रशिया युक्रेनवर 'फॉल्स फ्लॅग' हल्ला करू शकतो? हा हल्ला काय असतो?

फोटो स्रोत, MOD
पूर्व युक्रेनमध्ये वाढत असलेल्या संघर्षादरम्यान रशियाकडून 'फॉल्स फ्लॅग' हल्ल्याची तयारी करण्यात येत असल्याची भीती ब्रिटन आणि अमेरिकेने व्यक्त केली आहे.
AFP वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशिया जाणुनबुजून 'फॉल्स फ्लॅग' डावपेच आखू शकतो. यानंतर युरोपात द्वितीय विश्वयुद्धानंतर सर्वात मोठा सैन्य संघर्ष होताना पाहायला मिळू शकतो.
स्वतः हल्ला करून त्याचं खापर इतरांच्या माथी मारणं, याला 'फॉल्स फ्लॅग' असं संबोधलं जातं. आपल्या विरोधकांना दोषी ठरवण्यासाठी असा डावपेच आखला जातो.
NATO चे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी म्युनिक सुरक्षा परिषदेत म्हटलं की, युद्ध सरावाच्या नावावर रशिया मोठ्या संख्येने सैनिक आणि लवाजमा युक्रेनच्या सीमेवर जमा करत आहे. मुळात सरावाच्या तुलनेने ते कित्येक पटींनी जास्त आहे.
दुसरीकडे रशियासमर्थक फुटीरतावादी युक्रेनच्या सैन्यावर पूर्वीपासून हल्ल्याचा आरोप लावत आहेत. आता या ठिकाणाहून लोकांना निघून जाण्याचं आवाहन केलं जात आहे.
'फॉल्स फ्लॅग' हल्ला म्हणजे काय?
स्वतःवर हल्ला झाल्याचं भासवण्याला 'फॉल्स फ्लॅग' हल्ला म्हटलं जातं. जाणुनबुजून केलेली ती कारवाई असते. दुसऱ्यावर हल्ला करत असताना आपण प्रतिकार म्हणून हा हल्ला केला, असं सांगण्यासाठी हा हल्ला केला जातो.
या माध्यमातून आपल्या शत्रूला दोषी ठरवण्यासाठीचे ते डावपेच असतात. अनेक देशांनी युद्धादरम्यन असे डावपेच केल्याचं इतिहासात दिसून येईल.

फोटो स्रोत, Reuters
यामध्ये देश स्वतःवर हल्ला होत असल्याचं भासवतात. किंवा स्वतःच खोटा हल्ला करतात. नंतर शत्रूच्या माथी त्याचं खापर फोडतात. यानंतर देशाला युद्ध सुरू करण्याचं कारण मिळतं. मग युद्धाला सुरुवात होते.
या शब्दाचा वापर पहिल्यांदा 16 व्या शतकात केला गेला होता. त्यावेळी समुद्री चाच्यांनी व्यापारी जहाजांनी आपल्याकडे यावं यासाठी कशा प्रकारे एका मित्र देशाचा झेंडा फडकावला होता, हे सांगण्यात आलं होतं.
'फॉल्स फ्लॅग' हल्ल्यांचा एक मोठा आणि काळा इतिहास आहे.
पोलंडवर जर्मनीचा हल्ला- 1939
जर्मनीने पोलंडवर हल्ला करण्याच्या एक रात्र आधी असे डावपेच केले होते.
त्यावेळी 7 जर्मन सैनिकांनी पोलिश सैनिक असल्याचं भासवत जर्मनीतील ग्लीविट्झ रेडिओ टॉवरवर हल्ला चढवला होता. या सैनिकांनी रेडिओवरून एक संदेशही प्रसारित करायला लावला. हे रेडिओ स्टेशन आता पोलंडच्या ताब्यात आहे, या आशयाचा तो संदेश होता.

फोटो स्रोत, Getty Images
रेडिओ स्टेशनमध्ये जर्मन सैनिकांनी एका नागरिकाच्या मृतदेहाला पोलंडचा लष्करी गणवेश चढवला. प्रत्युत्तरादरम्यान तो मारला गेला, असा खोटा पुरावा तयार करण्यात आला.
पुढच्या दिवशी अॅडॉल्फ हिटलर यांनी पोलंडवर हल्ला चढवला. त्यावेळी हा हल्ला योग्य असल्याचं दर्शवण्यासाठी त्यांनी ग्लीविट्झ तसंच इतर काही घटनांचा उल्लेख करत एक भाषण केलं होतं.
रशिया-फिनलँड युद्धाची सुरुवात-1939
त्याच वर्षी रशियातील मनिला या गावात गोळीबार झाला होता. हे गाव फिनलँडच्या सीमेला लागून आहे. सोव्हिएत संघाने याचा वापर फिनलँडसोबत केलेला शांतता करार तोडण्यासाठी केला.
तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये शीतकालीन युद्ध सुरू झालं होतं.
इतिहासकारांच्या मते, या गावातील गोळीबार फिनलँडच्या सैनिकांनी केलेलाच नव्हता. तर सोव्हिएत सैन्यातील NKVD राज्य सुरक्षा पथकाकडूनच हा गोळीबार करण्यात आला होता.
रशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्तसिन यांनीही 1994 मध्ये स्वीकारलं होतं की शीतकालीन युद्ध सोव्हिएत आक्रमणानंतरचंच युद्ध होतं.
टोंकिन खाडी युद्ध-1964
2 ऑगस्ट 1964 रोजी व्हिएतनामच्या किनाऱ्यापासून आतील भागात टोंकिनच्या खाडीत अमेरिकेच्या तसंच उत्तर व्हिएतनामच्या टॉपरिडो जहाजांमध्ये समुद्री लढाई झाली होती.
या लढाईत दोन्ही बाजूंच्या जहाजांचं नुकसान झालं. उत्तर व्हिएतनामचे 4 जण मारले गेले, तर 6 जण जखमी झाले.

