हिंदू महिलेचं हृदय मुस्लीम तरुणाला दान: 'अल्लाह उनको जन्नत नसीब करे'

फरीद फणसोपकर

फोटो स्रोत, Shardul Kadam

फोटो कॅप्शन, फरीद फणसोपकर
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

"फरीद, तुम्हाला तातडीने हॉस्पिटलला पोहोचावं लागेल. एका मृत महिलेच्या कुटुंबाने त्यांचं हृदय दान करायचं ठरवलं आहे आणि सर्व रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले तर तत्काळ आपल्याला तुमचं हृदय प्रत्यारोपण करावं लागेल."

12 सप्टेंबर 2021 या दिवशी संध्याकाळी 4 वाजता 31 वर्षांच्या फरीद फणसोपकर यांना मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमधून फोन आला. गेल्या कित्येक दिवसांपासून फरीद आणि त्याचं कुटुंब या फोनची वाट पाहत होतं. कारण हा फोन कॉल फरीद यांच्यासाठी पुन्हा एकदा जगण्याची उमेद घेऊन आला होता.

फरीद यांना LVDCM (लेफ्ट वेंट्रिक्यूलर डिसफंकश्नसह डायलेटेड कार्डिओ मायोपॅथी) हा आजार असल्याने त्याचं हृदय प्रत्यारोपण करावं लागणार होतं. शरीराला वैद्यकीयदृष्ट्या योग्य ठरेल अशा हृदयाच्या प्रतिक्षेत फरीद होते.

'सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं'

फणसोपकर कुटुंब मुळचं रत्नागिरी जिल्ह्यातलं. मुंबईतील माहिम परिसरात ते राहतात.

फरीद यांची आई जेहरुन्नीसा आणि लहान भाऊ इमरान असं त्यांचं कुटुंब आहे. फरीद 3 वर्षांचे असतानाच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. 1992 साली मुंबईत झालेल्या दंगलीत वडिलांना आपले प्राण गमवावे लागले, असं फरीद सांगतात.

फरीद एका दुकानात टेलरचं काम करतात. साधारण मे महिन्यापासून फरीद यांना अचानक त्रास सुरू झाला. या दरम्यानच्या काळात त्याला मलेरियाची लागण झाली.

फरीद फणसोपकर

फोटो स्रोत, ShardulKadam

फोटो कॅप्शन, जेहरुन्नीसा फणसोपकर आणि फरीद फणसोपकर

बीबीसी मराठीशी बोलताना फरीद यांनी सांगितलं, "मी काम करत असतानाही थकवा जाणवत होता. दिवसभर थकवा जाणवू लागला. सारखा खोकला येत होता. मी सुरुवातीला एवढं लक्ष दिलं नाही. माझ्या घरच्यांनी वाटलं की थोडं बरं वाटत नसेल म्हणून आराम करतोय. मग मला मलेरिया झाला. केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला. त्यावेळी कळालं की मला हृदयाशी संबंधित काहीतरी आजार आहे."

काही महत्त्वाच्या चाचण्या केल्यानंतर त्यांना लेफ्ट वेंट्रिक्यूलर डिसफंकश्नसह डायलेटेड कार्डिओ मायोपॅथी हा गंभीर आजार असल्याचं समोर आलं. यामुळे त्यांचं हृदय कमजोर झालं होतं. पुरेसा ऑक्सिजन मिळत नव्हता. ग्लोबल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी फरीद यांना हृदय प्रत्यारोपण करावं लागेल असं सांगितलं.

एका दुसऱ्या व्यक्तीचं हृदय आपल्या मुलाच्या छातीत शस्त्रक्रिया करुन बसवणार यावर फरीद यांच्या आईला विश्वास बसत नव्हता.

"असं काही असतं याची मला कल्पनाच नव्हती. पण माझ्या मुलाला होणाऱ्या वेदना पाहून मला त्रास होत होता. आम्ही अनेक औषध उपचार करून पाहिले पण त्याला कशाचाच गुण येत नव्हता. त्याला पुन्हा जगता यावं यासाठी डॉक्टरांनी जो सल्ला दिला तो आम्ही मान्य केला," असं जेहरुन्नीसा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

'हृदय दात्याचं नाव पाहून मी अचंबित झालो'

डॉक्टरांशी बोलणं झाल्यावर फरीद ताबडतोब घरातून निघाले आणि शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलला पोहोचले. हृदय प्रत्यारोपणाच्या केसेसमध्ये रुग्णाला वेळेत हृदय दाता मिळणं अत्यंत गरजेचं असतं. नाहीतर खूप उशीर होतो, असं ग्लोबल हॉस्पिटलच्या कंसलटंट ट्रांसप्लांट फिजिशियन डॉ. श्रुती तापियावाला सांगतात.

"इतर अवयवांचं प्रत्यारोपण आणि हृदय प्रत्यारोपण यात खूप अंतर आहे. कारण हृदय प्रत्यारोपण दाताने दान केल्यानंतर काही ठराविक तासांत होणं आवश्यक असतं. ही अत्यंत नाजूक परिस्थिती असते. त्यामुळे हृदय प्रत्यारोपणासाठी प्रतिक्षा यादीत असलेल्या रुग्णांनी हॉस्पिटलपर्यंत पोहोचणं आणि त्यांना वेळेत हृदय उपलब्ध होऊन संबंधित टेस्ट वेळेत होणं यावर सर्वकाही अवलंबून असतं."

