युक्रेन-रशिया वाद : चीन आणि रशियाची व्यापारातील भागीदारी किती?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, केई वांग आणि वानयुआन साँग
- Role, बीबीसी रिअॅलिटी चेक
युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियावर मोठ्या प्रमाणावर काही देशांनी मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले आहेत. यात युरोपियन युनियन आणि ब्रिटनचा समावेश आहे. मात्र याच युरोपियन युनियन आणि ब्रिटन बरोबर रशियाचा मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो.
वाढत्या निर्बंधांमुळे रशियाला आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी चीन उभा राहू शकेल का?
निर्बंधांमुळे रशियाच्या व्यापारावर परिणाम होईल का?
यावर चीनचं म्हणणं आहे की, आमचा रशियासोबत सुरू असलेला व्यापार हा सामान्य पातळीवरच सुरू राहील. पण रशियन बँकांच्या स्विफ्ट या इंटरनॅशनल पेमेंट सिस्टीमच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. स्विफ्ट पेमेंट सिस्टीम संपूर्ण जगभर पैशांच्या देवाण-घेवाणीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. रशियन बँकांवर सिस्टीम वापरू नये म्हणून बंदी घातल्यामुळे व्यापार करणं जिकिरीचं झालं आहे.
आणि याचमुळे चीनने रशियाकडून होणारी खरेदी काहीप्रमाणात थांबवली आहे कारण आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत.
मागील काही वर्षांपासून चीन आणि रशिया आर्थिक व्यवहारांसाठी स्वतःची पर्याय पेमेंट सिस्टीम उभी करत आहेत. या सिस्टीम मध्ये त्यांचं यु. एस. डॉलर वरचं पर्यायाने स्विफ्ट या पेमेंट सिस्टीमवरील अवलंबित्व कमी व्हावं हा उद्देश होता.
रशियन पेमेंट सिस्टीमचं नाव ट्रान्सफर ऑफ फायनान्शियल मेसेजेस (STFM) असं आहे. तर चीनच्या पेमेंट सिस्टीमचे नाव क्रॉस बॉर्डर इंटरबँक पेमेंट सिस्टीम (CIPS) असं आहे. या पेमेंट सिस्टीम त्यांच्या चलनावर आधारित आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
रशिया आणि चीनच्या या पेमेंट सिस्टीमवर काही अभ्यास झाले. यात कार्नेगी मॉस्को सेंटर या संस्थेने युक्तिवादात म्हटलं आहे की, या देशांची स्वतःची पेमेंट सिस्टीम स्विफ्टसाठी पर्याय ठरू शकत नाही.
2021 अखेरपर्यंत तरी रशियन पेमेंट सिस्टीमला चीनची फक्त एकच बँक संलग्नित आहे. हेच चीनच्या पेमेंट सिस्टीमला बऱ्याच रशियन बँक, काही जागतिक अर्थ संस्था संलग्नित आहेत.
अधिकृत रशियन आकडेवारीचा हवाला देऊन काही मीडिया रिपोर्ट्स प्रसिद्ध झाले. या रिपोर्ट्सनुसार सध्याच्या घडीला रशिया आणि चीनचा युवान मधील व्यापार हा 17 टक्केच्या आसपास आहे. 2014 ला हाच व्यापार 3.1 टक्का इतका होता.
युआनचा अधिक वापर होत असला तरी त्यांचा ऊर्जा व्यापार अजूनही यूएस डॉलरमध्येच होतो.
रशियाचा चीनशी किती प्रमाणात व्यापार चालतो?
अलिकडच्या काही वर्षांत या दोन्ही देशांमधील व्यापार सातत्याने वाढत आहे.
गेल्या वर्षी जवळजवळ 147 बिलियन युएस डॉलर्सचा व्यापार करून नवा उच्चांक या देशांनी गाठला. हा उच्चांक मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 36% जास्त होता. आणि 2021 मध्ये रशियाच्या एकूण व्यापारात चीन सोबत झालेल्या व्यापाराचा सुमारे 18% वाटा होता.
मागील महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी चीनला भेट दिली. त्यावेळी चीन सोबत व्यापारातील भागीदारी 250 बिलीयन यु. एस. डॉलरपर्यंत वाढवण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.
