बायको नसूनही जुळ्यांचा बाबा झालेल्या पुरुषाची गोष्ट

प्रीतेश दवे त्यांच्या दोन्ही मुलांसोबत
फोटो कॅप्शन, प्रीतेश दवे त्यांच्या दोन्ही मुलांसोबत
    • Author, जय शुक्ल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

प्रीतेश दवेंच्या नशिबात सरकारी नोकरी नव्हती आणि म्हणून त्यांचं लग्नही झालं नव्हतं.

पण त्यांना लहान मुलं प्रचंड आवडतात आणि म्हणून लग्न न करताही त्यांना त्यांचं कुटुंब वाढवायचं होतं. अशा परिस्थितीत त्यांनी सरोगसीची मदत घेण्याचा निर्णय घेतला.

लग्न न करूनही सरोगसीची मदत घेऊन जुळ्या मुलांचे वडील बनलेले प्रीतेश हे बहुधा अशा प्रकारे वडील झालेल्या शेवटच्या भारतीय पुरुषांपैकी एक असावेत.

आता त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे ज्यांचा ते सांभाळ करतात. त्यांची दोन्ही मुलं एक वर्षाची होणार आहेत. नवीन सरोगसी कायदा लागू होण्याआधी सरोगसीच्या माध्यमातून वडील बनलेले प्रीतेश भाग्यवान आहेत. कारण आता त्यांना तसे करणे शक्य झाले नसते.

सरोगसीच्या मदतीने वडील बनण्याचं कारण काय होतं?

37 वर्षांचे प्रीतेश दवे अजूनही अविवाहित आहेत. ते म्हणतात की, त्यांच्यासाठी अनेक मुलींची स्थळं यायची पण प्रितेश यांना सरकारी नोकरी नसल्याचे कळल्यावर त्या मुली लग्नाला नकार द्यायच्या.

आर्थिक परिस्थिती चांगली असूनही त्यांचं लग्न काही होत नव्हतं. त्यांचं फारसं शिक्षणही झालेलं नाहीये. ते फक्त बारावीपर्यंतच शिकले आहेत. ते म्हणतात की, त्यांच्या अविवाहित राहण्यामागे त्यांचं कमी शिक्षण हेही एक कारण असावं.

बीबीसी गुजरातीसोबत बोलताना प्रीतेश दवे म्हणाले की, "माझ्या समाजात असे अनेक पुरुष आहेत ज्यांचं लग्न झालेलं नाही. कारण मुलींच्या आई वडिलांना त्यांच्या मुलीचा हात फक्त सरकारी नोकरी असणाऱ्या मुलाच्या हातीच द्यायला आवडते.

"आमच्याकडे जमीन आहे, संपत्ती आहे. पण त्यांच्यालेखी याला काहीही किंमत नाहीये. त्यांच्यासाठी फक्त 'सरकारी नोकरी'च महत्वाची आहे."

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रीतेशचे वडील भानूशंकर दवे यांचं असं मत आहे की, "आमच्या जातीमध्ये 'साटा' परंपरा आहे. या प्रथेनुसार आमची मुलगी द्यावी लागते आणि त्या बदल्यात त्यांची मुलगी आम्हाला सून म्हणून स्वीकारावी लागते. आम्ही खूप शोध घेतला. पण आमच्या प्रीतेशसाठी काही मुलगी मिळालीच नाही."

गुजरातच्या भावनगरमध्ये प्रितेश एका राष्ट्रीयकृत बँकेचं ग्राहक सेवा केंद्र चालवतात आणि त्यांचे आई वडील मात्र सुरतमध्ये राहतात.

त्यामुळे प्रीतेश सुरत-भावनगर असं येणंजाणं करत असतात. या सगळ्या काळात त्यांना एकटेपणा जाणवायचा आणि म्हणून अविवाहित असूनही त्यांना 'बाप' बनायचे होते. यासाठीच काही लोकांनी त्यांना सरोगसीचा पर्याय सुचवला होता.

सरोगसीबद्दल बोलताना प्रीतेश म्हणतात की, "सरोगसीच्या माध्यमातून मला माझ्या मुलांचा बाप होता आलं ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

"मी स्वतःला खूप नशीबवानदेखील समजतो. कारण आताच्या नवीन कायद्यानुसार माझ्यासारख्या अविवाहित पुरुषाला बाप होता येणं शक्य नाहीये."

