रशियाचं स्वस्त तेल भारतामार्गे युरोपियन बाजारपेठेत पोहोचवलं जातंय, पण याचा फायदा नेमका कोणाला?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, दीपक मंडल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युरोपियन महासंघाने रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यास सुरुवात केली. पुढे रशियाने आपली कारवाई चालूच ठेवल्याने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात युरोपियन महासंघाने रशियाच्या कच्च्या तेलावर निर्बंध लादले.

त्यानंतर पुढच्या दोन महिन्यात रशियाच्या शुद्ध तेल उत्पादनांवर निर्बंध लादण्यात आले. हे निर्बंध लादण्यापूर्वी युरोप त्यांच्या गरजेच्या 30 टक्के तेलाची खरेदी रशियाकडून करायचा.

असं म्हटलं जातंय की, रशियन तेलावर निर्बंध लादल्यामुळे युरोपियन महासंघासह संपूर्ण युरोपमध्ये पुरवठ्यात घट निर्माण होऊ शकते. आधीच युरोपमध्ये महागाई वाढली आहे, त्यात तेलाची घट युरोपसाठी चिंतेचं कारण ठरू शकते.

पण या निर्बंधांनंतरही युरोपला रशियन तेलाचा पुरवठा सुरूच आहे.

आता हे तेल भारतामार्गे युरोपियन बाजारपेठेत पोहोचवलं जातंय.

रशियातील कच्चं तेल थेट युरोपात पोहोचत नसल्याने तेथील तेल शुद्धीकरण कंपन्यांनसमोर उत्पादनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पण भारतातील खाजगी तेल शुद्धीकरण कंपन्यांनी याकडे एक संधी म्हणून पाहिलंय.

उपलब्ध आकड्यांनुसार, गेल्या वर्षी जानेवारीपर्यंत भारतातून युरोपियन महासंघातील देशांमध्ये रिफाईन्ड पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात सलग पाच महिने वाढत राहिली. या महिन्यात निर्यात 19 लाख टनांपर्यंत पोहचलीय.

भारताच्या तुलनेत पेट्रोलियम पदार्थांच्या उत्पादनांत युरोपियन महासंघ आघाडीवर

भारताच्या तुलनेत बघायचं झाल्यास, पेट्रोलियम पदार्थांच्या उत्पादनांत युरोपियन महासंघ आघाडीवर आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 मधील हा आकडा सर्वाधिक होता. एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत भारतातून युरोपमध्ये 1.16 कोटी टन रिफाइंड पेट्रोलियमची निर्यात करण्यात आली.

त्यामुळे भारतातून ज्या 20 प्रदेशांमध्ये रिफाइंड पेट्रोलियम पदार्थांची निर्यात होते त्यात युरोपियन महासंघ आघाडीवर पोहोचलं आहे.

या कालावधीत भारतातून झालेल्या पेट्रोल उत्पादनांच्या एकूण निर्यातीपैकी 15 टक्के उत्पादन एकट्या युरोपियन बाजारपेठेत निर्यात करण्यात आलं. पुढे ही निर्यात वाढून 22 टक्क्यांपर्यंत गेली.

ब्लूमबर्गने दिलेल्या एका बातमीनुसार, युरोपियन महासंघाने रशियाच्या तेलावर जेव्हा पासून निर्बंध लादलेत तेव्हापासून भारतातील रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात वाढली आहे. आणि आता भारत सर्वांत मोठा पुरवठादार देश बनण्याच्या मार्गावर आहे.

अमेरिकेने आणि नंतर युरोपने रशियावर निर्बंध लादले. मात्र भारताने रशियाकडून सवलातीच्या दरात कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये रशिया-युक्रेन युद्धाची सुरुवात झाली. त्यावेळी भारत रशियाकडून तेलाची केवळ एक टक्का आयात करायचा. पण पुढील एका वर्षात म्हणजेच फेब्रुवारी 2023 मध्ये हा आकडा वाढून 35 टक्क्यांवर पोहोचलाय. पूर्वी भारत रशियाकडून दररोज 16.2 बॅरल तेल खरेदी करत होता.