तेल, नैसर्गिक वायू, कोळसा आणि कृषी उत्पादने यांसारख्या रशियन निर्यातीसाठी चीन उपलब्ध बाजारांपैकी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आणि आकडेवारीनुसार रशियाने अलिकडच्या वर्षांत चीनला पूर्वीपेक्षा जास्त निर्यात करण्यास सुरुवात केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण चीन सोडला तर युरोपियन युनियन ही रशियाचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. 2021 मध्ये युरोपियन युनियन आणि रशियाचा व्यापार हा चीन आणि रशियाच्या व्यापार पेक्षा जवळपास दुप्पट होता.
ट्रेड इकॉनॉमिस्ट डॉ. रेबेका हार्डिंग यांच्या म्हणण्यानुसार, आता ही व्यापारातील भागीदारी बदलू शकते. युरोपियन युनियनने रशियावर निर्बंध लादल्याने हा व्यापार कमी होऊ शकतो. सध्या आलेल्या संकटाने युरोपियन युनियनला त्यांच्या पुरवठादारांमध्ये विविधता आणणे गरजेचे आहे असं वाटतं.
रशियाची अमेरिकेसोबत असलेली व्यापारातील भागीदारी अतिशय कमी पातळीवर आहे.
चीन रशियातील नैसर्गिक वायूची आयात वाढवू शकतो का?
तर रशियाची अर्थव्यवस्था आहे मोठ्या प्रमाणावर तेल आणि नैसर्गिक वायूच्या निर्यातीवर अवलंबून आहे. आणि विशेष म्हणजे या क्षेत्रावर कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. मागील वर्षी रशिया हा चीनचा दुसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार आणि तिसरा मोठा नैसर्गिक वायू पुरवठादार देश होता. त्या वर्षात रशियाने चीनला 41.1 बिलियन यु. एस. डॉलरची तेलाची आणि 4.3 बिलियन यु. एस. डॉलरची नैसर्गिक वायूची निर्यात केली होती.
पुतीन यांनी अलीकडेच चीनसोबत अंदाजे 117.5 अब्ज किंमतीचे रशियन तेल आणि वायू पुरवठ्याचे करार केले.
मात्र चीन बरोबर एवढी भागीदारी करून ही, रशियाची आतापर्यंतची सर्वात मोठी ऊर्जा बाजारपेठ युरोपियन युनियनचं आहे. 40% गॅस आणि सुमारे 26% तेल युरोपियन युनियनला पुरवले जाते.
जर तेलाचाच विचार करायचा झालं तर इंटरनॅशनल एनेर्जी एजन्सी (IEA) यांच्या अहवालानुसार मागील वर्षी रशियाने जी तेलाची निर्यात केली त्यात चीनचा वाटा फक्त 20 टक्के इतका होता. उर्वरित निर्यात ही युरोपात झाल्याचं दिसतं.

फोटो स्रोत, STR/AFP/GETTY IMAGES
चीन आणि रशियाच्या व्यापारी भागीदारी विषयी डॉ. हार्डिंग सांगतात मागील पाच वर्षात रशियाची चीनमध्ये तेलाची निर्यात ही वार्षिक नऊ टक्क्यांनी वाढत आहे. पण तरी ही वाढ युरोपियन युनियनच्या निर्यातीहून मागे आहे.
जर्मनी हा रशियाचा नैसर्गिक वायूचा मोठा ग्राहक देश आहे. मात्र रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जर्मनीने नॉर्ड स्ट्रीम 2 गॅस पाईपलाईन थांबवली आहे.
एका अहवालानुसार, रशिया आणि चीन (पॉवर ऑफ सायबेरिया 2) यांच्या दरम्यानची नवीन पाइपलाइन पुरवठ्यामध्ये, नॉर्ड स्ट्रीम 2 पाइपलाइनच्या क्षमतेच्या फक्त पाचव्या भागाएवढी आहे. तसेच सायबेरियातील नवीन गॅस पाइपलाइन कधी सुरू होईल हे स्पष्ट नाही.
दीर्घ मुदतीत, हरितगृह वायू कमी करण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी चीनला रशियन वायूची आयात आणखी वाढवायची आहे.
रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू निर्यातदार देश आहे. चीनने रोगाच्या चिंतेमुळे रशियाच्या काही भागांमधून ही आयात थांबवली आहे. पण युक्रेनवर हल्ला सुरू झाल्याच्या दिवशी चीनच्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी रशियन गहू आणि बार्लीवरील सर्व निर्बंध उठवण्याची घोषणा केली.
चीन हा रशियाचा सर्वात मोठा कोळसा खरेदीदार आहे आणि दोन देशांनी 20 बिलियन यु.एस डॉलर पेक्षा जास्त किंमतीचा नवीन करार करण्यावर सहमती दर्शवली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








