'फिमेल ऑरगॅझम'चा पहिल्यांदा अभ्यास करणारी राजकन्या : मारी बोनापार्ट

मारी बोनापार्ट

फोटो स्रोत, Getty Images

काहींच्या मते महिलांच्या लैंगिकतेविषयी बोलणाऱ्या अगदी सुरुवातीच्या काही लोकांपैकी ती एक होती, इतरांच्या मते ती फक्त उच्चभ्रू वर्तुळात वावरणारी श्रीमंत महिला होती.

पण काही का असेना मारी बोनापार्ट (1882 - 1962) यांची इतिहासाने दखल घेतलीच. फ्रेंच सम्राट नेपोलियन बोनापार्ट यांची ही चुलत नात आणि आधीचे ड्यूक ऑफ एडिंबरा - प्रिन्स फिलिप यांची ही आत्या.

मारी बोनापार्ट स्वतः एक राजकन्या. राजघराण्यात जन्म झालेल्या या महिलेला मनोविश्लेषण आणि महिलांची लैंगिकता - ऑरगॅझम यामध्ये विशेष रस होता. या विषयांचा त्यांनी सखोल अभ्यास केला.

पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मारी बोनापार्ट या एक 'फ्री वुमन' - खुल्या विचारांच्या होत्या.

त्यांचं चरित्र लिहिणाऱ्यांच्या मते त्यांचं व्यक्तिमत्त्वं इतकं अनोखं होतं की, त्या राजघराण्यात जितक्या उठून दिसत तितक्याच विज्ञान वर्तुळातही आपली छाप उमटवत. महिलांच्या लैंगिक सुखाविषयीच्या प्रश्नांची उत्तरं शोधणं त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं.

राजघराण्यात जन्म

पॅरिसमधल्या प्रसिद्ध आणि श्रीमंत कुटुंबात मारी बोनापार्ट यांचा जन्म झाला.

मारी - फेलिक्स (ने ब्लाँ) आणि फ्रान्सचे राजकुमार रोलाँ नेपोलियन बोनापार्ट यांची ही कन्या.

फ्रँकॉईज ब्लाँ हे त्यांचे आजोबा. माँटे कार्लो हा प्रसिद्ध कॅसिनो त्यांनी सुरू केला होता आणि प्रचंड संपत्ती मिळवणारे उद्योजक म्हणून ते ओळखले जात.

मारी बोनापार्ट यांचं पोर्ट्रेट

फोटो स्रोत, Getty Images

पण मारीच्या आयुष्यात कायमच दुःखद घटना घडत राहिल्या.

जन्माच्या वेळीच त्यांच्या जवळपास जीवावर बेतलं होतं. त्या बचावल्या, पण महिनाभरातच त्यांच्या आईचं निधन झालं.

मारीचं बालपण तसं एकटेपणात आणि अडचणीतच गेलं.

आजूबाजूला इतर लहान मुलं नसल्याने त्या कायम वडिलांच्या सोबत असत. त्यांचे वडील मानववंश शास्त्रज्ञ (Anthropologist) आणि भूगोलतज्ज्ञ (Geographer) होते.

आजीची - वडिलांच्या आईची लहानग्या मारीला प्रचंड भीती वाटे.

सुरुवातीपासूनच मारी अतिशय चिकित्सक. विज्ञान, साहित्य, लेखन...अगदी स्वतःच्या शरीराबद्दलही त्यांना प्रचंड कुतुहल होतं.

एकदिवस त्यांची देखभाल करणाऱ्या 'मिमो' या महिलेला मारी मास्टरबेट म्हणजे हस्तमैथुन करताना आढळल्या.

"हे पाप आहे! अतिशय चुकीची गोष्ट आहे! तू असं केलंस तर मरशील!" त्या महिलेने मारींना सांगितल्याची नोंद मारींनी त्यांच्या 1952मध्ये लिहिलेल्या डायरीत केलेली आहे.

