून अधिक पुस्तकं लिहिली. ते बरेलीचे असल्याने त्यांना अहमद रझा खान बरेलवी म्हणूनही ओळखलं जायचं."

रझा अकादमीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक जनजागृती आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी संस्था काम करते. पण वास्तवात रझा अकादमी चर्चेत येते तिच्या सदस्यांनी वेळोवेळी उदारमतवादी लेखक-कलाकारांविरोध केलेल्या केलेल्या निदर्शनांमुळे आणि काढलेल्या फतव्यांमुळे.

रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी

रझा अकादमीचं अधिकृत ट्विटर हँडल असून त्यावर दिलेल्या माहितीनुसार, रझा अकादमी ही भारतीय सुन्नी मुस्लिमांची बरेलवी संस्था असून विविध प्रकाशकांच्या आणि पुस्तकांच्या माध्यमातून इस्लामी विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे.

मुंबईतील मोहम्मद अली रोड येथे रझा अकादमीचं कार्यालय आहे. तसंच मालेगाव, भिवंडीसह देशभरात रझा अकादमीच्या जवळपास 35 शाखा आहेत.

रझा अकादमीचे किती सदस्य आहेत किंवा किती जण या संस्थेत काम करतात? यावर उत्तर देताना सईद नुरी म्हणाले, "ज्या भागात काही उपक्रम किंवा काम असल्यास काही लोकांकडे त्याची जबाबदारी दिली जाते."

ते पुढे म्हणाले, "आतापर्यंत अहमद रझा खान यांची आम्ही 850 पुस्तकं छापली आहेत. मुस्लीम धर्माचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा यासाठी आम्ही काम करतो. परंतु केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर अन्याय करणाऱ्या कुणाहीविरोधात आम्ही आवाज उठवला आहे."

"पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्याच्या निषेधार्थ आम्ही भेंडी बाजार बंद पुकारला होता, काश्मीर पंडितांविरोधातील हल्ल्याविरोधात आम्ही धरणा दिला होता. पूरपरिस्थिती आणि आपात्कालीन स्थितीमध्ये रझा अकादमी पीडितांसाठी मदतकार्य करते," असंही ते सांगतात.

"धर्माचं रक्षण करणं आमचं काम आहे. परंतु आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच आमचं काम करतो," असं त्यांनी स्पष्ट केलं.

वादग्रस्त घटना

2012 मध्ये रझा अकादमीचं नाव चर्चेत आलं ते मुंबईतल्या आझाद मैदान येथील आंदोलन आणि त्यानंतरच्या हिंसाचाराच्या घटनांमुळे.

आसाम आणि म्यानमार येथील काही घटनांच्या निषेधार्थ 2012 मध्ये रझा अकादमी आणि काही संघटनांनी आझाद मैदान इथे आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यात दोन जणांचा मृत्यू झाला तर काही पोलिसांसह अनेकजण जखमी झाले.

आसाम आणि म्यानमार येथील काही घटनांच्या निषेधार्थ 2012 मध्ये रझा अकादमी आणि काही संघटनांनी आझाद मैदान इथे आंदोलन केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Imgaes / PUNIT PARANJPE

फोटो कॅप्शन, आसाम आणि म्यानमार येथील काही घटनांच्या निषेधार्थ 2012 मध्ये रझा अकादमी आणि काही संघटनांनी आझाद मैदान इथे आंदोलन केलं होतं.

यादरम्यान झालेली 3 कोटी रुपयांची नुकसान भरपाई रझा अकादमी आणि इतर संघटनांनी द्यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस जारी करण्यात आली होती.

परंतु या मोर्चाचं आयोजन आम्ही केलं नव्हतं आणि त्यामुळे एकही रुपया आम्ही देणार नाहीत, अशी भूमिका तेव्हा रझा अकादमीने घेतली होती.

यासंदर्भात बीबीसी मराठीने मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवाटकर यांना संपर्क साधला. याविषयाची ताजी माहिती कार्यालयाकडून लवकरच दिली जाईल असं त्यांनी सांगितलं.

रझा अकादमी ही पुराणमतवादी असल्यामुळे आधुनिक विचाराच्या लेखक आणि कलाकारांना उग्रपणे विरोध करत आली आहे.

2000 साली बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या कार्यक्रमाला रझा अकादमीने विरोध दर्शवला. त्यांच्या लिखाणामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली.

