मुस्लीम आपापला 'घेट्टो' करूनच
    का राहतात?

    मुस्लीम एका ठिकाणी, एकत्र आपापल्या वस्तीतच का राहतात,हे शोधण्याचा प्रयत्नबीबीसीनं दलित व मुस्लिमांविषयीच्या या विशेष सीरिजमध्ये केला आहे.

    News imageNews imageNews image

    दिल्लीतील मुस्लीम वस्त्यांसाठी वेगवेगळे शब्द वापरले जातात, इंग्रजीमध्ये त्यासाठी ‘घेट्टो’ हा शब्द आहे.

    News image

    ‘घेट्टो’

    ‘घेट्टो’ या शब्दाचा उगम इटालियन भाषेतून झालेला आहे. व्हेनिसमध्ये एका लोखंडाच्या कारखान्याभोवती ज्यू लोकांची वसाहत करण्यात आली होती, तिला ‘घेट्टो’ असं संबोधलं जात असे.त्यानंतर सोळाव्या आणि सतराव्या शतकांमध्ये युरोपातील सर्वच ज्यू वसाहतींसाठी ‘घेट्टो’ हा शब्द वापरला जाऊ लागला. आताच्या काळात ‘घेट्टो’ म्हटलं की, पायाभूत सुविधांची वानवा असलेल्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट धर्माच्या लोकांची दाटीवाटीनं तयार झालेली वसाहत, असा अर्थ अभिप्रेत असतो.

    आता आपण दिल्लीत येऊ. पृथ्वीराज चौहान यांच्या सत्ताकाळापासून ते मुघलांपर्यंत आणि पुढं ब्रिटिश कालखंडापर्यंत दिल्लीचा चेहरामोहरा वारंवार बदलत गेला. त्याच वेळी या शहरात अनेक वसाहती आकाराला आल्या. आज दिल्लीमध्ये मुस्लिमांच्या अनेक दाटीवाटीनं उभ्या वसाहती आहेत.

    मुस्लीम अशा विशिष्ट भागांमध्ये का राहातात, इतर समुदायांच्या लोकांबरोबर ते का मिसळत नाहीत, केवळ आदिम काळाप्रकारे आपल्या धर्माच्याच लोकांसोबत राहण्याची सवय त्यांना असते का, इत्यादींसारखे प्रश्न अनेकदा विचारले जातात.

    ‘बीबीसी’च्या या विशेष लेखमालिकेमध्ये आम्ही या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

    या उत्तरांच्या शोधात आम्ही दिल्लीच्या ईशान्य भागामध्ये गेलो. हा परिसर ‘जमना पार’ या नावानं परिचित आहे.

    इथं मुस्लिमांची बरीच मोठी वस्ती आहे. विशेषतः उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेले आणि या भागात स्थायिक झालेले हे मुस्लीम आहेत. अनेक वसाहतींमध्ये केवळ मुस्लीम राहातात, तर अनेक ठिकाणी संमिश्र लोकसंख्याही आढळते.

    अशी एक वसाहत जाफराबादमध्ये आहे. सीलामपूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या या भागाची लोकसंख्या दीड लाख आहे. इथं राहणारे बहुतांश लोक व्यावसायिक तरी आहेत किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारचे कामगार आहेत.

    या भागात एकही सरकारी रुग्णालय वा दवाखाना नाही. केवळ दोन प्राथमिक शाळा आहेत आणि एकच माध्यमिक शाळा आहे. या भागातील गल्ल्या अतिशय अरुंद आहेत, त्यातून एखादी कारही जाणं अवघड आहे.

    ‘मुस्लिमांना परकं मानलं जातं’

    मुस्लीम जाफराबाद वसाहतीमध्ये का राहतात? संमिश्र लोकसंख्या असलेल्या लगतच्या परिसरामध्ये का राहात नाहीत?

    आमच्याकडं सर्वसामान्य भारतीय म्हणून पाहिलं जात नाही, तर केवळ मुस्लीम म्हणून बघितलं जातं. आमची मुलं आणि बुरखा घातलेल्या महिला यांना ‘परकं’ मानलं जातं,” असं त्या सांगतात.

    इरम

    या परिसरात राहाणाऱ्या २६ वर्षीय इराम अरीफ यांनी या प्रश्नांवर उपरोधिक उत्तर दिलं. पदवीधर गृहिणी असलेल्या इराम म्हणतात की, मुस्लिमेतर भागांमध्ये मुस्लिमांना ‘परकं’ मानलं जातं म्हणून ते अशा ठिकाणी राहातात.

    “या वसाहतींमध्येच आमच्याकडं सर्वसामान्यांसारखं पाहिलं जातं, म्हणून आम्ही इथं राहातो. इथं गुन्हे घडतात, पण इतर ठिकाणी आमच्या बाबतीत वागताना दुटप्पीपणा दाखवला जातो, तो तरी इथं नाही. इतर ठिकाणी आमच्याकडे सर्वसामान्य भारतीय म्हणून पाहिलं जात नाही, तर केवळ मुस्लीम म्हणून बघितलं जातं. आमची मुलं आणि बुरखा घातलेल्या महिला यांना ‘परकं’ मानलं जातं,” असं त्या सांगतात.

    “या भागामध्ये प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं जगण्याचं, खाण्याचं आणि उत्सव साजरे करण्याचं स्वातंत्र्य असतं,” असंही इराम सांगतात. मुस्लिमेतर भागांमध्ये आपल्याला भारतीय म्हणून समान वागणूक मिळणार असेल तर तिथं राहायला आपल्याला निश्चितच आवडेल, असंही त्या म्हणतात.

