हिजाज रेल्वे : जगभरातील मुस्लिमांना एकजूट करण्याचं एक स्वप्न, जे अखेर अधुरंच राहिलं...

हिजाज रेल्वे

फोटो स्रोत, AMANDA RUGGERI

जॉर्डनची राजधानी अमान शहरात फिरत असताना धुळीने माखलेल्या रस्त्यांवरुन प्रवास करत असताना कदाचित हिजाज रेल्वे स्टेशन तुमच्या नजरेस पडू शकतं.

तिथं पोहोचवण्यासाठी तुम्हाला शहरातील नागमोडी वळणांनी भरलेल्या रस्त्यांकडे काहीवेळ दुर्लक्ष करावं लागेल.

हे रस्ते तुम्हाला एखाद्या भुलभुलैय्याप्रमाणे भासतील. शहरभर ऐतिहासिक केंद्र, डोंगरं आणि प्राचीन किल्ल्यांच्या आसपास हे रस्ते पसरलेले आहेत.

हिजाज रेल्वे स्टेशनला पोहोचवण्यासाठीचा रस्ता खरं तर फक्त पाच किलोमीटरचाच आहे.

अमानमध्ये असलेल्या वाहतूक कोंडीमुळे या रस्त्यावर प्रचंड गर्दी असते. त्यामुळे प्रवासाला थोडा जास्त वेळ लागू शकतो.

हिजाज रेल्वे

फोटो स्रोत, AMANDA RUGGERI

रेल्वे स्टेशनच्या दगडांनी बनलेल्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच आपण एखाद्या दुसऱ्याच जगात आल्याचं आपल्याला वाटू शकतं. कारण इथं अजूनही वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन आहेत.

पण या रेल्वे मार्गाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील मुस्लिमांना एकत्रित करण्याची अपेक्षा या रेल्वे मार्गाकडून केली जाते.

हिजाज रेल्वे स्टेशनचं बांधकाम 1900 साली उस्मानिया सल्तनतचे (सध्याचं तुर्की) सुलतान अब्दुल हमीद द्वितीय यांच्या आदेशावरून केलं केलं होतं.

मक्का येथे जाण्यासाठीचा प्रवास सोपा आणि सुरक्षित व्हावा, हा याचा उद्देश होता.

रेल्वे मार्गावरील दमिश्क-मदिना सेक्शन

पूर्वीच्या काळी भाविक उंटांवर बसून काही आठवड्यांचा प्रवास करून मक्केला पोहोचत होते. दमिश्क येथून मदिनाला पोहोचण्यासाठी किमान 40 दिवसांचा कालावधी लागायचा.

हिजाज रेल्वे

फोटो स्रोत, AMANDA RUGGERI

रखरखीत वाळवंट आणि डोंगराळ भाग यांच्यामुळे अनेक भाविकांना रस्त्यातच आपल्या प्राणांना मुकावं लागत असे. पण रेल्वे आल्यानंतर हा प्रवास केवळ 5 दिवसांचाच राहिला.

या प्रकल्पाअंतर्गत रेल्वेमार्गाचा दमिश्क ते मदिना टप्पा पूर्ण झाल्यानंतर उत्तरेकडे उस्मानिया सल्तनतची राजधानी कॉन्स्टँटिनोपाल (आजचं इस्तांबूल) आणि दक्षिणेकडे मक्का या ठिकाणांपर्यंत विस्तार करण्याची योजना होती.

पण इस्लाम धर्मासाठी या रेल्वे स्टेशनचं महत्त्व इतक्यातच संपत नाही. त्यावेळी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पैशांची तरतूद ही मुस्लिमांनी केलेलं दान, उस्मानिया सल्तनतची तिजोरी आणि कर यांमधून केली जात होती. त्यामध्ये कोणतीच परकीय गुंतवणूक नव्हती, हे विशेष.