अहमदाबादमध्ये राहणारे वंध्यत्व तज्ज्ञ आणि सरोगसीच्या प्रक्रियेमध्ये प्रीतेशचे सल्लागार असणारे डॉ. पार्थ बाविसी म्हणतात की, "त्यांचे लग्न होऊ शकलेले नाही याबद्दल त्यांना दुःख जरूर आहे. त्यांना एक परिपूर्ण कुटुंब हवं होतं म्हणूनच त्यांची ती इच्छा घेऊन ते माझ्याकडे आले होते."

आणि प्रीतेशना जुळ्यांचे वडील होता आलं

बाप बनण्याचा क्षण प्रीतेशसाठी अत्यंत महत्वाचा होता. प्रीतेश म्हणतात की, "जेव्हा ही दोन मुलं माझ्या जगात आली, तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. हसावं की रडावं तेच कळत नव्हतं.

"सुरुवातीला ही बाळं अशक्त होती, त्यामुळे त्यांना इनक्यूबेटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. जेव्हा मी माझ्या बाळांना पहिल्यांदा हातात घेतलं तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम क्षण होता. मी त्या आनंदाचं शब्दात वर्णनही करू शकत नाही."

डॉक्टर पार्थ बाविसी सांगतात की, "त्यावेळी प्रीतेशकडे बघून असं वाटलं की त्यांना या जगातली सगळी सुखं मिळाली आहेत. ते वडील झाले आहेत या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसत नाहीये असं त्यांच्याकडे बघून वाटत होतं."

प्रीतेश यांच्या आई दिव्यानी आजी बनल्यामुळे खूश झाल्या आहेत.
फोटो कॅप्शन, प्रीतेश यांच्या आई दिव्यानी आजी बनल्यामुळे खूश झाल्या आहेत.

प्रीतेशचे वडील भानूशंकर आणि आई दिव्यानी दवे आजी आजोबा झाल्यामुळे प्रचंड आनंदी झाले आहेत.

भानुशंकर म्हणतात की, “मुलांशिवाय घरात खूप एकटं एकटं वाटायचं. आता जणू संपूर्ण घरच आनंदाने उजळून निघालंय. निसर्गाच्या कृपेने आमच्या घरी एक मुलगी आणि एक मुलगा असे दोघेही आलेत."

प्रीतेश दवे यांची आई दिव्यानी दवे यादेखील म्हणतात की, "या दोघांच्या येण्याने आमच्या हाती जणू एखादा अनमोल खजिनाच लागलाय. माझी आजी होण्याची इच्छाही पूर्ण झालीय आणि या छोट्या भावाला एक बहीण आणि बहिणीला एक भाऊही मिळालाय."

दवे कुटुंबीयांनी मुलाचं नाव 'धैर्य' असं ठेवलंय, तर मुलीचं नाव 'दिव्या' ठेवण्यात आलंय.

लग्न झालं नाही याचं दुःख वाटत नाही

या मुलांचा जन्म झाल्याने आता लग्न झालं नाही या गोष्टीचं दुःख वाटत नसल्याचं प्रीतेश म्हणतात.

आवडीची मुलगी मिळाली तर लग्न करण्याची इच्छा आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना प्रीतेश म्हणतात की, "धैर्य आणि दिव्या माझ्या आयुष्यात आले आहेत. त्यामुळे आता लग्न करण्याची माझी इच्छा नाहीये. माझी होणारी बायको या मुलांचा नीट सांभाळ करेल की नाही हे मी सांगू शकत नाही. त्यामुळे आता मी एकटाच या बाळांचं संगोपन करणार आहे.

"आता माझ्या आयुष्याचं केवळ एकच ध्येय आहे आणि ते म्हणजे माझ्या मुलांना चांगल्या पद्धतीने वाढवणे."

भानूशंकर दवे म्हणतात की, "आमच्या नातवंडांसोबत खेळण्याचं आमचं स्वप्न आता पूर्ण झालंय."

"या दोघांची काळजी घेण्यात आमचा वेळ कुठे जातो हेच कळत नाही," असे दिव्यानी दवे सांगतात.

"मुलगा आहे की मुलगी आहे याची पर्वा आम्ही करत नाही हे दोघेही मला प्रिय आहेत."

