डुक्कर हृदय प्रत्यारोपण : 25 वर्षांपूर्वी डुकराचं हृदय माणसाला लावल्याने डॉ. धनीराम बरुआ यांना झाला होता तुरुंगवास

फोटो स्रोत, BBC/DILIP KUMAR SHARMA
- Author, दिलीपकुमार शर्मा
- Role, सोनपूर, आसाम येथून बीबीसी हिंदीकरिता
"मी 25 वर्षांपूर्वी जगात पहिल्यांदाच मानवी शरीरात डुकराचं हृदय बसवलं होतं. डुकराचे अवयव मानवी शरीरात प्रत्यारोपित केले जाऊ शकतात, असं मी त्यावेळी माझ्या संशोधनाच्या आधारे जगाला सांगितलं होतं. पण त्यावेळी मला कुणीच पाठिंबा दिला नाही. इतकंच नव्हे तर सरकारने मला तुरुंगात डांबलं."
"आता इतक्या वर्षांनी अमेरिकन संशोधकांनी मानवामध्ये डुकराचं हृदय प्रत्यारोपण यशस्वीरित्या केलं, असं सांगितलं जात आहे. पण मुळात हे संशोधन मी आधीच केलेलं होतं."
71 वर्षीय अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. धनीराम बरुआ बोलत असताना रागाने मुठी आवळून टेबलवर मारताना दिसून आले. त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या मनातील राग प्रकट होत होता.
डॉ. बरुआ यांना 2016 मध्ये ब्रेनस्ट्रोकच्या समस्येचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून ते स्पष्ट आणि सहजपणे बोलू शकत नाहीत.
त्यांच्यासोबत अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या डॉ. डालिमी बरुआ त्यांचं अस्पष्ट बोलणं समजावून सांगतात. डॉ. बरुआ यांच्या रागाचं कारण म्हणजे त्यांच्या संशोधनावर झालेला अन्याय आहे, असं त्या म्हणाल्या.
नुकतेच अमेरिकेतील संशोधकांच्या एका पथकाने जनुकीय बदल करण्यात आलेल्या एका डुकराचं हृदय मानवी शरिरात बसवलं आहे.
अवयव प्रत्यारोपणाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या डुकराचं हृदय मानवी शरिरात बसवण्यात आलं.

फोटो स्रोत, UNIVERSITY OF MARYLAND SCHOOL OF MEDICINE
युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँड मेडिकल सेंटरच्या डॉक्टरांच्या मते, "अशा प्रकारची शस्त्रक्रिया जगात पहिल्यांदाच झाली. डेव्हिड बेनेट नामक 57 वर्षीय व्यक्तीला ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांची प्रकृतीही आता सुधारत आहे."
अमेरिकन संशोधकांकडून डुकराचं हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया जगात पहिल्यांदाच केल्याचा दावा करण्यात येत आहे, त्यावर डॉ. धनीराम यांनी नाराजी दर्शवली.
पण पुढच्याच क्षणी त्यांनी या शस्त्रक्रियेबाबत आनंदही व्यक्त केला. अखेर चिकित्सा विज्ञानातील लोकांना 25 वर्षांनी ही गोष्ट समजली, ते चांगलं आहे. मानवी शरीरात डुकराचे अवयव बसवता येऊ शकतात, हे त्यांना कळलं, हे चांगलंच झालं, असं ते म्हणाले.
1997 मध्ये केलेली शस्त्रक्रिया आणि तुरुंगवास
डॉ. धनीराम बरुआ यांचं आसामच्या सोनापूर शहरात 'डॉ. धनीराम बरुआ हार्ट सिटी अँड सिटी ऑफ ह्यूमन जिनोम' नावाने वैद्यकीय संशोधन केंद्र आहे.

फोटो स्रोत, BBC/DILIP KUMAR SHARMA
त्यांच्या मते, जनुकीय बदल करून डुकराचं हृदय प्रत्यारोपित करणं ही काय फार मोठी गोष्ट नाही. आपण 25 वर्षांपूर्वी वापरलेल्या तंत्रज्ञानानुसारच अमेरिकन संशोधकांनी हा कारनामा करून दाखवल्याचा दावा ते करतात.
मानवी शरिरात डुकराचं हृदय बसवण्याबाबत चर्चेदरम्यान डॉ. बरुआ बीबीसीला म्हणाले, "मी 1 जानेवारी 1997 रोजी जगात पहिल्यांदा एका 32 वर्षीय व्यक्तीच्या शरीरात डुकराचं हृदय बसवलं होतं. या शस्त्रक्रियेपूर्वी 100 पेक्षा जास्त चाचण्या घेतल्या होत्या. त्यानंतर मानवी शरीर डुकराचं अवयव स्वीकारेल याबाबत खात्री पटवण्यात आली."

