पाकिस्तानच्या आयेशाला भारतात मिळालं नवं हृदय, कॅनडाचा पर्याय सोडला कारण...

- Author, शारदा व्ही
- Role, बीबीसी तामिळ
"आम्ही पाकिस्तानात एक मोहीम राबवली पण एवढ्या रकमेची तरतूद होऊ शकली नाही. तरीही इथल्या डॉक्टरांनी आमच्यासाठी जे काही केलं ते अविश्वसनीय होतं. सध्या मला काय वाटतंय हे मी शब्दात सांगू शकत नाही."
पाकिस्तानच्या कराचीत राहणाऱ्या सनोबर रशीद यांचे हे उद्गार. त्यांच्या 19 वर्षीय मुलीच्या हृदयाचं प्रत्यारोपण चेन्नईच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये केलं गेलं. आयेशा नावाच्या त्यांच्या मुलीला या शस्त्रक्रियेनंतर एक नवीन आयुष्य मिळालं आहे.
सनोबर रशीद यांनी जेव्हा त्यांची गोष्ट आम्हाला सांगितली त्यावेळी त्याच इमारतीच्या 11 व्या माळ्यावर आयेशा उपचार घेत होती. सनोबर यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचं समाधान आणि आनंद दिसत होता.
दहा महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलीच्या हृदयाचं प्रत्यारोपण भारतातच होईल या आशेने त्या पाकिस्तानातून भारतात आल्या होत्या.
आयेशाच्या हृदयाचा 25 टक्के भाग निकामी झाल्याचं कळलं तेव्हा ती फक्त सात वर्षांची होती. हळूहळू आयेशाचं हृदय कमकुवत होऊ लागलं आणि ते सामान्य पद्धतीने काम करत नव्हतं.
2019ला पहिल्यांदा सनोबर आणि आयेशाने चेन्नईतील एका हृदयरोग तज्ज्ञाची भेट घेतली. त्यानंतर काही काळात तिला हृदयविकाराचा झटका येऊन गेला.
पाकिस्तानात ही शस्त्रक्रिया करणं जवळपास अशक्य होतं
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिच्या हृदयात एक कृत्रिम उपकरण बसवलं गेलं. त्यानंतर त्या दोघी कराचीला परत गेल्या पण दोन वर्षानंतर तिच्या हृदयाला संसर्ग झाल्याने हृदयाच्या उजवा हिस्सा निकामी झाला.
त्यानंतर ट्रान्सप्लांट म्हणजेच हृदयाचं प्रत्यारोपण हा एकमेव मार्ग असल्याचं डॉक्टरांनी आयशा आणि सनोबर यांना सांगितलं.
सनोबर म्हणतात की ही शस्त्रक्रिया पाकिस्तानात होऊ शकत नव्हती.
त्या म्हणतात की, "यासाठी आम्हाला भारत किंवा कॅनडाला जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर आम्ही याबाबतीत थोडी चौकशी केली आणि कळलं की यासाठी भारत हा एक चांगला पर्याय असेल."

