रशिया युक्रेनवर ‘या’तीन मार्गांनी हल्ला करू शकतो

फोटो स्रोत, Getty Images
कधी कधी प्रत्यक्ष किंवा थेट युद्धापेक्षा छोट्या-मोठ्या कुरबुरी देशाला जास्त उपद्रव देतात. युद्धाची परिस्थिती नसल्याने आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप कठीण जातो. पण, छुप्या यु्द्धासारख्या या कुरबुरींमुळे देशाचं नुकसान तर होत असतं. अशीच काहीशी रणनिती सध्या रशिया युक्रेनमध्ये आखताना दिसतंय.
युक्रेनच्या पूर्व भागातल्या फुटीरतावादी शक्तींना बळ देऊन देशात अशांतता निर्माण करायची आणि या शक्तींच्याच मदतीने युक्रेनमध्ये प्रवेशही मिळवायचा. नेमकी काय आहे रशियाची रणनिती? युक्रेनमध्ये त्यांच्या पुढच्या हालचाली काय असू शकतात?
रशियाने युक्रेनच्या सीमेवर जवळ जवळ दीड ते दोन लाख सैनिक आणून ठेवलेत असं अमेरिकन गुप्तचर विभागाला खात्रीलायकरित्या वाटतं.
बेलारुसमध्येही रशियाचा सध्या युद्धसराव सुरू आहे. म्हणूनच पाश्चिमात्य देशांना असं वाटतंय की, रशिया एका मोठ्या युद्धाच्या तयारीत आहे. त्यांनी युक्रेनवर थेट हल्ला केला तर युद्ध अटळ आहे.
रशिया मात्र म्हणतंय त्यांना हल्ला करायचा नाही.
पण, थेट हल्ल्याऐवजी त्यांनी छुप्या युद्धाची तयारी चालवली आहे का? कालची (21 फेब्रुवारी) घडामोड बघा. युक्रेनच्या पूर्वेला असलेल्या दोनेत्स्क आणि लुहान्स्क या गावांचं स्वातंत्र्य रशियाने मान्य केलंय.
या भागात युक्रेनमधले फुटीरतावादी गट 2014 पासून कार्यरत आहेत. आणि या गटांचा पाठिंबा रशियाला आहे. त्यांना स्वातंत्र्य बहाल करून रशियाने तिथल्या नागरिकांना रशियन पासपोर्ट द्यायलाही सुरुवात केली आहे.
म्हणजे पुढचे काही दिवस अशा फुटीरतावादी शक्तींना बळ द्यायचं. त्यांची ताकद असलेल्या प्रांतांना असाच स्वायत्ततेचा दर्जा द्यायचा. आणि तिथल्या भागांवर वर्चस्व मिळवून पश्चिमेकडच्या युक्रेनला आणखी धडक द्यायची, ही रशियाची रणनिती आहे असं युद्धविषयक तज्ज्ञ मानतात.

फोटो स्रोत, UK GOVERNMENT
अर्थात, अमेरिका आणि युरोप ही परिस्थिती किती गांभीर्याने घेतात यावरही तिथलं भवितव्य अवलंबून आहे. म्हणूनच रशियाची ही ताजी रणनिती आणि त्याला पाश्चिमात्य देश काय उत्तर देऊ शकतात याविषयी संरक्षण विषयातले तज्ज्ञ दिवाकर देशपांडे यांच्याकडून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला.
त्यांच्यामते, रशियाने अमेरिकेबरोबर सुरू केलेलं हे 'हायब्रिड युद्ध' आहे.
"अमेरिका आणि युरोपला सतत अस्थिर ठेवणं हा यामागचा हेतू आहे. प्रत्यक्ष लष्करी चढाई न करता, युक्रेनच्या पूर्व भागात फुटीरतावादी कारवायांना पाठिंबा द्यायचा. तिथले भूभाग युक्रेनपासून स्वतंत्र असल्याचं जाहीर करायचं. आणि तिथून युक्रेनविरोधातलं छुपं युद्ध सुरू ठेवायचं. पण, हे करताना रशियाचं खरं लक्ष्य अमेरिका आणि नेटोचे सैनिक हे असेल. असं हायब्रिड युद्ध ते काही वर्षं सुरू ठेवू शकतील," देशपांडे यांनी सध्याच्या परिस्थितीचं विश्लेषण करताना सांगितलं.

