PS1 : चोल राजांना हिंदू म्हटल्यामुळे वाद का? धर्माच्या मुद्द्यावर तमिळ हिंदूंपेक्षा वेगळे?

फोटो स्रोत, @CHIYAAN/TWITTER
मणिरत्नम दिग्दर्शित पोन्नियन सेल्वन-1 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याविषयी बरीच चर्चा होत आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून चोल वंशातील सम्राट राजराज चोल यांच्याविषयी नवी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे.
9व्या शतकापासून 13 व्या शतकापर्यंत भारतातील एका मोठ्या भागावर चोल वंशाचे राज्य होते.
या चित्रपटाविषयी तमिळ चित्रपट दिग्दर्शक वेत्रीमारन यांनी म्हटलं की, राजराज चोल याला 'हिंदू' ओळख देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे तामिळनाडूवर हजारो वर्षांपूर्वी राज्य करणाऱ्या राजाच्या धार्मिक ओळखीवरून वाद निर्माण झाला आहे.
'विदुतलाई चिरुताइगल कच्ची' या दलित पक्षाचे नेते थोलकप्पियान तिरुमावलवन यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित समारंभात वेत्रीमारन यांनी वरील मत व्यक्त केले.
ते म्हणाले, "तिरुवल्लुवरला भगवा रंग देण्यात येत आहे. राजराजला हिंदू म्हटले जात आहे. ते तमीळ लोकांची ओळख हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत."
पण अजून एक तमिळ चित्रपटकर्ते पेरारासू यांनी म्हटलं, "राजराज चोल हा हिंदू राजा होता, सर्व भारतीय हिंदूच आहेत."
या घटनेनंतर या तमीळ राजांच्या धर्मावरून संपूर्ण राज्यातच एक वाद निर्माण झाला आहे. तमीळ टीव्ही वृत्तवाहिन्यांवर या मुद्द्यावरून चर्चा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
विवेकानंद कॉलेजमधील निवृत्त प्राध्यापक ए. करुणानंदन म्हणतात, "या वादावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी आपण आधी राजराज चोल याचा कार्यकाळ आणि हिंदू धर्माच्या इतिहासाची तुलना केली पाहिजे."
ते म्हणतात, "राजराज चोल यांनी 10 व्या व 11 व्या शतकात राज्य केले होते. हिंदू या शब्दाचा वापर त्यांच्या जीवनकाळानंतर झाला. जेव्हा राजराज चोल जिवंत होते, तेव्हा हिंदू या शब्दाची उत्पत्ती देखील झाली नव्हती."

"आतापर्यंत चोल वंशाच्या कार्यकाळातील जे काही शब्दोल्लेख मिळाले आहेत, त्यात हिंदू हा शब्द नाही. तमिळ आणि इतर कोणत्याही भाषेत कोणत्याही धर्माची माहिती देताना हिंदू या शब्दाचा वापर केलेलाच नाही. म्हणून राजराज चोल याला हिंदू म्हणण्याचा काहीच पुरावा उपलब्ध नाही.
करुणानंदन यांच्या नुसार राजराज यांच्या काळात शैव व वैष्णव हे दोन मूळ धर्म होते.
या विषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, "राजराज यांच्या काळात बहुतेक लोक शैव धर्माचे पालन करत होते. या धर्माचे लोक शिवाला देव मानत असत. त्यावेळी हिंदू हा धर्म नव्हता. शैव आणि वैष्णव हेच लोकांचे धर्म होते. जैन आणि बौद्ध धर्माची लोकप्रियता त्या वेळी कमी होऊ लागली होती. ते लोकही शैव व वैष्णव संप्रादायत सामील होऊ लागले होते. राजराज यांनी एका नव्या प्रकारचा शैव संप्रदाय सुरू केला होता. त्याला 'पाशुपत शैव' म्हणतात. म्हणून राजराज यांना हिंदू राज म्हटले जाऊ शकत नाही."
करुणानंदन यांच्या मते राजराज यांना हिंदू राजा म्हणणे ही ऐतिहासिक चूक आहे.
त्यांचे म्हणणे असे आहे की, "जे पर्शियन आणि युनानी (ग्रीक - अनार्य) लोक वायव्येतून भारतात आले त्यांनी सिंधू शब्दप्रयोग केला. सिंधु या शब्दाचा संबंध नदीशी होता. पण हिंदू या शब्दाचा काहीच शाब्दिक अर्थ नाही. राजकारणी लोकांना या शब्दाला बदलून त्याला धर्माचे प्रतीक केले."
राजराज चोल यांच्या आयुष्यावर राजराज या नावाने पुस्तक लिहिलेले व्ही. जीवकुमार म्हणतात, "त्यांच्या कार्यकाळात शैव धर्माचा अधिक प्रभाव होता आणि त्या काळात शिवमंदिरे बांधली गेली होती.