सनोबर यांनी यासाठी चेन्नईतील एका डॉक्टरांशी संपर्क केला पण त्या शस्त्रक्रियेसाठी आणि नंतरच्या उपचारांसाठी लागणारे पैसे त्यांच्याकडे नव्हते. त्या सांगतात की, "चेन्नईतल्या डॉक्टरांनी त्याची चिंता न करता आम्हाला भारतात यायला सांगितलं."
चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात डॉ. बालकृष्णन हे हृदयप्रत्यारोपण विभागाचे संचालक म्हणून काम करतात. 2019 पासून ते आयशावर उपचार करत होते.
डॉ. बालकृष्णन म्हणतात की, "पहिल्यांदा आयेशा आमच्याकडे आली तेव्हा तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर आम्ही तिच्या हृदयात 'एकमो'(ईसीएमओ) नावाचं एक उपकरण बसवलं. यासोबतच रक्ताभिसरणासाठी आम्ही एक कृत्रिम उपकरणही तिच्या हृदयात बसवलं होतं.
त्यानंतर तिच्या तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे आम्ही तिला घरी पाठवून दिलं. पण पाकिस्तानमध्ये कृत्रिम हृदय पंपावर देखरेख ठेवण्यासाठी कोणत्याही सुविधा नाहीत आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांमधून गळती झाली."
त्यांचं म्हणणं होतं की आयेशा भारतात आली तेव्हा तिची परिस्थिती गंभीर होती आणि बरेच दिवस ती बेशुद्धावस्थेत होती.
ते बऱ्याच वर्षांपासून आयेशावर उपचार करत होते म्हणून त्यांना शक्य होईल ते सगळे प्रयत्न त्यांनी केल्याचं डॉक्टर बालकृष्णन सांगतात. त्यांच्या प्रयत्नांमुळेच दिल्लीतल्या एका कुटुंबाने त्यांच्या कुटुंबातील 69वर्षीय व्यक्तीचे हृदय दान करण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, ANI
एमजीएम रुग्णालयात संयुक्त संचालक म्हणून काम करणारे सुरेश राव म्हणतात की, "भारतातील प्रत्यारोपणाच्या नियमानुसार शरीराच्या कोणत्याही अवयवाचे प्रत्यारोपण करायचे असेल तर आधी स्थानिकांना प्राधान्य दिलं जातं. त्यामुळेच आयेशाला हृदय मिळण्यासाठी दहा महिने वाट पाहावी लागली. त्यामुळे इतर कोणतेही रुग्ण उरले नसताना आयेशाला हे हृदय दिलं गेलं."
ते म्हणतात की, "जर हृदय मिळालं नसतं तर आज आयेशा कदाचित जिवंत राहिली नसती."
डॉक्टर सुरेश म्हणाले, “जेव्हा आम्हाला कळलं की हे कुटुंब हृदय दान करण्यास तयार आहे, तेव्हा आम्ही आयेशाला शस्त्रक्रियेसाठी तयार केले. दिल्लीहून पाच तासांत ते हृदय आमच्या रुग्णालयात पोहोचलं. जेव्हा पाच तासांसाठी हृदयाची धडधड थांबते, तेव्हा ते दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यापूर्वी पुनर्जीवित करणं गरजेचं असतं."
डॉक्टर बालकृष्णन यांनीही या शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी होणाऱ्या खर्चाचीही माहिती दिली.
आयेशाला फॅशन डिझायनर बनायचं आहे
ते म्हणाले की, "ऐश्वर्यम ट्रस्टच्या मदतीने आयेशावर उपचार करता आले. कारण आयेशाच्या कुटुंबाकडे तेवढे पैसेच नव्हते. मी काही मदत केली आणि एमजीएम रुग्णालयात प्रत्यारोपण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काही मदत केली."
ऐश्वर्यम ट्रस्टने आतापर्यंत 175 हृदय प्रत्यारोपणाचा समावेश असलेल्या 12 हजार रूग्णांच्या उपचारासाठी मदत केली आहे.
डॉक्टरांचे आभार मानताना आयेशाने बीबीसीला सांगितलं की, "शस्त्रक्रियेनंतर मला बरं वाटत आहे."
“डॉक्टरांनी सांगितलं आहे की मी दोन महिन्यांत घरी परत जाऊ शकते. मला परत जाऊन माझा अभ्यास चालू ठेवायचा आहे आणि भविष्यात फॅशन डिझायनर बनायचं आहे."

फोटो स्रोत, AYESHA RASHEED
ती म्हणते की, “भारतात राहात असताना मला असे वाटत नव्हते की मी पाकिस्तानच्या बाहेर आहे. सर्व काही समान आहे, काहीही वेगळं नाही.”
चेन्नई शहराबाबत बोलताना आयेशा म्हणाली की, “माझी तब्येत बरी नसल्यामुळे माझा बहुतेक वेळ रुग्णालयात गेला. जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी समुद्रकिनाऱ्यावर मात्र जाऊन आले."