    सनदी लेखापाल असलेल्या हुमा खान (२६ वर्षं) यांचं मत काहीसं निराळं आहे. इतर समुदायांसोबत एकाच परिसरामध्ये मुस्लिमांनी राहायला हवं, पण यासंबंधीचा निर्णय कुटुंबातील ज्येष्ठांवरही अवलंबून असतो, असं त्या म्हणतात.

    त्या भागांमध्ये घर विकत घ्यायचं असेल किंवा भाड्यानं घ्यायचं असेल आम्हाला अडचणींना सामोरं जावं लागतं.”

    हुमा

    ‘दंगल’ असा शब्द न वापरता त्या म्हणतात, “मुस्लिमांसोबत २०-२५ वर्षांपूर्वी जे काही चुकीचं घडलं, त्यामुळं आमच्या कुटुंबांना दुसऱ्या कुठल्या भागामध्ये राहायला नको वाटतं. दुसरी गोष्ट, सुखसोयींनीयुक्त वसाहती किंवा मुस्लिमेतर परिसर आम्हाला स्वीकारायलाही तयार नसतात. त्या भागांमध्ये घर विकत घ्यायचं असेल किंवा भाड्यानं घ्यायचं असेल आम्हाला अडचणींना सामोरं जावं लागतं.”

    मुस्लीम भागांमध्ये स्वच्छतेची आणि कायदा व सुव्यवस्थेचीही मोठी समस्या असते. या प्रश्नावर बोलताना हुमा म्हणाल्या की, संधी मिळाली तर त्यांना निश्चितपणे मुस्लिमेतर भागामध्ये राहायला आवडेल. पण जाफराबादसारख्या मुस्लिमबहुल भागांमध्ये स्वच्छता आणली आणि कायदा व सुव्यवस्था राखली तर तिथं राहण्याला त्या प्राधान्य देतील.

    दिल्लीतील मुस्लीमबहुल भाग
    News image
    News image

    जाफराबादचा परिसर जॅकेटं,कूलर व छापील कशिदाकाम यांसाठी प्रसिद्ध आहे. ही भारतातील सर्वांत मोठी जॅकेट बाजारपेठ आहे, असं जाफराबाद व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमानुल्ला खान सांगतात. इथं जॅकेटांचं उत्पादनही होतं आणि त्यांची निर्यातही केली जाते.

    अमानुल्ला ख़ान

    अमानुल्ला ख़ान

    52 वर्षीय अमानुल्ला यांचा जॅकेटचा व्यवसाय भरभराटीमध्ये आहे आणि ते बऱ्यापैकी श्रीमंत आहेत.त्यांनी ठरवलं तर ते कोणत्याही चकचकीत वा सोयीसुविधांनीयुक्त सोसायटीमध्ये राहू शकतात, पण त्यांनी जाफराबादमध्येच राहण्याचा पर्याय निवडला आहे.

    “इथं आजूबाजूला मशिदी आहेत, त्यामुळं नमाज पढणं आम्हाला सोयीचं जातं. दुसरं म्हणजे, एखाद्या ठिकाणी आपल्या ओळखीचं कोणी असेल अशा ठिकाणी माणूस राहायला जातो,किंवा मग आपलं कुटुंब राहात असेल, तिथं राहतो.”

    आपल्या समुदायामध्ये राहिल्यामुळं सुरक्षेची भावना मिळते का, या प्रश्नाला उत्तर देताना अमानुल्ला म्हणाले की, जॅकेट-व्यवसायामुळं त्यांचे हिंदूंशी चांगले संबंध आहेत; आणि त्यांना कोणत्याही असुरक्षिततेची भावना सतावत नाही.

    जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या सहायक प्राध्यापक गझाला जमील यांनी दिल्लीतील मुस्लीम भागांविषयी ‘अॅक्युमुलेशन बाय सेग्रिगेशन’ हे पुस्तक लिहिलं आहे. या मुस्लीम वसाहतींची वाढ होण्यामागं सुरक्षेचा प्रश्न कारणीभूत आहे, त्याचसोबत विशिष्ट कौशल्यांशी निगडित व्यवसायांमधील लोक एकमेकांसोबत राहण्याला प्राधान्य देतात, हाही भाग त्यात आहे, असं जमील म्हणतात.

    या वसाहतींसाठी ‘घेट्टो’ हा शब्द वापरणं गझाला यांना गैर वाटतं. या शब्दाचा इतिहास दीर्घ स्वरूपाचा आहे, ते सोडून या शब्दाचा वापर करणं गैर आहे, असं त्या म्हणतात.

    “लोक खूप पूर्वीपासून समाजामध्ये विभक्तपणे राहात आले आहेत. गावांमध्ये कायमच भिन्न जातींच्या भिन्न ‘वसाहती’ होत्या. दलितही वेगळ्या वसाहतींमध्ये राहातात, पण त्यासाठी ‘घेट्टो’ असा शब्द वापरला जात नाही.”

    जाफराबादचे एक रहिवासी डॉ. फहीम बेग सांगतात की, आज मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे, त्यामुळं ते या मुस्लीम लोकसंख्येच्या वसाहतींमध्ये राहातात.

    भारताला दंगलींचा इतिहास आहे, आणि त्यामध्ये बहुतेकदा मुस्लीम मारले जातात. हे टाळण्यासाठी त्यांनी गटामध्ये राहाण्याचं ठरवलं.

