शांघाय कोरोना : चीनमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा लॉकडाऊन, कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या

चीनी महिला

फोटो स्रोत, Lintao Zhang

2 वर्षांपूर्वी कोव्हिड-19च्या जागतिक साथीला चीनमधून सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदाच चीनने आतापर्यंतचा सर्वांत मोठा लॉकडाऊन जाहीर केलाय. चीनमधलं शांघाय शहर पुढचे 9 दिवस दोन टप्प्यांमध्ये बंद राहील.

9 दिवसांच्या या लॉकडाऊनच्या काळात शांघाय शहरातले अधिकारी कोव्हिड-19 साठीच्या चाचण्या करणार आहेत.

शांघाय ही चीनची आर्थिक राजधानी मानली जाते. चीनसाठी महत्त्वाच्या या शहरात गेल्या महिनाभरापासून कोरोना व्हायरसच्या संसर्गाची नवीन लाट दिसून येतेय. आंतरराष्ट्रीय आकडेवारीशी तुलना केल्यास शांघाय शहरातील रुग्णसंख्या फारशी नाही.

आर्थिक फटका बसू नये म्हणून आतापर्यंत शहरात लॉकडाऊन लावण्यात आला नव्हता. पण शनिवारी 26 मार्चला शांघायमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळले. कोव्हिडची साथ सुरू झाल्यापासूनचा हा सर्वांत मोठा आकडा होता.

व्हीडिओ कॅप्शन, चीनवर पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ का आली?

त्यामुळेच 'झिरो कोव्हिड पॉलिसी' अवलंबलेल्या चीनने शांघाय शहरात लॉकडाऊन लावत चाचण्या सुरू केल्या आहेत.

दोन टप्प्यांत होणाऱ्या लॉकडाऊनमध्ये 1 एप्रिलपर्यंत शहराची पूर्व बाजू बंद राहील तर 1 ते 5 एप्रिल शांघायची पश्चिम बाजू बंद राहील.

या काळात सार्वजनिक वाहतूक बंद राहणार असून ऑफिसेस आणि कंपन्यांनी घरून काम करावं वा काम थांबवावं असं सांगण्यात आलंय.

शांघायमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे, म्हणून पहिल्यांदाच संपूर्ण शहर बंद करण्यात येतंय.

चीनमध्ये गेल्या काही काळात आढळलेल्या कोव्हिड रुग्णांची आकडेवारी जगातल्या इतर देशांच्या तुलनेत कमी असली, तरी यामुळे चीनच्या 'झिरो कोव्हिड' धोरणासमोर आव्हान उभं होतं. ताबडतोब लॉकडाऊन लावणं, निर्बंध अंमलात आणणं या पर्यायांचा वापर करत मोठी लाट टाळणं, हे या धोरणाचं उद्दिष्टं आहे.

शांघाय कोव्हिड

फोटो स्रोत, Reuters

पण या शून्य कोव्हिड धोरणामुळे सतत कराव्या लागणाऱ्या चाचण्यांबद्दल काही नागरिकांनी नाराजीही नोंदवली आहे.

रविवारी 27 एप्रिलला चीनमध्ये 4,500 नवीन रुग्ण आढळल्याचं चीनच्या हेल्थ कमिशनने म्हटलंय.

कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण

शांघाय शहरात चीनने लॉकडाऊन लावल्यानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे.

शांघाय कोव्हिड

फोटो स्रोत, Reuters

पण असं असलं तरी गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती अजूनही 80% जास्त आहेत. युक्रेन युद्ध हे या किंमती वाढण्यामागचं मुख्य कारण आहे.

चीनने लावलेल्या लॉकडाऊनचा परिणाम पुरवठा साखळीवर होण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. असं झाल्यास कच्च्या तेलासाठीची मागणी कमी होईल याची भीती ट्रेडर्सना असल्याने त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमती घसरण्यात झाला.

पण या लॉकडाऊनचा मोठा परिणाम होणार नसल्याचं हँग सेंग बँक चायनाचे चीफ इकॉनॉमिस्ट डॅन वँग यांनी म्हटलंय. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना परिसरातच ठेवून घेतलं असून त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)