रणबीर कपूर-आलिया भट्टची यांची लव्ह स्टोरी कुठल्या चित्रपटापासून सुरू झाली माहितेय का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मधु पाल
- Role, बीबीसी हिंदीसाठी
प्रेम जगाच्या नजरेपासून कितीही लपवलं तरी काही केल्या ते लपून राहत नाही, असं म्हटलं जातं.
अभिनेत्री आलिया भट्ट ही अभिनेता रणबीर कपूरच्या प्रेमात पडली तेव्हा असंच काहीसं पाहायला मिळालं होतं.
खरं तर आलिया भट्टने तिच्या 'स्टुडंट ऑफ द ईयर' या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच रणबीरबद्दलच्या भावना जगजाहीर केल्या होत्या. ते वर्ष होतं 2012. पुढे काही वर्षांनी तिचं स्वप्न पूर्ण झालं.
आता रणबीर आणि आलिया यांच्या जोडीला बॉलीवूडच्या सर्वात गोड जोड्यांपैकी एक म्हणून ओळखलं जात आहे.
रणबीर-आलियाच्या लग्नाविषयीच्या बातम्या सध्या प्रचंड चर्चेत आहेत.
दोघांचं लग्न नेमकं कधी होणार, कुठे होणार, हेच सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे.
आर. के. हाऊसमध्ये रंगणार विवाह सोहळा
बीबीसी हिंदीशी बोलताना आलिया भट्टचे काका रॉबिन भट्ट यांनी याबाबत माहिती दिली.
त्यांनी सांगितलं की रणबीर आणि आलिया यांचा विवाहसोहळा पाच दिवस चालणार आहे. 14 एप्रिल ते 18 एप्रिलदरम्यान हा कार्यक्रम पार पडेल.

फोटो स्रोत, Getty Images
दोघांच्या विवाहाचं लग्नकार्य आणि विधी मुंबईच्या आर. के. हाऊस येथेच होणार आहे. 14 एप्रिलपासून हे कार्यक्रम सुरू होतील. 18 एप्रिल रोजी स्वागत समारंभाने या साहळ्याची सांगता होईल.
याठिकाणी फक्त कपूर आणि भट्ट कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनाच निमंत्रण देण्यात आलेलं आहे.
नीतू कपूर यांची लाडकी आलिया
आलिया भट्टचं कपूर कुटुंबासोबतचं नातं सुरुवातीपासूनच विशेष राहिलं आहे.
आलियाने स्टुडंट ऑफ द ईयर या आपल्या पहिल्या चित्रपटात रणबीर कपूरचे वडील ऋषि कपूर यांच्यासोबत काम केलं होतं.

फोटो स्रोत, ALIA BHATT TWITTER
यानंतर ऋषि कपूर यांच्यासोबतच कपूर अँड सन्स चित्रपटातही तिने भूमिका साकारली. दिवंगत ऋषि कपूर हे पहिल्या चित्रपटापासूनच आलिया भट्टचं कौतुक करताना दिसायचे.
आलिया ही आजच्या तरुण कलाकारांमध्ये सर्वाधिक प्रभावी अभिनेत्रींपैकी एक आहे, असं ते नेहमी म्हणायचे.
ऋषि कपूर यांच्याप्रमाणेच आलियाचं रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांच्याशीही खूप जवळचं नातं राहिलं.
आलिया कपूरचं कौतुक करताना नीतू कपूर म्हणतात, "मला आलिया खूप आवडते. ती माणूस म्हणून खूप चांगली आहे. अत्यंत गोड आहे. रणबीर आणि आलियाची जोडी अगदी शोभून दिसेल. मीसुद्धा त्यांच्या विवाहाची प्रतीक्षा करत आहे."
'कॉफी विथ करण'मध्ये प्रेम असल्याचं मान्य केलं
रणबीर-आलिया यांच्यातील प्रेमाच्या चर्चा केवळ बॉलीवूड नव्हे तर जगभरात केल्या जात आहेत.
पण आलिया चित्रपटसृष्टीत दाखल होण्याच्या पूर्वीपासून तिच्या मनात रणबीरबद्दल प्रेमभावना होत्या, ही गोष्ट फारच कमी लोकांना माहीत आहे.

