रशिया युक्रेन युद्ध : भारत रशियाकडून आणखी कच्चं तेल का विकत घेतोय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, श्रुती मेनन
- Role, बीबीसी रिअॅलिटी चेक टीम
अमेरिकेसारख्या पश्चिमेतल्या देशांनी रशियावर निर्बंध घातल्यानंतर आता रशियाला त्यांच्या तेलासाठी नवीन ग्राहक हवे आहेत. आणि रशिया कमी किमतीत विकत असलेल्या कच्च्या तेलाचा फायदा भारत घेताना दिसतोय. भारताने रशियाकडून केली जाणारी कच्च्या तेलाची आयात वाढवली आहे.
भारताने अशी निर्यात करणं हे निर्बंधांचे उल्लंघन करणारं नसल्याचं अमेरिकेने म्हटलंय. पण "रशियाला पाठिंबा म्हणजे विध्वंस घडवणाऱ्या घुसखोरीला पाठिंबा देण्यासारखं आहे," असंही त्यांनी म्हटलंय.
भारत कोणाकडून तेल आयात करतो?
अमेरिका आणि चीन नंतर भारत हा तेलाचा सर्वाधिक वापर करणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
भारतात वापरल्या जाणाऱ्या तेलापैकी 80% तेल आयात होतं.
2021 या वर्षामध्ये भारताने रशियाकडून 1 कोटी 20 लाख बॅरल तेल घेतलं. भारताच्या एकूण आयातीच्या तुलनेत हे प्रमाण फक्त 2% होतं.
भारताला सर्वाधिक तेल पुरवठा मध्य-पूर्व आशिया म्हणजे मिडल ईस्ट देशांकडून होतो. याशिवाय अमेरिका आणि नायजेरियाकडूनही भारत तेल खरेदी करतो.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत भारताने रशियाकडून तेल आयात केलं नाही.
पण केप्लर (Kpler) या कमॉडिटीज रिसर्च ग्रुपच्या माहितीनुसार मार्च आणि एप्रिलसाठी भारताने आतापर्यंत 60 लाख बॅरल्सचे काँट्रॅक्ट्स केलेले आहेत.

आपण रशियाकडून आणखी तेल घेतलं तरी एकूण जागतिक तेल आयातीच्या तुलनेत रशियाकडून केली जाणारी ही आयात म्हणजे 'एखाद्या मोठ्या बादलीमध्ये अगदी थेंब ओतल्याप्रमाणे असेल,' असं भारत सरकारने म्हटलंय.
भारतासोबत रशियाचा तेलासाठीचा सौदा काय आहे?
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे रशियाच्या उरल क्रूड तेलाला (Ural Crude Oil) फारसे ग्राहक उरलेले नाहीत. परिणामी या तेलाच्या किमती पडलेल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
"भारत नेमके या तेलासाठी किती पैसे मोजतोय हे आपल्याला माहिती नाही. पण ब्रेंट क्रूडच्या तुलनेत उरल क्रूड तेल गेल्या आठवड्यात बॅरलमागे साधारण 30 डॉलर्स स्वस्त होतं," केप्लरचे अॅनालिस्ट मॅट स्मिथ सांगतात.
एरवी या दोन्ही कच्च्या तेलांच्या किंमती जवळपास समान असतात.

पण मार्च महिन्यात उरल तेलाच्या किमतीत घसरण होत राहिली आणि या तेलाचे दर आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर गेले.
"रशियाकडचं हे कच्चं तेल भारत आणि चीन सवलतीच्या दरात काही प्रमाणात विकत घेण्याची शक्यता आहे," मॅट स्मिथ सांगतात.
आर्थिक निर्बंधांचे काय परिणाम झाले आहेत?
जगातल्या अनेक देशांनी रशियातल्या बँकांवर निर्बंध घातलेले आहेत. म्हणूनच भारताने सवलतीच्या किमतीत विकत घेतलेल्या या तेलाचे पैसे देण्यामध्ये भारतातल्या मोठ्या तेल कंपन्यांना अडचणी येतायत.
दोन्ही बाजूंसाठी व्यापारातली ही मोठी अडचण आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारतातून रशियाला वस्तू निर्यात करणारे निर्यातदार सध्या त्यांची साधारण 50 कोटींची थकबाकी येण्याची वाट पाहत असल्याचं ब्लूमबर्गच्या फायनान्शियन अॅनालिस्टचं म्हणणं आहे.
डॉलर किंवा युरो या चलनांमध्ये व्यवहार करण्याऐवजी रशियाचं चलन - रूबल्समध्ये व्यवहार करणं हा भारताकडे एक पर्याय असेल. यामध्ये भारतातल्या निर्यातदारांना डॉलर किंवा युरोऐवजी रूबल्समध्ये पैसे मिळतील.
भारत इतर कोणाकडून तेल खरेदी करतो?
भारताने अमेरिकेकडून केलेल्या तेल आयातीचं प्रमाण फेब्रुवारीपासून बरंच वाढल्याचं रिफिनेटिव्ह या संस्थेचे विश्लेषक सांगतात.
पण अमेरिकेला आता त्यांचं देशांतर्गत उत्पादित तेल हे रशियाकडून येणाऱ्या तेल पुरवठ्याच्या बदल्यात वापरायचं असल्याने भारताला अमेरिकेकडून भविष्यात फार आयात करता येणार नसल्याचं मार्केट तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
यासोबतच इराणसोबतचा व्यापार जर मालाच्या अदलाबदलीच्या तत्त्वावर पुन्हा सुरू झाला तर भारतीय तेल कंपन्या याद्वारे तेल खरेदी करू शकण्याची शक्यता आहे. तीन वर्षांपूर्वी अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादल्यानंतर अशा प्रकारचा व्यापार थांबला होता.
पण इराणच्या आण्विक कार्यक्रमामुळे त्या देशावर हे निर्बंध घालण्यात आले होते. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलणी होऊन तोडगा निघाल्याशिवाय अशा प्रकारचा व्यापार सुरू होण्याची शक्यता नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