    फहीम बेग़

    बेग जाफराबादमध्ये स्वतःचा दवाखाना चालवतात. या वसाहतींमध्ये मुस्लीम स्वेच्छेनं येऊन राहातात, कारण मोदी सरकार आल्यापासून गेल्या चार वर्षांमध्ये मुस्लिमांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.

    “भारताला दंगलींचा इतिहास आहे, आणि त्यामध्ये बहुतेकदा मुस्लीम मारले जातात. हे टाळण्यासाठी त्यांनी गटामध्ये राहाण्याचं ठरवलं. जाफराबाद भागामध्येही लोकांनी घरं विकत घ्यायला सुरुवात केली तेव्हा रस्त्याकडेच्या घराला प्राधान्य दिलं जात नव्हतं. आतल्या भागात घर विकत घेतलं तर ते सुरक्षित राहील, अशी लोकांची धारणा होती,” असं बेग सांगतात.

    मुस्लिमेतर वसाहतींमध्ये राहण्याचा प्रयत्न मुस्लीम का करत नाहीत?

    या प्रश्नावर बेग म्हणतात की, बहुतांश समुदायांनी सुरक्षेच्या संदर्भात हे तंत्र आत्मसात केलं आहे.

    “१९८४ साली झालेल्या शीखविरोधी दंगलींनंतर शिखांनीही हेच केलं. ते एकत्र एका ठिकाणी राहायला लागले. त्यामुळं दिल्लीच्या पश्चिम भागात टिळकनगरसारख्या शिखांच्या वसाहती दिसतात. तिथं ते स्वतःच्या पद्धतीनं राहतात. त्यांनी तिथे जंगी गुरुद्वारा उभारले आहेत. तिथं त्यांना आपल्या पसंतीनुसार जगता येतं, खाता येतं, पिता येतं,” असं बेग म्हणतात.

    मुस्लिमांच्या एकत्र राहाण्यामागचं पहिलं कारण असुरक्षितता हे आहे, या वस्तुस्थितीबाबत गझालाही सहमती दर्शवतात. पण संस्कृतीचा मुद्दाही लक्षात घ्यावा लागतो, असं त्या सांगतात.

    News image
    News image

    अख़लाक़, अफ़राज़ुल आणि जुनैद

    News image

    दिल्लीच्या टिळकनगर परिसरात गेलं तर प्रत्येक मटणाच्या दुकानाच्या समोर ‘झटका’ असं लिहिलेलं आढळतं. जाफराबादमध्ये ‘हलाल’ हा शब्द दिसतो.

    “माझ्या पुस्तकासाठी संशोधन करत असताना मी अनेक लोकांशी बोलले. आपली जीवनशैली आणि पद्धती याकडे विचित्र नजरेनं पाहिलं जातं, असं हे लोक सांगायचे. या भागांमध्ये त्यांना स्वतःच्या इच्छेनुसार जगण्याची मुभा आहे, त्यामुळं ते इथं राहण्याचा पर्याय निवडतात,” असं गझाला म्हणतात.

    उदाहरणार्थ, दिल्लीच्या पश्चिम भागातील टिळकनगर परिसरात गेलं तर प्रत्येक मटणाच्या दुकानाच्या समोर ‘झटका’ असं लिहिलेलं आढळतं. जाफराबादमध्ये ‘हलाल’ हा शब्द मटणाच्या दुकानांबाहेर दिसतो. यावर विचार केला असता लक्षात येतं की, मुस्लीम लोक ‘झटका’ खाणार नाहीत आणि शीख ‘हलाल’ मांस खाणार नाहीत.

    “शहरं म्हणजे नफा कमावणारी यंत्रं असतात, त्यामुळं बाजारपेठेचं विभाजन, हेही एक महत्त्वाचं कारण आहे. मुस्लीम वसाहतींमध्ये काही लहान उत्पादनांचे रोजगार असतात आणि तिथं स्वस्तात कामगार उपलब्ध होतात. शिवाय, मुस्लिमांच्या आर्थिक परिस्थितीनुसार विविध मुस्लीम भाग विकसित झाले आहेत. यामध्ये पश्चिम निझामुद्दीनसारखे झकपक परिसरही आहेत.”

    ‘कुर्ता-पायजमा बघितल्यावर वागण्यात बदल’

    मुस्लीम समुदायाची मोठी समस्या हीच आहे की, ते दुसऱ्या समाजाबरोबर मिळून मिसाळून राहू शकत नाहीत आणि इतर समाजही त्यांना आपल्या आसपास राहू देत नाहीत.

    या भागांमध्ये लोकांना असुरक्षित वाटतं, असं २८ वर्षीय शादमन (नाव बदललं आहे) यांनी खरं नाव न देण्याच्या अटीवर सांगितलं. पदवीधर असलेले शादमन जॅकेटच्या व्यवसायात आहेत. मुस्लीम भागांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाणही सर्वांत जास्त असल्याचं ते सांगतात.

    निरक्षरता आणि गरिबी यांच्यामुळे गुन्हेगारी वाढते आणि सरकारही या भागांकडं फारसं लक्ष देत नाही, असं शादमन म्हणतात. शिवाय, संधी मिळाली तर आपण निश्चितपणे मुस्लिमेतर वसाहतीमध्ये राहायला जाऊ, असंही स्पष्ट करतात.

