अफनासी निकितिन: रशियाच्या मुसाफिराचं महाराष्ट्रातल्या चौलमध्ये स्मारक का उभं राहिलं?

अफनासी निकितिन

फोटो स्रोत, Artem Sobov

फोटो कॅप्शन, अफनासी निकितिनचं रशियाच्या त्वेर शहरातील स्मारक
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी

भारत आणि रशियामधल्या नात्याची सुरूवात महाराष्ट्रातून झाली, असं सांगितलं, तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण भारतात आलेला पहिला रशियन प्रवासी हा महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर, रायगडच्या चौलमध्ये उतरला होता. त्याचं नाव अफनासी निकितिन.

फक्त एक घोडा, एक डायरी आणि भारतात जाण्याची तीव्र इच्छा घेऊन हा माणूस इथे आला होता. ते वर्ष होतं 1469.

म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या मृत्यूनंतर साधारण 172 वर्ष आणि शिवाजी महाराजांच्या जन्माच्या साधारण 162 वर्ष आधी.

त्या काळातला महाराष्ट्र म्हणजे दख्खनचा प्रांत कसा होता? तिथले लोक, विशेषतः स्त्रिया कशा होत्या याचं दर्शन अफनासी निकितिनच्या लिखाणातून घडतं. अफनासी फक्त चौलमध्येच थांबला नाही, तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांतही फिरला.

या विलक्षण प्रवासाची आठवण म्हणून चौलजवळ अफनासी निकितिनचं स्मारकही उभारण्यात आलं आहे. त्याची गोष्ट एका हिंदी चित्रपटातही मांडण्यात आली.

पण अफनासी निकितिन कोण होता? त्याची गोष्ट महत्त्वाची का आहे? अफनासी चौलमध्ये का आला आणि त्यानं तेव्हाच्या महाराष्ट्रात काय काय पाहिलं? ही त्याचीच कहाणी आहे.

व्होल्गा ते कुंडलिका

अफनासी निकितिन हा एक रशियन व्यापारी होता. त्याचा जन्म 1433 साली रशियाच्या त्वेर शहरात झाल्याचं बहुतांश रशियन सरकारी माध्यमांतील रिपोर्ट्स सांगतात.

भारतात येण्याआधीच्या अफनासीच्या आयुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. पण त्यानं इथे यायचा निर्णय का घेतला असावा, याविषयी अंदाज बांधता येतो.

नकाशा
फोटो कॅप्शन, अफनासी निकितिनच्या प्रवासाचा मार्ग

त्याकाळी त्वेर ही रशियातली एक मोठी व्यापारी पेठ होती आणि तिथले व्यापारी युरोपात, मध्य आशियात दूरवर प्रवास करण्याचं धाडस करायचे. अफनासीही तसाच व्होल्गा नदीतून प्रवासाला निघाला. साधारण 1466 साली त्याचा प्रवास सुरू झाला.

अफनासीला कुणीतरी सांगितलं की, भारतात चांगल्या जातीचे घोडे मिळत नाहीत. त्यामुळंच त्यानं भारतात येताना एक घोडा आपल्यासोबत घेतला होता.

या प्रवासातले अनुभव निकितिननं नोंदवून ठेवले आहेत. त्यातूनच त्या काळातील प्रवासाचे मार्गही कळतात.

ऑडिओ कॅप्शन, 'युक्रेन कायमच रशियाचा भाग होता', हा पुतिन यांचा दावा किती खरा?

अफनासीनं लिहिल्यानुसार त्यानं आधी रशियाच्या व्होल्गा नदीतून कॅस्पियन समुद्रापर्यंत प्रवास केला. या वाटेत दोनदा निकितिनला लुटारूंनीही हिसका दिला. त्याच्यासोबतचे काहीजण मागे फिरले. पण निकितिन पुढे सरकत राहिला.

कॅस्पियन समुद्रातून त्यानं इराण म्हणजे तेव्हाच्या पर्शियात पाऊल ठेवलं आणि पुढे होर्मुझवाटे अरबी समुद्रातून प्रवास करत तो भारतात दाखल झाला.

चौल स्मारक

फोटो स्रोत, Shardul kadam/bbc

फोटो कॅप्शन, रेवदंड्याच्या एसआरटी विद्यालयातील अफनासी निकितीनचं स्मारक

अफनासीची बोट आधी दीवजवळ आणि मग गुजरातमध्ये खंबाटच्या आखातात पोहोचली. तिथे त्यानं नीळ खरेदी केली, जिला रशियात मोठी मागणी होती. तिथून अफनासी मग बोटीनं चौल बंदरात आला.