प्रीतेश दवे यांची जुळी मुलं
फोटो कॅप्शन, प्रीतेश दवे यांची जुळी मुलं

सरोगसी म्हणजे काय?

अनेक महिलांना प्रजनन समस्या, गर्भपात किंवा गर्भधारणेमध्ये खूपच जोखीम असल्याने बाळाला जन्म देऊ शकत नाही किंवा अनेकांना स्वतःच्या इच्छेनुसारच गर्भधारणा नको असते.

अशा परिस्थितीत सरोगसीचा पर्याय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतो. म्हणजे जेव्हा एखादे जोडपे मूल जन्माला घालण्यासाठी दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाचा आधार घेते आणि या प्रक्रियेमध्ये अंड्याची मदत घेण्यापासून ते या दुसऱ्या महिलेकडून जोडप्याच्या मुलाला जन्म देईपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेला सरोगसी असे म्हणतात.

डॉ. पार्थ बाविसी म्हणतात, “प्रीतेशचे शुक्राणू घेण्यात आले आणि एका महिलेची अंडी (ज्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येते) घेण्यात आली आणि त्यानंतर आयव्हीएफद्वारे भ्रूण तयार करून सरोगेट आईच्या गर्भाशयात त्याचे रोपण करण्यात आले.

प्रीतेश दवे यांचे वडील त्यांच्या नातवासोबत
फोटो कॅप्शन, प्रीतेश दवे यांचे वडील त्यांच्या नातवासोबत

"या भ्रूणांचे यशस्वीरीत्या गर्भात रूपांतर व्हावे यासाठी आम्ही दोन भ्रूण रोपण केले होते. पण दोन्ही भ्रूण विकसित झाले आणि जुळी मुले जन्माला आली."

अशा प्रकारच्या सरोगसीमध्ये एखादी महिला स्वतःच्या किंवा दुसऱ्या दात्याच्या मदतीने गर्भवती होते किंवा मग दाम्पत्याच्या स्त्रीच्या अंड्याचा वापर करून किंवा त्यातील पुरुष साथीदाराच्या शुक्राणूंचा वापर करून त्या जोडप्यासाठी गर्भवती होते.

जी स्त्री दुसऱ्याचे मूल तिच्या पोटात घेऊन जाते तिला सरोगेट मदर असे म्हणतात.

सरोगसीचे प्रकार

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

सरोगसीचे दोन प्रकार आहेत. पारंपारिक सरोगसी आणि गर्भधारणा सरोगसी.

पारंपारिक सरोगसी - ज्यामध्ये वडिलांचे किंवा दात्याचे शुक्राणू सरोगेट आईच्या अंड्यांसोबत फलित केले जातात.

मग डॉक्टर कृत्रिमरित्या शुक्राणू थेट गर्भाशय ग्रीवा, फॅलोपियन ट्यूब किंवा सरोगेट महिलेच्या गर्भाशयात इंजेक्शनच्या माध्यमातून पोहोचवतात. सरोगेट मदरच्या गर्भाशयात भ्रूण तयार होतो आणि नंतर सरोगेट मदर तो भ्रूण नऊ महिने तिच्या गर्भाशयात ठेवते. या प्रकरणात, सरोगेट आई ही मुलाची जैविक आई असते.

जर या प्रकरणात वडिलांच्या शुक्राणूंचा वापर केला गेला नसेल तर पुरुष दात्याचे शुक्राणू वापरता येतात. दात्याचे शुक्राणू वापरले असल्यास, वडिलांचा मुलाशी अनुवांशिक संबंध राहत नाही.

गर्भावस्थेतील सरोगसी- या सरोगसीमध्ये सरोगेट आईचा मुलाशी अनुवांशिक संबंध नसतो.

म्हणजेच, गर्भधारणेच्या सरोगसीमध्ये सरोगेट मातेची अंडी वापरली जात नाहीत. ती फक्त मुलाला जन्म देते. या प्रकरणात सरोगेट आई मुलाची जैविक आई नसते. गर्भावस्थेच्या सरोगसीमध्ये, वडिलांचे शुक्राणू आणि आईचे अंडे मिसळले जातात आणि सरोगेट आईच्या गर्भाशयात फक्त त्याचे रोपण केले जाते.

