गीता रामजी : HIV निर्मूलनासाठी झटणाऱ्या भारतीय मूळच्या शास्त्रज्ञाचं कोरोना व्हायरसमुळे निधन

गीता रामजी

फोटो स्रोत, Aurum Institute

HIVचा फैलाव रोखण्यासंदर्भात मोलाचं योगदान देणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञ गीता रामजी यांचं कोरोनामुळे निधन झालं.

HIV आणि टीबीविरोधात काम करणाऱ्या ऑरम इन्स्टियूटमध्ये डॉ. रामजी मुख्य वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. डर्बनजवळच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं.

मूळ भारतीय वंशाच्या रामजी यांना जगभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे.

महिलांमध्ये HIVची लागण होऊ नये यासाठी यासाठी अनेक वर्षं त्यांनी संशोधन केलं, असं रामजी यांच्या सहकारी गॅव्हिन चर्चयार्ड यांनी सांगितलं.

"जगाला त्यांची गरज असतानाच त्यांचं जाणं चटका लावणारं आहे. त्यांच्या निधनाने वैद्यकीय जगताचं, मानवजातीचं मोठं नुकसान झालं आहे," अशा शब्दांत युएन एड्स विनी ब्यानयिमा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जगभरातील सर्वाधिक HIVग्रस्त रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

कोरोना
लाईन

डॉ. रामजी यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्र तसंच जगभरात HIVविरोधात लढा देणाऱ्या मोहिमेचा आधारवड निखळला, अशा शब्दांत दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्राध्यक्ष डेव्हिड माबुझा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

HIVसारख्या दुर्धर आजाराला रोखण्यासाठी लढणाऱ्या मोहिमेत त्या अग्रस्थानी होत्या. त्यांच्या जाण्याने आपण एक वैद्यकीय योद्धा गमावला आहे. कोरोनासारखा संसर्गजन्य रोग त्यांना व्हावा हे दुर्देव आहे. कोरोनाचा संसर्ग कमीत कमी करून तसंच एचआयव्हीबाधितांची संख्या शून्यावर आणणं हीच डॉ. रामजी यांना खरी आदरांजली ठरेल, असं माझूबा पुढे म्हणाले.

"गीता अतिशय धडाडीच्या होत्या. त्या जिद्दी आणि लढवय्या होत्या. त्यांनी एखादी गोष्ट ठरवली तर कितीही अडथळे आले तरी त्या निग्रहाने पूर्णत्वास नेत", असं ऑरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख चर्चयार्ड यांनी बीबीसीच्या पुम्झा फिहलानी यांच्याशी बोलताना सांगितलं. चर्चयार्ड आणि डॉ. रामजी यांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं.

"समाजाच्या शेवटच्या स्तरातील महिलांना वैद्यकीय पायाभूत सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केले. त्यांच्याबद्दलची ही आठवण चिरंतन राहील" असे त्यांनी सांगितलं.

HIVसंदर्भातील डॉ. रामजी यांच्या योगदानाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली होती. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीन, वॉशिंग्टन विद्यापीठ तसंच केपटाऊन विद्यापीठ यांच्यातर्फे त्यांना मानद प्राध्यापकपद देण्यात आलं होतं.

दोन वर्षांपूर्वी युरोपियन डेव्हलपमेंट क्लिनिकल ट्रायल्स पार्टनरशिप्स यांच्यातर्फे त्यांना सर्वोत्कृष्ट महिला शास्त्रज्ञ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

पुरस्कारानंतर डॉ. रामजी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या, ‘या पुरस्काराने मला प्रचंड समाधानी वाटते आहे. एचआयव्ही रोखण्यासाठी क्लिनिकल रिसर्च क्षेत्रात गेले अनेक दशकं मी केलेल्या कामाची दखल घेण्यात आली आहे. जगातल्या सर्वोत्कृष्ट महिला शास्त्रज्ञांच्या मांदियाळीत माझं नाव घेतलं गेलं आहे हे खूपच सुखावणारं आहे’.

यशस्वी कारकीर्द घडवणारी दोन मुलं आणि खंबीर साथ देणारा नवरा यांच्याविषयी डॉ. रामजी बोलल्या होत्या.

विज्ञान शाखेत कारकीर्द करू इच्छिणाऱ्या मुलींसाठी त्यांना एक मंत्र दिला होता- कामाची प्रचंड आवड, निष्ठा, मेहनत घेण्याची तयारी, संयम हे असेल तरच विज्ञान क्षेत्रात सर्वोत्तमाचा ध्यास घेता येतो.

जगाने दखल घेतली, सन्मानित केलं असा आफ्रिकन शास्त्रज्ञ असणं देशासाठी महत्त्वाचं होतं. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे असं प्राध्यापक चर्चयार्ड म्हणाले.

सक्षम असं कौशल्यवान मनुष्यबळ तयार करणं, ज्ञान इतरांना देणं या तत्वांवर डॉ. रामजी यांची श्रद्धा होती. त्यांनी आयुष्यभर ही तत्वं जपली. म्हणूनच त्यांच्या पश्चात मोठं कार्य उभं आहे तसंच त्यांचा वारसा चालवणारी ज्ञानी माणसं त्यांनी दिलेली मशाल पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहेत.

HIV, टीबी आणि अगदी कोरोनाविरुद्धही त्यांनी प्रखरपणे संघर्ष केला. एचआयव्हीचा बीमोड करण्यासाठी त्यांनी केलेलं काम देशवासीयांसाठी वस्तुपाठ असेल. अविरत प्रयत्न करत राहा, काम अर्धवट सोडू नका हा संदेश त्यांनी आपल्याला दिला आहे. आम्हीही कोरोनाविरोधातली लढाई सोडून देणार नाही. लढत राहू, आजारावर उपायासाठी संघर्ष करत राहू.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)