फोटो स्रोत, UNIVERSAL IMAGES GROUP VIA GETTY IMAGES
त्याच्या दोन दिवसांनंतरही अशीच एक लढाई झाल्याचा दावा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने केला होता. पण दुसरा हल्ला उत्तर व्हिएतनामकडून कधीच करण्यात आला नव्हता, असं आता मानलं जातं.
अमेरिकेच्या नाविक दलाच्या जहाजावरील कप्तानाने सुरुवातीला सांगितलं की, त्यांना शत्रूच्या जहाजांनी चारही बाजूंनी घेरलं आणि गोळीबार केला. पण नंतर त्यांनी आपला जबाब बदलला होता. खराब हवामान आणि स्पष्ट दृश्यमानता नसल्यामुळे नेमका हल्ला कुणी केला, हे आपल्याला सांगता येणार नाही, असं त्यांनी नंतर म्हटलं.
अनेक वर्षे गोपनीय ठेवण्यात आलेले यांपैकी काही दस्तऐवज 2005 मध्ये सार्वजनिक करण्यात आले होते. या कागदपत्रांमधील माहितीनुसार, उत्तर व्हिएतनामच्या नाविक दलाचे जहाज अमेरिकेच्या जहाजांवर हल्ला करत नव्हते. तर 2 ऑगस्ट रोजी नादुरुस्त झालेल्या दोन नौकांना वाचवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू होता.
पण, तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉनसन आणि त्यांच्या प्रशासनाने या घटनेशी संबंधित सुरुवातीच्या व्यक्तव्यांवर विश्वास ठेवला होता. ही घटना अमेरिकन सैन्यावर उत्तर व्हिएतनामकडून करण्यात आलेला हल्ला, अशा स्वरुपात अमेरिकन संसदेत मांडण्यात आली.
यानंतरच टोंकिन खाडीच्या संदर्भात एक प्रस्ताव पारित करण्यात आला. यामध्ये उत्तर व्हिएतनामवर बॉम्बवर्षाव तसंच हल्ला करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतर अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतली होती.
क्रायमियाचे लिटिल ग्रीन मॅन- 2014
क्रायमियावर रशियन कब्जा होण्याच्या सुरुवातीच्या दिवसांत रशियन सैनिकांसारखे कपडे घातलेले शस्त्रसज्ज लोक रस्त्यांवर दिसू लागले होते. पण त्यांच्या कपड्यांवर इतर कोणतंच रशियन चिन्ह नव्हतं.

फोटो स्रोत, Reuters
हे लोक स्थानिक स्वयंसंरक्षण गटाचे सदस्य होते. हा भाग युक्रेनकडून परत घेऊन रशियाला परत दिला जावा, असं त्यांचं म्हणणं होतं, असं रशियन संसदेकडून (क्रेमलिन) नंतर सांगण्यात आलं.
या लोकांनी आपले कपडे आणि साहित्य दुकानांमधून खरेदी केले होते, असंही क्रेमलिनने सांगितलं.
या लोकांच्या वर्दीचा रंग आणि अज्ञात ओळखीमुळे रशियन पत्रकारांनी त्यांना पोलाईट मॅन (विनम्र पुरुष) असं संबोधलं होतं. तर क्रायमियाच्या स्थानिक लोकांनी त्यांना लिटिल ग्रीन मॅन नावाने संबोधलं होतं.
काश्मीर सीमा-2020
भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीरवरून नेहमीच वाद होतो. दोन्ही देशांकडून एकमेकांवर 'फॉल्स फ्लॅग' हल्ला केल्याचा आरोप सातत्याने केला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
2020 मध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या सीमेवर UN निरीक्षकांना घेऊन जात असलेल्या वाहनावर हल्ला केल्याचा आरोप भारतीय सैनिकांवर केला होता.
भारत आंतरराष्ट्रीय समुदाय तसंच पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण करण्यासाठी असे प्रकार करत असल्याचं पाकिस्तानने म्हटलं. पण भारताने ते सर्व आरोप फेटाळून लावले.
उलट, पाकिस्तान आपल्या सीमेचं संरक्षण करण्यात अपयशी ठरत असल्याचं वक्तव्य त्यावेळी भारताकडून करण्यात आलं होतं.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









