इराणी सुरक्षारक्षकांनी या तरुणीचं लैंगिक शोषण करून हत्या केली - गोपनीय कागदपत्रांनी गूढ उकललं

- Author, बेर्ट्राम हिल, आयडा मिलर आणि मायकेल सिमकिन
- Role, बीबीसी आय इनव्हेस्टिगेशन्स
इराणमधील एका मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या झाली होती. हे कृत्य इराणच्या संरक्षण दलातील तीन लोकांनी केल्याचं या दलाच्या कागदपत्रांतून उघड झालं आहे.
16 वर्षांची निका शाकारामी नावाची मुलगी 2022 साली सत्तेविरोधातील आंदोलनातून कशी नाहीशी झाली, याचा एक आराखडा या गोपनीय कागदपत्रांतून आम्हाला तयार करता आला आहे.
निकाचा मृतदेह या घटनेनंतर 9 दिवसांनी सापडला होता. तिनं आत्महत्या केल्याचा दावा सरकारने केला होता. परंतु तिच्या मृत्यूसाठी इराण सरकार आणि रिव्होल्युशनरी गार्ड्स जबाबदार असल्याचा आरोप होत होता, त्याबद्दल आम्ही अधिकृत प्रतिक्रिया मागितली, परंतु आम्हाला उत्तर मिळालं नाही.
इराणची इस्लामी राजवट सुरक्षित राहावी यासाठी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स म्हणजे आयआरजीसी हे दल काम करतं. त्याला रिव्होल्युशनरी गार्ड अशा नावाने ओळखतात. या दलाच्या एका अतिशय गोपनीय कागदपत्रांतून निकाच्या केसची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये तिची हत्या करणारे मारेकरी आणि हे प्रकरण लपवण्याचं काम करणारे त्यांचे वरिष्ठ यांची नावं नमूद केलेली आहेत.
यामध्ये आंदोलनात सहभागी असलेल्या निकाला रोखताना तिच्याबरोबर काय काय झालं याच्या व्यथित करणाऱ्या नोंदी आहेत.

फोटो स्रोत, Atash Shakarami
त्यांच्यापैकी एका माणसानं तिच्या अंगावर बसून तिच्यावर अत्याचार केले. तिचे हात बांधलेले असतानाही तिनं झगडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिला या लोकांनी बॅटनने मारहाण केली, अशा नोंदी आहेत.
यासंदर्भात अनेक खोटी कागदपत्रंही पसरवण्यात आली आहेत. त्यामुळेच या कागदपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी बीबीसीनं अनेक महिन्यांचा काळ घेऊन ती अनेक स्रोतांशी ताडून पाहून त्यांची सत्यता तपासली आहे.
या सखोल तपासातून ही कागदपत्रं निकाच्या शेवटच्या क्षणांबद्दल माहिती देणारी आहेत हे लक्षात आलं.
निका शाकारामीचं नाहीसं होणं आणि नंतर तिचा मृत्यू होणं याचा अनेक बातम्या आल्या होत्या. तिचा फोटो या आंदोलनाचा चेहराच बनला. हिजाबची सक्ती करण्याविरोधातील आंदोलनात तिच्या नावाने घोषणा दिल्या जाऊ लागल्या.
त्याआधीच काही दिवस माहसा अमिनी हिचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. तिनं हिजाब नीट घातला नव्हता, असा आरोप ठेवून तिला कोठडीत घेण्यात आलं होतं. त्यावेळेस तिचा मृत्यू झाला होता.
निकाच्या बाबतीत ती नाहीशी झाल्यावर आठवड्यापेक्षाही जास्त काळानंतर ती शवागारात सापडली होती. पण इराणमधील शासन अधिकाऱ्यांनी तिचा मृत्यू आणि आंदोलन यांचा संबंध असल्याचा दावा फेटाळला होता. तसेच त्यांनी केलेल्या तपासानुसार तिनं आत्महत्या केल्याचं जाहीर केलं होतं.
गायब होण्याआधी निका तेहरानमधील लालेह पार्कमध्ये 20 सप्टेंबर रोजी होळी करायला आणलेल्या हिजाबच्या ढिगाऱ्याजवळ दिसली होती. तिथले आंदोलक हुकुमशहा मुर्दाबाद अशा इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनेई यांना उद्देशून घोषणा देत होते.
मात्र, तिला आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे हे माहिती नव्हतं. रिव्होल्युशनरी गार्डच्या प्रमुखांना उद्देशून असलेल्या कागदपत्रात हे नमूद केले आहे. या आंदोलनात अनेक साध्या वेशातले, गुप्त गार्ड्स होते हे या कागदपत्रात सुरुवातीलाच म्हटलं आहे.
