मुस्लिमांच्या मशिदीत खरंच तलवारी असतात का? तिथं नेमकं काय चालतं?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : '... आणि मी पहिल्यांदाच पाहिलं आहे की मशिदीत नेमकं काय चालत'
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

20 वर्षांच्या शुभम कांबळेला जेव्हा मशिदीत बोलावणं आलं, तेव्हा त्याच्या मनात उत्सुकता आणि भीतीचं काहूर माजलं होतं. त्याला रात्री नीट झोपही लागली नाही.

"माझ्या मनात अनेक विचार, अनेक शंका होत्या. मला अनेक प्रश्न पडले होते. ते विचारू की नाही? कोणी माझ्यावर चिडणार तर नाही ना? अशी घालमेल सुरू होती," शुभम सांगतो.

मुंबईतल्या प्रामुख्यानं मुस्लीम वस्ती असलेल्या कुर्ल्यात राहात असूनही शुभमला इस्लामविषयी फारशी माहिती नव्हती.

"मुसलमान फक्त शुक्रवारीच आंघोळ करतात. लव्ह जिहाद करतात, पोरीशी लग्न केलं की तुम्हाला एवढे पैसे मिळणार असं वाटायचं. ते अतिरेकी बनण्याचं प्रशिक्षण घेतात, रक्तात बोट बुडवूनच मशिदीत जातात, असं मी ऐकलं होतं."

इस्लामविषयी असे गैरसमज असलेला शुभम एकटाच नाही. हिंदूधर्मियांच्या मनात इस्लामविषयीच्या अशा गैरसमजांतूनच हळूहळू पूर्वग्रह बनत जातात आणि दोन धर्मात तेढ वाढते.

कुर्ल्याची हलाई मेमन मशिद

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

फोटो कॅप्शन, कुर्ल्याची हलाई मेमन मशिद

हे रोखण्यासाठी 'जमात-ए-इस्लामी हिंद' या संघटनेनं पुढाकार घेतला आहे. 'मस्जिद परिचय' उपक्रमाद्वारे ते अन्य धर्मियांसाठी, विशेषतः हिंदूंसाठी मशिदीचे दरवाजे उघडत आहेत.

जमात-ए-इस्लामी हिंदच्या कुर्ला शाखेचे अध्यक्ष हसीब भाटकर या उपक्रमाविषयी माहिती देतात, "सर्वांसाठी इस्लाम - 'Islam is for all' या मोहिमेअंतर्गत आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर समुदायांमध्ये संवाद घडवून आणतो आहोत. त्यातून एकमेकांविषयीचे गैरसमज, तक्रारी दूर करू शकतो."

हसीब भाटकर

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

फोटो कॅप्शन, हसीब भाटकर

कुर्ल्याच्या हलाई मेमन मशिदीत काही आठवड्यांपूर्वी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शुभमसह आणखी चार-पाच जणांना मशिदीत येण्याची संधी मिळाली. बीबीसी मराठीच्या टीमलाही आमंत्रण होतं.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका दुपारी आम्ही कुर्ल्यात पोहोचलो, तेव्हा उकाडा चांगलाच जाणवत होता. मुंबईच्या या उपनगरात तुम्ही आधी कधीच आला नसाल, तर इथली गर्दी, रस्त्यावरची वर्दळ, आवाज कोंदट हवा आणि दाटीवाटीनं वाढलेली घरं तुमच्या अंगावरच येतील.

नमाज

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

मुंबईच्या पश्चिम उपनगरातून येताना मिठी नदी ओलांडून पलीकडे गेलं की काही अंतरावर न्यू मिल रोड लागतो. कुर्ला स्टेशनच्या पश्चिमेचा हा भाग.

मुंबईत तुफान पाऊस पडला, की या परिसरातील अनेक घरांत पाणी भरतं. तेव्हा धर्म विसरून लोक एकमेकांची मदतही करतात, असं स्थानिकांनी आम्हाला सांगितलं. पण एकमेकांच्या शेजारी राहूनही एकमेकांच्या धर्माविषयी त्यांना फारशी माहिती नसते असंही, त्यांनी कबूल केलं.

आमच्यासोबत मशिदीला भेट देण्याची संधी मिळालेले शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जनादर्न जंगले हेच सांगत होते.

मशिदीत इतर धर्मियांना इस्लामविषयी माहिती दिली जाते.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

फोटो कॅप्शन, मशिदीत इतर धर्मियांना इस्लामविषयी माहिती दिली जाते.

"1992च्या दंगलीनंतरच आम्ही कुर्ल्यात राहायला आलो. शिक्षकांना शासनाकडून तिथंच घर मिळाल्यामुळे आमच्यासमोर पर्याय नव्हता. मुस्लीम वस्ती असल्यानं अनेकांनी घरं भाड्यानं देऊन दुसरीकडे जाणं पसंत केलं. पण आम्ही काहीजण इथंच राहिलो."

