युक्रेन-रशिया वाद : मराठी विद्यार्थ्यांसह 500 भारतीयांना युक्रेनबाहेर पडण्यात यश, केंद्र सरकारकडून विमानाचीही सोय

युक्रेनमधून बाहेर पडण्यात यशस्वी झालेला भारतीय विद्यार्थ्यांचा एक गट

फोटो स्रोत, PAvan meshram

फोटो कॅप्शन, युक्रेनमधून बाहेर पडण्यात यशस्वी झालेला भारतीय विद्यार्थ्यांचा एक गट

मराठी विद्यार्थ्यांसह 500 भारतीयांना युक्रेनबाहेर पडण्यात यश आलं आहे. त्यांच्यासाठी केंद्र सरकारकडून विमानाचीही सोय करण्यात आली आहे. थोड्याच वेळात सर्वांना घेऊन हे विमान भारताच्या दिशेने रवाना होणार आहे, अशी माहिती युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या पवन मेश्राम या विद्यार्थ्याने दिली.

काही तासांपूर्वी युक्रेनमध्ये युद्ध याचि देही याचि डोळा अनुभवलेला नागपूरचा पवन मेश्राम इव्हानो फ्रँकव्हिस्क शहरातून निघाला.

500 जणांची तुकडी रस्तेमार्गाने रोमानियात दाखल झाली. जेवणाची व्यवस्था त्यांनी स्वत:च केली. गाडीवर भारताचा झेंडा लावण्याची सूचना युक्रेनमधील भारतीय दूतावासाने केली होती, असं त्याने सांगितलं.

भारताने रोमानियातून विमानाची व्यवस्था केली असून काही तासातच त्यांचं विमान भारतासाठी रवाना होईल. भारत सरकार या प्रवासाचा खर्च उचलणार आहे, असंही त्याने सांगितलं.

तिकीट परवडत नसल्याने होता चिंतेत

रशिया-युक्रेन संघर्षाला सुरुवात झाल्यानंतर विमानाचं तिकीट प्रचंड महागल्याने घरी कसं परतावं हा प्रश्न पवन मेश्रामसह अनेक विद्यार्थ्यांना पडला होता.

"घरच्यांचं म्हणणं असं आहे की कितीही रुपयांचं तिकीट असेल तरी चालेल, तुम्ही सुखरूप घरी या. एरव्ही मी युक्रेनला जातो किंवा भारतात येतो तेव्हा 25-30 हजार रुपयांची व्यवस्था घरचे करतात. पण एअर इंडियाची तिकीटं प्रचंड महागल्याने आर्थिक ताण पडला आहे," असं पवन मेश्रामने सांगितलं.

युक्रेन, रशिया, भारत, नागपूर

फोटो स्रोत, PAwan Meshram

फोटो कॅप्शन, नागपूरचा पवन मेश्राम युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्गाचं शिक्षण घेत आहे.

नागपूरचा पवन युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत आहे. युक्रेन-रशिया यांच्यातील वाढता तणाव लक्षात घेऊन भारतीय विद्यार्थ्यांनी मायदेशी परतावं असं परराष्ट्र मंत्रालयाने सूचित केलं आहे. भारतात परतण्याची गडबड सुरू असतानाच पवनने बीबीसी मराठीशी संवाद साधला.

"आमची महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की त्यांनी तिकिटांचे दर कमी होण्यासाठी काही केलं तर बरं होईल. राजस्थान, बिहार, हरियाणा यासारख्या राज्यांनी त्यांच्या राज्यातील मुलांना मायदेशी परतण्यासाठी पावलं उचलली आहेत.

"आम्ही तिकीट काढू पण त्याचे दर थोडे कमी झाले तर बरं होईल. आमचे लेक्चर्स ऑनलाईन सुरू झाले आहेत. मायदेशी परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तिकिटाचे दर कमी झाले तर चांगलंच आहे. नाहीतर आम्हाला तिकीट ज्या किमतीला उपलब्ध असेल ते घेऊन परतावं लागेल," असं पवनने सांगितलं.