यामध्ये आयव्हीएफ पद्धतीने भ्रूण तयार करून सरोगेट मदरच्या गर्भाशयात रोपण केले जाते.

अशा प्रकारे, आयव्हीएफचा वापर पारंपारिक सरोगसीमध्ये देखील केला जातो.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

असे असले तरी पारंपारिक सरोगसीमध्ये कृत्रिम गर्भाधान (IUI) पद्धत वापरली जाते. IUI ( Intrauterine insemination ) ही एक अतिशय सोपी वैद्यकीय प्रक्रिया आहे, ज्यामध्ये सरोगेट आईला विविध चाचण्या आणि उपचार करावे लागत नाहीत. पारंपारिक सरोगेट आईची अंडी वापरली जातात, त्यामुळे मूल होऊ इच्छिणाऱ्या स्त्रीला अंडी मिळवण्याच्या प्रक्रियेचा त्रास सहन करावा लागत नाही.

भारतातील सर्व IVF केंद्रांमध्ये गर्भावस्थेतील सरोगसी अधिक प्रचलित आहे कारण पारंपारिक सरोगेट माता ही मुलाची जैविक आई असते, ज्यावरून वाद निर्माण होऊ शकतो.

जेस्टेशनल सरोगेसी किंवा गरोदरपणातील सरोगसी देखील दोन भागात विभागली गेली आहे.

एक म्हणजे परोपकारी सरोगसी आणि दुसरी म्हणजे व्यावसायिक सरोगसी.

परोपकारी सरोगसी - जेव्हा जोडपे एखाद्या सरोगेट महिलेला त्यांच्यासोबत राहण्यासाठी आमंत्रित करते आणि ती सरोगेट स्त्री जोडप्याची नातेवाईक किंवा अनोळखी दोन्ही असू शकते. या प्रकरणात, जोडपे सरोगेट आईचा सर्व खर्च उचलतात.

व्यावसायिक सरोगसी - या प्रकारामध्ये सरोगेट आईला मुलाला जन्म दिल्याबद्दल भरपाई दिली जाते. नव्या कायद्यानुसार आता व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली आहे.

एकल पुरुषाला आता सरोगसीचा वापर करून वडील का होता येणार नाहीये?

सरोगसी (नियमन) कायदा, 2021 या नवीन सरोगसी कायद्यानुसार केवळ विवाहित जोडपेच सरोगसीचा वापर करून आई वडील होऊ शकतात.

कोणताही एकल पुरुष या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही. अजूनही एकल महिलांना मात्र याचा वापर करता येतो पण त्या एकतर घटस्फोटित किंवा विधवा असायला हव्यात अशी अट त्यामध्ये आहे आणि त्यांचं वय ३५ ते ४५ च्या मध्ये असणं बंधनकारक आहे.

समलैंगिक व्यक्तींनाही सरोगसीचा वापर करता येणार नाहीये. या विषयाची माहिती असणारे म्हणतात की पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. चित्रपट निर्माता करण जोहर आणि अभिनेता तुषार कपूर सरोगसीच्या मदतीनेच सिंगल फादर किंवा एकल पिता बनले आहेत.

बेबी फॅक्टरी म्हणजेच बाळांचा कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमधील आनंद शहरात सरोगसीची सुविधा देणारे क्लिनिक चालविणाऱ्या डॉ. नयना पटेल म्हणतात की, "कायद्यातील ही तरतूद पुरुषांच्या प्रजनन अधिकारांचे उल्लंघन करते."

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

डॉ.पार्थ बाविसी यांनीही कायद्यातील या बदलाचा विरोध करताना सांगितले की "आज प्रीतेशसारखे असे अनेक पुरुष असतील जे आपल्या आवडीचा जीवनसाथी न मिळाल्याने लग्न करणार नाहीत. मग बाप होण्याच्या त्यांच्या इच्छेचे काय? भारतातील लिंग गुणोत्तर पाहिल्यास पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमी आहे. अशा वेळी पुरुषांच्या भावनांचा आदर केला गेला पाहिजे.”

असे असूनही सरोगसीद्वारे अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिलांना मूल होण्यास प्रतिबंध करणार्‍या कायद्याच्या तरतुदीला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका देशभरातील विविध न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.

