'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' म्हणत युक्रेन सुदानमध्ये रशियाविरोधात उतरला आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जॉर्ज एरमान
- Role, बीबीसी न्यूज युक्रेन
सप्टेंबर 2023मध्ये एक अनपेक्षित बैठक झाली, तीही एका नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकणी.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतून परतत असताना, त्यांचं विमान आयर्लंडच्या शॅनन विमानतळावर थांबलं. तिथे सुदानचे नेते जनरल आब्देल फताह अल बुरहान झेलेन्स्कींना भेटले.
दोघांमध्ये आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर आणि ‘रशियाच्या आर्थिक मदतीवर चालणाऱ्या बेकायदेशीर संघटनां’विषयीही चर्चा झाली.
झेलेन्स्की यांच्या कार्यालयानं सांगितलं की, ही हाय प्रोफाईल भेट आधी ठरवून झालेली नव्हती. अटलांटिक ओलांडून प्रवास करणारी विमानं पुन्हा इंधन भरण्यासाठी या विमानतळावर अनेकदा थांबतात, तशीच ती थांबली होती आणि त्यादरम्यान दोघं भेटले.
पण युक्रेनच्या विशेष संरक्षण दलानं ही भेट घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, अशी चर्चा आहे.
झेलेन्स्की आणि अल बुरहान भेटले, तेव्हा सुदान हा देश तिथलं लष्कर आणि रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) नावानं ओळखली जाणारं एक सशस्त्र दल यांच्यातल्या संघर्ष आणि चकमकींमुळे गांजून गेला होता.
देशातल्या दोन ताकदवान लष्करी अधिकाऱ्यांमधल्या सत्तेच्या चढाओढीनं या संघर्षाची बीजं पेरली.

फोटो स्रोत, Ukrainian Presidency
एका बाजूला सुदानचे लष्करप्रमुख आणि देशाचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळणारे जनरल आब्देल फताह अल बुरहान आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे माजी सहकारी आणि RSF चे प्रमुख मोहम्मद हामदान डागालो, जे हेमेड्टी या नावानंही ओळखले जाता.
दोन्ही गटांमधली यादवी सुरू झाल्यापासून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, लाखो लोकांना त्यांची घरं सोडून इतर देशांत जावं लागलं आणि सुदानची अर्थव्यवस्थाही कोलमडली.
या संघर्षादरम्यानं युक्रेननं कथितरित्या सुदानच्या सरकारची का आणि कशी मदत केली, याच्या बातम्या अगदी अलिकडेच येऊ लागल्या आहेत.
‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ (WSJ) मधल्या वृत्तानुसार 2023 च्या ऑगस्ट महिन्यात सुदानची राजधानी खार्टूममध्ये राष्ट्राध्यक्षांच्य कार्यालयाला RSF नं वेढा घातला, तेव्हा युक्रेनच्या सैनिकांनी जनरल अल-बुरहान यांना सुरक्षित बाहेर पडण्यात मदत केली.
अल बुरहान आणि झेलेन्स्की यांच्यात फोनवरून चर्चा झाली आणि युक्रेनच्या विशेष दलांमध्ये कार्यरत असलेले साधारण शंभर जण ‘तिमूर’ नावाच्या एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सुदानमध्ये दाखल झाले, असंही या वृत्तपत्रानं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Ukrainian Defence Ministry
WSJनं पुढे दावा केला आहे की या युक्रेनी तुकडीनं अल बुरहान यांना बाहेर पडण्यास मदत केलीच, शिवाय सुदानच्या सैन्याला प्रत्यक्ष टेहळणी करणारी ड्रोन्स पुरवली आणि RSF वर रात्रीचे हल्ले करण्यात मदत केली. त्यामुळे या संघर्षाचं रूप बदललं.
बीबीसीनं याविषयी विचारणा केली असता युक्रेनियन गुप्तहेर खात्यानं या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही, पण याचं खंडनही केलेलं नाही. त्यांनी म्हटलं आहे की, “आम्ही युक्रेनच्या हिताचं रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रदेशांत अनेक गरजेच्या कारवाया करत असतो.”