द थिअरी ऑफ फिमेल सेक्शुआलिटी ऑफ मारी बोनापार्ट : फँटसी अँड बायोलॉजी या लेखात लेखिका नेली थॉम्पसन लिहीतात, "लैंगिक सुख मिळवलं तर मरण येईल, या मिमोच्या इशाऱ्यामुळे घाबरून वयाच्या आठव्या वा नव्या वर्षी मास्टरबेशन करणं सोडून दिल्याचा दावा बोनापार्ट करतात."

पण मारी लहान असल्यापासून बंडखोर वृत्तीच्या होत्या. महिलांनी दुसऱ्याचं ऐकणं, दबून राहणं त्यांना पटत नसे.

कुमारवयात असताना त्यांनी इंग्लिश आणि जर्मन भाषांचा अभ्यास सुरू केला. पण अचानक त्यांच्या आजीने आणि वडीलांनी त्यांना पुढच्या परीक्षा द्यायला मनाई केली.

"कुटुंबावर चिखलफेक करण्यासाठी बोनापार्टचे राजकीय शत्रू परीक्षेमध्ये अफरातफर करण्याची शक्यता असल्याचा दावा तिने (आजीने) आणि रोलाँने केला," मारींच्या डायरीतला उल्लेख थॉम्प्सन सांगतात.

मारी बोनापार्ट

फोटो स्रोत, Getty Images

थॉम्प्सन यांच्यानुसार यावर मारी म्हणाल्या, "धिक्कार असो माझ्या नावाचा, पदाचा आणि माझ्या श्रीमंतीचा! विशेषतः माझ्या लिंगाचा! कारण मी जर मुलगा असते, तर त्यांनी मला प्रयत्न करण्यापासून थांबवलं नसतं."

20 वर्षांच्या होण्याआधीच मारी बोनापार्ट यांचं एका विवाहित पुरुषासोबत अफेअर झालं. तो त्यांच्या वडिलांच्या मदनीसांपैकी एक होता.

या सगळ्याची परिणीती स्कँडल, ब्लॅकमेल आणि त्यांच्या बदनामीत झाली.

यानंतर मारींच्या वडिलांनी मारीची अशा पुरुषाशी ओळख करून द्यायचं ठरवलं, जो त्यांना जावई म्हणून पसंत होता. ग्रीस आणि डेन्मार्कचे राजकुमार - प्रिन्स जॉर्ज (1869-1957) ते मारीपेक्षा 13 वर्षं मोठे होते.

मारी या लग्नासाठी तयार झाल्या आणि 12 डिसेंबर 1907ला अथेन्समध्ये त्यांचं लग्न झालं.

या जोडप्याला दोन मुलं झाली - राजकुमारी युजिनी आणि राजकुमार पीटर. पण या दोघांचा संसार मात्र सुखी नव्हता.

त्यांचं लग्न 50 वर्षं टिकलं खरं, पण आपल्या नवऱ्याचं खरं भावनिक नातं त्याच्या काकांशी - डेन्मार्कचे राजकुमार वाल्डेमर यांच्याशी असल्याचं मारी यांच्या लक्षात आलं, तर मारी यांनी एकीकडे स्वतःच्या प्रेमिकांना जवळ केलं तर दुसऱीकडे संसारातल्या या अडचणींतून वेगळं होण्यासाठी अभ्सासाचा आसरा घेतला.

स्री लैंगिकतेचा अभ्यास

लैंगिकता आणि त्यातून स्त्रीला मिळणारं सुख याविषयी मारींना कुतुहल होतं. त्याविषयी त्यांना जाणून घ्यायचं होतं.

