मनसिया व्हीपी : केवळ मुस्लिम असल्यानं या मुलीला मंदिरात भरतनाट्यम करण्यापासून थांबवलं आणि...

मनसिया व्हीपी

फोटो स्रोत, MANSIYA VP

फोटो कॅप्शन, मनसिया व्हीपी
    • Author, शरण्य ऋषिकेश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कलेला कोणताही धर्म नसतो, असं मनसिया व्हीपीनं म्हटलं आहे. केरळच्या एका मंदिरात डान्स करण्यापासून मुस्लिम डान्सर मनसिया व्हीपी यांना रोखण्यात आलं.

मनसिया यांच्या आईनं त्यांना भरतनाट्यम शिकवायला सुरुवात केली, तेव्हा त्यांचं वय केवळ 3 वर्षं होतं. भरतनाट्यम ही भारतीय प्राचीन नृत्यशैली आहे. भारतातल्या अनेक मंदिरांत कलाकार भरतनाट्यम करतात.

भारताच्या दक्षिणेकडील केरळ राज्यातील मल्लपुरम जिल्ह्यात राहणाऱ्या मुस्लिम समाजाच्या मुलीसाठी अशाप्रकारचं नृत्य शिकणं सोपी गोष्ट नव्हती.

पण, मनसिया यांची आई अमीना यांचा मुलींना भरतनाट्यम शिकवण्याचा हेतू मजबूत होता. यामुळे मग त्यांच्या दोन्ही मुली केवळ भरतनाट्यमच नाही तर कथकली आणि मोहिमीअट्टमसारखे इतर शास्त्रीय नृत्यंही शिकल्या.

दोन्ही मुलींसाठी हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. मुस्लिम मुलींनी हिंदू नृत्य शिकू नये, असं त्यांच्या समाजातल्या परंपरावादी मुस्लिमांनी म्हटलं. आपल्या या निर्णयामुळे हे कुटुंब याआधीही बातम्यांमध्ये आलं आहे.

भरतनाट्यम शिकण्यासाठी पायात घुंगरू बांधल्यानंतर 24 वर्षं उलटल्यावर मनसिया गेल्या आठवड्यातही चर्चेत आल्या. यावेळी कारण होती त्यांची व्हायरल झालेली फेसबुक पोस्ट.

केरळच्या एका मंदिरानं त्यांना वार्षिक कार्यक्रमात नृत्य करण्यापासून रोखलं होतं. त्यानंतर मग त्यांनी ही पोस्ट लिहिली होती.

मनसिया हिंदू नर्तिका नाही, हे यामागचं कारण होतं.

कार्यक्रमाच्या आयोजकांनी सुरुवातीला त्यांचा अर्ज स्वीकारला. पण, नंतर परंपरा टिकवण्याचं कारण देत मंदिर प्रशासनानं त्यांच्या नृत्यावर स्थगिती आणली.

या घटनेनं आता एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

मनसिया पोस्टमध्ये लिहितात, "मी याहून जास्त भेदभावाचा सामना करत इथपर्यंत पोहोचले आहे. माझ्यासाठी हे काहीच नाही."

मशीद समितीचा आक्षेप

भरतनाट्यममध्ये पीएचडी करणाऱ्या 27 वर्षीय मनसिया आपलं लहानपण आठवताना सांगतात, "आमच्यासमोर आर्थिक प्रश्न होते. पण आम्ही खूप आनंदी होतो."

मनसिया आणि त्यांच्या बहिणीच्या जीवनात भरतनाट्यमच्या प्रवेशाची कहाणीही मजेशीर आहे.

एकदा त्यांच्या आईनं टीव्हीवर भरतनाट्यम पाहिलं आणि त्यातले सुंदर पोशाख पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या.

अमीना यांनी मनसिया आणि त्यांची मोठी बहीण रुबिया या दोघींना भरतनाट्यम शिकवण्यासाठी डान्स क्लासला घेऊन गेल्या. तसंच या दोघीही दररोज अभ्यास करतील हे सुनिश्चित केलं.

त्याकाळी मनसिया यांचे वडील व्हीपी अलाविकुट्टी सौदी अरेबियात काम करत होते आणि मुलींना भरतनाट्यम शिकवण्याचा पत्नीनं जो निर्णय घेतला त्याच्याशी ते सहमत होते.

