वैष्णवी देवतळे: चंद्रपुरातली राष्ट्रवादीची 'युवती' कशी चोरायची दुचाक्या?

फोटो स्रोत, Facebook@Vashnavi Deotale
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
वाहनचोरांमुळे त्रस्त असलेल्या चंद्रपूर शहरामध्ये एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने वाहनचोरांच्या एका टोळीला अटक केली आहे.
या टोळींमध्ये तरुणांबरोबर एका तरुणीचाही समावेश आहे. ही तरुणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसशी संबंधित असल्याची माहिती यामध्ये स्पष्ट झाली आहे.
अटक झालेल्या या युवतीचे नाव वैष्णवी देवतळे असे आहे. ती आपल्या दोन साथीदारांसह वाहनांची चोरी करायची असं पोलिसांनी जाहीर केलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे.
या युवतीला राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या महिन्यातच निलंबित केले होते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूरचे जिल्ह्याध्यक्ष राजीव कक्कड यांनी केला आहे.
दुचाकीच्या हँडलला लॉक नसल्याचे पाहून ती आपल्या साथीदारासह दुचाकी चोरायची.
या गुन्ह्याची शंका कशी आली याबद्दल माहिती देताना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी जितेंद्र बोबडे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "एक व्यक्ती संशयास्पदरित्या दुचाकीची विक्री करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. म्हणजेच 50 ते 70 हजार रुपयांची दुचाकी 5 ते 10 हजार रुपयांमध्ये विकत असल्याचे आम्हाला समजले. त्यानंतर त्या व्यक्तीला पकडल्यावर ही माहिती उघड झाली. यातील वैष्णवी देवतळे ही आरोपी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची पदाधिकारी असल्याचं स्पष्ट झालं."
मुख्य आरोपीला पकडल्यानंतर त्याने आपण कशी चोरी करायचो हे सांगितले.
अशी करायची चोरी?
हे दोघे एखादी दुचाकी ठेवणाऱ्या इसमावर लक्ष ठेवत. त्यानंतर आरोपी आणि त्याची मैत्रीण ती दुचाकी गाडी धक्का मारून थोडे दूर नेत असत.

फोटो स्रोत, Getty Images
चोरीच्या दुचाकीवर त्याची मैत्रीण स्वतः बसत असे व तिचा सहकारी आरोपी त्याच्या गाडीने त्या चोरलेल्या दुचाकीला धक्का मारून (टोईंग करून) नेत असत.
तेथे त्यांचा तिसरा साथीदार चोरीच्या गाड्यांचे नंबर प्लेट बदलून व दुचाकीच्या खोट्या किल्ल्या तयार करून देत असे. त्यानंतर या गाड्या विकल्या जात.
नंबरप्लेट तयार करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या दुचाकीचा आधार घ्यायचे. म्हणजेच एखाद्या कंपनीची पांढरी दुचाकी चोरली की त्याच कंपनीच्या दुसऱ्या एका पांढऱ्या दुचाकीचा नंबर या चोरलेल्या दुचाकीला द्यायचे अशी माहिती सपोनी जितेंद्र बोबडे यांनी दिली.

फोटो स्रोत, Chandrapur Police
या गुन्हयात आरोपींकडून रामनगर पोलीस स्थानक येथील एकूण 5 गाडया चंद्रपूर शहर पोलीस स्थान येथील 3 गाड्या, बल्लारशा पोलीस स्थानक येथील 1 गाडी तसेच इतर 2 दुचाकी वाहन अशा एकूण 11 दुचाकी मोपेड गाड्या अंदाजे किंमत एकूण 6,30,000/- रू. चा माल हस्तगत करण्यात आलेला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सपोनी जितेन्द्र बोबडे, पो.उप नि. सचिन गदादे, पो. हवा. संजय आतकुलवार, पो. कॉ. नितीन रायपूरे, गोपाल आतकूलवार, कुंदन बावरी, प्रांजल झिलपे, रविंद्र पंधरे, म.पो. शि. अपर्णा मानकर यांच्या पथकाने केली.
'सदर युवतीला आधीच पक्षातून निलंबित करण्यात आले आहे'
या युवतीची पक्षाने गेल्या महिन्यातच हकालपट्टी केली आहे अशी माहिती चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी दिली आहे.
"संबंधित युवती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती पण तिला पक्षाने 20 ऑक्टोबर 2021 रोजी निलंबित केले होते. ज्यावेळी ती पक्षात आली होती तेव्हा तिचे पोलीस व्हेरिफिकेशन आम्ही केले होते. त्यावेळी तिच्या नावावर कुठलाही गुन्हा नव्हता किंवा तिच्या नावे तक्रार देखील नव्हती," अशी माहिती चंद्रपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी बीबीसीला दिली.

"वारंवार सूचना देऊन देखील पक्षशिस्त न पाळणे, तसेच पक्षाच्या विरोधात कारवाई करणे यास्तव आपल्याला संघटनेतून निलंबित करण्यात येत आहे," असे पत्र तिला राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी 20 ऑक्टोबर रोजी दिले होते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