2023 च्या मार्च महिन्यात रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी सांगितलं की, रशियाने मागील वर्षभरात भारताला तेलाचा पुरवठा वाढविला असून, तेल विक्री 22 टक्क्यांनी वाढली आहे. चीन आणि अमेरिकेनंतर भारत तेलाचा तिसरा सर्वात मोठा खरेदीदार आहे. पण अमेरिकेने आणि युरोपियन महासंघाने घातलेल्या निर्बंधांनंतर रशियाने आपलं तेल स्वस्त केलं. यावर भारताला तेलाचा साठा वाढवण्याची चांगली संधी मिळाली.

रशियातून तेलाचा पुरवठा वाढल्याने त्याचा फायदा भारतातील खासगी तेल शुद्धीकरण कंपन्यांना होतोय. आणि युरोपकडे ते तेलाची बाजारपेठ म्हणून पाहतायत.

तेल शुद्धीकरण कंपन्यांचा फायदा

जगात सर्वाधिक प्रमाणात तेल शुद्धीकरण करणाऱ्या देशांपैकी भारत हा एक देश आहे. भारतातील तेल शुध्दीकरण कंपन्यांनी तेलाच्या पुरवठ्यात वाढ केल्यामुळे युरोपियन बाजारपेठेत तेलाचं संकट ओढवलं नाही. निर्बंधांमुळे तेलाच्या किंमती भडकतील अशी भीती व्यक्त केली जात होती.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

भारत हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. पण भारताची तेल शुद्धीकरण क्षमता देशांतर्गत मागणीपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. त्यामुळेच अतिरिक्त पुरवठा युरोप मधील बाजारपेठेत वळवला जातोय.

यात भारतीय तेल शुध्दीकरण कंपनी रिलायन्स आणि रशियन एनर्जी ग्रुप रोझनेफ्टची स्टेक कंपनी नायरा यांना चांगला फायदा होताना दिसतोय.

भले ही युरोपियन महासंघाने रशियन तेलावर निर्बंध लादलेत. मात्र भारतामार्फत त्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

भारताने रशियाकडून स्वस्तात मिळणारं कच्चं तेल खरेदी करण्याच्या निर्णयावर युरोपीय देशांनी नाराजी व्यक्त केली होती.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डिसेंबर 2022 मध्ये भारताच्या दौऱ्यावर असणाऱ्या जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अॅनेलिना बर्बॉक यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारताकडे तक्रार केली होती. तेव्हा भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की, युरोपियन महासंघाने गेल्या नऊ महिन्यांत जेवढ्या तेलाची खरेदी केली होती, त्याच्या केवळ एक षष्ठांश तेल भारताने खरेदी केलंय.

युरोपीय देशांना मात्र भारताकडून तेल घेताना कोणताही आक्षेप दिसत नाही.

भारत एक विश्वासार्ह पुरवठादार म्हणून पुढे येतोय?

आयआयएफएल सिक्युरिटीज कमोडिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणतात की, स्वतः भारताला कच्च्या तेलाची खूप जास्त गरज असते. त्यात आपल्याकडे एका महिन्यापेक्षा जास्तीचा साठा ठेवता येत नाही.

अशा परिस्थितीत जर भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या अतिरिक्त पुरवठा वापरून पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात वाढवत असतील तर ती खूप चांगली गोष्ट आहे.

गुप्ता यांच्या मते, रशियन तेलावर निर्बंध लादल्यानंतर युरोपियन महासंघाच्या देशांमधील तेलाचं संकट पाहता तिथे आयात वाढल्याचं दिसतं. यापूर्वी युरोपियन देश भारताकडून रिफाईंड पेट्रोलियम उत्पादनांची खरेदी मोठ्या प्रमाणावर करत नव्हते. पण सध्याचं संकट पाहता त्यांनी भारतीय उत्पादनांना महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

गुप्ता पुढे सांगतात, "ही गोष्ट भारताच्या आर्थिक क्षमतेसाठी चांगली आहे. यामुळे भारत एक विश्वासार्ह पुरवठादार म्हणून पुढे येतोय. या पुरवठा साखळीवर अमेरिका आणि युरोपीय देश अवलंबून राहू शकतात असा मजबूत दुवा म्हणून भारत उदयास येतोय," एकूणच, भारताच्या आर्थिक स्थितीसाठी हे चांगले संकेत आहेत.