1942मध्ये त्यांनी ए. ई. नर्जानी या टोपणनावाने याविषयीचा एक लेख प्रसिद्ध केला. नाव होतं, "महिलांना ऑरगॅझम न येण्यामागची पडण्यामागची शारीरिक कारणं" (Notes on the anatomical causes of frigidity in women)

मारी बोनापार्ट आणि त्यांचे पती ग्रीस आणि डेन्मार्कचे राजकुमार जॉर्ज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मारी बोनापार्ट आणि त्यांचे पती ग्रीस आणि डेन्मार्कचे राजकुमार जॉर्ज

"लैंगिक संबंधांदरम्यान संभोग करताना त्यांना कधीही ऑरगॅझम आला नसल्याने त्या व्यथित होत्या," अमेरिकेतल्या जॉर्जियामधल्या एमरी विद्यापीठातले बिहेवियरल न्यूरोएन्डोक्रिनॉलॉजी विभागाचे प्राध्यापक किम वॉलेन सांगतात.

"महिलांना फक्त थेट योनी उत्तेजनामुळेच ऑरगॅझम येऊ शकतो, यावर त्यांचा विश्वास नव्हता," प्राध्यापक वॉलन यांनी बीबीसीला सांगितलं.

जर संभोग करताना महिलांना ऑरगॅझम येऊ शकत नसेल, तर यामागे शरीर रचनेतली अडचण असणार असा मारी यांचा विचार होता.

यामागचा एक सिद्धांत त्यांनी मांडला - स्त्रीच्या क्लिटरीज (Clitoris) आणि योनीमार्ग यातलं अंतर जितकं कमी, तितका तिला संभोगादरम्यान ऑरगॅजम येण्याची शक्यता जास्त.

या हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी 1920च्या दशकात पॅरिसमधल्या 240 पेक्षा जास्त महिलांची शरीराची मापं घेतली.

त्यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, "ही आकडेवारी पद्धतशीररीत्या गोळा करण्यात आली नाही. एखादी महिला जेव्हा तिच्या डॉक्टरकडे तपासणीसाठी जाई, तेव्हा त्यांच्यामार्फत माहिती घेण्यात आली," डॉ. एलिझाबेथ लॉईड यांच्यासोबत मारी बोनापार्ट यांच्या कामाचा अभ्यास करणारे प्राध्यापक वॉलन सांगतात.

या तज्ज्ञांच्या मते, "क्लिटरीज आणि योनी मार्गाचे मुख यातल्या अंतरानुसार या माहितीची त्यांनी तीन गटांत विभागणी केली, पण हे नेमकं कसं ठरवलं हे मात्र नमूद करण्यात आलेलं नाही."

"बोनापार्ट यांनी मांडलेला विचार अनोखा आहे. त्यांच्यामते प्रत्येक स्त्री ही वेगळी असते, म्हणून संभोगादरम्यान प्रत्येकीला येणारा अनुभव आणि प्रतिक्रिया वेगवेगळी असते," डॉ. लॉईड यांनी बीबीसीला सांगितलं.

पण मारी यांच्या या सिद्धांतामध्ये, "सगळा भर हा महिलेच्या शरीररचनेवर आहे. यात वैचारिक प्रगल्भता, त्या महिलेच्या आयुष्यातले टप्पे यांचा विचार करण्यात आलेला नाही," तज्ज्ञ सांगतात.

मारी बोनापार्ट या सिग्मंड फ्रॉईड यांच्या शिष्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मारी बोनापार्ट या सिग्मंड फ्रॉईड यांच्या शिष्या होत्या.

यावरून मारी बोनापार्ट यांनी एक निष्कर्ष काढला. जर महिलांनी क्लिटरीज आणि योनीमधलं अंतर कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली, तर त्यांना संभोगाच्या वेळी ऑरगॅजम येईल.

पण दुर्दैवाने हे चूक होतं.

"य़ा शस्त्रक्रिया दुर्घटना ठरल्या. काही महिलांच्या तर सगळ्या संवेदनाच गेल्या. पण मारी बोनापार्ट यांचा त्यांच्या निष्कर्षांवर ठाम विश्वास होता. त्यांनी स्वतः ही शस्त्रक्रिया करून घेतली, पण काही उपयोग झाला नाही," प्राध्यापक वॉलन सांगतात.