‘वॅगनर’ ग्रुपचा सुदानशी काय संबंध?
फेब्रुवारीमध्ये एक व्हीडिओसमोर आला होता ज्यात कथितरित्या काही युक्रेनी गुप्तहेर सुदानमध्ये गोळीबारानं चाळण झालेल्या एका लष्करी वाहनात एका रशियन सैनिकाच्या मृतदेहासोबत दिसतात.
या वाहनावर रशियातल्या ‘वॅगनर ग्रुप’ या खासगी कंत्राटी सैन्याची गटाची चिन्हं दिसतात.
याच व्हिडियोच्या दुसऱ्या भागात युक्रेनी सैन्य अधिकारी पकडलेल्या रशियन सैनिकांची तपासणी घेताना दिसतात.
एक अधिकारी प्रश्न विचारतात, “तुमचा उद्देश काय आहे?”
उत्तर येतं, “स्थानिक सरकार पाडणं.”
हा व्हीडिओ सुदानमध्ये कधी आणि कुठे टिपला होता, हे माहिती नाही, आणि बीबीसीला स्वतंत्र्यरिता त्याची सत्यता पडताळता आलेली नाही.
पण रशियाच्या वॅगनर ग्रुपचे सैनिक ही यादवी माजण्याआधीपासूनच सुदानमध्ये कार्यरत होते. 2017 सालीच त्यांच्या सुदानमधल्या कारवायांचे पहिले व्हिडियो समोर आले होते.
त्यावेळी अशा बातम्या आल्या होत्या की हा रशियन ग्रुप सुदानच्या सैनिकांना ट्रेनिंग देत आहे आणि तिथे होणारी निदर्शनं पांगवण्यासाठी स्थानिक सुरक्षादलांना ते कथितरित्या मदत करत आहेत.
वॅगनर ग्रुपचे संस्थापक येवगेनी प्रिगोझिन यांनी जून 2023 मध्ये बंड पुकारलं आणि ऑगस्ट 2023 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुदानसह आफ्रिकेतल्या इतर देशांमधल्या वॅगनर गटाच्या तुकड्या रशियाच्या विशेष सैन्याच्या ताब्यात गेल्या.

फोटो स्रोत, Getty Images
आता सुदानमध्ये RSFला पाठिंबा देणारे वॅगनर सैनिक हे तिथल्या युक्रेनी अधिकाऱ्यांचं मुख्य लक्ष्य असल्याचं बीबीसी मॉनिटरींगच्या विश्लेषक बेव्हर्ली ओचिएंग सांगतात.
“सुदानमध्ये युक्रेनची युनिट्स युक्रेनमध्ये सुदानच्या लष्कराला मदत करण्याऐवजी रशियन्सना टार्गेट करण्यावर जास्त भर देत आहेत असं याविषयीची बहुतांश वृत्तं सांगतात,” बेव्हर्ली माहिती देतात.
युक्रेन सरकारनं वॅगनर ग्रुपवर वारंवार युद्ध गुन्हेगारीचे आरोप केले आहेत.
युक्रेनच्या सैन्यातील गुप्तहेर विभागाचे प्रमुख किरिलो बुडानेव्ह यांनी संकेत दिले होते की सुदानमध्ये कार्यरत असलेले काही रशियन्स युक्रेनमधल्या युद्धातही सक्रीय होते.
“सगळे रशियन युद्ध गुन्हेगार जे युक्रेनविरुद्ध लढले आहेत, लढतायत किंवा लढत राहतील त्यांना जगाच्या पाठीवर ते कुठेही असतील तिथे शिक्षा केली जाई,” असं बुडानेव्ह म्हणाले होते.
या रशियन कंत्राटी सैनिकांना येणारा निधी आणि मिळणारी रसद तोडण्याचा प्रयत्नही युक्रेन करत आहे असं मुराद बटाल शिशानी सांगतात. मुराद लंडनमधल्या रिमार्क्स फॉर पॉलिटिकल व्हायोलन्स या संस्थेत काम करतात.