मनसिया व्हीपी वडील अलाविकुट्टी व्हीपी यांच्यासोबत

फोटो स्रोत, MANSIYA VP

फोटो कॅप्शन, मनसिया व्हीपी वडील अलाविकुट्टी व्हीपी यांच्यासोबत

मनसिया आणि त्यांच्या बहिणीचं जीवन शाळा, भरतनाट्यमचे क्लास आणि धार्मिक शिक्षा-दीक्षा यातच गेलं. कारण अमीना यांना धर्माविषयी प्रचंड श्रद्धा होती.

मनसिया यांच्या लहानपणीच त्यांचे वडील अलाविकुट्टी केरळला परत आले. अलाविकुट्टी स्वत: प्रचंड धार्मिक नसले तरी पत्नी आणि मुलींच्या धार्मिक आस्थेविषयी त्यांना काही हरकत नव्हती.

दररोज शाळा सुटल्यानंतर आणि सुट्टीच्या दिवशी मनिसाय यांचं कुटुंब बसमधून नृत्य आचार्यांकडे जात असे. तिथं या बहिणींना सहा वेगवेगळ्या नृत्याचे प्रकार शिकवले जात.

कधीकधी मनसिया यांचं कुटुंब शेकडो किलोमीटर प्रवास करत एकाच दिवसात वेगवेगळ्या जिल्हयातील नृत्य केंद्रांवर पोहोचत असे.

मनसिया सांगतात, "ते खूपच थकवणारं होतं, पण आम्हाला या रुटीनची सवय झाली होती. आणि मला ते आवडतही होतं."

या मुलींना इतरांप्रमाणे मंदिरं आणि यूथ फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करायला सुरुवात केली.

पण, स्थानिक मशिदीच्या समितीनं याविषयी हरकत घेतली तेव्हा मात्र समस्येला सुरुवात झाली.

'मदत थांबवली'

मनसिया सांगतात, "मशीद समितीचे सदस्य आणि मदरशाची शिक्षिका माझ्याकडून आणि माझ्या बहिणीकडून कधीच नृत्य न करण्याचं आश्वासन घेण्यासाठी आग्रह करत होते."

मनसिया इतक्या लहान नव्हत्या की, त्यांना काय चाललं हे कळत नव्हतं. त्यामुळे त्या 'हो' म्हणायच्या. पण रुबिया मात्र रडत रडत घरी यायच्या.

पण, अमिना आणि त्यांचे पती अलाविकुट्टी दोन्ही मुलींना नृत्य शिकण्यासाठी कायम आश्वस्त करत होते.

मनसिया सांगतात, "मला नाही माहिती की त्यांनी हे कसं केलं. पण ते कधीच त्यांची चिंता आमच्यासमोर व्यक्त करत नव्हते."

आपल्या मुली चुकीचं काहीच करत नाही, हे निश्चित माहिती असणं आपल्या दृढनिश्चयाचं कारण असल्याचं अलाविकुट्टी सांगतात. अलाविकुट्टी यांनीही त्यांच्या तरुणपणात नाटकांमध्ये काम केलं आहे.

मनसिया व्हीपी

फोटो स्रोत, MANSIYA VP

फोटो कॅप्शन, मनसिया व्हीपी

पण, 2006 मध्ये अमिना यांना कॅन्सर झाल्याचं समोर आलं आणि मग परिस्थिती बदलली.

"माझे वडील आईच्या उपचारासाठी पैशांची जमवाजमव करत होते. त्याच दरम्यान विदेशातून आर्थिक मदतीचा प्रस्ताव आला," मनसिया सांगतात.

पण, मनसिया आणि बहिणीच्या शास्त्रीय नृत्य शिकण्यामुळे नाराज झालेल्या मशीद समितीनं त्यांच्यापर्यंत मदत पोहोचू दिली नाही.

मनसिया सांगतात, "माझी आई आणि मी दररोज समितीच्या सदस्यांकडे मदतीसाठी विनंती करायला जायची."

या अनुभवानं धर्मासोबतच्या नात्याबद्दल विचार करायला प्रवृत्त केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

2007 मध्ये अमीना यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांना स्थाविक कब्रस्तानात दफन करण्यासाठी जागाही नाही मिळाली.

पुढची काही वर्षं एकटेपणाचे आणि अवघड होते. पुढच्या शिक्षणासाठी रुबिया तामिळनाडूला गेल्या. पण, नृत्याप्रतीची आवड आणि वडिलांचा पाठिंबा यामुळे मनसिया यांनी नृत्य करणं चालू ठेवलं.

धार्मिक ध्रुवीकरण

भारतातलं धार्मिक वातावरण गुंतागुंतीचं आहे. यामुळे अनेकदा विरोधभासांना जन्म दिला जातो.

