भारताने रशियाकडून स्वस्तात खरेदी केलं 30 लाख बॅरल कच्चं तेल : #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. भारताने रशियाकडून खरेदी केलं 30 लाख बॅरल कच्चं तेल
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातील कच्च्या तेलांच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. मात्र भारतीय तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने मोठ्या सवलतीत रशियाकडून 30 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केलं आहे.
अमेरिकेसह पाश्चात्य राष्ट्रांनी आर्थिक निर्बंध लादल्यामुळे रशियाने भारत आणि इतर मोठ्या आयातदारांना सवलतीच्या किमतीत तेल आणि इतर वस्तू देण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार IOC 20 ते 25 डॉलर प्रति बॅरलच्या सवलतीने 'युरल्स क्रूड' खरेदी केलं आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन स्वतःच्या अटींशर्थींवर रशियाकडून कच्चं तेल खरेदी केले आहे. मालवाहतूक आणि विमा व्यवस्थेतील निर्बंधांमुळे कोणतीही गुंतागुंत होऊ नये म्हणून या अटी घालण्यात आल्या आहेत.
इंडियन एक्स्प्रेसने ही बातमी दिली आहे.
2. रेल्वे खासगीकरणाच्या चर्चा काल्पनिक - अश्विनी वैष्णव
सध्या रेल्वेचं खासगीकरण करण्याचा केंद्राचा कोणताही मानस नसून रेल्वेच्या खासगीकरणाच्या सर्व चर्चा काल्पनिक असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सांगितलं.
2022-23 या वर्षात रेल्वे मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान काँग्रेस आणि इतर काही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सरकारवर 'रेल्वेच्या खाजगीकरणा'कडे पावले टाकत केवळ नफा कमावण्यावर लक्ष केंद्रित केल्याचा आरोप केला.
यावेळी उत्तर देताना रेल्वेमंत्री म्हणाले की, रेल्वेचे खाजगीकरण होऊ शकत नाही. कारण ट्रॅक रेल्वेचे आहेत, लोकोमोटिव्ह रेल्वेचे आहेत, स्टेशन्स आणि पॉवर लाइन्स रेल्वेच्या आहेत. याशिवाय डबे आणि सिग्नलिंग यंत्रणाही रेल्वेचीच आहे.
पीयूष गोयल यांनी देखील यापूर्वी स्पष्ट केले होते की, रेल्वेची रचना जटिल आहे आणि तिचे खाजगीकरण केले जाणार नाही. मालगाड्यांचंही खासगीकरण केलं जात नसल्याचंही, वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे.
लोकमत वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
3. 'योगींच्या भगव्या कपड्यांवर आक्षेप का नाही?'
कर्नाटकमधल्या शाळेतील हिजाब बंदीवर कर्नाटक उच्च न्यायालयने हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नसल्याचं सांगतानाच शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा अधिकार असल्याचा निर्णय दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यावर उत्तर प्रदेशमधील बरेली येथील तन्झीम उलमा-ए-इस्लामच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी प्रतिक्रिया देत म्हंटल आहे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भगव्या कपड्यांवर कोणी आक्षेप का घेत नाही?
हिजाबच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना मौलाना शहाबुद्दीन रझवी म्हणाले, कर्नाटकातील महाविद्यालयात हिजाबवर घालण्यात आलेली बंदी म्हणजे महिलांच्या हक्कांचं उल्लंघन आहे. शरियतनं प्रौढ मुलींना बुरख्यामध्ये राहण्याचा आदेश दिलाय. तसंच देशाच्या संविधानानं प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला त्यांच्या आवडीनुसार कपडे घालण्याचं स्वातंत्र्य दिलंय.
यावेळी यूपीच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत मौलाना म्हणाले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भगव्या रंगाचे कपडे घालतात, ही त्यांची स्वतःची निवड आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कपड्यांवर आणि वागण्यावर एकाही मुस्लिमानं आक्षेप घेतला नाही. इस्लामनं बुरख्याचं महत्त्व कायम ठेवलंय, त्यामुळं महिलांनी बुरख्यात चेहरा लपवणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.
सकाळ या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
4. अजूनही खेळ संपलेला नाही - ममता बॅनर्जी
चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवूनही भाजपाला आगामी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकणे सोपं नसल्याचं विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. अजूनही खेळ संपलेला नाही, असंही त्या म्हणाल्या.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी ममता बॅनर्जी भाजपविरोधी आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्या यावेळी म्हणाल्या की, "खेळ अजून संपलेला नाही. ज्यांच्याकडे देशातील एकूण आमदारांच्या निम्मेही आमदार नाहीत त्यांनी मोठ-मोठ्या गोष्टी बोलू नये. आमच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. हे विसरू नका. गेल्या वेळच्या तुलनेत पराभव होऊनही समाजवादी पक्षासारखे पक्ष मजबूत स्थितीत आहेत.''
NDTV या वृत्तवहिनीने ही बातमी दिली आहे.
5. सामूहिक कॉपी प्रकरणात सहभाग आढळल्यास शाळांची मान्यता रद्द - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
दहावीची प्रश्नपत्रिका फुटल्यास किंवा सामूहिक कॉपी प्रकरणात शाळांचा सहभाग आढळल्यास त्यांची मान्यता रद्द करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी बुधवारी विधानपरिषदेत केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यासंदर्भात वर्षां गायकवाड म्हणाल्या, "पैठणमधील शाळेत प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण उघड झाले, त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. बोर्डाच्या परीक्षा त्यांच्यासाठी महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे परीक्षा सुरळीतपणे पार पडाव्या यासाठी पालक, शाळा, प्रसारमाध्यमे यांनी सहकार्य करावं."
प्रत्येक शाळेत परीक्षा केंद्र दिल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर परीक्षा केंद्रे वाढली आहेत. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर द्यावा, अशी विनंती गृहखात्याला करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशी ही माहिती त्यांनी यावेळी दिली.
लोकमत वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