विश्लेषकांच्या मते, रशियाकडून जास्त तेलाची खरेदी केल्याने काही पाश्चात्य देश भारतावर नाराज होते. त्यांनी जगासमोर यावर आक्षेप घेतला मात्र आतल्या आत त्यांना याचा अजिबात त्रास नव्हता.

भारतातील तेल शुद्धीकरण कंपन्यांनी जागतिक तेलाचा पुरवठा कायम ठेवला ही अमेरिका आणि अनेक पाश्चात्य देशांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे. भारताकडून रिफाइंड पेट्रोलियम उत्पादने मिळाल्यामुळे या देशातील पुरवठ्याची स्थिती चांगली राहिली. या गोष्टी युरोप आणि अमेरिका या दोघांच्याही हिताच्या आहेत. विशेष करून युरोपसाठी, कारण युरोपमध्ये महागाई वाढली असून, तेलाच्या किंमती वाढणं म्हणजे धोक्याची घंटा आहे.

अमेरिकेला आणि युरोपला वाटतं त्याप्रमाणे, तेलाचा जागतिक पुरवठा खंडित होऊ नये म्हणून भारतीय तेल शुध्दीकरण कंपन्यांनी निर्यात वाढवणं चांगलं लक्षण आहे.

पण भारतीय तेल शुध्दीकरण कंपन्यांना याचा विशेष फायदा होतोय. स्वस्त रशियन तेलामुळे शुद्धीकरणाच्या किंमती कमी झाल्या आणि दुसरीकडे मार्जिन वाढलंय.

अनुज गुप्ता म्हणतात, "भारताला याचा फायदा होईल. यामुळे आधीच मजबूत असलेला भारतीय तेल शुध्दीकरण उद्योग आणखीन मजबूत होईल. भविष्यात भारत एक मध्यस्थ म्हणून पुढे येईल. अनेक देश भारताकडून रिफायनिंग पेट्रोकेमिकल उत्पादने खरेदी करतील."

भारताला आपली क्षमता वाढवावी लागेल

रशियन तेलावर निर्बंध लादयचे की नाही यावर युरोपियन महासंघातील देशांमध्ये एकमत नव्हतं. हा घाईघाईत घेतलेला निर्णय होता. किंबहुना फ्रान्स आणि जी-7 बाहेरील देशांनीही असंच म्हटलं होतं.

एनर्जी एक्सपर्ट अरविंद मिश्रा म्हणतात, "युरोपसमोर आजही इंधन महागाईचं संकट उभं आहे. युरोपमध्ये विजेच्या किंमती 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. आज रशियन तेलावर निर्बंध असेल तरीही युरोपला रशियन ऊर्जेवरच अवलंबून राहावं लागणार आहे. बदललेल्या परिस्थितीमुळे आता हे तेल थेट रशियातून नाही तर भारतातून येतंय. ऊर्जा सुरक्षा हा असा विषय आहे ज्यावर कोणाचीही थेट बाजू घेता येत नाही."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

भारताने रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी आतापर्यंत 35 हजार कोटी रुपयांची बचत केलीय. दुसरीकडे भारत पेट्रोलियम उत्पादनांचा प्रमुख पुरवठादार देश म्हणून पुढं येतोय.

अरविंद मिश्रा म्हणतात, "रशिया युक्रेन युद्धामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झालीय की एकवेळ भारत तेलाचा सर्वात मोठा आयातदार होता, तोच आता सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून पुढे येतोय. भारत पेट्रोलच्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या पुरवठ्याचं मोठं केंद्र म्हणून उदयास येतोय. पण भारताला या परिस्थितीचा फायदा तेव्हाच घेता येईल जेव्हा तो आपली तेल शुद्धीकरण क्षमता आणखी वाढवून मजबूत करेल."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)