2021 मध्ये प्यू रिसर्चच्या अभ्यासात समोर आलंय की, सगळ्याच धर्माचे बहुसंख लोक धार्मिक सहिष्णुता आणि धार्मिक भेदभावाला पाठिंबा देतात.

संस्कृती आणि दैनंदिन आयुष्यातील वातावरणात मात्र समन्वय दिसून येतो. पण बऱ्याचदा यासंबंधीच्या मर्यादांचीही कसोटी पाहिली जाते.

भारतातल्या प्रसिद्ध संगीतकारांपैकी अनेक कलाकार इस्लाम मानणारे आहेत. त्यांचं संगीतही बऱ्यादा भक्तीमय राहिलं आहे.

बिस्मिल्ला खाँ
फोटो कॅप्शन, बिस्मिल्ला खाँ

उस्ताद बिस्मिल्लाह खाँ यांच्यापासून अलाउद्दीन खान यांच्यापर्यंत विद्येची देवता सरस्वतीचे भक्त राहिले आहेत. पण यासोबतच ते स्वत:च्या धर्माचं पालनंही करत आले आहेत.

मनसिया आठवतात की, "मला आणि माझ्या बहिणीला व्हीपी सिस्टर्स या नावानं ओळखलं जातं. मलप्पुरममधील प्रत्येक मंदिरात आम्ही डान्स परफॉर्मन्स केला आहे. प्रत्येकच ठिकाणी त्यांना प्रेम आणि प्रशंसा मिळाली आहे."

एका मंदिर समितीच्या सदस्यानं मुस्लिम असल्यामुळे डान्स करण्यास विरोध केला होता, ही एकच घटना त्यांच्या आठवणीत आहे.

मनसिया सांगतात, "आमचा परफॉर्मन्स त्यांना इतका आवडला की नंतर त्यांनी आम्हाला मीठी मारली."

धर्माचा उच्चार नाही

त्रिचूर येथील कूडलमनिक्यम मंदिरांनं वार्षिक कार्यक्रमासाठी अर्ज मागवले तेव्हा मनसिया यांनी आयोजकांशी संपर्क साधला.

त्यावर तुम्ही तुमच्याविषयीची माहिती पाठवून द्या, असं त्यांना सांगण्यात आलं. तुम्हाला कोणती माहिती पाहिजे, असं आयोजकांना विचारलं तेव्हा ते एखाद्या कलाकाराच्या रिझ्यूमेप्रमाणे होतं. त्यात धर्माचा उल्लेख कुठेच केला नव्हता.

मनसिया अनेक आठवड्यांपासून या कार्यक्रमासाठी अभ्यास करत होत्या. तेव्हा अचानक एके दिवशी त्यांना एका आयोजकानं फोन केला आणि तुम्ही हिंदू नसल्यामुळे परफॉर्म करू शकत नाही, असं सांगितलं. तसंच मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश निषिद्ध आहे, असंही सांगितलं.

भारतातल्या बहुंसख्य हिंदू मंदिरांमध्ये सगळ्याच धर्मातल्या लोकांना प्रवेशाची आणि पूजा करण्याची मुभा आहे. पण, अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये एका निश्चित सीमेच्या पुढे केवळ हिंदूंना प्रवेश असल्याचं सांगितलं जातं.

मनसिया यांचा अर्ज रद्द करण्यामागे मंदिराच्या परंपरांचं पालन करणं हे कारण असल्याचं मंदिर प्रशासनानं म्हटलं आहे. मनसिया यांची फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे.

मनसिया यांना राजकारणी आणि कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. काही कलाकारांनी, तर मनसिया यांच्या समर्थनार्थ या कार्यक्रमातून आपली नावं मागे घेतली आहे.

या काळात मनसिया यांचं कुटुंब त्यांच्यासोबत आहे. यात नियमितपणे मंदिरात जाणारे त्यांची सासरची हिंदू मंडळीही आहे.

अलाविकुट्टी यांच्यादृष्टीनं आतापर्यंत त्यांनी जो काही संघर्ष केला आहे, त्यामानानं ही एक छोटी गोष्ट आहे.

मनसिया सांगतात की त्यांनी एकाच कारणामुळे फेसबुक पोस्ट लिहिली होती.

"ही पोस्ट वाचून एका जरी व्यक्तीला कळालं की कलेला कोणताही धर्म नसतो, तर मला त्याचा खूप आनंद होईल," हे मनसिया यांचं पोस्ट लिहिण्यामागचं कारण आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)