त्यामुळेच आजही या रेल्वेमार्गाला वक्फ म्हणून संबोधण्यात येतं. म्हणजेच एक अशी संपत्ती जी सर्व मुस्लिमांनी एकत्रित येऊन जमा केलेली संपत्ती आहे.

हिजाज रेल्वे

फोटो स्रोत, AMANDA RUGGERI

जॉर्डनमध्ये हिजाज रेल्वेस्थानकाचे महासंचालक असलेले जनरल उज्मा नालशिक म्हणतात, "ही कोणत्याही एका देशाची संपत्ती नाही. ही कोणत्याही एका व्यक्तीचीही संपत्ती नाही. ही जगभरातील सर्व मुस्लिमांची संपत्ती आहे. ही एक मशिदीसारखी आहे. याची विक्रीही होऊ शकणार नाही."

उज्मा नालशिक म्हणतात, "जगभरातील कोणताही मुस्लीम व्यक्ती, मग तो इंडोनेशिया किंवा मलेशियाचा का असेना, यामध्ये माझाही वाटा आहे, असा तो दावा करू शकतो."

सुल्तान अब्दुल हमीद द्वितीय यांच्यासाठी मुस्लीम जगत एकजूट करणं ही केवळ अध्यात्मिक गरज होती, असं नाही, तर त्याचे अनेक व्यावहारिक लाभही त्यांना होते.

हिजाज रेल्वे

फोटो स्रोत, THE TRAVEL SHOW

रेल्वेमार्ग बांधकामाच्या पूर्वी काही दशकं आधी इतर साम्राज्य उस्मानिया सल्तनतपासून दूर झाले होते.

फ्रान्सने ट्युनिशियावर कब्जा केला होता. इंग्रजांनी इजिप्त, रोमानिया, सर्बियावर हल्ला केला. तर मोंटेनेग्रोने स्वातंत्र्य मिळवलं होतं.

ऑटोमन साम्राज्याच्या लोकांना एकभित करून सुल्तान अब्दुल हमीद द्वितीय यांना फक्त मुस्लीमच नव्हे तर आपल्या सल्तनतलाही एकजूट करायचं होतं. पण तसं होऊ शकलं नाही.

1908 मध्ये पहिली रेल्वे दमिश्कवरून मदीनापर्यंत चालवण्यात आली. पण पुढच्याच वर्षी सुल्तान यांची सत्ता गेली.

आज ऑटोमन साम्राज्य एक इतिहास बनला आहे. या मार्गाच्या केंद्रस्थानी असलेला परिसर आता पाच देशांमध्ये विभागला गेला आहे. (तुर्की, सीरिया, जॉर्डन, इजरायल आणि सौदी अरेबिया)

1914 पर्यंत 3 लाख भाविकांना प्रवासाची सुविधा प्राप्त करून देण्यात आल्यानंतरही हिजाज रेल्वेचं महत्त्व अवघ्या दशकभरापर्यंतच राहिला.

प्रथम विश्वयुद्धाच्या काळात तुर्की सैन्यानेही त्याचा वापर केला, पण इंग्रज अधिकारी टी. ई. लॉरेन्स (ज्यांना लॉरेन्स ऑफ अरेबिया उपाधी देण्यात आली) यांनी तसंच इतर अरब बंडखोर सैनिकांनी या मार्गावर हल्ला केला.

युद्धानंतर इंग्रज आणि फ्रेंच सैन्याने भूमध्य सागरात लॅव्हेंटचं क्षेत्र बहाल केलं.

त्यावेळी या रेल्वेमार्गाचा बहुतांश भाग उद्ध्वस्त झाला होता. त्यामुळे तेव्हा मुस्लिमांन एकजूट करणाऱ्या या रेल्वेमार्गाचं अस्तित्व कायम राखणं याला त्यांचं प्रथम प्राधान्य होतं.