ते पुढे म्हणाले, "त्यांच्या वेळी शिवमंदिरे होती आणि धर्म हा शैव धर्म होता. शिवाचे गुणगान गाणारी करणारी 'तेवारम' आणि 'तुरमुराई' ही महाकाव्येसुद्धा याच काळात होती. अजूनही असे काही लोक आहेत, ज्यांच्या मते शैव हा वेगळा धर्म आहे. एवढेच नव्हे तर फक्त शिवलिंगाची पूजा करणारे लिंगायतसुद्धा स्वतःला हिंदू मानत नाहीत.
राजराज चोलच्या काळात शैव धर्माव्यतिरिक्त बौद्ध आणि जैन धर्माचे पालनही अनेक लोक करत होते. वैष्णव धर्माचे पालन करणारेही लोक होते. सिद्ध नावाच्या लोकांचा समुदायही होता, जे कोणत्याच देवी वा देवाची पुजा करत नव्हते. राजराजच्या काळात अनेक धर्माचे लोक एकत्र राहत होते. त्यामुळे त्यांना कोणत्याही एका धर्माशी जोडले गेले नाही."
धर्माच्या मुद्द्यावर तमिळ किती वेगळे?
व्ही. जीवकुमार यांच्या मते, जे लोक ना मुसलमान होते ना हिंदू त्यांच्यासाठी इंग्रज असलेल्या सर विल्यम्स जोन्स यांनी पहिल्यांदा हिंदू या शब्दाचा वापर केला.
जीवकुमार म्हणतात, "इंग्रजांनी, वेगवेगळ्या देवी-देवतांना मानणाऱ्या लोकांना एका समुहात आणण्यासाठी हिंदू शब्दाचा वापर केला होता. जेव्हा सर विल्यम जोन्स यांनी यासाठी नियम तयार केले आणि लिहिले तेव्हा त्यांना ख्रिश्चनेतर आणि मुसलमानेतर लोकांना हिंदू म्हणून संबोधले. ही धार्मिक ओळख नव्हती. हे केवळ एक नाव होते.
चेन्नई विद्यापीठातील दर्शनशास्त्र व धार्मिक विचार विभागाचे प्राध्यापक सर्वानन यांची धारणा आहे की, सध्याचा कल पाहता राजराज याला हिंदू राजा म्हणणे चुकीचे आहे.

फोटो स्रोत, LYCA PRODUCTION
ते म्हणतात, "कोणत्याही विशिष्ट धार्मिक प्रथांसाठी किंवा धार्मिक रिवाजांसाठी हिंदू शब्दाचा वापर होत नव्हता. आपण जेव्हा हिंदू म्हणतो तेव्हा वैदिक अभ्यास, यज्ञ आणि अग्निचा संदर्भ असतो. त्याचप्रमाणे या शब्दाला सनातन धर्म व वर्णाश्रमाचाही संदर्भ असतो."
तमिळ लोकांची श्रद्धा पूर्णपणे वेगळी आहे. नवव्या शतकात आदि शंकराचार्यांनी शण्मतच्या अंतर्गत सहा धर्मांचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते की, शिवाची पूजा करणारे शैव आहेत. विष्णूची पूजा करणारे वैष्णव आहेत, मुरुगाची पूजा करणारे कुमारम आहेत, सूर्याची पूजा करणारे सौराम आहेत, गणपतीची पुजा करणारे गणपत्यम आहेत आणि शक्तीची पूजा करणारे शाक्त आहेत. त्यांनी धर्म आणि लोकांचे विभाजन असे केले होते. त्यामुळे सध्याच्या काळात राजराजला हिंदू म्हणे, चुकीचे आहे."
सर्वानन असेही म्हणतात की, हिंदू धर्मात शैव हा शब्द गृहित आहे.
ते म्हणतात, "तिरुक्करल आणि शिल्लपदिकरमसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये हिंदूविषयी एकही शब्द नमूद केलेला नाही. पण त्यानंतरच्या साम्राज्यांमध्ये वरिष्ठ पदावरील लोकांनी, वेद व ब्राह्मण श्रेष्ठ आहेत या विचारांचा प्रचार केला."
"काही काळानंतर त्यांनी शिवालाही स्वीकारले, जी शैव धर्माची एकमेव देवता आहे आणि त्यांना हिंदू धर्मात समाविष्ट करून घेण्यात आले. वैष्णवांबाबतही हेच झाले. शैव धर्मातील कडवे अनुयायी कधीच ते हिंदू असल्याचे स्वीकारणार नाहीत."
'हिंदुस्तानातील लोक हिंदू आहेत'
वेत्रीमारन यांच्या विधानावर भाजप टीका करत आहे.
भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव एच. राजा यांनी विचारले आहे, "ज्या राजाने शिवाची मंदिरे बांधली आहेत, तो मुसलमान, ख्रिश्चन किंवा बौद्ध असेल का?"

तामिळनाडूमधील भाजपाचे उपाध्यक्ष नारायण तिरुपती म्हणतात की, राजराजसाठी हिंदू या शब्दाचा वापर चुकीचा नाही. कारण हिंदू हा एक धर्म नसून ती एक जीवनशैली आहे.
ते म्हणाले, "आपण भारतात राहणाऱ्या सर्वांना हिंदू म्हणू शकतो. शैव आणि वैष्णव यांच्यात संघर्ष असेल तर हिंदू या शब्दाने या दोघांमधील संघर्ष संपला. ते एक झाले."
"त्या आधी रक्तपात होत असेल आणि लोकांच्या माना कापल्या जात असतील तर हिंदू या शब्दाने हे सगळे थांबले. शैव आणि वैष्णव एकत्र झाले. म्हणूनच राजराजसाठी हिंदू या शब्दाचा वापर चुकीचा नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








