‘महिला कैद्यांना कॅमेऱ्यासमोर कपडे काढायला लावले जायचे’

फोटो स्रोत, MOZHGAN KESHAVARZ/INSTAGRAM
- Author, परहाम गोबादी
- Role, प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
तुरुंगात कॅमेऱ्यासमोर महिला कैद्यांना विवस्त्र केलं जात असल्याची खळबळजनक माहिती इराणच्या तुरुंगातून बाहेर आलेल्या महिलांनी दिली आहे.
इराणच्या तुरुंगातील छळाला कंटाळून काही महिला देश सोडून गेल्या आहेत. त्यापैकी काहींशी बीबीसीने बातचित केली आहे
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणमध्ये महिला कैद्यांना त्यांचे सॅनिटरी पॅड आणि टॅम्पून्स काढण्यास भाग पाडण्यात आलं आणि अनेकदा उठाबशा काढायला सांगितलं.
इराणमधील एविन आणि क्वार्चाक या तुरुंगात मोझगन केशवार्झ या महिलेने तीन वर्षं काढली.
“आम्हाला अपमानित करण्यासाठीच अशा गोष्टी केल्या जायच्या,” असं मोझगन केशवार्झ यांनी सांगितलं.
मोझगन यांची सुरक्षा कॅमेऱ्यांसमोर तीनदा विवस्त्र करून झडती घेतली. एवढंच नाही तर महिला पोलिसाने त्यांचे नग्न अवस्थेतील फोटोही काढले.
2022 मध्ये त्यांची तुरुंगातून सुटका केली.
मोझगन यांनी कपडे काढण्यावर आक्षेप घेतला होता. पण असं करणं आवश्यक असल्यांचं तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितलं.
कारण भविष्यात महिलांवर अत्याचार केले असं कोणीही आरोप करू नये यासाठी फोटो काढण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
"ते व्हीडिओ आणि फोटो कोण पाहतं? सरकार नंतर त्यांचा वापर करून आम्हाला गप्प करेल का?" अशी भीती मोझगन यांना वाटतेय.
मोझगन यांचे इन्स्टाग्राम पेजवर हिजाबशिवाय त्यांचे अनेक फोटो आहेत.
त्यामुळे त्यांच्यावर देशाच्या सुरक्षेविरुद्ध कट रचणे, इस्लामचा अपमान करणे, इराणविरुद्ध अपप्रचार करणे आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे, असे आरोप लावण्यात आले आहेत.
त्यांना 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अलीकडेच मोझगन यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं आहे.
या आरोपात इराणमध्ये मृत्युदंडाची शिक्षेची पण तरतूद आहे.
शेवटी मोझगन यांना देश सोडावा लागला. त्यानंतर बीबीसीने तिच्याशी संवाद साधला.
‘अनेकदा व्हीडिओ शूट केले’
अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या कैद्यांची झडती घेण्यासाठी इराणमध्ये अनेक वर्षांपासून कपडे उतरवले जातात, असं इराणच्या तुरुंगातून बाहेर आलेल्या एका महिला कैद्याने बीबीसीला सांगितलं.
पण चांगली वर्तणूक असलेल्या महिला कैद्यांना त्यापासून दूर ठेवलं जातं. कॅमेऱ्यासमोर त्यांना कधीच कपडे उरवायला सांगितलं जात नाही, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान जून 2023च्या सुरुवातीला अशा बातम्या म्हणजे देशाविरोधात चालवलेला अपप्रचार असल्याचं इराणच्या न्यायव्यवस्थेनं म्हटलं.
पण जूनअखेर इराणच्या सरन्यायाधिशांनी महिला कैद्यांचे व्हीडिओ शूट केले जातायत आणि ते फक्त महिला पोलीसच करतात, असं कबूलही केलं.
तुरुंगात जिथे कॅमेरे नसावेत अशा ठिकाणी ते लावण्यात आले आहेत, असेही इराणच्या यंत्रणेवर आरोप करण्यात आले.