पण, यातून अमेरिकेवर निशाणा कसा साधला जातो हे सांगताना ते म्हणाले, "प्रत्यक्ष युक्रेनवर ताबा न मिळवता अमेरिका आणि नेटो सैन्याला विचार करायला लावून खेळवत ठेवण्याची रशियाची रणनिती दिसते आहे. आणि अमेरिका या खेळात गुंतलेली असताना रशियाचा शेजारी चीनही दक्षिण चिनी सागरात आक्रमक हालचाली करून अमेरिकेला आव्हान देऊ शकतो. अमेरिकेला कोंडीत पकडण्यासाठी रशिया, चीन यांच्या या हालचाली असू शकतात," दिवाकर देशपांडे यांनी ही शक्यता बोलून दाखवली.
त्याचबरोबर रशियाने ज्या प्रमाणात आपले सैनिक युक्रेन सीमेवर आणून ठेवलेत त्यावरून त्यांची युद्धसज्जताही दिसते. म्हणूनच बीबीसीने रशियन सैन्याची जमवाजमव बघता कुठल्या तीन मार्गांनी ते युक्रेनवर चढाई करू शकतात याचाही अभ्यास केला. ते तीन मार्गही आपण समजून घेऊया…
युक्रेनवरील संभ्याव्य हल्ल्यासाठी तीन मार्ग
त्यापूर्वी, रशिया आणि युक्रेनचा नकाशा नीट समजून घ्यायची गरज आहे. एकेकाळी सोव्हिएट रशियाचा भाग असलेले हे दोन देश सोव्हिएतचं विभाजन झाल्यानंतरही कायम आमने सामने आहेत. रशियाला युक्रेनचं स्वतंत्र अस्तित्व मान्य नव्हतंच.
म्हणूनच त्यांच्या नेटो सदस्यत्वालाही त्यांचा विरोध आहे. 2014मध्ये छुप्या युद्धाचा आसरा घेत रशियाने युक्रेनचा क्रिमिया हा प्रांतही बळकावला होता.
क्रिमिया वर, पूर्व युक्रेनमध्ये आजही रशिया धार्जिणे गट कार्यरत आहेत. तर युक्रेनच्या उत्तरेला असलेला बेलारुस हा देशही रशियाशी मैत्रीचे संबंध राखून आहे. रशियाच्या दक्षिणेला आहे काळा समुद्र…

थोडक्यात, बेलारुस आणि रशियाच्या विळख्यात युक्रेन अडकलाय. आणि युक्रेनला ताब्यात ठेवून काळ्या समुद्रावर वर्चस्व गाजवायचा रशियाचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी युक्रेनवर तीन मार्गांनी चढाई करण्याची सिद्धता रशियाने ठेवली आहे, असं तज्ज्ञ मानतात.
बेलारुसमार्गे आक्रमण
अमेरिकेच्या सीएनए रिसर्च ऑर्गनायझेशनच्या अंदाजानुसार, बेलारुसकडून हल्ला करणं हे रशियासाठी जास्त सोपं आहे. सध्या युद्धसरावाच्या बहाण्याने रशियाचे 30,000 सैनिक तिथं तैनात आहेत.
त्यांच्याकडे छोट्या पल्ल्याची क्षेपणास्त्र, रॉकेट लाँचर तसंच Su-35 लढाऊ विमानंही आहेत. शिवाय या मार्गाने युक्रेनची राजधानी कीव्हवर हल्ला करणंही सोपं आहे. असं करताना चर्नोबेल अणूऊर्जा प्रकल्पाच्या जवळून जाण्याचा धोकाही त्यामुळे टळतो. हा झाला रशियासमोरचा एक मार्ग…
क्रायमियामार्गे आक्रमण
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज् च्या म्हणण्यानुसार, रशियाकडे दुसरा मार्ग आहे तो आधीच ताब्यात असलेल्या क्रायमियाच्या भूमीतून हल्ला करण्याचा. जमिनीवरून हल्ला करायचा झाल्यास हा सर्वोत्तम मार्ग असल्याचं तज्ज्ञांना वाटतं. कारण, पश्चिम, पूर्व आणि उत्तरेला रशियन सैन्य आधीच तैनात आहे. शिवाय काळ्या समुद्रात रशियन नौदलाचीही मदत मिळू शकेल.

असं झालं तर पश्चिमेला खरसोन आणि ओ़ेडेसा, पूर्वेला मेलिटोपोल आणि मेरियोपोल तर उत्तरेला कीव्हच्या दिशेनं रशियन सैनिक वाटचाल करतील.
या भागात रशियन समर्थक फुटीरतावादी गट मोठ्या संख्येनं असल्याने सैन्याची आगेकूचही सोपी होईल. तीन बाजूंनी होणाऱ्या या आक्रमणामुळे युक्रेनचं सैन्य नायपर नदीच्या अलीकडे कोंडीत पकडता येईल.
पूर्वेकडून हल्ला
पूर्व युक्रेनमधल्या दोनेत्स्क आणि लुहान्स्क या प्रांतांना रशियाने 2014मध्येच स्वायत्तता देऊ केली आहे. इथे जवळ जवळ 15,000 फुटीरतावादी सैनिक आहेत, ज्यांचा रशियाला पाठिंबा आहे.
याशिवाय रोस्तोव्ह भागात रशियाने 10,000 च्यावर सैनिक तैनात केले आहेत. आता पूर्वेकडून हल्ला करायचा झाल्यास, आग्नेय युक्रेनच्या बेलगोरोद, कारकीव तसंच करमेन्चुक प्रांतांतून रशिया आगेकूच करू शकते.
या भागात मोठ्या प्रमाणावर रशियन समर्थक असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी सैनिकी हालचाली करत असल्याचं कारणही रशियाला त्यामुळे पुढे करता येईल.
रशिया आणि युक्रेनमधल्या संघर्षामुळे युरोपमधला सत्तेचा समतोल बिघडलेला आहे. त्यामुळे जगभरातलं वातावरणही सध्या तापलंय. महागाई, इंधनाचा भडका असे परिणामही पाहायला मिळतायत.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)










