'लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशीच मी विधवा झाले,' रशिया - युक्रेन युद्धातली दु:खद प्रेमकथा

फोटो स्रोत, VALERIA SUBOTINA
- Author, डायना कुरीशको
- Role, बीबीसी न्यूज युक्रेन
"टिनच्या पत्र्यापासून त्याने लग्नाच्या अंगठ्या बनवल्या आणि मला लग्नासाठी प्रपोज केलं. मी होकार दिला होता," अंस वॅलेरिया सुबोतिना सांगते.
"त्याच्यावर माझं प्रेम होतं. आमच्या अंगठ्या अगदी छान होत्या," असं ती म्हणाली.
ती आणि तिचा 34 वर्षांचा प्रियकर अँड्रीय सुबोतिन युक्रेनच्या सैन्यात कॅप्टन होता. युद्धानंतर मारियूपोल मध्ये लग्न करण्याचा त्यांचा विचार होता.
लग्नानिमित्त मित्रमंडळी आणि कुटुंबीयांना एक मोठी मेजवानी देण्याचं त्यांचं स्वप्न होतं.
मात्र रशिया-युक्रेन युद्धाचा भडका उडल्यानंतर रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या दक्षिण युक्रेनमधील या बंदर असलेल्या शहरात रशियन सैन्यानं जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर थोड्याच दिवसात रशियन सैन्यानं या शहराला वेढा घातला.
त्यानंतर मारियूपोल वर रशियन सैन्यानं तोफांचा मारा सुरूच ठेवला होता. शहराच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी आग लागली होती. शहरात अन्न, वीज, पाणी नव्हतं. शहराला रशियन सैन्याचा वेढा असल्यामुळं तिथून बाहेर पडण्याचाही मार्ग नव्हता.
मारियूपोल शहराला पडलेला रशियन सैन्याचा वेढा तीन महिन्यांपर्यत सुरू होता. या लढाईत हजारो नागरिकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं आहे.
या काळात मारियूपोलमधील असंख्य लोकांनी अॅथोवस्तल पोलाद कारखान्यात मोठ्या आशेनं आसरा घेतला होता. तिथं बॉम्ब हल्ल्यापासून संरक्षण करणारे 30 बंकर होते. सोविएत युनियन असताना शीतयुद्धाच्या काळात आण्विक हल्ल्याची भीती सतत व्यक्त केली जायची. त्यावेळेस हे बंकर्स तयार करण्यात आले होते.
याच बंकर्समध्ये वॅलेरिया विवाहबद्ध झाली होती आणि तिथेच ती विधवा देखील झाली होती. हे सर्व फक्त दोन दिवसांच्या कालावधीत घडलं होतं.
अन्न पदार्थांचा तुटवडा
रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यास सुरूवात केली तेव्हा वॅलेरिया कवयित्री होती. त्यानंतर लगेचच ती अॅझोव्ह ब्रिगेडची प्रेस अधिकारी बनली. अॅझोव्ह ब्रिगेड हा युक्रेनच्या नॅशनल गार्डचा भाग आहे. अती उजव्या गटांशी असलेल्या कथित संबंधांमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
अॅझोव्ह ब्रिगेडनं स्वत:च अनेकदा जोर देऊन सांगितलं होतं की ते युक्रेनमधील राष्ट्रवादाचा अंगिकार करतात आणि त्यांची अती-उजव्या गटांशी कोणताही संबंध नाही.
मारियूपोलवरील रशियाचा हल्ला जसजसा तीव्र होत गेला तशी युक्रेनच्या सैन्याची अॅझोवस्तलच्या पोलाद कारखान्यातील बंकरमध्ये पीछेहाट होत गेली. त्यांच्याबरोबर या बंकरमध्ये नागरिकदेखील होते.
या बंकर्सचं प्रवेशद्वार एखाद्या भगदाडासारखं होतं. तिथून आत जाताना तुम्हाला अनेक अर्धवट कोसळलेल्या पायऱ्यांनी खाली जावं लागायचं, असं वॅलेरिया सांगते.
"या बंकर्समध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला अनेक पोकळ्या आणि बोगद्यांमधून जावं लागायचं आणि जोपर्यत तुम्ही एका कॉंक्रीटच्या सुरक्षित छोट्या खोलीपर्यत पोचत नाही, तोपर्यत तुम्हाला खाली जावं लागायचं," असं ती सांगते.
बंकरमध्ये लोकांनी तात्पुरत्या स्वरूपाची स्वयंपाकघरं बनवली होती. तिथं उरलेलं अन्न चुलीवर शिजवलं जायचं.