कुंडलिका नदीच्या खाडीकाठी चौलमध्येच त्यानं भारतीय भूमीवर पहिल्यांदा पाऊ ठेवल्याचं काहीजण मानतात.

चौल आणि दख्खनची भूमी

रायगड जिल्ह्यातलं चौल वरवर दिसायला कोकणातल्या इतर कुठल्याही किनाऱ्यावरच्या गावसारखं माडा-पोफळींच्या बागांनी झाकलेल्या टुमदार घरांचं गाव आहे.

पण या परिसराला किमान दोन हजार वर्षांचा इतिहास आहे आणि त्याच्या पाऊलखुणा आजही इथे भग्नावशेषांच्या रुपात विखुरलेल्या दिसतात.

रेवदंडा

फोटो स्रोत, Shardul kadam/bbc

फोटो कॅप्शन, रेवदंडा-चौलचा किनारा

मध्ययुगात चौल हे एक मोठं बंदर होतं. देशविदेशातले व्यापारी चौलला येत असत. शेजारी रेवदंड्याच्या खाडीतील बंदरात त्यांच्या बोटी येऊन थांबत. अफनासि निकितिन त्यापैकीच एक होता.

चौलला पोहोचल्यावर त्याला भारतीय लोकांमधील फरक लगेच दिसून आला. आपल्या डायरीत तो लिहितो :

"इथे लोक उघडेच राहतात. त्यांचं डोकं झाकलेलं नसतं, छाती उघडी असते, केसांची एक वेणी बांधतात. इथे सगळेजण अनवाणी असतात.

"इथे श्रीमंत व्यक्ती डोक्याला कापड बांधतात, खांद्यावरून एक कापड घेतात आणि दुसरे कापड कमरेभोवती गुंडाळतात; येथील स्त्रिया फक्त कमरेला कापड गुंडाळतात.

"इथले स्त्री पुरुष काळ्या रंगाचे आहेत. मी कुठेही गेलो, की गोरा रंग पाहून त्यांना अप्रूप वाटतं."

चौल स्मारक

फोटो स्रोत, Shardul kadam/bbc

फोटो कॅप्शन, चौलमधील हमामखान्याचे अवशेष

रशियातून आलेल्या व्यक्तीसाठीही हे सगळंच नवं होतं, याची जाणीव अफनासीचं लिखाण वाचताना होते.

चौलहून अफनासी पुढे आपला घोडा घेऊन पाली मार्गे जुन्नरला गेला. या प्रवासासाठी त्याला जवळपास पंचवीस दिवस लागले. जुन्नरविषयी तो लिहितो,

"इथे चार महिने दिवसरात्र पाऊस आणि चिखल असतो. हे शहर खडकाळ भागावर वसलेलं असून, त्याला कुठली संरक्षक भिंत नाही."

जुन्नरचा एक किस्सा त्यानं लिहून ठेवला आहे. त्यानुसार तिथला सरदार असद खाननं निकितिनला एक अट घातली. 'इस्लामचा स्वीकार कर, तरच तुझा घोडा परत देईन. नाहीतर तुला दंड बसेल.'

अफनासी संकटात सापडला. पण मग एका तुर्की मुस्लीम मंत्री मोहम्मद खोरासननं असद खानला दम भरला, की आपला धर्म असा दुसऱ्यांवर लादू नये. मोहम्मदनं अफनासीची सुटका केली आणि पुढे दोघांमध्ये त्यानंतर मैत्रीचं नातं निर्माण झालं.

बहामनी राजवट आणि विजयनगरचं साम्राज्य

त्या काळात दख्खनमध्ये बहामनी राजवट आणि विजयनगरचं साम्राज्य होतं. निकितिननं आधी बहामनी साम्राज्याची राजधानी बिदर आणि मग विजयनगरलाही भेट दिली.

बिदरमध्ये त्याला अखेर आपला घोडा विकण्यात यश आलं. त्यानं पुढे गोवळकोंडा आणि रायचूरला हिऱ्याच्या खाणी पाहिल्या.

चौल

फोटो स्रोत, Shardul kadam/bbc

फोटो कॅप्शन, मध्ययूगात चौल मोठं बंदर होतं

त्यानं हिंदूंसोबत श्रीशैल मलिल्कार्जुनाची यात्रा केली आणि मुसलमानांसोबत रमझानमध्ये रोझेही पाळले.