“हेमेड्टी हे बऱ्याच काळापासून आफ्रिकेत रशियाचे, विशेषतः वॅगनर ग्रुपचे सहकारी राहिले आहेत. त्यांचं सोन्याच्या साठ्यावर नियंत्रण आहे, जो वॅगनर ग्रुपला मिळणाऱ्या निधीचा मुख्य स्रोत आहे,” अशी माहिती ते देतात.

फोटो स्रोत, Getty Images
2022 मध्ये सीएनएननं एका वृत्तात दावा केला होता की सुदानमधल्या सोन्याच्या खाणी आणि व्यापारात रशियाचा कथितरित्या सहभाग आहे. त्या वृत्तानुसार रशियानं सोन्यानं भरलेली 16 विमानं सुदानमधून सीरियाला पाठवली होती.
रशियाच्या सुदानमधल्या सोन्याच्या व्यापाराला खीळ घालण्याची योजना युक्रेन करत असल्याच्या वृत्ताला युक्रेनियन गुप्तहेर खात्यातील सूत्रांनी दुजोरा दिल्याचं वॉल स्ट्रीट जर्नलनं म्हटलं आहे.
हेमेड्टी यांचा पराभव झाला आणि सुदानचं युक्रेनसोबतचं नातं घट्ट झालं तर त्याचा फटका रशियाच्या सुदानमधल्या योजनेला बसू शकतो. रशियाला तांबड्या समुद्रानजीक पोर्ट सुदानमध्ये लष्करी तळ उभारायचा आहे.
‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’
सुदानमध्ये जे सुरू आहे, ते एक प्रॉक्सी वॉर किंवा छुपं युद्ध असल्याचं काही विश्लेषक म्हणतात. छुप्या युद्धात दोन प्रमुख प्रतिस्पर्ध्यांशिवाय इतरही काही देश गुंतलेले असतात आणि त्यांचे स्वतःचे वेगळेच उद्देश असतात.
“हेमेड्टी यांना संयुक्त अरब अमिराती आणि रशियाचा पाठिंबा आहे. तर अल बुरहान स्थिरपणे विजयाकडे वाटचाल करत असून त्यांना सौदी अर्थसहाय्य आणि युक्रेनी सैन्याची मदत मिळताना दिसते आहे,” असं ग्लेन होवार्ड सांगतात. ते वॉशिंग्टनमधल्या जेम्सटाऊन फाऊंडेशन या संशोधन संस्थेचे माजी प्रमुख आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
युक्रेनलाही ‘आम्ही रशियाच्या ताकदीला जगात कुठेही धक्का पोहोचवू शकतो’ अशी प्रतिमा उभी करायची आहे असं निकोलास ए हेरास यांना वाटतं. ते वॉशिंग्टनच्या न्यू लाईन्स इंस्टिट्यूटमध्ये काम करतात.
“झेलेन्स्की आणि अल बुरहान यांच्यातलं सहकर्य म्हणजे ‘शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र’ अशा प्रकारचा करार आहे.
“यातून युक्रेनला जगाला हे दाखवून द्यायचं आहे की फक्त युरोपच नाही तर जगात इतर कुठेही झेलेन्स्की पुतिन यांना तोंड देऊ शकतात,” असं निकोलास सांगतात.
रशिया-युक्रेनमधल्या सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या तुलनेत सुदानमधली युक्रेनची क्षमता बरीचस कमी आहे आणि क्यीव्ह त्यांच्या आफ्रिकन दोस्ताला मदतीसाठी विशेष सैन्याच्या छोट्या तुकड्याच पाठवू शकतो.
त्याउलट, सुदानमध्ये रशियाचा प्रभाव मात्र जास्त आहे.
“रशियाकडे वॅग्नर ग्रुपच्या माध्यमातून मोठ्या आणि दीर्घ मोहिमा आखण्याची क्षमता आहे. त्यांच्याकडे सैनिकांच्या बटालियन्स आहेत ज्यांना तोफखाना, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र यांच्यासोबतच RSF ला इतर तांत्रिक आणि रसदपुरवठा करण्याची क्षमताही आहे,” हेरास सांगतात.











