आयपॅक काय आहे? ईडीच्या छाप्यांमुळे चर्चेत आलेले प्रतीक जैन कोण आहेत?

फोटो स्रोत, linkedin/Getty
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी (8 जानेवारी) कोलकाता येथे राजकीय सल्लागार कंपनी 'आयपॅक' आणि तिचे प्रमुख प्रतीक जैन यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली.
आयपॅक आणि त्याचे प्रमुख प्रतीक जैन यांच्यावर छापेमारी सुरू असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जैन यांच्या घरी धाव घेतली. यावरून आयपॅक आणि प्रतीक जैन सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेससाठी (टीएमसी) किती महत्त्वाचे आहेत, याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पक्षाशी संबंधित हार्ड डिस्क, अंतर्गत कागदपत्रे आणि संवेदनशील माहिती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, असा ईडीचा दावा आहे.
प्रतीक जैन हे टीएमसीचे आयटी प्रमुख असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. आयपॅकने 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसची रणनीती तयार केली होती.
आयपॅक काय आहे? ही कंपनी नेमकं कसं काम करते?
2024 मधील लोकसभा निवडणुकीतही आयपॅक तृणमूल काँग्रेससोबत जोडलेली होती. या दोन्ही निवडणुकांमध्ये टीएमसीने चांगली कामगिरी केली होती.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी एएनआयशी बोलताना आयपॅक हे टीएमसीचे डोळे आणि कान असल्याचं म्हटलं आहे.
आयपॅकच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, आयपॅकचं पूर्ण नाव 'इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी' आहे. ही संस्था 2013 मध्ये 'सिटिझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स' (सीएजी) या नावाने सुरू झाली होती.
आयपॅकच्या वेबसाइटनुसार, "ही संस्था दूरदृष्टी असलेल्या आणि कामगिरी सिद्ध झालेल्या नेत्यांसोबत काम करते. कंपनी नेत्यांना जनतेशी जोडलेला अजेंडा तयार करण्यास मदत करते आणि तो प्रभावीपणे राबवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करते, जेणेकरून तो अजेंडा जनतेपर्यंत पोहोचेल आणि व्यापक समर्थन मिळू शकेल."

फोटो स्रोत, indianpac.com
आयपॅकने सर्वात आधी 2014 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी काम केलं होतं.
यानंतर या संस्थेने देशातील अनेक राज्यांमध्ये विविध पक्षांसाठी निवडणूक रणनीती तयार करण्याचं काम केलेलं आहे. यापैकी बहुतांश निवडणुकांमध्ये आयपॅकने ज्या पक्षांसोबत काम केलं, त्या पक्षांना यश मिळालं आहे.
तर काही निवडणुकांमध्ये आयपॅकसोबत काम करणाऱ्या पक्षांना पराभवाचाही सामना करावा लागला होता.
कंपनीने आपल्या वेबसाइटवर संस्थेने तयार केलेल्या निवडणूक प्रचार मोहिमांची माहितीही दिली आहे.
यामध्ये पंजाब काँग्रेससाठी तयार केलेला 'कॅप्टन दे नौ नुक्ते', जेडीयूसाठी 'नीतीश के 7 निश्चय', टीएमसीसाठी 'दीदी की शपथ' आणि आम आदमी पक्षासाठी 'केजरीवाल की 10 गारंटियां' यांसह अनेक प्रचार मोहिमांचा समावेश आहे.
प्रशांत किशोर आणि आयपॅकचं कनेक्शन काय?
माजी राजकीय रणनीतीकार आणि जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर हे देखील आयपॅकसोबत जोडले गेले होते.
2021 मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत प्रशांत किशोर हे आयपॅकचा प्रमुख चेहरा होते.
नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि आयपॅकपासून ते वेगळे झाले.

फोटो स्रोत, Getty Images
इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, आयपॅकमध्ये काम केलेले फलकयार अस्करी यांनी सांगितलं, "प्रशांत किशोर फक्त सल्लागार म्हणून काम करत होते. कंपनीच्या रचनेत त्यांना बांधून ठेवणारं काहीही नव्हतं. त्यामुळे ते गेले तरी कंपनीवर कोणताही परिणाम झाला नाही."
प्रतीक जैन कोण आहेत?
प्रशांत किशोर यांच्यानंतर आयपॅकची धुरा ऋषि राज सिंह, विनेश चंदेल आणि प्रतीक जैन यांच्या हाती आहे.
प्रतीक जैन आयपॅकमधील सर्वात महत्त्वाचे व्यक्ती असल्याचे एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.
पश्चिम बंगालच्या आगामी निवडणुकीत तृणमूल काँग्रेससाठी काम करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असल्याचे सांगितलं जातं.
ते आयपॅकच्या प्रणालीला टीएमसीच्या व्यवस्थेशी जोडण्याचं काम करतात.
प्रतीक जैन यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवरून मिळालेल्या माहितीनुसार, ते आयपॅकचे सह-संस्थापक आणि संचालक आहेत.
एप्रिल 2015 पासून ते या कंपनीशी संबंधित आहेत. त्यापूर्वी, ते सिटिझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्सचे संस्थापक सदस्य होते.
राजकीय सल्लागार कंपनीमध्ये सहभागी होण्याआधी ते डेलॉइट या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये विश्लेषक (अॅनालिस्ट) म्हणून काम करत होते.
त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून बीटेक केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
टीएमसीच्या एका नेत्याने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितलं , "प्रतीक जैन हे प्रशांत किशोर यांच्या अगदी विरुद्ध आहेत. त्यांना नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहायला आवडतं. ते खूप प्रतिभावान आहेत आणि एकांतात राहूनच उत्तम काम करतात. शिवाय, त्यांची मुळं कोलकाताशी जोडली गेलेली आहेत. इतरांपेक्षा त्यांना बंगालच्या राजकारणाची चांगली समज आहे."
या वृत्तपत्रानुसार, टीएमसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जैन यांच्याशी संबंधित एक किस्सा सांगितला.
त्यांनी सांगितलं, "बंगालच्या 2024 मधील लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. प्रतीक जैन यांना मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमसोबत फोटो काढण्यासाठी बोलवलं गेलं. दुसऱ्या दिवशी माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या फोटोमध्ये ते फोटो काढताना अस्वस्थ दिसत असल्याचे स्पष्टपणे जाणवत होतं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