यात म्हटलंय की 'टीम 12' ला ही मुलगी त्यांची पुढारी असल्याचा संशय आला. कारण तिचं वेगळं वागणं आणि सतत मोबाईलवर फोन कॉल्स येणं त्यांच्या डोळ्यात भरलं.
त्यानंतर या 'टीम 12' ने आंदोलकांच्या वेशात आपले लोक घुसवले आणि निका खरंच आंदोलकांची पुढारी आहे का याची खातरजमा केली. त्यानंतर तिला अटक करण्यासाठी त्यांनी टीमला बोलावलं पण ती तिथून निसटली.
तिचा संरक्षण दलांकडून पाठलाग होतोय, असं तिनं आपल्या मैत्रिणीला फोन करुन त्याच रात्री सांगितलं होतं, असं निकाच्या आत्यानं बीबीसी पर्शियनशी बोलताना सांगितलं.

या कागदपत्रात पुढे म्हटलंय की, सुमारे तासाभरानंतर ती पुन्हा दिसली आणि तिला पकडून टीमच्या एका फ्रिजर व्हॅनमध्ये नेण्यात आलं.
'टीम 12' च्या तीन लोकांसह ती व्हॅनच्या मागच्या भागात होती. यात आसाश काल्होर, सादेघ मोन्झाझी आणि बेहरुझ सादेघी यांचा समावेश होता. त्यांच्या टीमचा प्रमुख मूर्तझा जलील ड्रायव्हरबरोबर पुढे होता.
त्यानंतर या लोकांनी तिला दुसरीकडे कुठेतरी नेण्याचा प्रयत्न केला. आधी तिला एका तात्पुरत्या पोलीस कॅम्पात न्यायाचा प्रयत्न केला मात्र तिथं फारच गर्दी होती.
मग तिला डिटेन्शन सेंटर म्हणजे स्थानबद्धता केंद्रात नेण्यात आलं. या केंद्राच्या प्रमुखाने निकाला तिथं दाखल करुन घेतलं परंतु नंतर त्यानं आपला विचार बदलला. निका सतत घोषणा देत होती असं त्यानं तिच्याबद्दल तपास करणाऱ्यांना सांगितलं.
त्यावेळेस डिटेन्शन सेंटरमध्ये 14 महिला होत्या आणि निकामुळे त्यांना त्रास होईल आणि दंगल होईल अशी काळजी मला वाटत होती असं या प्रमुखानं सांगितलं.
आता तिथंही नकार मिळाल्यावर मूर्तझा जलील यांनी आयआरजीसीच्या मुख्यालयाला फोन लावून त्यांचा सल्ला घ्यायचं ठरवलं. त्यांनी या मुलीला तेहरानमधील सर्वात धोकादायक अशा एविन तुरुंगात न्या असं सांगितलं.

या प्रवासात आपल्याला मागच्या बाजूने मोठ्याने आवाज येत होते असं त्यांनी स्पष्ट केलं.
मागे असलेल्या बेहरुझने दिलेल्या जबाबात सांगितलं होतं की, डिटेन्शन सेंटरमध्ये प्रवेश नाकारल्यावर निकाने जोरजोरात घोषणा द्यायला आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली होती.
आराश काल्होरने तिलं तोंड सॉक्सने बांधलं पण तरीही ती झगडत होती. त्यानंतर मोन्जाझी तिच्या छातीवर बसला आणि परिस्थिती आटोक्यात आली, असं तो जबाबात म्हणतो.
“नंतर काय झालं माहिती नाही पण काही मिनिटांनी ती पुन्हा घोषणा देऊ लागली. मला काही दिसत नव्हतं पण मारामारीचा आणि हाणामारीचा आवाज येत होता.”
मात्र पुढील घटनांबद्दल आराश काल्होर अधिक माहिती देतो.
तो सांगतो, क्षणभरासाठी त्यानं फोनचा टॉर्च लावला तेव्हा मोन्झाझीनं आपला हात तिच्या पँटमध्ये घातल्याचं दिसलं.
त्यानंतर आपल्या नियंत्रणात काहीच नव्हतं असं तो सांगतो.
“कोण काय करत होतं हे आपल्याला माहिती नाही परंतु निकावर बॅटनने दणके देत होता याचा आवाज येत होता. मी लाथा मारायला, गुद्दे मारायला सुरुवात केली, पण खरंच मी आमच्या माणसाला मारतोय की आरोपीला (निकाला) तेच समजत नव्हतं.”
मात्र मोन्झाझीनं याच्यापेक्षा विरुद्ध जबाब नोंदवला आहे. त्यात तो आपल्या सहकाऱ्यांनी द्वेषापोटी असा आपल्याविरोधात जबाब दिल्याच तो म्हणतो. निकाच्या पँटमध्ये हात घातल्याचं तो नाकारतो. मात्र आपण तिच्या छातीवर बसल्यावर ‘उद्दिपित’ झाल्याचं आणि तिच्या नितंबांना हात लावल्याचं तो सांगतो.
