दृष्ट लागणं म्हणजे नेमकं काय? लोक निळा डोळा का वापरतात?

फोटो स्रोत, Alamy
- Author, कोएन हरजेताई
- Role, बीबीसी फिचर
आपल्याकडे आजी पणजी अशा म्हाताऱ्या बायका आजही मीठ मिरच्यांनी दृष्ट काढतात. कोणाची वाईट नजर लागू नये म्हणून केलेला हा प्रकार तसा अंधश्रद्धेचाच एक भाग असतो. पण आताच्या आधुनिक काळात या वाईट नजरेपासून बचाव व्हावा म्हणून नवनवीन लॉकेट, ब्रासलेट, नजर सुरक्षा कवच यंत्र अशा अनेक जाहिराती आपण पाहतो.
यात एक साधर्म्य दिसतं ते म्हणजे 'डोळा' या आकृतीचं. अमेरिकन मॉडेल जीजी हदीद असो वा किम कार्दशियन या दोघींच्याही गळ्यात तुम्हाला हे डोळ्यांचं लॉकेट दिसतं.
हा डोळा म्हणजे प्राचीन इजिप्तमधील संरक्षण, शाही शक्ती आणि चांगल्या आरोग्याचं प्रतीक म्हणून धारण केला जातो. हा डोळा असतो घोड्याचा. याला 'शैतानी आँख' असंही म्हटलं जातं.
आता हा निळ्या रंगाचा डोळा फक्त इस्तंबूलच्या बाजारपेठेतच दिसेल का? तर नाही, अगदी विमानांपासून ते कॉमिक बुकपर्यंत सगळीकडे हा डोळा तुम्हाला दिसतो.
वाईट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी हा निळा डोळा धारण करण्याचा ट्रेंड जवळपास दहा वर्षांपूर्वी सुरू झाला. किंबहुना फॅशन जगतातले असे अनेक फोटो समोर आले.
अमेरिकन मॉडेल किम कार्दशियनने हॉलीवूडच्या अनेक कार्यक्रमात या निळ्या डोळ्यांचं ब्रेसलेट आणि हेडपीस घातलेले फोटो काढलेत. जीजी हदीदने 2017 मध्ये आय लव्ह नावाचा शू ब्रँड लाँच करताना हा ट्रेंड पुढं चालवला होता.

फोटो स्रोत, Getty Images
आता सेलिब्रिटींच्या ट्रेंडला फॉलो करायचं म्हणून ऑनलाईन जगतात असे ब्रेसलेट, नेकलेस आणि रिंग विकण्याचा व्यापार सुरू झाला. आणि या डोळ्याने मानवी कल्पनाशक्तीवर आपली पकड आणखीनच घट्ट केली.
दृष्ट हा नेमका प्रकार काय आहे?
तर वाईट नजर किंवा दृष्ट यांचा आधार समजण्यासाठी पहिल्यांदा तावीज आणि वाईट नजर यातला फरक समजून घेतला पाहिजे.
हे निळ्या डोळ्याचं तावीज असतं त्याला 'शैतानी आँख' म्हणजेच सैतानाचा डोळा असं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात हा डोळा नजर सुरक्षा कवच म्हणून वापरतात. असं म्हणतात की, एखाद्या शत्रूची किंवा वाईट माणसाची नजर आपल्या चांगल्या गोष्टींवर पडते आणि आपण त्याला 'नजर' लागली किंवा 'दृष्ट' लागली असं म्हणतो.

फोटो स्रोत, METROPOLITAN MUSEUM OF ART
हे निळ्या डोळ्यांचं तावीज हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात आहे. दृष्ट लागणे ही संकल्पनाचं इतकी जुनी आहे की याचं मूळ शोधणं तसं पाहायला गेलं तर अवघड काम आहे.
तसं तर वाईट नजर आणि त्याचा परिणाम ही फार अशी क्लिष्ट संकल्पना नाहीये. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालंच तर जेव्हा एखादा व्यक्ती मोठं यश मिळवते, नाव मिळवते तेव्हा त्याच्या आजूबाजूला त्याचा मत्सर करणारे लोक सुद्धा असतात. आणि ही ईर्ष्या, मत्सर आपल्या प्रगतीसाठी हानिकारक गोष्ट असते.
एथिओपिका नावाची एक प्राचीन ग्रीक रोमँटिक कादंबरी आहे. यात हेलियोडोरस ऑफ एमेसा मध्ये ही संकल्पना स्पष्ट करताना म्हटलंय की, 'जेव्हा आपली एखादी चांगली गोष्ट एखादा माणूस ईर्ष्येच्या नजरेने पाहतो तेव्हा तो आपल्या अवतीभवतीचं वातावरण दूषित करून टाकतो.'