फोटो स्रोत, facebook
रणबीरच्या सांवरिया या पहिल्या चित्रपटापासून ते बर्फी, रॉकस्टार यांच्यासारख्या चित्रपटातील त्याच्या अभिनयामुळे ती त्याच्या प्रेमात पडली.
दोघांपैकी आलिया भट्टनेच तिचं रणबीरवरचं प्रेम सार्वजनिकरित्या मान्य केलं होतं.
निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये त्यावेळी आलिया भट्ट स्टुडंट ऑफ द ईयर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती.
त्यावेळी आलियाने म्हटलं की रणबीर कपूर तिला प्रचंड आवडतो. त्या कार्यक्रमात आलियाला विचारण्यात आलं की जर तिचं स्वयंवर झालं तर कोणत्या तीन अभिनेत्यांना ती त्याठिकाणी पाहू इच्छिते?
तेव्हा आलियाने पहिलं नाव रणबीर कपूरचं घेतलं. त्यानंतर सलमान खान आणि आदित्य रॉय कपूर या अभिनेत्यांचं नाव तिने घेतलं होतं.
आलिया भट्टची चेष्टा झाली खरी
कॉफी विथ करण कार्यक्रमात करण जोहरने आलिया भट्टला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला - प्रणय दृश्य कोणासोबत करायला आवडतील?
तेव्हा इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आलियाच्या तोंडून एकच नाव निघालं होतं, ते म्हणजे रणबीर कपूरचंच.

फोटो स्रोत, facebook
चेष्टामस्करीदरम्यान आलिया भट्टला लग्नाबद्दलही विचारण्यात आलं. तेव्हा तिने लग्नही रणबीर कपूरसोबतच करायचं असल्याचं सांगितलं होतं, हे विशेष.
पण आज आलिया भट्टने चेष्टेच सांगितलेली हीच इच्छा पूर्ण होत आहे. दोघेही लवकरच लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत.
विवाहापूर्वी रणबीर-आलिया आपल्या मित्रमंडळींसोबत एक बॅचलर पार्टीही ठेवणार असल्याची चर्चा आहे.
कुठे आणि कशी झाली रणबीर-आलियाची भेट
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांची लव्ह स्टोरी दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती, हे आपल्याला माहिती आहे.
पण रणबीर-आलिया यांच्यातील लव्हस्टोरीची सुरुवातसुद्धा संजय लीला भन्साली यांच्या सेटवरच झाली होती.
याविषयी आलिया भट्टने सांगितलं, "2005 मध्ये मी पहिल्यांदा रणबीर कपूरला पाहिलं होतं. त्याचवेळी मला रणबीर आवडू लागला. मी तेव्हा ब्लॅक चित्रपटासाठी ऑडिशन देण्यासाठी गेले होते. तिथं रणबीर कपूर सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्याला पाहताक्षणीच प्रेमात पडले."
पहिल्यांदा 'या' कार्यक्रमात दिसले एकत्र
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरची चर्चा ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या घोषणेपासून सुरू झाली.

फोटो स्रोत, FILMFARE TWITTER
अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात दोघांना घेण्यात आल्यानंतर सुरुवातीला हा केवळ प्रमोशन फंडा असल्याचं सर्वांना वाटत होतं.
चित्रपटाच्या शूटिंगवेळी दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचंही ऐकण्यात आलं.
यानंतर सोनम कपूरच्या लग्नात ते चक्क एकमेकांचा हात धरून कार्यक्रमात पोहोचले. कॅमेऱ्यांनी ही गोष्ट नेमकी टिपली.
कपूर कुटुंबीयांसोबत आलियाची उपस्थिती
रणबीर कपूरचं नाव आतापर्यंत दीपिका पदुकोन, कॅटरिना कैफ आणि सोनम कपूर यांच्याशी जोडलं गेलं होतं. पण पहिल्यांदाच त्याच्या कुटुंबीयांच्या कार्यक्रमात रणबीरच्या प्रेयसीची उपस्थिती दिसू लागली ती आलियाच्या स्वरुपात.
केवळ आलिया भट्टच नव्हे तर आलियाचे वडील महेश भट्ट, आई सोनी राजदान आणि त्यांचे कुटुंबीयसुद्धा कपूर कुटुंबाच्या कार्यक्रमात एकत्र दिसू लागले.

फोटो स्रोत, facebook
रणबीर आणि आलिया यांनी अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये एकत्र काम केलं. पण लग्नानंतर दोघे ब्रह्मास्त्र या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
हा दोघांचाही अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपट मानला जात आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून या चित्रपटाचं काम सुरू आहे. कोरोनामुळे चित्रपट बनण्यास जास्त वेळ लागला.
रणबीर आणि आलिया यांच्याव्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि नागार्जून यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे.
हा चित्रपट 3 भागांमध्ये येणार असून पहिला भाग 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