फोटो स्रोत, BBC/DILIP KUMAR SHARMA
संबंधित रुग्ण त्या शस्त्रक्रियेनंतर 7 दिवस जिवंत होता. हा एका यशस्वी शस्त्रक्रियेचाच परिणाम होता. पण नंतर रुग्णाला एकाच वेळी अनेक प्रकारचे संसर्ग झाल्यामुळे त्याचा जीव वाचू शकला नाही. त्या रुग्णाच्या हृदयाच्या खालील बाजूस छिद्र होतं. त्याला व्हेंट्रिकुलर सेप्टल डिफेक्ट असं संबोधलं जातं. त्यामुळे त्या रुग्णास अनेक संसर्गांनी ग्रासलं होतं."
डॉ. धनीराम बरुआ यांनी ही शस्त्रक्रिया आपल्या सोनापूर येथील हार्ट इन्स्टिट्यूटमध्येच केली होती. यादरम्यान त्यांनी हाँगकाँगच्या एका तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतली होती.
सुमारे 15 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत डॉ. बरुआ यांनी त्या रुग्णाच्या शरिरात डुकराचं हृदय आणि फुफ्फुसं प्रत्यारोपित केली होती. पण संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर या शस्त्रक्रियेवरून मोठा वाद निर्माण झाला.
स्थानिक माध्यमांमध्ये या घटनेची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दोन्ही डॉक्टरांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली तसंच अवयव प्रत्यारोपण कायदा, 1994 अंतर्गत अटक करण्यात आली.
डॉ. धनीराम बरुआ यांनी स्कॉटलँडच्या ग्लासगो येथील रॉयल कॉलेजमधून कार्डिओ सर्जरीचं शिक्षण घेतलं होतं.
25 वर्षांपूर्वीच्या घटनेच्या आठवणी सांगताना ते म्हणतात, "आज सगळ्या जगभरात डुकराच्या हृदय प्रत्यारोपणाची चर्चा होत आहे. पण मला त्यावेळी तुरुंगात टाकण्यात आलं होतं. माझ्या इन्स्टिट्यूटमध्य तोडफोड करण्यात आली. मला 40 दिवस रुग्णालयात राहावं लागलं. सरकार किंवा कोणत्याही चिकित्सा क्षेत्रातील व्यक्तीने माझी मदत केली नाही. तो खटला आजही माझ्यावर चालू आहे."
नवनवी औषधं विकसित करण्याचे 'दावे'
एका प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. धनीराम म्हणतात, "मी ग्लासगो येथे कार्डिओ सर्जरीचं शिक्षण घेतल्यानंतर ब्रिटन, अबुधाबीसह अनेक देशांमध्ये काम केलं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरून मी मायदेशात परतलो. त्यादरम्यान आसाममधील AGP सरकारने माझ्यासोबत खूपच चुकीचं केलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही मी माझं संशोधन सुरू ठेवलं. आतापर्यंत मी 23 औषधांचा शोध लावला आहे. त्यांच्या मदतीने हृदयविकार, HIV आणि मधुमेह यांच्यासारख्या आजारांवर उपचार केलं जाऊ शकतं."