हिजाज रेल्वे

फोटो स्रोत, AMANDA RUGGERI

आज मात्र वाफेचे हे रंगीबिरंगी इंजीन ओमानच्या मुख्य रेल्वे स्थानकावर स्तब्ध उभे आहेत.

येथील संग्रहालयात रेल्वेशी संबंधित जुनी तिकीटे, चित्रे, कंदील यांसारख्या विविध वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

20 व्या शतकाच्या सुरुवातीला तयार करण्यात आलेली एक बोगी, शानदार मखमली खुर्च्या आणि सोनेरी दिवे आजही त्या समृद्ध इतिहासाची झलक दाखवतात.

स्कॉलर शेख अली अतंतवी यांनी हा रेल्वे मार्ग बंद झाल्यानंतर लिहिलं होतं, हिजाज रेल्वेची कहाणी संघर्षपूर्ण आपत्ती आहे. एक मार्ग आहे, पण कोणतीच रेल्वे चालवली जात नाही. स्टेशनही आहे पण कोणताच प्रवासी नाही.

पण ही फक्त तुटलेल्या स्वप्नांची आणि चुकांची कहाणी नाही. गेल्या काही वर्षांत याचा काही भाग पुन्हा पूर्ववत करण्यात येत आहे.

इस्रायलने हायफापासून ते बेत श्यानपर्यंत हा रेल्वेमार्ग पुन्हा उभारला आहे.

2011मध्ये येथे ओमानहून दमिश्कपर्यंतही एक रेल्वे चालवण्यात आली. त्यावेळी ती चांगलीच लोकप्रिय झाली होती.

विकेंडला आम्ही सीरियाची यात्रा कशी केली, हे स्थानिक प्रवासी रंगवून रंगवून सांगत होते. जॉर्डनमध्येही या रेल्वेमार्गावरील दोन ठिकाणांवर लोकांची वर्दळ आहे.

इथं केवळ उन्हाळ्याच्या दिवसांत चालवण्यात येणारं वाफेवरचं इंजीन आहे. मुख्यत्वे पर्यटकांसाठी ते चालवण्यात येतं.

हा रेल्वे मार्ग रोम खोऱ्याच्या वाळवंटातून जातो. त्याच ठिकाणी 'लॉरेन्स ऑफ अरेबियां'नी हल्ला केला होता.

याव्यतिरिक्त इथं एक साप्ताहिक रेल्वेही चालवली जाते. संपूर्ण वर्षभर ती ओमानहून अल-जजाहपर्यंत चालवण्यात येते. बहुतांश स्थानिक नागरिक केवळ मनोरंजन म्हणून याचा वापर करतात.

एका शनिवारी सकाळी ओमानच्या हिजाज रेल्वे स्टेशनवर थोडी गर्दी दिसली.

डोक्यावर गडद आणि चकमदार रंगाचा स्कार्फ परिधान केलेल्या महिला हातात खाण्यापिण्याचे डबे, बॅग्ज घेऊन उभ्या होत्या. मुलांच्या हातात फुटबॉल आणि खेळणी होते.

आम्ही ओमानहून अल-जजाहला रेल्वेने जात होतो. या 35 किलोमीटरच्या प्रवासात रेल्वे अरुंद मार्गाने जात असताना केवळ 15 किमी प्रतितास वेगाने चालवली जाते. या संपूर्ण प्रवासाला दोन तासांचा वेळ लागतो.

रेल्वे

फोटो स्रोत, AMANDA RUGGERI

पण खरी मजा या प्रवासातच आहे. स्टेशनवरून रेल्वे बाहेर निघताच मुलांनी आनंदाने कल्ला सुरू केला. ते एकमेकांच्या जागेवर जात, रेल्वेच्या रेलिंगवर लटकताना दिसले.

काही ठिकाणी ही रेल्वे गुळगुळीत डांबरी रस्त्यांच्या बाजूनेही जाते. एके ठिकाणी तर रेल्वे मार्गाच्या बाजूने फळांनी भरलेल्या गाड्याही उभ्या होत्या.

