विक्रम वेधा : हृतिक रोशन-सैफ अली खानचा सिनेमा बॉलिवूडसाठी महत्त्वाचा का आहे?

फोटो स्रोत, T series
हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला विक्रम वेधा चित्रपट आज म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
24 ऑगस्ट रोजी विक्रम वेधाचा टिझर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी या चित्रपटातील 'अल्कोहोलिया' गाणं प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर अखेर आज विक्रम वेधा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
विक्रम वेधा चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं सुरुवातीच्या रिव्ह्यूजमधून दिसून आलं आहे.
विक्रम वेधा हा चित्रपट याच नावाच्या मूळ तमीळ चित्रपटाचा रिमेक आहे. तमीळ विक्रम वेधा चित्रपट 21 जुलै 2017 रोजी केवळ तमीळ भाषेत प्रदर्शित झाला होता. केवळ 11 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल 70 कोटी रुपयांचा गल्ला केला होता.
या चित्रपटाचं दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केलं होतं. पती-पत्नी जोडगोळी असलेल्या पुष्कर-गायत्री यांचं या चित्रपटासाठी प्रचंड कौतुक झालं. या चित्रपटाला त्यावर्षीच्या साऊथ फिल्फमेअर पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.
आता याच चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यात येत आहे. विशेष म्हणजे पुष्कर-गायत्री हेच या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्यामुळे चित्रपट चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
बॉलिवूडसाठी चित्रपट महत्त्वाचा का?
गेली दोन वर्षे बॉलिवूडच्या दृष्टिकोनातून चांगले गेलेले नाहीत. कोव्हिड काळात या उद्योगाला चांगलाच फटका बसला. पण आज दोन वर्षे झाली तरी हा चित्रपट उद्योग या फटक्यातून काही सावरलेला नाही.
कोव्हिड साथीच्या काळात बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचं कंबरडं मोडलं होतं. पण आताही खचाखच भरलेल्या सिनेमा हॉलमध्ये मोकळ्या खुर्च्या बघणं या उद्योगाच्या नशिबाला आलं आहे. आजअखेर फिल्म इंडस्ट्रीचा करोडो रुपयांचा महसूल बुडल्याचं बघायला मिळतंय.

फोटो स्रोत, twitter
आपण आपले पैसे कुठे खर्च करावेत याबद्दल प्रेक्षकही जागरूक झालेत.
बॉक्स ऑफिसच्या आकड्यांचा हिशोब लावला तर यावर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात ज्या 20 फिल्म रिलीज झाल्या होत्या त्यापैकी 15 फिल्म्स बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरल्या आहेत.
यात देशातल्या बड्या सुपरस्टारच्या चित्रपटांचाही समावेश आहे. जसं की रणवीर सिंहचा '83' आणि 'जयेशभाई जोरदार', अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'बच्चन पांडे' आणि कंगना रणौतचा 'धाकड'.
चित्रपट व्यवसायाशी संबंधित असलेले जोगिंदर टुटेजा सांगतात, "या चित्रपटांना सुमारे सातशे ते नऊशे कोटी रुपयांचा फटका बसलाय. जर चित्रपटांचे सॅटेलाईट आणि डिजिटल राइट्स विकले गेले नसते, तर पैशांची भरपाई करणं आणखी कठीण झालं असतं."
टुटेजा यांना वाटतं की, "जर ही परिस्थिती अशीच राहिली तर या वर्षी सिनेमाहॉलची एकूण कमाई 45 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त होणार नाही. 2019 मध्ये बॉक्स ऑफिसवर सुमारे 55 कोटी डॉलर्स कमावलेल्या हिंदी चित्रपटांपेक्षा हा आकडा 10 कोटी डॉलर्सने कमी आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर विक्रम वेधा प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूड केवळ दक्षिणेतील गल्लाभरू चित्रपटांचा रिमेक करून पैसे कमावतं. ओरिजनल कंटेंट आणत नाही, असा आरोप गेल्या कित्येक वर्षांपासून होत आला आहे.
दरम्यान, बॉलिवूडचे दक्षिणेतील रिमेकही या काळात दणकून आपटल्याचं दिसून आलं आहे. अशातच, आणखी एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक येत असल्याने याकडे सर्वांचं लक्ष असेल.
आगामी काळात बॉलिवूडची वाटचाल कशी राहील, याची दिशा यामधून कळू शकेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.
बॉयकॉट ट्रेंड
आमिर खानचा लाल सिंह चढ्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन हे दोन चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज झाले. प्रदर्शनाच्या आधीपासूनच दोन्ही चित्रपटांवरून वादही सुरू झाला होता.
या दोन्ही चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड गेले काही दिवस सोशल मीडियावर पहायला मिळाला. अनेकांनी तर केवळ या दोन चित्रपटांवरच नाही, तर बॉलिवूडवरच बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू केली होती.
यानंतर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेला ब्रह्मास्त्र चित्रपटालाही बॉयकॉट ट्रेंडला सामोरं जावं लागलं होतं. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात गेलेल्या या दोन्ही कलाकारांना आंदोलकांच्या विरोधामुळे मंदिर प्रवेश करता आला नाही.
यानंतर ब्रह्रास्त्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचं कथानक, अभिनय आणि संवाद आदी गोष्टींवर सोशल मीडियावर मीम बनले. पण असं असूनही चित्रपटाने काही प्रमाणात गल्ला जमवला. पण या चित्रपटाची नेमकी कमाई किती याबाबत वाद आहे.