फोटो स्रोत, BBC/DILIP KUMAR SHARMA
आपण बनवलेल्या एका औषधाच्या इंजेक्शनमुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेची गरज पडत नाही, असा दावाही डॉ. धनीराम यांनी केला.
ते सांगतात, "मी हृदयविकारावरचं एक औषध बनवलं आहे. त्यामुळे मानवी शरिरात डुकराचं हृदय लावण्याचीही गरज आता भासणार नाही. या औषधामुळे कोणत्याच प्रकारच्या शस्त्रक्रियेची किंवा प्रत्यारोपणाची गरज नसेल."
बीबीसीने डॉ. धनीराम यांना या औषधांच्या वैद्यकीय चाचणीबद्दल तसंच आरोग्य संस्थांकडून मिळणाऱ्या मंजुरीबद्दल विचारलं. पण त्यांनी याविषयी स्पष्टपणे काहीच सांगितलं नाही.
डॉ. धनीराम यांच्या सहकारी म्हणून बराच काळ काम करणाऱ्या डॉ. गीता म्हणतात, "ही औषधं अनेक वर्षांच्या चाचण्यांनंतर तयार केली जातात. त्यासाठी ICMR सह इतर संस्थांशी संपर्क करावा लागतो. ही मोठी प्रक्रिया आहे. त्यानंतरच आपल्याला परवानगी मिळते. आम्ही कोरोना लसही बनवली आणि ICMR ला कळवलं. पण आम्हाला परवानगी मिळाली नाही. प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आलं."
मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्रातून पोस्ट डॉक्टरेट करणाऱ्या डॉ. गीता यांच्या मते, "डॉ. धनीराम यांनी HIV वरचं औषधही तयार केलं आहे. यामध्ये रुग्णाला केवळ 10 दिवसांचा औषधाचा कोर्स करावा लागतो. रुग्णाला रोज एक इंजेक्शन दिलं जातं. त्यानंतर तो व्यक्ती HIV चं औषध न खाताही सामान्य जीवन जगू शकतो. हा उपचार घेतलेल्या 25 टक्के रुग्णांची HIV चाचणी निगेटिव्ह येते."
बीबीसीने यासंबंधित अनेक प्रतिप्रश्न विचारूनही डॉ. धनीराम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या दाव्यांबाबत ठाम भूमिका मांडली. आपले अनेक रुग्ण या औषधांच्या साहाय्याने निरोगी जीवन जगत असल्याचा दावा त्यांनी केला.
दाव्यांवर प्रश्नचिन्ह
डॉ. बरूआ यांनी केलेल्या दाव्यांवर पूर्वीपासूनच अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.
आसामच्या HIV एड्सविषयक कार्यकर्त्या जान्हबी गोस्वामी यांनी त्यांच्यावर आणखी गंभीर आरोप केला.
डॉ. धनीराम यांनी दिलेल्या औषधाच्या इंजेक्शनमुळे राज्यात 4 जणांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी म्हटलं.
जान्हबी गोस्वामी म्हणतात, "मला डॉ. धनीराम यांच्या संशोधनावर प्रश्नचिन्ह उपस्थित नाही करायचं. पण आम्ही त्यांना अनेकवेळा म्हटलं की तुम्ही तुमचं HIV वरचं औषध WHO कडे पाठवून द्या. ICMR ची परवानगी घ्या. पण ते कुणाचंच ऐकत नाहीत. आम्ही एड्स कंट्रोल सोसायटीमार्फत आसाम सरकारकडेही डॉ. धनीराम यांनी बनवलेल्या औषधाची चाचणी करण्याची विनंती केली होती.
डॉ. धनीराम यांचं HIV इंजेक्शन घेतल्यानंतर नवगांव येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला. आर्थिकरित्या मागास असलेल्या गरिब कुटुंबातील व्यक्ती एड्समुळे झालेल्या मृत्यूचं प्रकरण जास्त मोठं होऊ देत नाहीत. समाजातून भेदभाव होण्याची त्यांना खूप जास्त भीती असते, असं गोस्वामी म्हणाल्या.
संशोधन संस्थेभोवती सुरक्षेचं कडं
सोनापूरमध्ये डॉ. धनीराम बरुआ इन्स्टिट्यूटच्या इमारतीबाहेर कोणत्याही प्रकारचा बोर्ड लावलेला नाही.
उंच चार भिंतींच्या् कुंपणात त्यांचं इन्स्टिट्यूट आहे. हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. धनीराम यांच्या परवानगीशिवाय चिटपाखरूही प्रवेश करू शकत नाही.
या संस्थेच्या आवारात सुमारे 200 हून अधिक भटके कुत्रे आहेत. ते कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आत जाऊ देत नाहीत.
या कुत्र्यांबद्दल विचारलं असता डॉ. धनीराम हसत म्हणाले, "मी वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने वेगवेगळी संशोधनं करत असतो. पण सरकारकडून मला कोणत्याच प्रकारची सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही. त्यामुळे हे कुत्रेच माझं रक्षण करतात."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