    ते म्हणतात, “इतर समुदायांसोबत न मिसळण्याची वृत्ती ही मुस्लीम समुदायाची सर्वांत मोठी समस्या आहे. त्याच वेळी हिंदू व इतर कोणता समुदायही त्यांना सामावून घेत नाही. आम्ही त्यांच्यासोबत राहायला लागलो आणि ते इथं आमच्यासोबत राहायला आले, तरच दोघांमधील अंतर भरून निघेल.”

    मी मुस्लीम आहे का, असं ते मला वारंवार विचारायला लागले

    जाफराबादमध्ये कोचिंग सेंटर चालवणाऱ्या ३५ वर्षीय नदीम अरिने यांचे विचारही अशाच प्रकारचे आहेत. मुस्लिमेतर लोक मुस्लिमांना स्वीकारत नाहीत, त्यामुळं मुस्लीम याच भागांमध्ये राहण्याचा पर्याय निवडतात, असं ते सांगतात.

    “हिंदूंनी आम्हाला स्वीकारलं, तर आम्हाला त्यांच्यासोबत राहायला का आवडणार नाही. हिंदू मुलं माझ्याकडे आली की त्यांनाही मी गरजेच्या सुविधा पुरवतोच,” असं नदीम म्हणतात.

    “२०१० साली ग्वाल्हेरमध्ये माझी परीक्षा सुरू होती. दोन दिवस सहपरीक्षार्थींनी मला चांगली वागणूक दिली. पण तिसऱ्या दिवशी जुम्मा प्रार्थनेनंतर मी कुर्ता-पायजमा घालून परीक्षा-केंद्रावर गेलो, आणि त्यांचं माझ्यासोबतचं वागणं बदललं. मी मुस्लीम आहे का, असं ते मला वारंवार विचारायला लागले,” अशी एक आठवण नदीम सांगतात.

    या भागांमध्ये राहण्याचं आणखी एक कारण शिक्षण हेही असल्याचं ते म्हणतात. इथं धार्मिक शिक्षणासोबतच आधुनिक शिक्षणही उपलब्ध आहे.

    News image

    मी मुस्लीम भाग सोडून इतर कुठे जाऊ इच्छित नाही..

    गृहिणी असलेल्या सुभाना इस्लाम म्हणतात, “माझ्या मुलांनी मुस्लिमेतरांसोबत मिसळलेलं मला आवडेल, पण शिक्षणाच्या बाबतीत या मुस्लीम भागांना सोडून दुसरं कुठं त्यांनी जाऊ नये असं मला वाटतं. माझ्या मुलांनी इस्लामी संस्कृती अंगिकारावी असं मला वाटतं, आणि ते इथंच शक्य आहे.”

    बकरी ईद आणि इतर उत्सवांच्या वेळी या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं

    पस्तीस वर्षीय अंजुम इर्शाद या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आपले अनेक नातेवाईक मुस्लिमेतर भागांमध्ये राहातात, त्यांच्यासोबत शेजारी फारसा संपर्कही ठेवत नाहीत, असं त्या सांगतात. बकरी-ईद आणि इतर उत्सवांच्या वेळी या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, हेही त्या नमूद करतात.

    परंतु, या समस्या असल्या तरीही उद्यानं, रुग्णालयं व शाळांसारख्या सुविधा मुस्लिमेतर भागांमध्ये सहजी उपलब्ध असल्यामुळं आपण तिथं राहाण्याला प्राधान्य देऊ, असं त्या स्पष्ट करतात.

    विशिष्ट हेतूनं हे भाग तयार केले आहेत का?
    News image

    मुस्लीम भागांना मतपेढ्याही मानलं जातं. आपण मतपेढीसाठी इथं स्थायिक झाल्याचं, अनेक नेत्यांनी अनेक निवडणुकांवेळी सांगितलेलं आहे.

    हे भाग खरंच विशिष्ट हेतूनं निर्माण झालेले आहेत का? समाजशास्त्राचे प्राध्यापक इम्तियाज अहमद हा मुद्दा अमान्य करतात.

    ते म्हणतात, “कोणत्याही सरकारनं विशिष्ट हेतूनं मुस्लीम भाग वसवलेले नाहीत, पण वेगवेगळ्या सरकारांनी केलेला भेदभाव हे या वसाहतींमागचं कारण निश्चितपणे आहे. स्वातंत्र्यानंतर सरकारांनी अनेक निवासी वसाहती निर्माण केल्या, पण सर्व समुदायाच्या लोकांनी तिथं राहावं, असं काही धोरण करण्यात आलं नाही.”

    “या निवासी वसाहतींसंबंधीचं छुपं धोरण असं होतं की, तिथं देवळांसाठी आणि काही वेळा गुरुद्वारांसाठीही जागा राखून ठेवलेली असायची, पण मशिदींना अशी जागा मिळत नसे. त्यामुळे आपल्या संस्कृतीनुसार मशिदी असतील आणि इतर सुविधाही उपलब्ध असतील, अशा ठिकाणी मुस्लीम राहायला गेले.”

    या वसाहती सरकारी धोरणामुळं वसवण्यात आलेल्या नाहीत, पण सरकारने त्यांचा वापर मात्र केलेला आहे, आणि काही भेटवस्तू देऊन त्यांना भुलवण्याचे प्रयत्नही होत असतात, अशी टिप्पणी गझाला करतात. परंतु, आता मुस्लिमांनी नागरी अधिकारांचा वापर सुरू केला आहे आणि या भागांची प्रतिमाही बदलली आहे, असं गझाला मानतात.
    पण या मुस्लीम भागांशी जोडली गेलेली नकारात्मक प्रतिमा कशा रितीनं सुधारेल? लोकांच्या प्रयत्नांनी ही प्रतिमा बदलू शकेल, असं गझाला म्हणतात. या अडथळ्यांना आव्हान देण्यासाठी लोक त्यांचे अधिकार वापरू लागतील, तेव्हाच ‘मिनी पाकिस्तान’सारखी त्यांची प्रतिमा इतर लोकांच्या मनातून पुसली जाईल.