जवळपास तीन साडेतीन-वर्ष निकितिन भारतात होता. त्याला आता घराची ओढ लागली.

कोकणातल्या दाभोळ बंदरातून तो परतीच्या प्रवासाला निघाला. दाभोळचं वर्णन करताना अफनासी लिहितो,

"दाभोळ हे सुद्धा मोठं बंदर आहे. इजिप्त, अरेबिया, खुरासन, तुर्कस्तानातून इथे घोडे विक्रीसाठी आणले जातात. हे बंदर जमिनीच्या मार्गानं बिदर आणि गुलबर्गा इथून एक महिनाभराच्या अंतरावर आहे. "

इथियोपिया, इराण आणि पुढे काळ्या समुद्रातून क्रायमिया, कीव्हमार्गे रशियात पोहोचलाही. पण घरी त्वेरला पोहोचेण्याआधीच 1472 साली आजच्या रशियातल्या स्मॉलन्स्कमध्ये त्याचा मृत्यू झाला.

'परदेसी' चित्रपट आणि चौलमधलं स्मारक

अफनासीच्या मृत्यूनंतर गेल्या साडेपाचशे वर्षांत भारतात आणि रशियातही अनेक साम्राज्यांचा उदयास्त झाला. मग भारताच्या स्वातंत्र्यानंतर सोव्हिएत काळात निकितिनकडे भारत-रशिया मैत्रीचं प्रतीक म्हणून पाहिलं गेलं.

त्यातूनच 1957 साली निकितिनची कहाणी सांगणारा चित्रपट, 'परदेसी' प्रदर्शित झाला. हा चित्रपट म्हणजे भारतीय आणि सोव्हिएत रशियन कलाकारांचं 'जॉइंट व्हेंचर' होता.

चौल स्मारक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, त्वेरमध्ये अफनासी निकितिनचं स्मारक व्होल्गा नदीकाठी आहे

दोन भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात नर्गिस, पृथ्वीराज कपूर, बलराज साहानी यांच्यासह अफनासीच्या भूमिकेत रशियन अभिनेता ओलेग स्ट्रिझनोव्ह झळकले होते. लता मंगेशकर, मन्ना डे, मीना कपूर यांनी त्यातली गाणी गायली होती.

2002 साली रशियन दूतावासाच्या साथीनं चौलजवळ रेवदंडा इथे अफनासी निकितिनचं स्मारक म्हणून एक स्तंभ उभारण्यात आला. (रेवदंडा गाव मध्ययुगात चौलचाच भाग होतं.)

रेवदंड्याच्या सरदार रावबहाद्दूर तेंडुलकर शाळेच्या प्रांगणात हा स्तंभ उभा आहे. दूतावासाशी संबंधित अनेक रशियन्स आणि इतिहास अभ्यासकांनी या भागाला भेट दिल्याचं शाळेतील शिक्षक सांगतात.

अफनासीच्या मायभूमीत, रशियाच्या त्वेर शहरात आणि क्रायमियाच्या फेडोशियामध्येही त्याचे पुतळे उभारण्यात आले आहेत.

अफनासीची डायरी महत्त्वाची का आहे?

आयुष्याच्या अखेरपर्यंत निकितिन लिहित राहिला. त्याची ती डायरी काही वर्षांनी रशियातल्या एका मठात सापडली, तेव्हा निकितिनची कहाणी जगासमोर आली. एखाद्या रशियन व्यक्तीनं केलेलं भारताचं प्रवासवर्णन म्हणून रशियात या डायरीकडे पाहिलं जातं.

खोझेनिया झा त्री मोऱ्या म्हणजे जर्नी बियाँड थ्री सीज किंवा तीन समुद्रांपलीकडचा प्रवास या नावानं ही डायरी ओळखली जाते, कारण निकितिननं कॅस्पियन समुद्र, अरबी समुद्र आणि काळा समुद्र अशा तीन समुद्रांमधून प्रवास केला होता.

निकितन

फोटो स्रोत, Getty Images

पंधराव्या शतकात असा प्रवास करून भारतात येणारा निकितिन एकटाच व्यापारी किंवा प्रवासी नव्हता. निकितिननंतर तीस वर्षांनी वास्को द गामानं कालिकतमध्ये पाऊल ठेवलं.

पण निकितिनचं वेगळेपण त्यानं लिहिलेल्या विस्तृत प्रवासवर्णनातून दिसून येतं, असं रशियन भाषेच्या अभ्यासक, सहाय्यक प्राध्यापक आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागाच्या प्रभारी विभाग प्रमुख डॉ. मेघा पानसरे सांगतात.