हे घटनेच्या कलम 14 आणि कलम 21 चे उल्लंघन आहे. इंडियन सोसायटी फॉर असिस्टेड रिप्रॉडक्शनचे माजी अध्यक्ष डॉ मनीष बनकर म्हणतात, “विविध न्यायालयांमध्ये खटल्यांची सुनावणी सुरू असली तरी कायदा अजूनही लागू आहे. सरकारने न्यायालयात आपली भूमिका मांडली असून सरकार याप्रकरणी कोणतीही तडजोड करण्यास तयार नसल्याचे सरकारच्या उत्तरावरून दिसते."

इथे हे सांगणं गरजेचं आहे, 5 एप्रिल 2023 रोजी द प्रिंटमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, या विषयावर सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेला उत्तर देताना, सरकारने सरोगसीच्या नवीन तरतुदींचे वर्णन करतात "सामाजिक आणि नैतिक मूल्यांचे मिश्रण" असे केले होते आणि या कठोर तरतुदी शिथिल करण्यास नकार दिला होता.

नवीन सरोगसी कायदा काय आहे?

नवी सरोगसी कायद्यानुसार ज्या जोडप्यांना मूल नाही केवळ अशीच जोडपी सरोगसीचा वापर करू शकतात.

या जोडप्याचे वय २५ ते ५० च्या मध्ये असायला हवे. त्यांना कोणतेही मूल नसायला हवे किंवा त्यांनी एकही मूल दत्तक घेतलेले नसावे.

एखाद्या महिलेला सरोगसीचा लाभ मिळवायचा असेल तर ती महिला एकतर घटस्फोटित असणे किंवा विधवा असणे बंधनकारक आहे तसेच त्या महिलेचे वय ३५ ते ४५ च्या मध्ये असणे देखील गरजेचे आहे.

कायदा विधवा किंवा घटस्फोटित महिलेला सरोगसीसाठी तिची अंडी दान करण्याची परवानगी देतो. मात्र, त्याचे वय 35 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे.

ज्या जोडप्यांना सरोगसी अंतर्गत मूल हवे आहे त्यांना सरोगसीसाठी विशेष सरकारी वैद्यकीय मंडळाशी संपर्क साधावा लागतो. बोर्डाच्या मंजुरीनंतरच सरोगसीची प्रक्रिया पुढे जाऊ शकते.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

एकदा जोडप्याने आणि सरोगेटने त्यांचे पात्रता प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर, ते असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) शी संपर्क साधू शकतात.

सरोगेट महिला आणि जोडप्यांना त्यांचे आधार कार्ड लिंक करावे लागेल जेणेकरुन या प्रणालीमध्ये सामील असलेल्या लोकांचे बायोमेट्रिक्स रेकॉर्ड केले जातील. आगामी काळात काही प्रश्न निर्माण झाले तर ते या रेकॉर्डच्या मदतीने सोडवता येतील.

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना 10 वर्षांपर्यंत कारावास आणि 25 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.

मुलाच्या जन्मापूर्वी जोडप्याचा मृत्यू झाल्यास, मुलाच्या देखभालीची जबाबदारी जोडप्याने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीवर असेल. ही जबाबदारी सरोगेट आईची राहत नाही.

‘या’ सेलिब्रिटींनी घेतलेली सरोगसीची मदत

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास सरोगसीच्या मदतीने पालक बनले आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि तिचा पती जीन गुडइनफ देखील सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे पालक बनले. शिल्पा शेट्टी देखील सरोगसीच्या मदतीने मुलगी समिशाची आई बनली आहे.

चित्रपट निर्माता करण जोहर हा सिंगल फादर आहे जो सरोगसीच्या माध्यमातून पिता बनला आहे. 2017 मध्ये तो जुळ्या मुलांचा बाप झाला होता. एकता कपूरही सरोगसीच्या मदतीने एकल माता बनली आहे.

अभिनेत्री लिसा रे देखील सरोगसीच्या मदतीने आई बनली आहे. सनी लिओनीने आधी दोन मुले दत्तक घेतली, नंतर ती सरोगसीच्या मदतीने इतर दोन मुलांची आई बनली.

शाहरुख खान आणि गौरी खान देखील 2013 मध्ये सरोगसीच्या मदतीने पालक बनले होते. त्याच्या मुलाचे नाव अबराम आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)