“जिथं कैदी फिरत आहेत, उदाहरणार्थ, कॉरिडॉर अशा ठिकाणी सीसीटीव्हीला परवानगी आहे. इतर ठिकाणी नाही,” असं तेहरानमधील वकील मोहम्मद होसेन असासी यांनी बीबीसीला सांगितलं.
महिलांना विवस्त्र करतानाचे व्हीडिओ शूट करणं हे इराणसाठी नवीन नाही. पण अशा बातम्या इतर देशांतूनही याआधी आल्या आहेत.
ऑस्ट्रेलियातील साउथ वेल्समध्येही अशा घटना घडल्याच्या बातम्या आल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
महिलांच्या झडतीदरम्यान अधिकाऱ्यांनी अनेकवेळा चित्रीकरण केल्याचं सरकारी कागदपत्रांवरून दिसून येतं.
पण इराणच्या महिलांनी भीतीदायक गोष्टी सांगितल्या. कॅमेऱ्यासमोरची झडती ही महिलांना अपमानित करण्यासाठीच केली जात असल्याचं त्या सांगतात.
बीबीसीला हॅकिंग ग्रुप इदलत अलीकडून नोव्हेंबर 2021मध्ये सरकारचा गोपनीय दस्तऐवज मिळाला. त्यातील एका पत्रामध्ये इराणच्या न्यायव्यवस्थेने महिलांना विवस्त्र करण्याचा मुद्दा मान्य केला आहे.
'तुरुंगात अनेकदा विवस्त्र केलं'
इराणमधील कुर्द लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या मोजगन कावोसी या महिलेचाही या पत्रात उल्लेख आहे.
तुरुंगात त्यांना विवस्त्र व्हावं लागलं होतं.
कावोसी यांची पाच वेळा कपडे काडून झडती घेण्यात आल्याचं एका इराणी सूत्राने बीबीसीला सांगितलं.
मानवी हक्कांविषयी बातम्या देणाऱ्या ऱ्हाना (Hrana) या संस्थेने महिलांच्या विवस्त्र (Strip Search) विषयी एक अहवाल प्रकाशित केला होता. त्यानंतर इराण सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती.
कावोसी सध्या आता जामिनावर बाहेर आहेत.
अशीच घटना बलूच अल्पसंख्याकांसाठी काम करणार्या एल्हेह इझबारी यांच्यासोबतही झाली.
बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दोनदा अटक झाली आणि दोन्हीवेळा त्यांची कपडे उतरवून झडती घेतली. त्यांना धक्काबुक्की केली.
कावोसी यांनी त्यांच्या हातावरील चटके दिल्याचे दाग दाखवले. पोलिसांनी त्यांच्या हातावर सिगारेटने चटके दिल्याचं त्या सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांना नोव्हेंबर 2022 मध्ये अटक करण्यात आली होती आणि तीन वेगवेगळ्या अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आले होते.
सुरक्षा यंत्रणांचे वारंवार कॉल आणि अटकेच्या धमक्यांमुळे कोवोसीने इराणमधून पळ काढला.
नसीब शमशी ही आणखी एक इराणी महिला आहे जिची तीनवेळा विवस्त्र करून झडती घेतली.
ती ‘रिव्होल्यूशन स्ट्रीट’ नावाच्या गटाचा भाग होती. तिने हिजाबच्या विरोधात प्रदर्शन करत 2018 मध्ये तिचा डोक्याचा स्कार्फ काढला होता.
त्यावेळी डझनभर लोकांना अटक करण्यात आली होती.
तिच्यावर "तिचा हिजाब काढून इराणविरुद्ध अपप्रचार करणं आणि इराणच्या सुप्रीम लीडरचा अपमान करणं” हे आरोप ठेवण्यात आले आहेत.
तीन महिने तुरुंगात राहिल्यानंतर तिची सुटका झाली. आता तिने देश सोडला आहे.
तिने सीसीटीव्हीसमोर विवस्त्र होण्याविरोधात तक्रार केली तेव्हा पोलिसांनी तिला एका वाक्यात उत्तर दिलं, "आजपासून सर्वकाही शक्य आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








