गर्भपात झाला आणि जिच्यासाठी सरोगेट झाले तिनं फक्त मेसेज केला- आपलं नातं संपलं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मेघा मोहन
- Role, बीबीसी न्यूज
आजकाल अनेक सेलिब्रिटी मूल होण्यासाठी सरोगसीचा पर्याय निवडत आहेत. सोशल मीडियावर याविषयी चर्चाही सुरू आहे.
प्रियंका चोप्रा, इलॉन मस्क, किम कार्दशियन, नाओमी कॅम्पबेल...अशी ही यादी आणखी वाढत चालली आहे.
पण, मग या सेलिब्रेटींसाठी सरोगेट मदर बनलेल्या महिलांचं आयुष्य असतं तरी कसं?
शाना सेंट क्लेअर दोनदा सेलिब्रिटींसाठी सरोगेट मदर बनल्या आहेत. त्या दिवशी शानाचा फोन वाजला तेव्हा पलीकडून कॅथरिन बोलत होती.
शानाला हॅलो न म्हणताच कॅथरिन म्हणाली, "तुला ही बातमी कळण्याआधीच मला तुला काही सांगायचं आहे. मी सरोगसीसाठी दुसऱ्या महिलेशी संपर्क साधलाय. तिनं नुकतंच एका मुलाला जन्म दिलाय.”
हे ऐकून शाना स्तब्ध झाली. कारण शानाची बाळंत होण्याची तारीख जवळच आली होती. कॅथरिनचं बाळ तिच्या पोटात वाढत होतं.
आता कॅथरिनला सरोगसीद्वारे आणखी एक मूल झालं आहे. याचा अर्थ सरोगसीसाठी कॅथरिननं संपर्क साधलेली शाना ही एकमेव महिला नव्हती.
कॅथरिनला शानाच्या पोटात वाढणारं बाळ हवं होतं की नाही? याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल.
"तू मला हे आधी सांगायला हवं होतं. उद्या चेकअप झाल्यावर याविषयी बोलू," शाना फोनवर म्हणाली.
कॅथरिननेही 'ठीक आहे,' असं म्हणत फोन ठेवला.

फोटो स्रोत, ELIZABETH NICHOLS
काही तासांनी शानानं कॅथरिनला मेसेज पाठवला.
"तू जे सांगितलंस ते ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं. पण मी तुझ्यासाठी आनंदी आहे. तुझ्या बाळाला प्रेमानं वाढव. चेकअप झाल्यावर बोलू," असं तिनं मेसेजमध्ये लिहिलं.
मात्र, कॅथरिननं उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी फोनही केला नाही.
शाना पेनसिल्व्हानियामध्ये राहते. एके दिवशी ती चहा पित बसली होती, तेव्हा तिची तिन्ही मुलं बाहेर खेळत होती. तेव्हा तिनं पहिल्यांदा एका मासिकात सरोगसीबद्दल माहिती वाचली.
व्यावसायिक सरोगसी ही altruistic surrogacy पेक्षा वेगळी आहे, ज्यामध्ये सरोगेट मदरला पैसे दिले जातात, असं एका लेखात शानानं वाचलं.
सरोगसीच्या बाजूनं लिहिलेल्या या लेखात असं नमूद केलं होतं की, एकल पालक, एलजीबीटी कुटुंबं आणि अपत्यहीन जोडप्यांसाठी व्यावसायिक सरोगसी वरदान ठरत आहे. शानाला हा लेख आवडला.

फोटो स्रोत, FITOPARDO/GETTYIMAGES
शाना 30 वर्षांची आहे. तिनं आधीच तीन मुलांना जन्म दिला आहे. पण आता यापुढे मूल नको असा तिनं आणि तिच्या पतीनं निर्णय घेतला.
शन्नानं gestational carrier (गर्भधारणा वाहक) व्हायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी सरोगसी एजन्सीमध्ये जाऊन प्रश्नावलींची उत्तरं दिली. कागदपत्रं जमा केली.