फोटो स्रोत, Alamy
वाईट नजर किंवा मग दृष्ट लागणं हा प्रकार फक्त ईजिप्शियन संस्कृतीतचं नाही तर जगातील वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये सापडतो.
अनेक पिढ्यांपर्यंत हा विश्वास जपण्यात आल्याचं दिसतं. आजवरचा सर्वांत वाईट आणि जुना संदर्भ फ्रेडरिक थॉमस एल्वर्थीच्या 'द इव्हिल आय' या कथेत सापडतो.
अंधश्रद्धेसंबंधीच्या या प्राचीन कथा आहेत. एलवर्थी यांनी जगातील विविध संस्कृतीची उदाहरण शोधून काढली आहेत. त्यांनी ग्रीकांच्या हृदयभेदक नजरेपासून ते आयरिश लोक कथांमध्ये घोड्यांच्या वशीकरणापर्यंतच्या अनेक काल्पनिक कथा लिहिल्या आहेत.
वाईट नजरेच्या संकल्पना प्रत्येक संस्कृतीत इतक्या खोलवर अंतर्भूत झाल्या आहेत की बायबल असो को कुराणसह, बऱ्याच धार्मिक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो.
डोळ्याच्या बदल्यात डोळा
वाईट नजरेवर विश्वास ठेवणं म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखंच आहे. पण यावर अनेक तत्त्ववेत्यांनी विश्वास ठेवलाय ही विशेष गोष्ट.
यातलं सर्वांत प्रसिद्ध उदाहरण म्हणजे ग्रीक तत्त्ववेत्ता प्लुटार्क याचं. त्याने आपल्या सिम्पोसिक्स या पुस्तकात वाईट नजरेचं वैज्ञानिक स्पष्टीकरण देत म्हटलंय की, "मानवी डोळ्यात ऊर्जाचे अदृश्य किरण उत्सर्जित करण्याची शक्ती असते आणि ही शक्ती लहान मुलं, जनावरांचे जीव घेण्यासाठी खूप ताकदवान ठरू शकते."

फोटो स्रोत, Alamy
प्लुटार्कने उदाहरण देत म्हटलंय की, काळ्या समुद्राच्या दक्षिणेकडील काही टोळ्या अशा वाईट नजरेचा वापर करतात. तसेच निळे डोळे असलेल्या लोकांमध्ये संमोहनाची क्षमता असते.
काही लोकांकडे खूप तीक्ष्ण अशी नजर असते आणि ज्यामुळे हानी होण्याची शक्यता असते हा सिद्धांत तसा सामान्यचं आहे. पण वाईट नजरेचा संबंध फक्त वाईट विचारांशीच असेल असं काही नाही.
काही संस्कृतींमध्ये याला एक प्रकारचं ओझं मानलं जातं. म्हणजे आपण वाईट विचार करत नसलो तरी आपल्या नजरेतून वाईटच घडतं.
उदाहरण म्हणून एलवर्थीने पोलंडमधील एक प्राचीन लोककथा सांगितली आहे. तो म्हणतो की, एक माणसाची नजर एवढी खराब आणि वाईट होती की, आपल्या प्रियजनांवर आपली वाईट नजर पडू नये म्हणून त्याने स्वतःचे डोळे फोडून घेतले होते.