कुर्ल्यातल्या सद्भावना मंचच्या माध्यमातून दोन समाजांच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी काम केलं जातं. जनार्दन जंगले त्यात सहभागी झाले, पण त्यांच्याही मनात अनेक शंका होत्या.

"मी याआधी एकदाच मशिदीत गेलो होतो, माझ्या एका मित्राच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस. माझ्या मनातही अनेक प्रश्न होते, मशिदीत नेमकं काय करतात, महिला नमाज पढत नाहीत का, असे अनेक गैरसमज होते," असं जंगले कबूल करतात.

नमाज

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

शुभम आणि जनार्दन जंगले यांच्याप्रमाणेच माझ्याही मनात एक शंका होती. पत्रकार असले, तरी महिला म्हणून मला मशिदीत कशी वागणूक मिळेल? भारतात अनेक ठिकाणी महिलांना धार्मिक स्थळी एकतर प्रवेश नसतो किंवा त्यांच्यावर अनेक बंधनं येतात.

पण हलाई मेमन मशिदीत आम्हा सर्वांचंच उत्साहानं स्वागत करण्यात आलं. मशिदीतल्या वेगवेगळ्या प्रथांची आणि त्यामागच्या कारणांची माहिती देण्यात आली.

मशिदीत प्रवेश केल्यावर चपला काढून ठेवाव्या लागतात. भारतातील अन्य धर्मांप्रमाणेच इस्लाममध्येही प्रार्थनेआधी स्वतःला शुद्ध करणं महत्त्वाचं असतं.

शुभम कांबळे

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

फोटो कॅप्शन, शुभम कांबळे

त्यासाठी मशिदीत पाण्याची सोय केलेली असते. तिथं हातपाय, चेहरा स्वच्छ धुवावा लागतो- यालाच वुझू करणे म्हणतात. त्यानंतरच मुख्य मशिदीत प्रवेश मिळतो.

मक्का ज्या दिशेला आहे त्या दिशेला, म्हणजे भारतात पश्चिमेला तोंड करून नमाझ पढतात. त्यातल्या प्रत्येक वाक्याचा, कृतीचा अर्थ काय आहे हे मौलाना मुझम्मिल हुसेन यांनी समजावून सांगितलं.

मशिदीची माहिती देऊन झाल्यावर अल्पोपहाराचा कार्यक्रम झाला. सगळे मांडी घालून एकत्र खालीच बसून गप्पा मारत होते.

शुभमच्या प्रत्येक प्रश्नाला मौलानांनी आणि हसीब भाटकर यांनी उत्तरं दिली. त्याच्या आणि बाकीच्यांच्या मनातल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शुभमचं समाधान झाल्याचं दिसलं.

नमाज

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

मशिदीतल्या छोट्या हौदाकाठी, एका चौथऱ्यावर बसून तो आपले अनुभव सांगत होता,

"सगळ्यांत मला आवडलं ते म्हणजे नमाझ पढताना सगळे एकसमान आहेत. जो पहिला येईल तो तिकडे रांगेत पहिला बसणार, गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे. मला भीती वाटली सुरूवातीला प्रश्न विचारताना, पण त्यांनी न चिडता, न रागवता मला सगळं समजावून सांगितलं"

जनार्दन जंगलले यांनाही हा उपक्रम म्हणजे दोन धर्मांना जवळ आणण्यासाठी एक चांगलं पाऊल वाटतं.

ते सांगतात, "मी पहिल्यांदाच पाहिलं आहे की मशिदीत नेमकं काय चालत? आपण बाहेर जे ऐकतो, मशिदीत काहीतरी भयंकर चालतं, मशिदीत भडकावू भाषणं देतात, दहशतवाद पसरवतात, असं बोललं जातं. पण वास्तव यापेक्षाही वेगळं आहे."

सर्वांनी एकमेकांच्या धर्मस्थळांना भेट द्यायला पाहिजे, असं जंगले यांना वाटतं.

इस्लाम

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

"आजकाल सोशल मीडियावरून एखादी पोस्ट पसरत जाते, खरं काय आहे हे काही कुणाला माहीत नसतं. केवळ माहिती नसल्यामुळं किंवा चुकीची माहिती मिळाल्यामुळं धार्मिक तेढ निर्माण होते, ते अशा उपक्रमांमुळं थांबेल" अशी आशा ते व्यक्त करतात.

शुभमनंही त्याला दुजोरा दिला. "आज जसं त्यांनी एक सत्र घेतलं, तसं अजून एकदा परत घ्यावं. खोटं काय आहे नि खरं काय आहे, हे लोकांना कळेल. माणसं स्वतः बघत नाहीत तोवर विश्वास नाही ठेवणार. आपण नेहमी एकमेकांना दोष देतो हे चांगलं की वाईट हे त्यांना समजून जाईल. सगळ्यांच्या मनातला तिरस्कार दूर होईल."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)