    त्याच वेळी, या भागांविषयी दोन प्रकारचे पूर्वग्रह दिसत असल्याचं इम्तियाज नोंदवतात. तेम्हणतात, “पहिला पूर्वग्रह अनुभवाशिवाय तयार होतो. त्यांचा कोणत्याही मुस्लिमाशी परिचय नसतो किंवा ते मुस्लीम वसाहतींमध्ये ते कधी गेलेलेही नसतात, पण त्यांच्या मनात अढीसारखा पूर्वग्रह निर्माण होतो. दुसरा पूर्वग्रह एकमेकांच्या संपर्कात असूनही तयार झालेला असतो.”

    “ईदच्या वेळी मुस्लिमेतरांना शेवयांची खीर दिली जाईल आणि दिवाळीच्या वेळी हिंदू लोक मुस्लिमांसोबत करंजी खातील तेव्हाच या पूर्वग्रहाला तडा जाईल.”

    मुस्लीम या भागांमध्ये का राहतात ?

    News image

    मी सरकारं बदलताना पाहिली आहेत, आंदोलनं पाहिली आहेत, पण त्या भागांमधल्या लोकांची मनोवृत्ती बदलणार नाही

    अर्शलान

    राष्ट्रीय राजधानी प्रदेश अर्थात नॅशनल कॅपिटल रीजनमध्ये (एनसीआर) येणाऱ्या नोएडामध्ये प्रवेश केल्यावर गगनचुंबी इमारतींनी भरलेलं सिमेंटचं जंगल दिसतं. यातील काही इमारतींमध्ये कार्यालयं आहेत, तर बहुतांश इमारती निवासी स्वरूपाच्या आहेत.

    ग्रेटर नोएडा वेस्ट परिसरातील एका निवासी संकुलामध्ये मी प्रवेश केला, तेव्हा मला माझ्याविषयीचा संपूर्ण तपशील नोंदवावा लागला : ‘मी कोण आहे?’, ‘मला कुणाच्या घरी जायचं आहे?’ आणि ‘मी तिथं का जातोय?’ इत्यादी.

    या ९०० सदनिकांच्या संकुलात शंभराहून अधिक मुस्लीम कुटुंबं राहातात. यातील अनेक कुटुंबं आधी काही मुस्लीम वसाहतींमध्ये राहात होती.

    एका ई-कॉमर्स कंपनीसाठी ‘ग्राहक सेवा’ विभागाचे प्रमुख म्हणून काम करणारे अर्शलान गौहर (२८ वर्षं) मूळचे वाराणसीचे आहेत. त्यांचं शिक्षण दिल्ली विद्यापीठात झालं आणि सहा वर्षं ते दिल्लीतील झाकीरनगर या मुस्लीमबहुल भागामध्ये राहात होते. पाच महिन्यांपूर्वीच ते या संकुलात राहायला आले.

    त्यांनी मुस्लीम भाग का सोडला? असा प्रश्न विचारल्यावर अर्शलान म्हणाले की, सहा वर्षांच्या तिथल्या वास्तव्यात त्यांना पायाभूत सुविधांमध्ये काहीही सुधारणा झाल्याचं दिसलं नव्हतं.

    “मी सरकारं बदलताना पाहिली आहेत, आंदोलनं पाहिली आहेत, पण त्या भागांमधल्या लोकांची मनोवृत्ती बदलणार नाही. वाराणसीहून येतानाची माझी मनोवृत्ती इथून पुढंही माझ्यासोबत असावी असं मला वाटत नाही. मला चांगला मुस्लीम बनायचं नाहीये, मला नवीन मुस्लीम बनायचंय, माझ्या मुलांना नवीन भवितव्य लाभावं असं मला वाटतं. आणि हे त्या अरुंद गल्ल्यांमध्ये शक्य नाही,” असं अर्शलान म्हणतात.

    मोहम्मद हसनैन

    मोहम्मद हसनैन

    ‘नोएडा एक्सटेन्शन’ भागात राहाणाऱ्या मोहम्मद हसनैन (४१ वर्षं) यांचं मतही असंच आहे. त्यांच्या संकुलामध्ये हजारो सदनिका आहेत,पण तिथं राहणाऱ्या मुस्लीम कुटुंबांची यादी केवळ एका पानात मावेल. तिथं दीडशे मुस्लीम कुटुंबं राहातात.

    निवासी संकुलांमध्ये इस्लामी वातावरण असतं का?

    निर्यात उद्योगामध्ये सल्लागार म्हणून काम करणारे हसनैन यांनी सुमारे २० वर्षं विविध मुस्लीम वसाहतींमध्ये घालवलेली आहेत.

    या वसाहतींमध्ये मुलांना लिहिण्या-वाचण्यासाठी आणि खेळण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसतात, त्यामुळे मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी मुस्लीम वसाहती सोडण्याचा निर्णय घेतल्याचं ते सांगतात.

    सोसायटीत मशिदीची मागणी का केली जात नाही ?