डॉ.श्रुती तापियावाला

फोटो स्रोत, Shardul Kadam

फोटो कॅप्शन, डॉ.श्रुती तापियावाला

त्या पुढे सांगतात, "फरीदच्या केसमध्ये डोनर इन-हाऊस होता. ज्यांनी हृदय दान केलं त्यांचा मृतदेह याच हॉस्पिटलमध्ये होता. त्यांच्या कुटुंबाने आम्हाला सांगितलं की त्यांना अवयव दान करायचे आहेत. त्यामुळे हृदयाचा प्रवास करून पोहचण्याचं आव्हान या केसमध्ये नव्हतं."

फरीद यांचे भाऊ इमरानकडे हृदय दात्याच्या रक्ताचे नमुने आले. त्यावर एका हिंदू महिलेचं नाव त्याने वाचलं. "माझ्याकडे जे रक्ताचे नमुने देण्यात आले त्यावर मी नाव वाचलं. मी लगेच आईकडे गेलो. तिला हे सांगितलं आणि मानवतेच्या धर्मापेक्षा काहीच मोठं नाही हे मी तिला सांगितलं," बीबीसी मराठीशी बोलताना इमरान फणसोपकरने सांगितलं.

परंतु या शस्त्रक्रियेसाठी फणसोपकर कुटुंबाला जवळपास 15 ते 20 लाख रुपयांचा खर्च येणार होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्यासाठी हा खर्च परवडणारा नव्हता.

याविषयी बोलताना इमरान म्हणाला, "प्रत्येक कुटुंबात एक मजबूत व्यक्ती असतो. आम्हाला फरीदच्या आजाराविषयी कळाले तेव्हा आमचं कुटुंब आता ढासळणार असं वाटलं. जणू पायाखालची जमीन सरकली. त्यात ऑपरेशनचा एवढा खर्चही आम्हाला शक्य नव्हता."

इमरान फणसोपकर

फोटो स्रोत, Shardul Kadam

फोटो कॅप्शन, इमरान फणसोपकर

हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी फरीद याचं पूर्व-प्रत्यारोपण आणि अँटीबॉडी स्क्रिनिंग करण्यात आलं. यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला. लीड हार्ट ट्रांसप्लांट आणि सिनियर सीव्हीटीएस सर्जन डॉ. प्रवीण कुलकर्णी म्हणाले,

"हृदय दाताच्या शरीरातून हृदय काढण्यापासून ते प्राप्तकर्त्याच्या शरीरात प्रत्यारोपण केल्यानंतर हृदय सुरू होण्यापर्यंतच्या कालावधीला 'इस्केमिया वेळ' असं म्हणतात. ही वेळ कमी होती तसंच अडवान्स HLA आणि फ्लो सायटोमेट्री क्रॉस मॅचेस यामुळे प्रत्यारोपण यशस्वीरित्या पूर्ण झालं."

दात्याकडून मृत्यूनंतर सहा अवयव दान

ग्लोबल हॉस्पिटलमध्ये 41 वर्षीय महिला दाखल झाली होती. त्यांच्या मेंदूतून रक्तस्त्राव होत होता. नंतर त्यांना ब्रेन हॅमरेज झालं आणि त्यांचा मृत्यू झाला.

हार्ट अटॅक

फोटो स्रोत, Thinkstock

झोनल ट्रांसप्लांट कोऑर्डिनेश कमिटीच्या (ZTCC) नियमानुसार, मृत व्यक्तीच्या कुटुंबाने महिलेचे सहा अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. हृदय, किडनी आणि इतर चार अवयव दान करून दात्याने आपल्या मृत्यूनंतर अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी योगदान दिलं. ( ZTCC च्या नियमानुसार दात्याची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.)

अवयव दानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यारोपणासाठी प्रतिक्षेत असलेली यादी तपासण्यात येते. या यादीतील क्रमानुसार पहिल्या रुग्णाच्या उपचाराला प्राधान्य देण्यात येतं. जर संबंधित हॉस्पिटलमध्ये रुग्ण नसल्यास ZTCC च्या यादीनुसार शहर, जिल्हा, जवळचा दुसरा जिल्हा, राज्य यानुसार रुग्णांचा प्राधान्य क्रम ठरतो, असं डॉ. श्रुती तापियावाला सांगतात.

'मी सुद्धा अवयव दान करणार'

खरं तर हृदय प्रत्यारोपण यशस्वी झाल्याचं हे पहिलच उदाहरण नाही. राज्यसह देशभरात अवयव दानाची प्रक्रिया आणि त्या आधारे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. पण या घटनेकडे मानवतावादी दृष्टीकोनातूनही पाहिलं जातं आहे.

डॉक्टर्स

फोटो स्रोत, ShardulKadam

फरीद म्हणाला, "ज्या दात्यामुळे मला जीवनदान मिळालं मी त्यांचा आभारी आहे. उनके लिए दिल से दुआ निकलती है, अल्लाह उनको जन्नत नसीब करे."

यासंदर्भात बोलताना डॉ. श्रुती तापियावाला म्हणाल्या, "मनुष्याचं शरीर मनुष्याचं आहे. त्याचा धर्म धरतीवर येऊन आपण केला. जेव्हा निसर्गाने आपल्याला बनवलं तेव्हा एक शरीर दिलं आणि त्यातलं रक्त सगळ्याचं एकसारखंच आहे."

या उदाहरणावरून एक माणूस म्हणूनच आपण इतर माणसांच्या कामी येऊ शकतो हे दिसतं असं इमरान सांगतो.

"माणूसकीपेक्षा काहीही मोठं नाही असंही मला वाटतं. मी सुद्धा माझे अवयव दान करायचं ठरवलं आहे. अवयव दानामुळे माझ्या भावाचे प्राण वाचले त्यामुळे मीही कोणाचे तरी प्राण वाचवू इच्छितो," असंही तो म्हणाला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)