डॉक्टरांनी त्यांची मानसिक स्थिती तपासली. त्यानंतर वकिलांसोबत डझनभर बैठका झाल्या. काही आठवड्यांनंतर तिला एक फोन आला. सेलिब्रिटी कपल जेनिफर आणि मार्क यांनी फोनवर सांगितलं की, त्यांनी तिची प्रोफाइल पाहिली आहे आणि तिला न्यूयॉर्कमध्ये भेटायचं आहे.
शानाचं मन पटकन यासाठी तयार झालं.
"ते खूप चांगले आहेत. त्यांनी माझ्याबद्दल आणि माझ्या मुलांबद्दल खूप काही माहिती मिळवली होती," ती सांगते.
ते तिला आयव्हीएफ क्लिनिक, हॉटेल, प्रवास आणि जेवणाचा खर्च देतील आणि इतर खर्च देतील, असं त्यांनी तिला सांगितलं. तिला 3 वर्षात एकूण 50,000 डॉलर (40.77 लाख रुपये) देण्यात आले.

फोटो स्रोत, JILL LEHMANN PHOTOGRAPHY/GETTYIMAGES
तिला गरोदर राहण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करावे लागले. शेवटी तिने बाळाला जन्म दिला, तेव्हा मार्कनं तिचा हात हातात धरून अश्रूंनी तिचे आभार मानले.
त्यानंतर काही महिन्यांनी शानाला पुन्हा जेनिफरचा फोन आला. तेव्हा तिची कॅथरिनशी ओळख झाली.
कॅथरिन एका प्रतिष्ठित कुटुंबातून येते. तिनं अपत्यप्राप्तीसाठी खूप प्रयत्न केले. सरोगसीचाही प्रयत्न करुन पाहिला. पण, त्यातून काही निष्पन्न झालं नाही.
मात्र, जेनिफरनं सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिल्याचं कॅथरिनला कळालं. मग कॅथरिननं शानाशी बोलायचं ठरवलं.
"मला पहिल्याच संभाषणात थोडंस वेगळं वाटलं," शाना सांगते.
"खर्च कमी करण्यासाठी सरोगसी एजन्सीऐवजी थेट करार करूया. यासाठी आमच्या वकिलांसोबत बोलून पुढे जाऊया," असं कॅथरिननं म्हटल्याचं शानाला आठवतं.
शाना म्हणाली की, "जेनिफरच्या वेळेस आधीच मानसशास्त्रीय चाचण्या घेण्यात आल्या असल्यानं पुन्हा त्या चाचण्या घेण्याची गरज नाही."
शानानं तीनदा प्रयत्न करायचे ठरवले.
सुरुवातीला 'सायकलिंग' नावाची एक प्रक्रिया असते. त्यामध्ये ओव्ह्युलेशनची प्रक्रिया सुरू झालेली महिला आणि तिच्यासाठी सरोगेट बनलेली महिला यांची मासिक पाळी एकाच वेळी येईल हे पाहिलं जातं. त्यासाठी हार्मोन्सची इंजेक्शन वापरली जातात.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर शाना आणि तिचा नवरा थेट कॅथरिनला भेटायला जातील आणि आयव्हीएफ क्लिनिकमध्ये फर्टिलाईज अंडी शानाच्या गर्भाशयात सोडली जातील, असं ठरलं.
कॅथरिन या जोडप्याला भेटायला आली.
सुरुवातीला शानाला कॅथरिनला स्पर्श करायचा होता. पण, कॅथरिन थोडी मागे गेली. शानाला वाटलं की तिला एवढं स्पर्श करणं आवडणार नाही.
कॅथरिननं शानाला सांगितलं की, जेव्हा भ्रूण तिच्या गर्भाशयात सोडलं जाईल तेव्हा ती तिच्याजवळ उभी राहिल. त्यानंतर कॅथरिनच्या ड्रायव्हरने शाना आणि तिच्या पतीला सुरक्षितपणे हॉटेलमध्ये सोडणार असल्याचं सांगितलं.