    मशीद व दिनी तालीम यांच्या उपलब्धतेमुळे आपण मुस्लीम वसाहतींमध्ये राहात असल्याचं काही लोक सांगतात. अशा वेळी निवासी संकुलांमध्ये राहाणाऱ्या मुस्लीम कुटुंबांना हे लाभ कसे मिळतात? यावर निगारीश अन्वर (३८ वर्षं) म्हणतात की, तिथंही मुस्लीम वातावरण असतं, कारण इथले लोक काही दुसऱ्या जगातून आलेले नसतात; फक्त इथं हे वातावरण अख्ख्या संकुलात नाही, तर घरांमधून सापडतं.

    उत्सव साजरे करण्यासंदर्भात हसनैन म्हणाले की, इथून एक किलोमीटर अंतरावर शाहबेरी इथं एक मशीद आहे, सर्व मुस्लीम तिथं एक येऊन नमाज पढतात.

    संकुलात मशीद उभारण्याचा प्रयत्न का होत नाही? असं विचारलं असता निगारीश म्हणाले, “जेवणात चवीपुरतं मीठ घातलं जातं तितपतच प्रमाणात मुस्लीम कुटुंबं या संकुलांमध्ये असतात, त्यामुळं स्वतंत्र मशीद उभारण्याची काय गरज आहे? बहुतांश लोक हिंदू असतात, त्यामुळं इथं मंदिर असतं.”
    मशिदी व मुघलाई खाद्यपदार्थ ठेवणाऱ्या हॉटेलांची उणीव भासते, असं हसनैन म्हणतात. तरीही संकुलाच्या आसपास असलेल्या मशिदींचा आणि हॉटेलांमध्ये आम्ही जातो, असं त्यांनी सांगितलं.

    आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी दडपून ही मुस्लीम कुटुंबं या संकुलांमध्ये राहायला आली आहेत का?

    प्रा. इम्तियाज अहमद

    प्रा. इम्तियाज अहमद

    "शेवटी, जगण्यात कुर्मा-बिर्याणीच्या पलीकडं बरंच काही असतं", असं समाजशास्त्रज्ञ इम्तियाज अहमद सांगतात. “या लोकांच्या मनात सुरक्षेविषयीची शंका असतेच, पण हिंदू असो वा मुस्लीम, आजच्या पिढीमध्ये पूर्वग्रहाची पातळी अतिशय कमी आहे. त्यामुळे लोक स्वतःच्या सोयीचा विचार करतात. त्यांना प्रशस्त रुंद रस्ते, स्वच्छता, गाडी लावण्यासाठी जागा इत्यादी सुविधा हव्या असतात, आणि हे सगळं संकुलांमध्ये उपलब्ध असतं,” असं इम्तियाजम्हणतात.

    मुस्लिमांना दंगलींची भीती का वाटते?

    News image

    भारतामध्ये दंगलींचा इतिहास आहे आणि ती भीती आजकाल काही वेळा वाढते. भारतीय मुस्लिमांचीही या भीतीपासून सुटका नाही. सदनिकांमध्ये राहाणाऱ्या मुस्लीम कुटुंबांना याविषयी काय वाटतं?

    एका कन्सल्टन्सी कंपनीत काम करणारे नदीम अख्तर खान (४२ वर्षं) म्हणतात की, दंगली कुठंही होऊ शकतात आणि दंगलखोर लोक कुठंही असू शकतात.

    “दंगलखोरांची मानसिकता कुठंही निपजू शकते. नोएडात मी राहतो त्या संकुलामध्ये इतर समुदायांच्या लोकांनाही यातील हानीची जाणीव आहे. असुरक्षितता लोकांनीच निर्माण केलेली असते आणि चोरीमारीच्या घटनाही सर्वत्र घडू शकतात.”

    पदव्युत्तर पदवी घेतलेल्या झेहरा (बदललेलं नाव) एका संमिश्र वस्तीच्या निवासी संकुलात राहाते. ‘सुरक्षा ‘अल्ला’च्या हातात आहे आणि त्याच्याच आश्रयाखाली मी इथं राहते आहे,’ असं तिनं ओळख उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं.

    या संकुलात तिला कोणत्याही स्वरूपाच्या भेदभावाला सामोरं जावं लागलेलं नाही, इथं तो प्रश्नच उद्भवलेला नाही, असंही ती स्पष्ट करते.

    बहुतांश काळ मुस्लीम वसाहतींमध्ये घालवलेल्या निहा इम्तियाज (३२ वर्षं) या नोकरदार महिला आहेत. गेलं दीड वर्षं आपण या मोठ्या संकुलात राहतो आहोत आणि इतर धर्माच्या लोकांनी आपल्याला पाठिंबाच दिला आहे, असं त्या सांगतात.

    निहा म्हणतात, “मुस्लीम मोलकरणींच्या बाबतीत भेदभाव निश्चितपणे होतो, त्यांना कामावर घेतलं जात नाही. पण माझ्याशी इथं सगळे चांगलंच वागले आहेत. कन्यापूजनाच्या वेळी माझ्या मुलींनाही जेवायला बोलावलं जातं. दिवाळी-होळी व इतर उत्सवांच्या वेळी आम्हाला लोक घरी बोलावतात. आम्हीही सगळे उत्सव साजरे करतो. दंगलींबद्दल बोलायचं तर, त्या घडायच्या असतात तेव्हा घडतातच.”

    तसंही, मुस्लीम वसाहतींमध्येही सुरक्षितता नसतेच, तिथंही जाता-येताना खिसा कापला जाऊ शकतो, असं निगारीश म्हणतात.

