नयनताराने आई झाल्याचं शेअर केल्यानंतर वाद का? सरोगसीवरून चर्चा का?

फोटो स्रोत, Instagram/Vignesh Shivan
- Author, नंदिनी वेलिचामी
- Role, बीबीसी तमीळ
साऊथ सुपरस्टार नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश सिवन यांनी रविवारी (9 ऑक्टोबर) आपण आई-बाबा झाल्याचं जाहीर केलं.
नयनतारा आणि विघ्नेश याच वर्षी जून महिन्यात विवाहबद्ध झाले आहेत. त्यापूर्वी दोघं पाच वर्षं एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते.
सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत या दोघांनी आपण जुळ्या मुलांचे आई-बाबा झालो असल्याची गुड न्यूज शेअर केली. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी अभिनंदन करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पण त्याचबरोबर काहींनी या जोडप्याने सरोगसीचा पर्याय स्वीकारला असल्याची शक्यताही बोलून दाखवली. पण नयनतारा आणि विघ्नेशने स्वतः याबद्दल कोणतंही भाष्य केलं नाहीये.
दुसरीकडे तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांनी या चर्चांची दखल घेतली आहे. तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एम. सुब्रमण्यम यांनी याबद्दल बोलताना म्हटलं आहे की, या प्रकरणी नयनतारा आणि विघ्नेश यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं जाईल. सरोगसीसंदर्भातल्या नियमांचं उल्लंघन केलं गेलं आहे की नाही हे पाहू.

फोटो स्रोत, Instagram/Vignesh Shivan
"नियमानुसार 21 वर्षांहून अधिक आणि 36 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती स्त्रीबीज डोनेट करू शकते. याप्रकरणी असंच झालं असावं हे आम्ही गृहीत धरतो…पण आरोग्य विभागाच्या सचिवांना ही प्रक्रिया नियमांना धरून झाली आहे की नाही याची चौकशी करावी याचे निर्देश देत आहोत," असं सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे.
सरोगसी हा मुद्दा चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही यावरून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी यांच्या धाकट्या मुलाचा, अबरामगचा जन्म हा सरोगसीद्वारे झाला आहे. 2013 मध्ये शाहरुख-गौरीने सरोगसीद्वारे अपत्यप्राप्ती झाल्याचं जाहीर केलं होतं.
2017 मध्ये दिग्दर्शक करण जोहर जुळ्या मुलांचा बाबा झाला. त्यानेही सरोगसीद्वारे आपल्याला बाळं झाल्याचं सांगितलं.
केवळ करण जोहरच नाही; तर एकता कपूर, तुषार कपूर यांनीही सरोगसीद्वारे अपत्यप्राप्तीचा पर्याय निवडला आणि सिंगल पेरेंट राहणं पसंत केलं.
या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतात सरोगसीचे नेमके नियम काय आहेत? कायदा काय सांगतो? हे जाणून घेऊया. पण त्याआधी मुळात सरोगसी म्हणजे काय हे समजून घेऊया.

फोटो स्रोत, Instagram/Shah Rukh Khan
सरोगसीचा शब्दशः अर्थ म्हणजे गर्भाशय भाड्यानं घेणं. एखादी महिला गर्भधारणा करण्यासाठी असमर्थ असेल किंवा गर्भाशयात कोणत्याही पद्धतीचं संसर्ग झाल्यास दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात मूल वाढवले जाते.
पतीचा शुक्राणू आणि पत्नीच्या बीजांड यांच्या मिलनातून तयार झालेला भ्रूण सरोगेट मदरच्या गर्भाशयात सोडला जातो. त्यानंतर नऊ महिने हा गर्भ सरोगेटच वाढवते.
म्हणजेच ही सरोगेट ही त्या अपत्याची जैविक माता नसते. गेल्या काही वर्षांत भारतातल्या अनेक शहरांत व्यावसायिक पद्धतीनं सरोगसी करणाऱ्या केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा आरोप आहे.
सरोगसीसंबंधीचा कायदा कधी बनला?
पालकत्वाची आस ही नैसर्गिक गोष्ट असली, तरी सरोगसीचा पर्याय अवलंबण्यासाठी काही नियम असावेत अशी भूमिका वारंवार मांडण्यात येत होती.
त्याचदृष्टीने लोकसभेमध्ये 15 जुलै 2019 ला सरोगसी नियमन विधेयक मांडण्यात आलं. त्यानंतर हे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर 2021 मध्ये संमत करण्यात आलं आणि राष्ट्रपतींच्या सहीनंतर जानेवारी 2022 मध्ये सरोगसीसंदर्भातला कायदा अस्तित्त्वात आला.
या कायद्यानं सरोगसीवर काही निर्बंध आणले.
भारतात व्यावसायिक सरोगसीवर पूर्णपणे बंदी आहे. कायद्यानुसार पूर्ण निःस्वार्थी भावनेनं ही प्रक्रिया केली जावी.