पण जेनिफर आणि मार्क यांनी जसा तिचा विचार केला होता, तशी कॅथरिन नाहीये, असा शानानं स्वत:शीच विचार केला.
सरोगसीचा पहिला प्रयत्न फसला. दुसऱ्या प्रयत्नाच्या आदल्या दिवशी कॅथरिननं शाना आणि तिच्या पतीला जेवायला बोलावलं. तेव्हा तिनं त्यांना त्यांचं खाजगी जेट आणि डिझायनर फर्निचरबद्दल सांगितलं.
त्या आलिशान हॉटेलमध्ये बसून ते सगळं ऐकताना शानाला जरा अस्वस्थ वाटलं. या दोघांमध्ये खूप फरक आहे, असं तिला वाटलं.
दुसऱ्या दिवशी कॅथरिन औषधांचा डबा घेऊन शानाकडे आली. शानाच्या मज्जातंतूंच्या समस्यांमुळे पहिला प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे गोळ्या काही प्रमाणात काम करू शकतील, असं कॅथरिननं सुचवलं.
कॅथरिननं गोळ्यांचा बॉक्स शानाला दिला.

फोटो स्रोत, Getty Images
‘मला नको,’ असं शाना उत्तरली.
पण कॅथरिनला चैन पडत नव्हता.
"शाना तुझा खरा प्रॉब्लेम काय आहे? गोळी घेतल्यास काय होईल?," असं ती शानाला म्हणाली.
शाना म्हणाली की, तुझ्याशी बोलणं अवघड काम आहे. शानानं एक गोळी घेतली आणि तोंडात टाकली.
शाना दुसऱ्यांदाही गरोदर राहिली नाही. मग पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागले.
यावेळी ते एका क्लिनिकजवळ भेटले. कॅथरिन तिच्या आईसोबत फोनवर बोलत होती. इंटिरियर डिझाइनबद्दल ती बोलत होती. ती शानासोबत फार कमी वेळ बोलली.
दहा दिवसांनी गोड बातमी समजली. शानाची युरीन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तिच्या पोटात गर्भ वाढायला लागला होता.
‘मला खूप आनंद झाला,’ शाना आठवून सांगते.
पण, कॅथरिन फारशी खूश दिसत नव्हती.
“कारण प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही सरोगेटचा गर्भपात झाल्याचा अनुभव कॅथरिनला आला होता.”
"माफ कर, पण भूतकाळात काय घडलं ते मला माहित नाही," शाना म्हणाली.
"हे सर्व तिच्यामुळेच झालं," असं कॅथरिन म्हणाल्याचं शानाला अजूनही आठवतं.
"तिनं तिच्या वडिलांना भेटण्यासाठी 12 तास वाट पाहिली. मी तिला बाहेर न जाण्यास सांगितलं. पण, तिनं ऐकलं नाही. यामुळे गर्भपात झाला," कॅथरिन म्हणाली.

काही दिवसांनंतर शानाची एचसीजी पातळी थोडी कमी झाली. मात्र, डॉक्टरांनी तिला न घाबरण्याचा सल्ला दिला.
तिनं लगेच कॅथरिनला फोन केला. "बघूया काय होतं ते," कॅथरिन तिला म्हणाली.
काही दिवसांनंतर जेव्हा कॅथरिननं शानाला फोन केला आणि "मला दुसर्या सरोगेट मदरपासून बाळ झालं आहे," असं सांगितलं तेव्हा शाना सुन्न झाली.
त्यानंतरही शाना तिच्या नियमित तपासणीसाठी जाऊ लागली. कॅथरिनला खरंच हे बाळ हवंय की नाही हे तिला माहीत नव्हतं.
चार आठवड्यांनंतर शानाला कळलं की तिची एचसीजी पातळी आणखी खाली आली आहे. त्यानंतर तिचा गर्भपात झाला.
शानानं लगेच कॅथरिनला फोन केला. पण, कॅथरिननं उत्तर दिलं नाही. मग तिनं मेसेजद्वारे ही माहिती दिली.
