कोरोना सिरो सर्व्हे : शरीरात अँटीबॉडी सापडल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होत नाही का?

फोटो स्रोत, Sopa images
- Author, भूमिका राय
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 29 लाखांवर पोहोचली आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत जगभरात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पण त्याचबरोबर भारतात उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाणही जास्त आहे.
राजधानी दिल्लीत करण्यात आलेल्या दुसऱ्या सिरो सर्व्हेचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी हा अहवाल गुरुवारी (20 ऑगस्ट) जाहीर केला.
या अहवालानुसार, दिल्लीतील 29 टक्के नागरिकांच्या शरीरात कोरोना व्हायसच्या अँटीबॉडी सापडल्या आहेत. म्हणजेच या लोकांचा कोरोना व्हायरसची लागण होऊन गेली. त्यांच्या शरीरात याविरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडी विकसित झाल्या आहेत.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

सत्येंद्र जैन यांनी एक पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती सांगितली. 1 ते 7 ऑगस्टदरम्यान सिरो सर्व्हेसाठी नमुने गोळा करण्यात आले होते. यामध्ये 29.1 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी आढळून आल्या आहेत.

फोटो स्रोत, EPA/JAGADEESH NV
हा दुसरा सिरो सर्व्हे अहवाल आहे. पहिला सिरो सर्व्हे जुलै महिन्यात झाला होता. यामध्ये जवळपास एक-चतुर्थांश लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. या सर्व्हेसाठी 21387 नमुने गोळा करण्यात आले होते, ज्यात 23.48 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी विकसित झाल्याचं आढळून आलं.
पण दुसऱ्या सर्व्हेमध्ये फक्त 15 हजार लोकांचेच नमुने गोळा करण्यात आले. दुसऱ्या सर्व्हेमध्ये 32.2 टक्के महिला तर 28 टक्के पुरुषांमध्ये विकसित अँटीबॉडी सापडल्या. याचा अर्थ दोन कोटी लोकसंख्येच्या दिल्लीत सुमारे 60 लाख लोक कोरोना संसर्ग होऊन बरे झालेले असू शकतात.
पण, दिल्लीत अद्याप 'हर्ड इम्युनिटी' विकसित झालेली नाही.
एखाद्या ठिकाणी 40 ते 70 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार होतात, त्यावेळी तिथं 'हर्ड इम्युनिटी' विकसित होते, असं सत्येंद्र जैन यांनी सांगितलं.
सिरो सर्व्हेनुसार मुंबई आणि पुण्यातसुद्धा 40 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी आढळून आल्या आहेत.
अँटीबॉडी विकसित झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होत नाही?
या प्रश्नाचं अजूनही स्पष्ट उत्तर मिळू शकलेलं नाही.
ICMR मध्ये संसर्गजन्य रोग विभागात कार्यरत असलेल्या डॉ. निवेदिता गुप्ता सांगतात, "दुसऱ्यांदा लागण होऊ शकते किंवा नाही हे स्पष्ट झालेलं नसलं तरी एकदा संसर्ग झालेल्या लोकांनी प्रतिकारशक्ती विकसित केली आहे, हे आपल्याला कळून येतं."