तो सांगतो, यामुळे निका अधिकच धडपड करू लागली, तिनं माझ्या तोंडावर लाथ मारल्यामुळे मला माझं संरक्षण करावंच लागलं. (तिच्या हालचालींना प्रतिकार करावा लागला)
त्यानंतर मूर्तझा जलीलनी गाडी थांबवायला सांगून ते मागे आले, दार उघडल्यावर त्यांना निकाचा मृतदेह दिसला. त्यांनी आपण निकाच्या चेहऱ्यावरचं आणि डोक्यावरचं रक्त साफ केल्याचं सांगितलं.
हे वर्णन ती ज्या अवस्थेत शवागारात सापडली त्याच्याशी मिळतं-जुळतं असल्याचं निकाची आई सांगते.
बीबीसी पर्शियनला ऑक्टोबर 2022 मध्ये तिचं मृत्यू प्रमाणपत्र मिळालं, त्यात निकाचा मृत्यू जड वस्तूने घाव घातल्यामुळे झालेल्या अनेक जखमांमुळे झाला असं म्हटलं आहे.
तिथं काय झालं होतं याचा शोध आपण घ्यायचा प्रयत्न केला नाही हे मूर्तझा मान्य करतात.
मूर्तझा म्हणतात, मी तिला कुठे न्यायचं यायच्या विचारात होतो. मी फक्त ती श्वास घेतेय का हा प्रश्न विचारला त्यावर बेहरुजने ती मेली आहे असं सांगितलं. त्यानंतर जलीलने पुन्हा मुख्यालयाला फोन केला.
यावेळेस तो आधीपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलला त्यांचं सांकेतिक नाव 'नईम 16' असं होतं.
'नईम 16' तपासाच्या वेळेस म्हणाले, “आधीच आमच्या ठाण्यांमध्ये मृत्यूंची नोद होत होती, मला आणखी एक त्यात भर नको होती. तिला मुख्यतळावर आणण्यानं काही प्रश्न सुटणार नव्हता.”
त्यामुळे त्याने जलीलला तिचा मृतदेह सरळ रस्त्यावर फेकून द्यायला सांगितला. त्यानंतर आपण निकाचा देह तेहरानच्या 'यादगार ए इमाम' महामार्गाखाली एका शांत जागी फेकून दिला असं जलीलनं सांगितलं.

अहवालानुसार लैंगिक अत्याचारामुळे व्हॅनमध्ये दंगा झाला आणि टीम 12 च्या सदस्यांनी दिलेल्या तडाख्यांंमुळे निकाचा मृत्यू झाला.
या मारहाणीत तीन बॅटन आणि तीन टेसर (शॉक देणारी वस्तू) चा वापर झाल्याचं अहवालात म्हटलं असून कोणता एक तडाखा वर्मी बसला हे स्पष्ट नाही, असंही म्हटलं आहे.
हा अहवाल आणि सरकारने दिलेली माहिती परस्पर विरोधी आहे. तिच्यावर अंत्यसंस्कार झाल्यावर महिन्याभराने सरकारी वृत्तवाहिनीवर एक सरकारी तपासाची माहिती दिली. त्यात निकानं इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं.
एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती अपार्टमेंटमध्ये शिरत असल्याचं आणि ती व्यक्ती म्हणजे निका असल्याचं सांगण्यात आलं. मात्र निकाच्या आईने फोनवरुन बीबीसी पर्शियनला दिलेल्या माहितीत ती व्यक्ती आजिबात निका असल्याच्या शक्यता नाही असं सांगितलं.
नासरिन शाकारामी सांगतात, ते खोटं बोलत आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.

बीबीसी आय इन्व्हेस्टिगेशन या कागदपत्रांबद्दल अधिक काळजी घेत होतं, कारण इंटरनेटवर इराणी सरकारी कागदपत्रं म्हणून जी प्रसिद्ध केली जातात ती अनेकवेळा खोटी असल्याचं लक्षात आलं आहे.
यातील बहुतांश कागदपत्रं बनावट असतात. ती सहज ओळखता येतात कारण ती अधिकृत कागदपत्रांपेक्षा वेगळी दिसतात. त्यात दोन ओळींमध्ये भरपूर अंतर तसेच शीर्षकातील अक्षरं तसेच सहज लक्षात येतील अशा व्याकरणाच्या आणि अक्षरांच्या चुका असतात.
त्यात कधीकधी सरकारी ब्रीदवाक्य चुकीचं किंवा लोगो चुकीचा असू शकतो. उदाहरणार्थ या गोष्टी ज्या काळात घटना घडल्या आहेत त्याच्याशी सुसंगत नसतात.
तसेच इराणच्या सरकारी कार्यालयांत वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट भाषेशीही ती विसंगत असतात.