त्या म्हणतात, "इतकी संकटं झेलून एक माणूस इतक्या दूर येतो, हे सगळं अनुभवतो आणि मुख्य म्हणजे ग्रामीण भागात जाऊन तो राहिला आहे, फिरला आहे. त्यामुळेच त्याचा प्रवास वेगळा होता. तो इथे राहिला, भारतातल्या सर्वसामान्यांमध्ये मिसळला. त्यानं ग्रामीण संस्कृती नोंदवून ठेवली.

"त्यानं लिहिलं आहे, तुलना केली आहे ती रशियन दृष्टिकोनातून आहे. स्त्रियांविषयी लिहिताना तो लिहितो की त्या डोकं उघडं ठेवतात. कारण रशियात केस झाकण्याची पद्धत होती."

त्या काळातल्या इतर युरोपियन व्यापाऱ्यांसारखं अफनासीला कुठल्या राजा महाराजांचं समर्थन किंवा शाही आधार नव्हता, तरीही तो इथे आला. यातूनच त्याला भारताविषयी असलेलं आकर्षण यातून दिसून येत असल्याचंही डॉ. पानसरे सांगतात.

निकितन

फोटो स्रोत, PHAS/getty

फोटो कॅप्शन, अफनासी निकितिनचं क्रायमियामधील स्मारक

निकितिनची डायरी त्यावेळच्या भारताचं विशेषतः दख्खनचं चित्र मांडते. निकितिननं भारतात अनेक मुस्लीम आणि हिंदूंसोबत मैत्री केली, पहिल्यांदाच ताडीचा आस्वाद घेतला, फणसाची आणि साजूक तुपाची चव चाखली.

भारतात घोड्यांऐवजी लोक गाई-बैलाला महत्त्व देतात, इथे हत्तीचे व माकडाचे तोंड असलेल्या देवता (गणपती आणि हनुमान) आहेत असं तो लिहितो.

महत्त्वाचं म्हणजे त्या काळातल्या श्रीमंत आणि सामान्य लोकांमध्ये आढळणारी तफावत आणि समाजातील जाती-जातींमधला फरकही तो नमूद करतो. एका समाजाचे लोक दुसऱ्यासोबत खात-पीत नाहीत किंवा लग्न करत नाहीत असं निरिक्षण त्यानं नोंदवलं आहे.

डॉ. मेघा पानसरे सांगतात, "आपल्याकडे इतिहास समजून घेण्याचे स्रोत मर्यादित आहेत आणि अशा नोट्स हा खऱ्याखुऱ्या स्रोतांपैकी एक आहेत. इतिहासाचे वेगवेगळे अर्थ लावले जातात, हे सतत आपण पाहतो आहोत. मला वाटतं आपला एक सशक्त, सांस्कृतिक वैविध्याचा वारसा अफनासी निकितिनच्या लिखाणातून स्पष्टपणे दिसतो.

अफनासी निकितिन

"मुस्लिम राजवट असतानाही त्यांच्याकडे काही चांगुलपणा होता, हे सगळं आपल्याला तिथे जाणवतं. त्या काळातल्या सामूहिक जीवनातलं वेगवेगळ्या पंथांमध्ये सहअस्तित्वाचं चित्र तो मांडतो. हे आजच्या काळात जास्त महत्त्वाचं आहे."

त्या पुढे सांगतात, "अफनासी स्वतः एक श्रद्धाळू ख्रिश्चन होता आणि धर्म बदलण्याची सक्ती करण्यात आली, तेव्हा अस्वस्थ झाला. त्यावेळी त्यानं लिहिलंय, की इकडे यायचं असेल तर आपली श्रद्धा, धर्म तिथेच ठेवून यावी. पण एक बाजू हीदेखील आहे, की तो आपली श्रद्धा इथे टिकवूनही ठेवू शकला."

भारत आणि रशियामधलं नातं समजून घेण्यासाठीही अफनासी निकितिनला समजून घेणं गरजेचं आहे, असं त्यांना वाटतं.

"आज आपण रशिया-भारत मैत्रीविषयी बोलतो आणि त्यातून भारताला भूमिका घेणं किती अवघड बनलं आहे याची चर्चा करतो. पण दोन्ही देशांतले संबंध, मैत्री समजून घ्यायची असेल तर मला वाटतं अफनासी निकितिनला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण काळाच्या ओघात मागे गेलो, तरच हे नातं किती खोलवर रुजलं आहे याची जाणीव होते."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)