फोटो स्रोत, AAMIR KHAN PRODUCTIONS
या पार्श्वभूमीवर आगामी चित्रपटांबाबत सोशल मीडियावर काय मतप्रदर्शन होते आणि कोणती भूमिका घेतली जाते, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात हृतिक रोशनने केलेल्या एका जाहिरातीने वादाला तोंड फुटले.
उज्जैनच्या 'महाकाल'चा अपमान झाला असा आरोप झोमॅटोवर करण्यात आला आहे. त्यानंतर झोमॅटोने माफी देखील मागितली आहे. पण सध्या ट्विटरवर बॉयकॉट झोमॅटो, झोमॅटो इंसल्ट्स महाकाल असे ट्रेंड सुरू आहेत.
या प्रकरणी कंपनीने माफीही मागितली असून ती जाहिरात मागे घेण्यात आली आहे. याचा चित्रपटावर काय परिणाम होईल हासुद्धा प्रश्न आहे.
बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होण्याचं कारण काय?
बीबीसी बिझनेस प्रतिनिधी निखिल इनामदार यांच्या एका लेखानुसार, चित्रपट न चालण्यामागे बरीच कारणं असतील मात्र चांगला कंटेंट नसल्यामुळेही चित्रपटांची अशी अवस्था झाली असू शकते.

फोटो स्रोत, TWITTER
एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या एका रिपोर्टनुसार, "एक काळ असा होता, जेव्हा कंटेंट चांगला नसतानाही मोठे स्टार्स त्यांच्या जीवावर त्यांचं फॅन फॉलोइंग सिनेमाहॉलमध्ये खेचून आणायचे. आणि यातून चित्रपटांची कमाई पण ठीकठाक व्हायची. पण जसा काळ पुढं सरकला तशी प्रेक्षकांची पसंती बदलली. प्रेक्षक आता चित्रपटाच्या कंटेंटकडे जास्त लक्ष देतात."
कोव्हीड यायच्या आधी बॉक्स ऑफिसवर मिड-बजेट आणि गंभीर विषय असलेले चित्रपट चालायचे. पण आता कोव्हीडनंतर हे चित्रपटही चालायचे बंद झाले आहेत.
देशातील सर्वात मोठ्या फिल्म स्टुडिओपैकी एक म्हणजे टी-सिरीज. या टी-सिरीजचे मालक भूषण कुमार म्हणतात की, प्रेक्षकांना आता चित्रपटात चांगला कंटेंट आणि आणि बडे कलाकार अशा दोन्ही गोष्टी बघायच्या आहेत.
दक्षिण भारतातल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कब्जा केला..
भूषण कुमार निर्मित 'भूल भुलैया 2' हा हॉरर कॉमेडी चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
पण तरीही चित्रपट निर्माते संभ्रमात असल्याचं त्यांना वाटतंय. बॉक्स ऑफिसवर सतत खराब कामगिरी केलेल्या चित्रपटांमुळे, प्रेक्षकांना नेमका कोणत्या पठडीतला चित्रपट आवडेल हे समजायला मार्ग नाही.

फोटो स्रोत, TWITTER/BINGED
दुसरीकडे, दक्षिण भारतात बनवलेले चित्रपट सहसा दक्षिण भारतात चांगलं काम करताना दिसतात. पण गेल्या काही वर्षांपासून हिंदी पट्ट्यात या चित्रपटांच्या हिंदी डब व्हर्जनची लोकप्रियता वाढली आहे.
या चित्रपटांनी हिंदी पट्ट्यात चांगली कामगिरी केली आहे. साऊथचा 'RRR', 'KGF Chapter-2' आणि 'पुष्पा' सारखे अॅक्शनपॅक चित्रपट बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत बॉलिवूड चित्रपटांच्या लेव्हलला आले आहेत.
मुंबईतील स्टुडिओमध्ये बनवल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांसारखे भव्य सेट, आकर्षक गाणी आणि स्लो मोशन सीक्वेन्सचा अभाव असल्याचं जाणकारांचं मत आहे.
देशात दक्षिणेकडील चित्रपटांचा ट्रेंड वाढतोय. त्यांच्या या वाढत्या लोकप्रियतेवर चित्रपट समीक्षक सुचरिता त्यागी सांगतात, "जर मी आता एखाद्या सिनेमाहॉलमध्ये गेले तर मी एखाद्या रोमांचक सफरीवर आहे असा अनुभव हवाय."
कोव्हिडच्या काळात लोकांनी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर अनेक दाक्षिणात्य चित्रपट शोधून काढले. कारण तुम्ही जेव्हा घरी असता आणि तेचतेच बघून तुम्हाला उबग येते. हेच काही दिवसांपासून हिंदी चित्रपटांच्या बाबतीत घडताना दिसत आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