फोटो स्रोत, METROPOLITAN MUSEUM OF ART
आणि अशा प्रकारचा समज खूप व्यापक स्तरावर पसरलेला होता.
पण प्राचीन सभ्यतेने यावरही एक उपाय शोधून काढला. यात डोळ्याच्या बदल्यात डोळा अशी पद्धत सुरू झाली. म्हणजे वाईट नजरेपासून वाचण्यासाठी सैतानाचा डोळा धारण करण्याची पद्धत सुरू झाली आणि आजही सर्रास लोक याचा वापर करतात.
हे तावीज वापरणे कधीपासून सुरू झालं?
इस्तंबूलमधील कला इतिहासाचे प्राध्यापक डॉ. नेशे यिलदारन बीबीसी कल्चरशी बोलताना सांगतात की, 'वाईट नजरेपासून वाचण्यासाठी अशाप्रकारचं तावीज वापरण्याची पद्धत इसवीसन पूर्व 3,300 इतकी जुनी आहे.'
प्राचीन मेसोपोटेमियामधील सर्वांत जुन्या शहरांपैकी एक असलेल्या तल बराक या शहरात उत्खनन सुरू असताना हे तावीज सापडलं. तिथं डोळे काढून बनवलेल्या मूर्त्यी सापडल्या. आज हे शहर सिरीयात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तल बराक मध्ये ज्या प्राचीन अलाबास्टर मुर्त्या सापडल्या त्यावर आज जसे निळे डोळे आपल्याला दिसतात तसे निळे डोळे नाहीयेत. इसवी सन पूर्व 1500 पर्यंत तर याचं स्वरूप निश्चित नव्हतं. मग ही उत्क्रांतीची प्रक्रिया कशी घडली?
निळ्या रंगाचा संबंध येतो तो इजिप्तच्या मातीमुळे. इजिप्तच्या चिकणमातीमध्ये ऑक्साईडचे प्रमाण जास्त आहे. जेव्हा ही माती भाजली जाते तेव्हा कॉपर आणि कोबाल्टमुळे याला निळा रंग प्राप्त होतो.
या डोळ्यांना हेरगिरीचं प्रतीक सुद्धा मानण्यात आलंय. इजिप्तमधील उत्खननादरम्यान अनेक निळ्या-डोळ्यांचे होरस पेंडंट सापडले. याचा हवाला देत यिलदारन सांगतात की, या निळ्या होरस पेंडंटना आज जे तावीज आहेत त्याचं प्रभावशाली मूळ रूप मानता येईल.

फोटो स्रोत, Alamy
यिलदरान यांच्या मते, सुरुवातीच्या ज्या तुर्की टोळ्या होत्या त्या निळ्या रंगाची 'तंजेरी' (टेंगरी) आकाश देवता मानायचे. त्यामुळे त्यांच्यात निळ्या रंगाबद्दल उत्सुकता होती. त्यामुळे त्यांनी कोबाल्ट आणि कॉपर निवडलं असावं.
या भागात निळ्या डोळ्यांची माळ मोठ्या प्रमाणावर वापरली जायची. फोनीशियन, असीरियन, ग्रीक, रोमन आणि उस्मानी लोकांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता.
या डोळ्यांचा नेमका अर्थ..
निळ्या डोळ्याबद्दल सर्वांत आकर्षक गोष्ट म्हणजे यात हजारो वर्षांच्या कालावधीत सातत्याने बदल होत गेले.
आपली जहाज पाण्यातून प्रवास करताना सुरक्षित राहावी म्हणून इजिप्शियन आणि एट्रस्कॅन्स लोक जहाजांवर हे निळे डोळे लावायचे. आणि आजही त्यांच्या विमानांवर या डोळ्यांची चित्र दिसतात.
तुर्कीमध्ये नवजात मुलांचा वाईट नजरेपासून बचाव व्हावा म्हणून त्यांना निळ्या डोळ्यांचं तावीज घातलं जातं.

फोटो स्रोत, KINO
पण आधुनिक जगात याचा इतिहास नव्याने लिहिला जातोय असं म्हटलं तर कोणालाही आश्चर्य वाटायला नको.
या निळ्या डोळ्यांचा इतिहास तसा खूपच जुना आहे. किंबहुना यांच्याशी अनेकांची संस्कृती जोडली गेलीय. त्यामुळे या संस्कृतीचा वारसा असलेले लोक याचा वापर करताना दिसतात.
जसं की किम कार्दशियन आणि जिजी हदीद या दोघीही अशाच एका संस्कृतीशी निगडित आहेत त्यात या निळ्या डोळ्यांचं महत्त्व सांगितलंय.

फोटो स्रोत, Alamy
यिलदरान यांना ही समस्या आहे असं वाटत नाही. त्यांच्यामते, हा निळा डोळा एका मोठ्या भौगोलिक क्षेत्रात पसरलाय. विविध संस्कृतीमध्ये याची विविध रूप आपल्याला दिसतील.
अशा सांस्कृतिक प्रतिकांमध्ये भौगोलिक किंवा धार्मिक सीमा ओलांडण्याची क्षमता असते. त्यामुळे फॅशन स्टेटमेंटच्या पलीकडे जाऊन ही याला एक नवीन अर्थ प्राप्त होतो.
हा डोळा लोकांचा विश्वास त्यांची अवधारणा यांकडे अंगुलीनिर्देश करतो. तुमचा यावर खरंच विश्वास असेल तर तुम्ही ते तावीज त्याची माहिती घेऊन परिधान करायला हवं नाहीतर ते तुमच्यासाठी दुर्दैवीही ठरू शकतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