"मी तुला लवकरच कॉल करेन," असं उत्तर कॅथरिनकडून आलं.
पण, अनेक दिवस गेले, तरी कॅथरिनचा फोन आला नाही. त्यानंतर शानानं पुन्हा मेसेज केला.
"मला आशा आहे की तू आणि तुझे बाळ ठीक असतील. तुला माझी बिलं पाठवायला आवडतील का?" असा मेसेज तिनं पाठवला.
तिला कॅथरिनकडून उत्तर मिळालं.
“आपलं नातं संपलं” असं कॅथरिन म्हणाल्याचं शानाला अजूनही आठवतं. त्यानंतर त्या दोघी पुन्हा कधी बोलल्या नाहीत. "आजकाल सेलिब्रिटी सरोगसीबद्दल खूप बोललं जात आहे. पण हे वर्षानुवर्षं चालत आलं आहे," असं कॅलिफोर्नियास्थित सेलिब्रिटी सरोगसी एजन्सी मॉडर्नलीच्या प्रवक्त्या आरिया सिम्युएल सांगतात.
आरिया यांच्यासोबत त्यांची व्यावसायिक भागीदारही सरोगेट म्हणून काम करत होते. त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांची त्यांना जाणीव आहे.
“सामान्यत: उच्च प्रोफाइल लोक व्यवसाय व्यवस्थापक, सहाय्यक आणि सुरक्षा प्रमुखांसह सरोगसीसाठी येतात. सरोगेट्स त्यांना घाबरतात," आरिया सांगतात.
असं असलं तरी सरोगेट संस्था त्यांच्यातील भीती दूर करण्याचं काम करतात, असंही त्या सांगतात.
"आम्ही सरोगेट्समधील चिंता कमी करण्यासाठी पावलं उचलू. आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या वैद्यकीय पार्श्वभूमीची तपासणी आणि मानसशास्त्रीय चाचण्या करू," असं त्या स्पष्ट करतात.
काहीवेळा सरोगेट्सना मर्यादा असतात, असंही त्या सांगतात.
त्या सांगतात की, "ते त्यांना रिअॅलिटी शोमध्ये पाठवायला सांगतात, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सिनेमात संधी द्यायला आणि त्यांच्यासाठी पैसे गुंतवायला सांगतात."
आरिया म्हणतात की, अशा सर्व गोष्टी अगोदरच करारांमध्ये लिहून ठेवल्या जातात.
कॅथरिनसोबतच्या कटू अनुभवानंतर, तुम्ही दुसऱ्या जोडप्याला भेटायला उत्सुक आहात का? असं विचारणारा फोन शाना यांना एका सरोगसी एजन्सीतून आला. संबंधितांना भेटल्यानंतर शानानं पुन्हा एकदा सरोगसी करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी शानानं जुळ्या मुलांना जन्म दिला.
"कॅथरिनसोबतचा कटू अनुभव विसरण्यासाठी मला पुन्हा सरोगसीच्या माध्यमातून जायचं होतं," शाना सांगते.
मला सरोगसीचे दोन सुंदर आणि एक कटू अनुभव आल्याचं शाना पुढे सांगते.
आज शाना हेअर ड्रेसिंग सलून चालवते. तिथं येणारे लोक सेलिब्रिटींबद्दल बोलतात.
शाना सांगते की, "ज्यांना मुलं आहेत, ज्यांनी मुलं गमावली आहेत, ज्यांना मुलं होण्याची शक्यता नाही, ज्यांना मुलं नको आहेत, अशी वेगवेगळ्या प्रकारची माणसं माझ्याशी बोलतात."
"सरोगसीला प्रत्येकजण समर्थन देऊ शकत नाही. हा अतिशय वैयक्तिक निर्णय आहे. आपण इतर लोकांच्या मतांचा आदर केला पाहिजे," असं शाना पुढे सांगते.
(या बातमीतील जोडप्यांची नावं बदलण्यात आली आहेत.)
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