फोटो स्रोत, OREST DMYTRO KOZATSKY
लोकांना पीठ मिळालं की ते पीठ मळून घ्यायचे आणि ब्रेड तयार करायचे.
"आम्ही त्या गोष्टीला ब्रेड म्हणायचो पण खरं तर ते फक्त पाण्यावरील पीठाचे गोळेच असायचे. अशा रितीने आम्ही त्यात जिवंत राहिलो. हा एकप्रकारे अन्नधान्याचा दुष्काळच होता," असं वॅलेरिया सांगते.
"आम्ही उंदरांसारखे राहत होतो. आम्हाला काहीही मिळालं की आम्ही त्यावर तुटून पडायचो. आम्ही चिंध्या किंवा कपड्याच्या बोळ्यांवर, तुकड्यांवर झोपायचो."
"काही ठिकाणी तर पूर्णपणे अंधार असयाचा. मात्र तुमचे डोळे त्याला सरावायचे आणि तुम्हाला ती गोष्ट सर्वसाधारण वाटू लागायची. मात्र तेव्हापासून आमच्या आयुष्यात सुरळीत असं काहीही नव्हतं."
15 एप्रिल 2022 च्या दिवशी, हवाई हल्ल्यात एक खूप मोठा बॉम्ब पोलादाच्या कारखान्यावर टाकण्यात आला. त्यात वॅलेरिया जखमी झाली.
"मी मृतदेहांच्या गराड्यात सापडले होते. त्यामध्ये फक्त मीच जिवतं वाचले होते. तो एक चमत्कार होता मात्र ती एक खूप मोठी शोकांतिकादेखील होती."

फोटो स्रोत, VALERIYA SUBOTINA
त्यानंतर गंभीर आघात बसलेली वॅलेरिया अॅझोवस्तलच्या भूमिगत हॉस्पिटलमध्ये आठ दिवस होती. तिथं हातपाय कापलेल्या शेकडो सैनिकांबरोबरच तिच्यावर उपचार होत होते.
"त्या सैनिकांना योग्य वैद्यकीय मदत मिळत नव्हती कारण तिथं फारच थोडी औषधं होती. तिथं सर्वत्र रक्त आणि कुजल्याचा वास येत होता," असं ती सांगते.
वॅलेरियाचा प्रियकर अँड्रीय हा देखील अॅझोवस्तलमध्ये होता. वॅलेरिया जखमी झाल्यानंतर लवकरच त्याने तिला त्या बंकरमध्येच लग्नाची मागणी घातली होती. त्याची त्या बंकरमध्येच लग्न करण्याची इच्छा होती.
5 मे ला या जोडप्यानं आवश्यक त्या कागदपत्रांवर सह्या केल्या आणि त्याच्या स्कॅन कॉपी किव मध्ये असणाऱ्या अँड्रीयच्या पालकांना पाठवल्या. त्यांनी ती कागदपत्रे विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन सादर केली आणि या विवाहाला अधिकृत स्वरूप आलं.
त्यानंतर बंकरमध्येच त्यांचा विवाह समारंभ होता. विवाहप्रसंगी खास पोशाख घालतात त्याच दिमाखात त्यांनी त्यांचा लष्करी युनिफॉर्म घातला होता. त्यांनी एकमेकांना टिनच्या पत्र्यापासून बनवलेल्या अंगठ्या घातल्या होत्या.