मूळचे पाकिस्तानचे आणि कॅनडा येथे वास्तव्यास असलेल्या प्राध्यापक आणि माजी राजकीय नेते मोहम्मद ताहिर उल कादरी यांचं 2012 साली मुंबईत होणारं भाषण रद्द करण्याची मागणी रझा अकादमीने केली होती.

'इस्लाम धर्म शांतता आणि करुणेची शिकवण देतं' हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. मोहम्मद ताहिर उल कादरी यांचं भाषण मुंबईत होणं धोकादायक असून त्यांचे काश्मीरबाबत विचार वादग्रस्त आहेत असा दावा रझा अकादमीने केला होता.

तर 2015 मध्ये अकादमीने संगीतकार ए.आर रहमान आणि इराणी सिनेनिर्माता माजिद माजिदी यांच्या 'मोहम्मद-मेसेंजर ऑफ गॉड' या सिनेमाविरोधात फतवा जारी केला होता.

त्यापूर्वी 1999 साली ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांच्या 'सॅटॅनिक व्हर्सेस' या कांदबरीलाही रझा अकादमीने विरोध दर्शवला होता.

अलीकडच्या काळात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर धार्मिक स्थळं खुली करण्यात आली. यावेळी रझा अकादमीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनातील मशीद प्रार्थनेसाठी खुली करावी अशी मागणी केली. यानंतर शुक्रवारी राजभवनाबाहेर यासाठी गर्दी झाल्याचंही वृत्त समोर आलं.

महाराष्ट्रात हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप

त्रिपुरातील हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमरावती, मालेगाव, नांदेड, औरंगाबादसह इतर काही ठिकाणी मुस्लीम संघटनांनी बंद पुकारला होता. काही ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनाला अमरावती, मालेगावसह काही ठिकाणी हिंसक वळण लागलं.

अमरावतीमध्ये हिंसाचाराच्या सगळ्यांत जास्त घटना घडल्या. काही ठिकाणी दुकानं फोडण्यात आली तर काही ठिकाणी दगडफेक झाली. यात पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचंही वृत्त आहे.

या घटनांनंतर दुसऱ्या दिवशी भाजपने अमरावतीसह काही ठिकाणी मोर्चा काढला. अमरावतीत भाजप नेते अनिल बोंडे यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं आणि त्यानंतर त्यांच्यासह 60 जणांना अटक करण्यात आली.

या हिंसाचाराच्या मागे रझा अकादमी असल्याचा आरोप काही नेत्यांनी केला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी रझा अकादमीविरोधात तक्रार केली असून रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

अमरावती

फोटो स्रोत, BBC / Nitesh Raut

फोटो कॅप्शन, अमरावतीमधील दृश्यं

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी रझा अकादमी आणि भाजपवर निशाणा साधला. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांचा रझा अकादमीच्या सदस्यांसोबतचा फोटो नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. तर रझा अकादमी भाजपसाठी काम करते असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.

आशिष शेलार यांनी मात्र मलिक यांनी दाखवलेला फोटो 2016-17 सालचा असल्याचं स्पष्ट केलं.

बीबीसी मराठीशी बोलताना रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून या सगळ्या घटनांचे राजकारण केलं जात असल्याचं म्हटलं आहे.

ते म्हणाले, "आम्ही केवळ मुंबईत बंदची हाक दिली होती. बंद करण्यासाठी कोणावरही जबरदस्ती करण्यात आली नाही. इतर ठिकाणी उत्स्फूर्त आंदोलन करण्यात आलं. पण त्याच्याशी आमचा संबंध नाही. आम्ही या घटनांचा निषेध करतो. दोषींवर कायद्यानुसार कारवाई व्हावी," अशी मागणी त्यांनी केली.

"आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. सरकार कोणाचेही असले तरी आम्ही आमच्या मागण्या आणि भूमिका त्यांच्यासमोर मांडत असतो," असंही ते पुढे म्हणाले.

नितेश राणे यांनी रझा अकादमीवर राज्य सरकारने बंदी घालावी अशी मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना सईद नुरी म्हणाले, "त्यांना सत्य माहिती नसेल. त्यांना माहिती मिळाल्यावर त्यांना खरं कळेल. आम्ही कायद्यानुसार आंदोलन केलं आहे. राजकारणाविषयी आम्हाला काही बोलायचे नाही."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)