फोटो स्रोत, Reuters
त्यांच्या मते, "सिरो सर्व्हेच्या माध्यमातून फक्त संसर्ग झाला होता आणि रुग्ण बरा झाला एवढंच कळू शकतं."
हरजीत सिंह भट्टी हे प्रोग्रेसिव्ह मेडिकोज अँड सायंटिस्ट फोरम (PMSF) चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या मते, आपण संसर्ग म्हणजे काय हे सर्वप्रथम समजून घ्यायला हवं.
भट्टी सांगतात, "शरीराच्या आतल्या भागात एखादा परकीय जीव प्रवेश करून अवयवांना नुकसान पोहोचवण्यास सुरुवात करतो, त्याला आपण संसर्ग झाला असं म्हणतो. अशा स्थितीत शरीराने त्याचा प्रतिकार करणारी यंत्रणा विकसित केल्यास तो परकीय जीव शरीराला नुकसान पोहोचवू शकत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
भट्टी यांच्या मते, "ज्या लोकांच्या शरीरात अँटीबॉडी विकसित झाली आहे. त्यांना पुन्हा संसर्ग होणारच नाही. कारण त्यांच्या शरीरात त्या व्हायरसला रोखणारी यंत्रणा आधीपासूनच तयार झालेली आहे."
जगभरात 180 देशांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे. ताज्या माहितीनुसार, हा व्हायरस वेगाने आपलं स्वरूप बदलत चालला आहे. यालाच 'म्युटेशन' म्हटलं जातं.
कोरोनाने स्वतःचं स्वरूप बदलल्यानंतर आधीच्या अँटीबॉडी आपलं संरक्षण करू शकतील का, हा प्रश्नही उपस्थित होतो.
या प्रश्नाच्या उत्तरादाखल डॉ. निवेदिता यांनी म्हटलं, "अजूनपर्यंत तरी कोरोना व्हायरस किती प्रमाणात म्युटेट होत आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही."
डॉ. हरजीत यांच्या मते, "कोव्हिड-19 एक नवीन विषाणू आहे. या व्हायरसबाबत अजूनसुद्धा जास्त माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे पुन्हा संसर्ग होऊ शकतो किंवा नाही याबाबत संशोधन सुरू आहे."
"इन्फ्लुएन्झाची साखळी दरवर्षी बदलते आणि दरवर्षी नव्या साखळीची लागण लोकांना होते. त्यामुळे यावरची लस वर्षातून एकदाच प्रभावी ठरते. पण कोरोनामधील बदल हा चारवेळाच झालेला आहे. हा विषाणू जनावरांमधून माणसांमध्ये आलेला आहे. यातलं म्युटेशन इतकं जास्तसुद्धा नाही.
डॉ. टी. जेकब एक विषाणूतज्ज्ञ असून ते वेल्लोरच्या ख्रिस्टियन मेडीकल कॉलेजमधील निवृत्त प्राध्यापक आहेत.
पहिला सिरो सर्व्हे समोर आल्यानंतर त्यांनी याबाबत प्रतिक्रिया बीबीसीला दिली होती. 'हा सर्व्हे खूशखबर मानता येणार नसला तरी दिलासादायक नक्की आहे,' असं ते त्यावेळी म्हणाले होते.
"व्हायरसबाबत जी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे तो काम करत असल्याचं या अहवालावरून दिसून येतं. व्हायरसच्या वागणुकीत अद्याप कोणताच मोठा बदल झालेला नसल्याचं या अहवालावरून दिसून येतं," असं ते म्हणाले होते.
कोरोनाचा पीक येऊन गेला का?
दिल्लीत कोरोना व्हायरसचा एक पीक येऊन गेला आहे, असं एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं होतं.
हा सर्व्हे नेमका कधी करण्यात आला, हेसुद्धा महत्त्वाचं आहे. दिल्लीत पहिला सर्व्हे 27 जून ते 10 जुलैदरम्यान करण्यात आला होता. तर तिसरा सर्व्हे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येईल.
अँटीबॉडी विकसित झालेले लोक प्लाझ्मा दान करू शकतात का?
तज्ज्ञांच्या मते असं सांगणं, अद्याप घाईचं ठरेल.
सर्व्हेचा निष्कर्ष म्हणजे लोक प्लाझ्मा दान करू शकतात, याचा पुरावा नाही. प्लाझ्मा दान करण्यासाठी वेगळी चाचणी करणं गरजेचं असतं.
साधारणपणे, ठळकपणे लक्षणं दिसून आलेले रुग्णच प्लाझ्मा दान करू शकतात.
डॉ. हरजीत सिंह सांगतात, "प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात एक स्मरणशक्ती असते. व्हायसरविरुद्ध कसं लढायचं हे शरीराला माहीत असतं. पण प्रत्येक शरीराची रचना वेगळी आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या पेशी दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातही तेवढ्याच क्षमतेने काम करेल किंवा नाही, याबाबत शंका आहे.
सिरोलॉजिकल टेस्ट म्हणजे काय?
सिरोलॉजिकल टेस्ट हा एक रक्त तपासणीचा प्रकार आहे. या चाचणीत शरीरातील रक्तात असलेल्या अँटीबॉडीची ओळख पटवली जाते.
रक्तातून लाल रक्तपेशींना काढून टाकल्यास एक पिवळसर पदार्थ शिल्लक राहतो. याला 'सीरम' असं संबोधलं जातं.
या सीरममध्ये असलेल्या अँटीबॉडीवरून वेगवेगळे आजार तपासण्यासाठी विविध प्रकारचे सिरोलॉजिकल टेस्ट केल्या जातात.
सिरोलॉजिकल टेस्टमध्ये प्रतिकारयंत्रणेमार्फत तयार झालेल्या प्रथिनांचा अभ्यास करण्यात येतो. कोरोना रोखण्यासाठी या चाचणीची मदत घेतली जाऊ शकते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