फोटो स्रोत, VALERIYA SUBOTINA
अँड्रीयने वॅलेरियाला वचन दिलं होतं की 'युद्ध संपल्यानंतर तो तिला लग्नाची एक छानशी अंगठी विकत घेऊन देणार होता.'
मात्र 7 मे च्या दुर्दैवी दिवशी तो मारला गेला. त्या भागात एक लष्करी कारवाई करत असताना त्याला गोळी लागली.
"आपण ज्याच्यावर प्रेम करत असतो त्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो, तेव्हा त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांबद्दल लोक बोलत असतात. मात्र मला तशी कोणतीही भावना जाणवली नाही," असं वॅलेरिया सांगते.
"खरंतर ज्या दिवशी अॅंड्रियचा मृत्यू झाला त्यादिवशी त्याच्या मृत्यूची बातमी मला मिळण्यापूर्वी मी चांगल्या मूडमध्ये होती. माझं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि मी प्रेमात होते."
"जेव्हा वॅलेरियाला तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी कळाली तेव्हा मी रडले नाही, ते सर्व दुःख मी आत साठवून ठेवलंय," असं ती सांगते.
"अॅझोवस्तलमध्ये एक दिवस जणू एक वर्षाप्रमाणं होता. पहिल्या दिवशी मी वधू होते, त्याच्या पुढील दिवशी मी पत्नी आणि त्याच्या पुढील दिवशी...मला तो शब्द बोलण्याचीदेखील भीती वाटते आहे."
युद्धकैदी
मे महिन्याच्या सुरूवातीला अॅझोवस्तलच्या पोलाद कारखान्यात आश्रय घेतलेल्या आणि 80 दिवस अन्न किंवा औषधाशिवाय काढलेल्या युक्रेनच्या हजारो नागरिकांना त्वरित बाहेर काढण्याची आवश्यकता होती.
सुरूवातीला नागरिकांना त्या पोलाद कारखान्यातून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर रशियन सैन्यानं युक्रेनच्या सैनिकांना कैद केलं होतं.
युद्धकैद्यांच्या हस्तांतराच्या कराराचा भाग म्हणून त्यांना लवकरच सोडण्यात येईल अशी आशा होती.
मात्र दोन वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरदेखील युक्रेनचे हजारो सैनिक अजूनही रशियाच्या ताब्यात आहेत. त्यामध्ये अॅझोव्ह ब्रिगेडचे जवळपास 900 सैनिक देखील आहेत.
युक्रेनमध्ये अनेक लोक अॅझोव्ह सैनिकांना राष्ट्रीय नायक मानतात. मारियूमोलच्या युद्धात तुलनेने कमी संख्येने असलेल्या या सैनिकांनी रशियाच्या मोठ्या सैन्याला कडवी झुंज दिली होती.
युक्रेनच्या सरकारने या सैनिकांना सोडवण्यासाठी आणखी प्रयत्न करावे यासाठी त्यांचे कुटुंबीय नियमितपणे निदर्शनं करत असतात. युद्धकैंद्यांच्या हस्तांतराची प्रक्रिया अतिशय गुंतागुतींची असते.

फोटो स्रोत, VALERIYA SUBOTINA
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत रशियाच्या कैदेत असणाऱ्या युक्रेनच्या जवळपास 3,000 सैनिकांना युद्धकैद्यांच्या हस्तांतरण कराराअंतर्गत मुक्त करण्यात आलं आहे.
रशियाच्या कैदेत 10,000 हून अधिक युक्रेनियन सैनिक असल्याचा अंदाज आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका ताज्या तपासात नोंदवण्यात आलं आहे की रशियाच्या कैदेत असणाऱ्या युक्रेनच्या सैनिकांना सतत मारहाण केली जात आहे, त्यांना इलेक्ट्रिक शॉक दिले जात आहेत, महिला सैनिकांवर बलात्कार, लैंगिक हिंसा केली जाते आहे. त्यांना नकली फाशी देखील दिली जाते आहे.
वॅलेरियादेखील 11 महिन्यांसाठी कैद झाली होती. या कालावधीत तिचा छळ करण्यात आला आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आले, असं तिनं सागितलं. अलीकडेच तिनं एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. कैदेत असतानाच्या काळाबद्दल तिनं हे पुस्तक लिहिलं आहे.
तिचा दिवंगत पती अँड्रीय याचं पार्थिव शरीर अॅझोवस्तलच्या पोलाद कारखान्यात आहे.
"मी ज्या ज्या गोष्टींवर प्रेम केलं ती प्रत्येक गोष्ट, माझं शहर, माझे मित्र आणि माझा पती, सर्वांना रशियन्सने मारून टाकलं, सर्वकाही नष्ट केलं," असं वॅलेरिया तिची वेदना व्यक्त करताना सांगते.