फोटो स्रोत, Getty Images
एखाद्या जोडप्यासाठी सरोगेट बनलेल्या महिलेनं बाळाला जन्म दिल्यानंतर त्याचा ताबा आई-वडिलांकडे द्यायला हवा.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे एखाद्या जोडप्याला वंध्यत्व असेल किंवा कोणत्याही वैद्यकीय कारणामुळे मूल होऊ शकणार नसेल तरच सरोगसीचा पर्याय अवलंबता येऊ शकतो. त्या जोडप्याच्या जवळची व्यक्ती सरोगेट बनू शकते. सरोगेट मातेचं वय हे 25 ते 35 च्या दरम्यान असावं.
कायदा काय सांगतो?
जेव्हा एखादं विवाहित जोडपं शारीरिकदृष्ट्या गर्भधारणा करण्यासाठी सक्षम नसेल तर ते मुलाला जन्म देण्यासाठी सरोगसीचा आधार घेऊ शकतात.
हे जोडपं भारताचं नागरिक असावं आणि त्यांच्या विवाहाला किमान पाच वर्षं झालेली असावीत.
त्यांना मूल (स्वतःचं, दत्तक किंवा सरोगसीद्वारे झालेलं) नसावं.
जोडप्यामध्ये पत्नीचं वय हे 23 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावं, तर पतीचं वय हे 26 ते 55 वर्षांच्या दरम्यान असावं.

फोटो स्रोत, Getty Images
सरोगसीसाठी संबंधित महिलेला पैसे देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. गरोदरपाणाच्या काळातील तिचा सर्व खर्च तसंच विम्याचा खर्च सरोगसीचा वापर करणाऱ्या जोडप्यांनी करायचा असतो.
सरोगसीच्या प्रक्रियेचं नियमन करण्यासाठी केंद्रीय स्तरावर नॅशनल सरोगसी बोर्ड आणि राज्य स्तरावर स्टेट सरोगसी बोर्डची स्थापना केली जाईल.
या कायद्यावर आक्षेप का?
सरोगसीसंबंधीच्या काही नियमांवर डॉक्टरांनी आक्षेप घेतले होते. त्यांपैकीच एक म्हणजे लग्नाला पाच वर्षं झालेलं जोडप्यालाच सरोगसीची परवानगी असणं.
डॉ. शांती रवीन्द्रनाथ यांनी बीबीसी तमीळशी बोलताना म्हटलं की, ज्या महिलांना नैसर्गिकरित्याच गर्भाशयाच्या समस्या असतात, त्यांनी सरोगसीसाठी इतका वेळ थांबणं योग्य आहे का? याचा शास्त्रीयदृष्ट्या विचार करणंही आवश्यक आहे.
त्याचबरोबर अविवाहित, समलैंगिक व्यक्ती, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारी जोडपी यांना सरोगसीचा वापर करून मुलांना जन्म द्यायला बंदी घातली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच गर्भपाताशी संबंधित जो निर्णय दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर या नियमाकडे पाहायला हवं. सर्वोच्च न्यायालयाने अविवाहित महिलेलाही गर्भपाताची परवानगी दिली आहे.
डॉ. शांती रवींद्रनाथ यांनी म्हटलं, "जर अविवाहित महिलेला गर्भपाताचा अधिकार असेल, तर अविवाहित व्यक्तीलाही सरोगसीद्वारे मूल जन्माला घालण्याचा अधिकार आहे."
गेल्या वर्षी जुलै महिन्यात डीएमके पक्षाचे खासदार थंगपांडियन यांनी मागणी केली होती की, या कायद्यानुसार क्वीअर कम्युनिटी, टान्सजेंडर व्यक्ती आणि एकल व्यक्तींनाही सरोगसीनं अपत्यप्राप्तीचा अधिकार असावा.
घटस्फोटित महिला आणि पुरुषांनाही सरोगसीच्या माध्यमातून मूल जन्माला घालता यावं, अशीही मागणी होती.
हा कायदा अस्तित्त्वात येण्यापूर्वीच वर ज्यांचा उल्लेख केला आहे त्या करण जोहरसारख्या सेलिब्रेटींनी सरोगसीद्वारे अपत्यप्राप्ती करून घेतली होती.
"बदलत्या जीवनशैलीमुळे अपत्यहीन जोडप्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरोगसीच्या नियमांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे, ते अधिक लोकाभिमुख करायला हवेत, वास्तववादी हवेत. पण कायद्यातील नियमांमधील संदिग्धतेमुळे सरोगसीचा पर्याय अवलंबणाऱ्या जोडप्यांची संख्या कमी होऊ शकते. शिवाय, या नियमांकडे जेंडर इक्वालिटीच्या दृष्टिकोनातूनही बदलायला हवं," असं डॉ. शांती सांगतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात वंध्यत्वाची समस्या असलेल्या जोडप्यांची संख्या 3.9% वरून 16.8% झाली आहे. त्यामुळेच सरोगसीचे नियम कालानुरुप बदलायला हवेत, अशी मागणीही होत आहे.
ही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