    या भागांमध्ये राहिल्यानं पूर्वग्रह दूर होतील का?

    News image

    याच संकुलात राहाणाऱ्या रुबिना (बदललेलं नाव) यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं की,चांगली माणसं सर्वत्र असतात आणि केवळ १० टक्के लोक भेदभाव करतात, त्यांचं वागणं सभ्यतेच्या पातळीवरचं नसतं.

    मुस्लिमांना घर मिळणं अवघड जातं, असं नेहमी बोललं जातं. पण हे काही खरं नाही, असं हसनैन म्हणतात. माध्यमांनी खोटेपणा करून हा गैरसमज निर्माण केलेला आहे. आम्ही मुस्लिमेतर भागांमध्ये राहिलो नाही तर या समजाला बळकटीच मिळेल, असं मत ते व्यक्त करतात.

    परंतु, मुस्लिमांना घर मिळण्यात अडचणी येतात हे समाजातलं वास्तव आहे, असं जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सहायक प्राध्यापक गझाला जमील म्हणतात. आजच्या घडीला समाजावर बाजारपेठीय शक्तींचं प्रभुत्व आहे, त्यामुळं घर मिळणं मात्र अधिक सोपं झालं आहे, असं त्या सांगतात.

    “घर विकत घेण्याची क्षमता असलेले मुस्लीम लोक मुस्लिमेतर भागांमध्ये राहातात आणि हा निवडीचा भाग असल्यामुळं त्यांनी तिथं राहाणं योग्यच आहे,” असं त्या म्हणतात.

    अर्शलान म्हणतात की,या संकुलांविषयीच्या पूर्वग्रहांमधून मुस्लिमांनी बाहेर यायला हवं. जन्मल्यापासून इतरांकडून काहीबाही गोष्टी ऐकण्याऐवजी, त्यांनी स्वतःहून हे अनुभव घ्यायला हवेत.

    “त्या हिंदू भागांमध्ये राहायला आम्हाला आवडणार नाही”
    News image

    दीर्घ काळ संमिश्र लोकसंख्या असलेल्या संकुलांमध्ये राहिलेल्या खैरुन्निसा यांचं जीवन पूर्णतः बदलून गेलं आहे. जुने दिवस आठवून त्या भावनिकपणे त्याविषयी सांगतात.

    “ती जागा आम्ही १६ वर्षांपूर्वी सोडली आणि आता पुन्हा कधीच आम्ही तिथं राहणार नाही, यावर विश्वास ठेवणं अवघड जातं. अगदी निराश वाटायला लागतं. तिथली संस्कृतीच वेगळी होती. आम्ही सगळ्या प्रकारचे उत्सव एकत्र साजरे करायचो तिथे,” असं त्या सांगतात.

    सदनिका संस्कृतीविषयी बोलताना त्या म्हणतात, “बालपणापासून आम्ही प्रौढावस्थेत येईपर्यंत कधीही आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत असं आमच्या शेजाऱ्यांनी वाटू दिलं नाही. ईश्वरानं संधी दिली तर आम्हाला पुन्हा त्या जुन्या शेजाऱ्यांसोबत राहायला आवडेल.”

    २८ फेब्रुवारी २००२रोजी दंगलखोरांच्या जमावानं खैरुन्निसा यांच्या घरावर हल्ला केला. आठ सदस्यांच्या आपल्या कुटुंबाला दोन वेळा तशा भीषण अनुभवांमधून जावं लागल्याचं त्या सांगतात.

    माझे मित्रमैत्रिणी किंवा शेजारी यांच्याशिवाय कधी ईद साजरी केल्याचं मला आठवतच नाही

    चांदखेडा इथं गंगाविहार सोसायटीमधल्या एका फ्लॅटमध्ये त्यांचं कुटुंब राहात होतं. दंगलखोर त्यांच्या घरात घुसले होते, त्यावेळी केवळ हिंदू शेजाऱ्यांमुळं त्यांचं कुटुंब वाचलं.

    पंजाबी, मराठी, मल्याळी, तामीळ आणि बंगाली असे उत्तरेपासून दक्षिण भारतापर्यंत विविध लोक त्यांच्या शेजारामध्ये होते. दंगलखोर जमावानं खैरुन्निसा यांचं घर उद्ध्वस्त करून पेटवून दिलं.

    त्या भयंकर घटनेची आठवण सांगताना त्या म्हणतात, “माझे वडील ओएनजीसीमध्ये काम करत होते. त्यामुळं विविध प्रकारच्या लोकांमध्ये राहाण्याची संधी आम्हाला मिळाली. तिथं आम्ही सगळे उत्सव एकत्र साजरे करायचो. माझे मित्रमैत्रिणी किंवा शेजारी यांच्याशिवाय कधी ईद साजरी केल्याचं मला आठवतच नाही, आणि होळीमध्ये मी सहभागी झाले नाही, असंही कधी घडलं नाही.”

    “यामुळंच मला धर्मांमधले आणि समजुतींमधले मतभेद समजत नाहीत. आज आपली मुलं भेदाभेदच शिकतायत. शाळेतल्या पहिल्या दिवसापासून ते या गोष्टी शिकत जातात.”

    निवृत्तीनंतर आपल्या वडिलांनी त्याच परिसरात राहण्याचा निर्णय घेतला, असं खैरुन्निसा सांगतात. मुस्लीमबहुल भागात राहायला जायचा विचारही त्यांच्या मनात आला नव्हता. सुरक्षेच्या दृष्टीनं इथं काही धोका निर्माण होईल, असं त्यांच्या कुटुंबाला कधी वाटलं नव्हतं,पण २००२ या वर्षानं त्यांची मानसिकता बदलून गेली.