एकदा नाही, तर तब्बल तीन वेळा त्यांनी ही शस्त्रक्रिया करून घेतली.

"क्लिटरीजजवळच्या नसा जास्त कापल्या गेल्या, तर तुमच्या संवेदना वाढण्याऐवजी कमी होतीस कारण तुम्ही अतिशय महत्त्वाच्या अशा नसा कापत आहात," डॉ. लॉर्ईड समजावून सांगतात. इंडियाना युनिव्हर्सिटीच्या जीवशास्त्र विभागात ते प्राध्यापक आहेत.

"संभोगादरम्यान स्त्रीला ऑरगॅजम यावा यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचं त्यांना वाटत होतं," डॉ. लॉईड सांगतात.

सिग्मंड फ्रॉईडसोबतची मैत्री

इतकं होऊनही मारी बोनापार्ट यांनी ध्यास सोडला नाही. लैंगिक आयुष्यातल्या अडचणींवरची उत्तरं शोधणं त्यांनी सुरूच ठेवलं.

1925च्या सुमारास पॅरिसच्या वैद्यकीय वर्तुळात एका मनोवैद्यानिकाची अतिशय चर्चा होती. मारी बोनापार्ट त्यांना भेटायला व्हिएन्नाला गेल्या. त्यांचं नाव - सिग्मंड फ्रॉईड.

"फ्राईडच्या रूपात त्यांना अशी व्यक्ती भेटली जिची त्यांना अतिशय गरज होती," थॉम्प्सन त्यांच्या लेखात म्हणतात.

मारी बोनापार्ट आणि सिग्मंड फ्रॉईड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मारी बोनापार्ट या सिग्मंड फ्रॉईड यांच्या पेशंट, शिष्य आणि मित्र होत्या.

मारी बोनापार्ट फ्रॉईड यांच्या पेशंट होत्या. पण लवकरच त्यांची मैत्री झाली. मारीचा मनोविज्ञानातला रस वाढत गेल्यावर त्या फ्रॉईड यांच्या शिष्य झाल्या.

"फ्रॉईडसोबत मनोविज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या फ्रान्समधल्या सुरुवातीच्या महिलांपैकी त्या एक होत्या," स्वित्झर्लंडमधल्या लॉसेन विद्यपीठामध्ये मानसशास्त्राच्या प्राध्यापक असणारे रेमी अमॉरॉक्स यांनी बीबीसीला सांगितलं.

"फ्रॉईडना त्यांची सोबत आवडायची कारण त्या ना धोकादायक महिला होत्या ना शिक्षण तज्ज्ञ होत्या. त्या दोघांची भेट झाली तेव्हा फ्रॉईड 70 वर्षांचे होते. आणि मारी त्यांच्याशी वाद घालणारी एक अतिशय विलक्षण, हुशार आणि श्रीमंत महिला होती," प्रा. अमॉरॉक्स पुढे सांगतात.

पुढे पॅरिसच्या मनोविश्लेषकांच्या वर्तुळात मारी बोनापार्ट यांचं नाव आदराने घेतलं जाऊ लागलं आणि राजकुमारी म्हणून त्यांनी केलेल्या डायरीतल्या नोंदींमध्ये त्यांच्या काही रुग्णांचे उल्लेखही आहेत.

योगायोगाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रियावर नाझी जर्मनीने ताबा मिळवल्यानंतर त्यांनी फ्रॉईड यांचा जीव वाचवला.

आपली संपत्ती आणि ओळख याचा वापर करत मारी यांनी फ्रॉईड आणि त्यांच्या कुटुंबाला व्हिएन्नामधून निसटून लंडनला जायला मदत केली. इथेच फ्रॉईड यांचं निधन झालं.