आमचा तपास ज्या कागदपत्रांवर अवलंबून आहेत त्यातही अशा काही गोष्टी आढळल्या. उदाहरणार्थ त्या काळात जिला 'फाराजा' पोलीस फोर्स म्हटलं जायचं तिचं नाव यात 'नाजा' असं आलं आहे. त्यामुळे आम्ही त्याची सत्यता पडताळण्यासाठी इराणच्या गुप्तचर विभागाती माजी अधिकाऱ्याची मदत घेतली. त्याने अशी शेकडो अधिकृत कागदपत्रं हाताळलेली आहेत.
त्याने त्याचा सरकारी कोड वापरुन आयआरजीसीच्या अभिलेख विभागाकडून खरंच हे कागदपत्र त्या केसचा भाग होतं का याची खातरजमा केली.
त्याला त्याचं उत्तर होकारार्थी मिळालं. आणि या अहवालाचा नंबर 2022 साली सरकारविरोधी झालेल्या आंदोलनाच्या 322 पानी फाइलचा भाग असल्याचं दर्शवलं.
अर्थात आपण कधीच 100 टक्के खात्री देऊ शकत नसलो तरी ते कागदपत्र खरं असल्याचा विश्वास आम्हाला मिळाला, या अधिकाऱ्यांच्या आयआरजीसीमध्ये असलेल्या पोहोचीमुळे आम्हाला आणखी एक गूढ उकलता आलं ते म्हणजे 'नईम-16' या माणसाची ओळख. ज्यानं निकाचा मृतदेह फेकण्यास टीमला सांगितलं होतं.
यावेळेस त्यानं इराणी लष्कराच्या यंत्रविभागात फोन केला आणि माहिती मिळवली. त्यावेळेस 'नईम 16' म्हणजे कॅप्टन मोहम्मद झमानी असल्याचं समजलं. ते आयआरजीसीमध्ये काम करतात.
हे निकाच्या मृत्यूप्रकरणी झालेल्या 5 तासांच्या सुनावणीवेळेस उपस्थितांमध्ये असल्याचं दिसतं.
आम्ही जे आयआरजीसी आणि इराणी सरकारवर आरोप केले त्याला त्यांच्याकडून उत्तर आलं नाही.आमच्याकडे आतापर्यंत असलेल्या माहितीनुसार निकाच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या लोकांना अजूनही शिक्षा झालेली नाही.
त्यांना शिक्षा झाली नसावी याचं उत्तर त्याच कागदपत्रात मिळतं. 'टीम 12' मधील जे सर्व सदस्य सुनावणीसाठी उपस्थित होते ते हेजबोल्लाहचे असल्याचं अहवालात म्हटलं आहे. हेजबोल्लाह हा इराणचा एक पॅरामिलिटरी ग्रुप आहे. लेबनॉनमधील संघटनेशी याचं नामसाधर्म्य आहे परंतु हा गट वेगळा आहे. या ग्रुपच्या लोकांचा आयआरजीसी कधीकधी आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन वापर करते. याची नोंद अहवालात दिसते.
अहवालातील नोंद सांगते, “ हे लोक हेजबोल्लाहचे असल्यामुळे आवश्यक पूर्तता आणि सुरक्षा हमी यापलिकडे या खटल्याचा पाठपुरावा शक्य झाला नाही."
आयआरजीसी अधिकारी नईम 16 यांना मात्र ताकीद दिल्याचं त्यात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Social media
संयुक्त राष्ट्राच्या सत्यशोधन मोहीमेच्या माहितीनुसार इराणी महिलांच्या आंदोलनात सुरक्षा दलांकडून 551 आंदोलकांचे प्राण गेले आहेत.
संरक्षण दलांच्या हिंसक कारवाईनंतर काही महिन्यांतच आंदोलन थंडावलं.
त्यानंतर थोडा शांततेचा काळ गेला पण या महिन्यापासून इस्लामिक ड्रेसकोडचा भंग करणाऱ्यांवर पुन्हा कारवाई सुरू झाली आहे. यामध्ये निकाची मोठी बहीण आयदालाही अटक झाली आहे.
या माहितीपटाच्या प्रकाशनानंतर बीबीसीला असे आणखी पुरावे मिळाले आहेत जे लीक झालेल्या कागदपत्रात दाखवलेल्या वेळेत काही संभाव्य विसंगती असल्याचं सांगतात.
या बातमीसाठी बीबीसी ज्या पडताळणी प्रक्रियेतून गेली आहे त्यावर आम्ही ठाम आहोत. आणि हा माहितीपट निका यांच्या मृत्यूबाबत उपलब्ध असलेल्या पुराव्यांची पडताळणी करण्यातील मर्यादा आणि अडचणी पारदर्शकपणे अधोरेखित करतो. ही बातमी बीबीसीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.