लहान मुलं हातातले प्लास्टीकचे आईस्क्रिमचे कप बाहेर भिरकावत होते. आरडाओरडा ऐकून एका लहान मुलीने आपले दोन्ही हात आपल्या कानांवर धरले.

पण त्यामुळे जास्त काही फरक पडला नाही. रेल्वेत बसलेली मुले जास्तच उत्साहित होती. बहुतांश ओमानचे रहिवासीच त्याठिकाणी होते. आपल्या शहराला एका वेगळ्या पद्धतीने अनुभवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

त्याठिकाणी आम्हाला सीरियन स्थलांतरितांचा एक समूहसुद्धा दिसला. सर्वांना पाहून ते हसत होते.

हिजाज रेल्वे त्या सर्वांसाठी एक रंजक प्रवास होता. त्यामुळेच रेल्वेच्या आत पार्टीसारखंच वातावरण होतं.

महिलांनी आणलेल्या स्पीकरवर जोरदार आवाजात गाणी लावली होती. मी जवळच्या एका बोगीत गेले आणि पाहिलं तर तिथं काही महिला आनंदाने नाचत होत्या. मला पाहून त्या लाजल्या आणि हसू लागल्या.

रेल्वे

फोटो स्रोत, AMANDA RUGGERI

दोन तासांनी अल-जजाह स्थानकावर आम्ही पोहोचलो. सर्वजण आपल्या मार्गाला लागले. जवळच्या एका बागेत खाण्यापिण्याचे डबे बाहेर काढण्यात आले.

स्टेशनच्या मागच्या बाजूला काही तरूण मुलं हुक्का पिऊ लागले. त्यांनी त्याचं साहित्य आपल्यासोबत आणलेलं होतं.

मनोरंजन, पर्यटन आणि मौजमजा

आजकाल या रेल्वे मार्गाचा वापर मुख्यत्वे यासाठीच केला जात आहे. पण अजूनही हिजाज रेल्वेला पूर्वीचं वैभव प्राप्त होईल, ही अपेक्षा आहे.

रेल्वे

फोटो स्रोत, THE TRAVEL SHOW

नालशिक यांच्या मते, या रेल्वेने दररोज 6 लाख प्रवासी जरका ते ओमानचा प्रवास करतात. दोन्ही शहरांना जोडण्यासाठी इतर सोपा पर्याय नसल्यामुळे रेल्वेचा खूप उपयोग होतो.

नालशिक म्हणतात, "लोकांना हिजाज रेल्वेचा इतिहास सांगणं हासुद्धा एक हेतू आहे. अनेकजण इथून ये-जा करतात. पण याठिकाणी एक स्टेशन 110 वर्षांपासून सक्रिय आहे, हे बऱ्याच जणांना माहीत नाही. जॉर्डनच्या पर्यटन नकाशात याचा समावेश व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत."

त्याशिवाय या रेल्वेचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

सौदी अरेबियाने 2015 मध्ये यासंदर्भात विचार करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता.

(जॉर्डनप्रमाणे सौदी अरेबियाने प्रत्यक्ष वाहतुकीसाठी या मार्गाचं लोकार्पण केलं नाही. मात्र तिथं या रेल्वेमार्गाबाबत एक छोटंसं संग्रहालय आहे. ते याचा रेल्वेचा वारसा म्हणूनही उल्लेख करतात.)

अशा स्थितीत ही रेल्वे सीरियावरून प्रवाशांना सौदी अरेबियाला घेऊन जाईल, याची कल्पनाही आपण करू शकतो.

आगामी काळात हिजाज रेल्वेचा वारसा पुन्हा पुनरुज्जिवित केला जावा. याला पूर्वीचं वैभव पुन्हा प्राप्त व्हावं अशी आपण अपेक्षा करू.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)