मारी बोनापार्ट यांनी सिग्मंड फ्रॉईड यांना नाझींच्या कचाट्यातून निसटायला मदत केली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मारी बोनापार्ट यांनी सिग्मंड फ्रॉईड यांना नाझींच्या कचाट्यातून निसटायला मदत केली.

"जर्मनीने ताबा मिळवल्यामुळे वयाच्या 82व्या वर्षी मी माझं व्हिएन्नातलं घर सोडून इंग्लंडमध्ये आलो. माझ्या आयुष्याचा शेवट स्वातंत्र्यात होईल, अशी मला आशा आहे," 1938मध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत फ्रॉईड यांनी सांगितलं होतं.

मुक्त विचारांची महिला

व्यावसायिक प्रगल्भता दाखवत मारी बोनापार्ट यांनी स्वतःच मांडलेल्या स्रीच्या लैंगिक सुखाविषयीच्या सिद्धांतांवर सवाल केले.

"मारी बोनापार्ट यांनी स्वतःच्याच मूळ संकल्पना पूर्णपणे फेटाळून लावल्या. 1950मध्ये त्यांनी 'स्त्रियांची लैंगिकता' (Female Sexuality) नावाचं नवीन पुस्तक प्रसिद्ध केलं. यामध्ये त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या विचारांपासून फारकत घेतली," प्राध्यापक वॉलन सांगतात.

"या सगळ्याशी स्त्रीच्या शरीररचनेचा काहीही संबंध नसून सगळं मानसिक असल्याचं त्या सांगतात. त्या वेळी त्यांनी जवळपास 25 वर्षं मनोविश्लेषणाचं काम केलं होतं," प्रा. वॉलन सांगतात.

पण स्वतःच्याच विचारांशी फारकत घेऊनही त्यांचा सुरुवातीचा अभ्यास उल्लेखनीय असल्याचं प्राध्यापक वॉलन सांगतात. बोनापार्ट या क्रांतिकारी महिला असल्याचं ते मानतात.

डॉ. लॉईड म्हणतात, "मारी बोनापार्ट या विलक्षण होत्या. त्या माझ्या आदर्शांपैकी एक आहेत. स्त्रीच्या लैंगिकतेविषयी बोलायचं झालं तर स्वतःच्या शरीराविषयी नाखूष असूनही त्या ज्ञान आणि समज यांबाबत त्या काळाच्या पुढे होत्या."

मारी बोनापार्ट 1950

फोटो स्रोत, Getty Images

प्राध्यापक आमॉरॉक्स यांनी पॅरिसच्या ऐतिहासिक संदर्भ विभागामध्ये मारी बोनापार्ट यांच्या कामाविषयीची माहिती गोळा करण्याचं काम काही वर्षं केलेलं आहे. मारी बोनापार्ट यांचे त्या काळातल्या साहित्यिक, राजकीय आणि राजघराण्यातल्या सगळ्यांशीच चांगले संबंध असल्याचं अमॉरॉक्स सांगतात. 20व्या शतकाच्या पूर्वार्धातल्या जवळपास सगळ्या प्रसिद्ध व्यक्तींना मारी बोनापार्ट ओळखत होत्या.

"महिलांच्या चळवळीतलं हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्वं आहे," ते सांगतात.

"आपला महिलांच्या लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टीकोन पुरुषप्रधान होता असा निष्कर्ष शेवटी मारी बोनापार्ट यांनी काढला. कारण ऑरगॅझम फक्त एकाच पद्धतीद्वारे य़ेऊ शकतो, असं त्यांनी मानलं होतं," अमॉरॉक्स सांगतात.

"पण त्याच वेळी त्या अतिशय खुल्या विचाऱ्यांच्या होत्या. विविध पैलू असणारी ही एक अशी महिला होती जिच्यात फ्रॉईडना आव्हान देण्यची हिंमत होती."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)