    आता पुन्हा जुन्या जागेत राहण्याचा किंवा इतर कोणत्याही संमिश्र संस्कृतीमध्ये राहाण्याचा विचारही त्यांच्या कुटुंबाला शक्य नव्हता. आता मुस्लिमबहुल परिसरातच आपल्याला सुरक्षित राहता येईल, असं कुटुंबीयांना वाटू लागलं, असं खैरुन्निसा म्हणतात.

    दंगलींनंतर एकदा वा दोनदा त्या चांदखेडामधील जुन्या घरी गेल्या, आणि शेजाऱ्यांनी जपून ठेवलेल्या त्यांच्या काही वस्तू घेऊन परतल्या.

    आता खैरुन्निसा मुस्लीमबहुल जुहापुरा भागामध्ये स्थायिक झालेल्या आहेत. “आमच्या जुन्या घराची बाजारातली किंमत १० ते १२ लाख रुपये होती, पण फक्त पाच लाख रुपयांमध्ये आम्हाला ते विकावं लागलं. काही दिवस आम्ही आमच्या नातेवाईकांसोबत राहिलो, त्यानंतर जुहापुरा भागात आम्ही एक घर भाड्यानं घेतलं. माझ्या भावांची लग्नं झाली, त्यांना नोकऱ्या मिळाल्या. आता आमचे दोन फ्लॅट आहेत आणि आम्ही इथं राहातोय.”

    ख़ैरुन्निसा बताती हैं कि उनके जीवन में एक बेहद सुखद बात हुई जिसे वह कभी नहीं भुलाना चाहेंगी और उसे हमेशा संजोकर रखेगीं. वे कहती हैं, “मेरे पुराने पड़ोसियों, बचपन और कॉलेज के दोस्तों के साथ कोई संपर्क नहीं था लेकिन कुछ सालों बाद उन्होंने सोशल मीडिया के माध्यम से मुझसे संपर्क बनाया और वह हमारे जीवन में लौट आए. मैं इन लम्हों को हमेशा अपने पास रखना चाहती हूं.”

    कालांतरानं आपल्या जीवनात एक अतिशय आनंददायी आणि कधीही विसरता न येणारा क्षण आला, असं खैरुन्निसा सांगतात: “माझे जुने शेजारी, लहानपणीचे आणि कॉलेजातले मित्रमैत्रिणी यांच्याशी मधल्या काळात काहीच संपर्क राहिलेला नव्हता. पण नंतर काही वर्षांनी सोशल-मीडियाच्या माध्यमातून त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि ते माझ्या आयुष्यात परत आले. ते आनंददायी क्षण मी कायम माझ्यासोबत जपून ठेवेन.”

    खैरुन्निसा यांच्यासारख्या सर्व दंगलपीडितांचे अनुभव सारखे नसतात. गुलबर्ग सोसायटीमधील इम्तियाज सईद पठाण यांचा दाखला वेगळ्या प्रकारचा आहे. २८ फेब्रुवारीचा तो वादळी दिवस अजूनही त्यांच्या डोळ्यांसमोर ताजा आहे. त्या दिवशी त्यांच्या एकत्र कुटुंबातल्या १० जणांना प्राण गमवावे लागले.

    काँग्रेसजे माजी खासदार एहसान जाफ्री यांच्यासह ५९ जण मृत्युमुखी पडले, तीच ही सोसायटी!

    ‘आम्ही कुणाकडं तक्रार करणार होतो? लहानपणापासून ज्या लोकांना मी बघत आलो, ज्यांच्यासोबत उत्सव साजरे केले, त्यांनीच आमचं घर जाळलं, लुटलं आणि माझ्या नातलगांना मारून टाकलं,’ असं इम्तियाज सांगतात.

    “त्याच ओळखीच्या चेहऱ्यांनी आमच्या सोसायटीवर हल्ला केला. चार तास सर्व बाजूंनी त्यांचा हल्ला सुरू राहिला.”

    संतप्त होत ते म्हणतात, “तिथे आयुष्यात पुन्हा कधीही परतायची माझी इच्छा नाही. तिकडं आमचे बंगले भग्नावशेषात पडलेले आहेत आणि मी इथं मुस्लिमबहुल गोमटीपूर भागात सासू सासऱ्यांच्या कृपेनं एक वनरूम-किचन घर भाड्यानं घेतलंय. हा केवढा दैवदुर्विलास आहे बघा.”

    “माझी दोन्ही मुलं आता किशोरवयीन आहेत, पण तीन खोल्यांच्या माझ्या बंगल्यात जो एकांत मिळत होता तो मी आता त्यांना देऊ शकत नाही,” इम्तियाज बोलत राहातात.

    “आमचं जीवन सुरक्षित नाही, त्यामुळं आम्ही हिंदुबहुल किंवा संमिश्र संस्कृतीच्या परिसरात राहू शकत नाही. आमच्या समुदायातील बांधवांसोबत राहत असतानाच आम्हाला सुरक्षित वाटतं.”

    ०००

    लेखन: मोहम्मद शाहिद (दिल्ली )
    हरेश झाला (अहमदाबाद )
    फोटो : आरजू आलम
    रेखाचित्रं : निकिता देशपांडे
    नकाशा: गगन नर्हे
    शॉर्टहँड निर्मिती : शादाब नाझमी