HIV: या महिलेच्या शरीराने स्वतःच पळवून लावला व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मिशेल रॉबर्ट्स
- Role, आरोग्य संपादक, बीबीसी न्यूज ऑनलाईन
अर्जेंटिनामधील एका महिलेनं कोणतीही औषधं किंवा उपचारांशिवाय एचआयव्ही (HIV)पासून सुटका मिळवल्याचं समोर आलं आहे. अशा प्रकारची आजपर्यंतची जगातली ही केवळ दुसरी घटना आहे.
या रुग्णाच्या रोगप्रतिकारशक्तीनं या विषाणूचा खात्मा केला असं डॉक्टरांचं मत आहे.
अर्काईव्हज ऑफ इंटर्नल मेडिसीन रिपोर्ट्सनुसार या महिलेच्या शरीरातील एका अब्जपेक्षा जास्त पेशींची तपासणी करण्यात आली. पण त्यात HIV च्या संसर्गाचे काहीही पुरावे आढळले नाहीत.
जर या पद्धतीचा वापर करता आला तर, त्या माध्यमातून HIV नष्ट करण्याचा अथवा त्यावर प्रभावी उपचाराचा मार्ग सापडू शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
HIV चा नायनाट
काही लोक HIV बद्दलच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीसह जन्माला येत असतात याचेच आणखी काही पुरावे या निष्कर्षातून समोर आले आहेत.
काही जणांमध्ये अशी काही जनुकं (जीन्स) असतात जी याचा संसर्ग रोखू शकतात.
'इस्परांझा' रुग्णांसह इतरांमध्ये HIVची लागण होते, पण नंतर ते याचे विषाणू नष्ट करतात.
मात्र HIV ची लागण असलेल्या बहुतांश रुग्णांना आयुष्यभर अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (ART) घेण्याची आवश्यकता असते.
त्यांनी जर हे उपचार किंवा औषधं घेणं थांबवलं, तर हा सुप्त विषाणू पुन्हा डोकं वर काढून इतर काही समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकतो.
गेल्या काही वर्षांत, "Elite controllers" विषाणू दडपून टाकण्यास सक्षम ठरत असल्याचं अहवालात समोर आलं आहे, मात्र तरीही यावर अद्याप औषध नाही.
लंडनमधील अॅडम कॅस्टिलेजो यांच्या शरीरातूनही विषाणू बाहेर पडला होता.
लंडनमधील अॅडम कॅस्टिलेजो यांना कॅन्सरवरील स्टेम सेल उपचारासाठी दाता (डोनर) मिळाल्यानंतर त्यांच्या HIV साठीच्या रोजच्या गोळ्याही बंद झाल्या होत्या.
कॅन्सरच्या उपचारादरम्यान त्यांच्या शरीरातील HIV चा संसर्ग झालेल्या पेशी नष्ट करण्यात आल्या आणि बदलण्यात आल्या.
सुदैवानं त्यांचे डोनर हे जगातील अशा 1 टक्के लोकांपैकी होते ज्यांच्या शरीरात HIV चा संसर्ग रोखणारी किंवा पेशींमध्ये संसर्ग पसरवणारी जनुके (जीन्स) असतात.
मात्र तरीही, कॅस्टिलेजो यांना यामुळं किती दिवस फायदा मिळणार हे निश्चितपणे सांगता येणार नाही.
'निर्जंतुकीकरण उपचार'
मात्र एस्परंझाच्या रुग्णामध्ये आठ वर्षांपेक्षा अधिक काळासाठी निदान न होणारा HIV आढळला नाही.
सॅन फ्रान्सिस्को येथील लॉरील विलेनबर्ग यादेखील त्यांच्या शरीरातील रोग प्रतिकार प्रणालीमुळं स्वतःच HIV मधून बऱ्या झाल्याचं आढळलं.
यामुळं इतर रुग्णांसाठी 'निर्जंतुकीकरण उपचार' च्या माध्यमातून एक आशा निर्माण झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"ज्या लोकांना स्वतः हे शक्य होत नाही, अशांसाठी निर्जंतुकीकरण उपचार हा एक मार्ग ठरू शकतो," असं मत मॅसॅच्युएट्स जनरल हॉस्पिटल, मॅसॅच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि हार्वर्डच्या रॅगन इन्स्टिट्यूटचे मुख्य संशोधक डॉ. शु यू यांनी म्हटलं.
"आम्ही आता लसीकरणाच्या माध्यमातू ART असलेल्या व्यक्तींमध्ये अशा प्रकारची रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्याच्या शक्यतेच्या दिशेनं विचार करत आहोत. त्या माध्यमातून संबंधितांच्या प्रतिकार शक्तीला अशा प्रकारच्या विषाणूला ART शिवाय नियंत्रित करण्याचं प्रशिक्षण देणं हा त्यामागचा उद्देश आहे.
'नष्ट होणारा संसर्ग'
एखादी व्यक्ती HIV मधून पूर्णपणे बरा होऊ शकतो असं म्हणणं जवळपास अशक्य असल्याचं ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक जॉन फ्रेटर यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं. हे सिद्ध करण्यासाठी सध्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभ्यासकांनी यासाठी त्यांना शक्य ते सर्व केल्याचं ते म्हणाले.
"रुग्ण खरंच आपोआप यातून बरा झाला की, त्यांना दुसरा एखाद्या प्रकारचा संसर्ग झाला होता, जो नष्ट होण्याच्या मार्गावर होता आणि त्यामुळंच ते लवकर बरे झाले तर नाही? हा महत्त्वाचा प्रश्न आहे," असं ते म्हणाले.
"त्यांना लागण झालेली होती हे त्यांच्या प्रतिकारशक्तीवरून अगदी स्पष्ट होतं. त्यामुळं त्यांच्याबाबत असा प्रश्नच नव्हता.
"दरम्यान, याठिकाणी अशाच प्रकारचे आणखी काही रुग्ण नक्कीच असतील, ज्यांच्या मार्फत HIV वरील उपचाराबाबत बरंच काही शिकायला मिळू शकेल."
या अभ्यासामुळं रोगप्रतिकार यंत्रणेसंबंधी सध्या विकसित होत असलेल्या उपचार पद्धतीला फायदा होणार असल्याचं, इम्पेरियल कॉलेज लंडनमधील, HIV औषधी तज्ज्ञ प्राध्यापिका सारा फिडलर म्हणाल्या.
सध्या HIV वरील औषधं अत्यंत प्रभावी आहेत आणि भविष्याचा विचार करता उपचार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. जगभरात ART ची उपलब्धता हे त्यात प्राधान्याचं असल्याचं, कार्डिफ युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलचे डॉक्टर अँड्र्यू फ्रीडमन म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