त्याने पुढे सांगितलं, "भारतीय दूतावासाने 20 तारखेला आम्हाला युक्रेन सोडण्यासंदर्भात सूचना केली. भारतात जाण्यासाठी एअर इंडियाची विमानं 22, 24 आणि 26 तारखेला उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तिकीट प्रत्येकाने आपापलं काढायचं आहे. एरव्ही किव्ह ते दिल्ली या प्रवासासाठी 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो.

"एअर इंडियाचं विमानाचं तिकीट 60 ते 80 हजार रुपये आहे. अन्य एअरलाईन्सचं तिकीट आताही 25 ते 30 हजार रुपयात उपलब्ध आहे. ही विमानं एक थांबा घेऊन घेऊन भारतात जातात.

"एअर इंडियाचं विमान थेट दिल्लीला जातं. एअर अरेबिया, फ्लाय दुबई, कतार एअरलाईन्स या कंपन्यांची किव्हहून दिल्लीसाठी विमानसेवा आहे. मात्र या कंपन्या अन्य देशांच्या असल्याने वाटेत एखाद्या शहरात थांबा असतो".

युक्रेन, रशिया, भारत, नागपूर

फोटो स्रोत, PAwan Meshram

फोटो कॅप्शन, पवन मेश्राम

"मी इव्हानो फ्रँकव्हिस्क या शहरात आहे. हे शहर पश्चिम युक्रेनमध्ये आहे. मध्यवर्ती भागात असल्याने युद्धाची थेट झळ पोहोचलेली नाही. तूर्तास तरी इथलं दैनंदिन जीवन सुरळीत सुरू आहे. हिवाळा संपण्याच्या बेतात असून उन्हाळा सुरू होतो आहे.

"या शहरात सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. ट्रेन-बसने अन्यत्र कुठेही जाता येतं. युक्रेनची राजधानी असलेलं किव्ह शहर 500 ते 600 किलोमीटर अंतरावर आहे. किव्हला जाण्यासाठी ट्रेन आहे तसंच विमानाचीही सोय आहे. या प्रवासाला साधारण 8 तास लागतात", असं पवनने सांगितलं.

"युक्रेनमध्ये भारतीयांची संख्या 20000 पर्यंत आहे असं पवनने सांगितलं. पण यापैकी सगळे आता युक्रेनमध्ये नाहीत. कोरोना काळात ऑनलाईन लेक्चर्स होत असल्याने काही विद्यार्थी भारतातच राहिले.

"गेल्या महिनाभरापासून युद्धप्रवण परिस्थिती असल्याने साधारण 3000 विद्यार्थी भारतात परतलेत. काही मुलं आज रवाना होत आहेत. आता साधारण 10000 भारतीय विद्यार्थी युक्रेनध्ये असू शकतात."

"इथे महाराष्ट्र मंडळ नाही, पण इंडियन्स इन युक्रेन नावाची कम्युनिटी आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटरवर सगळीकडे अकाऊंट्स आहेत. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातूनही संपर्क होत असतो."

"भारतीय दूतावासाच्या आम्ही संपर्कात असतो. एअर इंडियाची विमानं उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी पुढाकार घेतला. मात्र या विमानांची तिकीट महाग आहेत. तिकिटांचे दर कमी करता येईल का यासंदर्भात आम्ही त्यांना विनंती केली आहे. मात्र तूर्तास तरी त्यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही", असं पवनने सांगितलं.

दरम्यान युक्रेनमधील वैद्यकीय विद्यापीठांनी त्यांचे अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने चालवणार का यासंदर्भात भारतीय दूतावासाला मोठ्या प्रमाणावर कॉल येत आहेत. यासंदर्भात भारतीय विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरळीत सुरू राहावं यासाठी भारतीय दूतावास संबंधित यंत्रणांशी समन्वय करत आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तात्पुरत्या काळासाठी भारतीय विद्यार्थ्यांनी युक्रेन सोडावं. विद्यापीठाकडून ऑनलाईन लेक्चर्ससंदर्भात अधिकृत सूचना जारी होण्याची वाट पाहण्यापेक्षा त्यांनी मायदेशी परतावं. यासंदर्भातील तपशील विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल असं भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)