मी महिला जननेंद्रियाचा ज्ञानकोश तयार केला कारण...

पुसीपीडियानुसार, खूप कमी महिलांना त्यांच्या शरीराचे भाग कसे काम करतात, हे माहिती असतं.

फोटो स्रोत, María Conejo/BBC

    • Author, स्टेफानिया गॉझर
    • Role, बीबीसी न्यूज मुंडो

सर्वच महिलांचं स्खलन होतं का?

2016चं वर्षं संपता संपता पोस्ट करण्यात आलेल्या या प्रश्नामुळे अमेरिकन पत्रकार झोई मेंडेलसन आणि तिच्या तेव्हाच्या बॉयफ्रेंडमध्ये वाद झाला. त्यांना या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालं नाही तेव्हा त्यांनी आसरा घेतला गुगलचा.

"पण जी माहिती आली ती अगदी बाष्कळ आणि फालतू होती. म्हणून मी मेडिकल जर्नल्स तपासायचं ठरवलं," झोईने बीबीसीला सांगितलं.

पण त्याचाही फायदा झाला नाही. "मला त्यातलं काहीही कळलं नाही. ते शरीराच्या कोणत्या अवयवांचा उल्लेख करत होते, ते भाग कुठे होते आणि त्यांचं काम काय होतं, काहीच कळलं नाही."

यातून झोईने दोन निष्कर्ष काढले, "मला असं वाटलं की माझ्यासाठी उपलब्ध असणारी सगळी माहिती एकतर अपुरी होती किंवा न पटणारी होती. आणि लक्षात आलेली दुसरी गोष्ट म्हणजे मला माझ्या स्वतःच्या शरीराबद्दल काहीच माहीत नाही."

दोन वर्षांनंतर झोईने तिच्या मारिया कोनेयो या इलस्ट्रेटर असणाऱ्या मेक्सिकन मैत्रिणीसोबत पुसीपीडियाची सुरुवात केली. स्त्री शरीराबद्दलची खात्रीशीर माहिती विस्तृतपणे देणारा हा फ्री ऑनलाईन एनसायक्लोपीडिया आहे.

आणि या प्रोजेक्टच्या केंद्रस्थानी आहे 'पुसी'. हा शब्द म्हणजे महिलांच्या जननेंद्रियासाठीचा इंग्लिश स्लँग असला तरी ही वेबसाईट तयार करणाऱ्यांना या शब्दाचा मोठ्या हेतूने वापर करत स्त्री शरीराच्या इतर भागांचीही माहिती द्यायची आहे.

पण खरंच अशा प्रोजेक्टची गरज आहे का? कारण आपण आता 21व्या शतकात आहोत, #MeToo सारखी चळवळ झालेली आहे, जगभरातल्या शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देण्यात येतं आणि बहुतेक लोकांच्या हातामध्ये इंटरनेट उपलब्ध आहे.

जुलैमध्ये इतर काहीजणांच्या मदतीने झोई आणि मारियाने पुसीपीडिया लाँच केला.

फोटो स्रोत, María Conejo/BBC

फोटो कॅप्शन, जुलैमध्ये इतर काहीजणांच्या मदतीने झोई आणि मारियाने पुसीपीडिया लाँच केला.

मारिया दोन वाक्यांत याचं उत्तर देते. 'माहिती ही शक्ती आहे' आणि 'लाज धोकादायक ठरू शकते.'

"जेंडर इक्वालिटीबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा आपल्याला खूप प्रगती झाल्यासारखं वाटतं. पण आपण अजूनही असा जगात राहतो जिथे भरपूर मोठ्या प्रमाणावर लिंगभेद केला जातो आणि आपलं शरीर आणि लैंगिकता याबद्दल लाज बाळगली जाते. जर समाज याबाबत अधिक खुला होत असला तरीही हे अंतर्गत मुद्दे अजूनही आहेतच," झोई म्हणते.

मारिया याला दुजोरा देते. "आपण असं गृहित धरतो की आपल्याला स्वतःबद्दल आणि स्वतःच्या शरीराबद्दल सगळं माहीत आहे. म्हणूनच आपण काहीच गोष्टी विचारणं टाळतो. कारण आपल्याला असं वाटतं की आतापर्यंत हे आपल्याला माहिती असायला हवं होतं. यामुळे स्वतःवरच मर्यादा घातल्या जातात," तिने मेक्सिकोहून बीबीसीला सांगितलं.

जुलैमध्ये इतर काहीजणांच्या मदतीने झोई आणि मारियाने पुसीपीडिया लाँच केला.

योनीच स्वच्छ कशी करायची इथपासून ते कीटकनाशकांचा प्रजननक्षमतेवर काय परिणाम होऊ शकतो, यापर्यंतची सगळी माहिती या वेबसाईटवर आहे.

फोटो स्रोत, María Conejo/BBC

फोटो कॅप्शन, योनीच स्वच्छ कशी करायची इथपासून ते कीटकनाशकांचा प्रजननक्षमतेवर काय परिणाम होऊ शकतो, यापर्यंतची सगळी माहिती या वेबसाईटवर आहे.

या वेबसाईटवर इंग्लिश आणि स्पॅनिशमध्ये माहिती आहे. जुलैमध्ये सुरू झाल्यापासून 1,30,000 जणांनी या वेबसाईटला भेट दिली आहे.

योनीच स्वच्छ कशी करायची इथपासून ते कीटकनाशकांचा प्रजननक्षमतेवर काय परिणाम होऊ शकतो, यापर्यंतची सगळी माहिती या वेबसाईटवर आहे.

शिवाय पुसीपीडियावरच्या लेखांमध्ये जिथून माहिती घेण्यात आली आहे त्या मूळ स्रोतांची लिंकही आहे.

मग 'पीनसपीडिया'चं काय?

योग्य स्रोतांकडून खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी झोई आणि मारिया भरपूर कष्ट घेत असल्या तरी अजूनही काही प्रश्नांची उत्तरं मिळवणं कठीण जातं.

का? कारण स्त्री जननेंद्रियांचा प्रजननक्षमता सोडल्यास फारसा अभ्यास करण्यात आलेला नाही. त्यामानाने पुरुषांच्या शरीररचनेचा आणि त्याच्या कार्यांवर बराच अभ्यास झाल्याचं त्या सांगतात.

मारिया कोनेयो
फोटो कॅप्शन, मारिया कोनेयो

"मी अजूनही माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करत आहे. बरीच माहिती अजूनही उपलब्ध नाही आणि स्त्री शरीररचनेतल्या अनेक गोष्टींविषयी संशोधकांचं एकमत नाही. म्हणजे स्त्री जननेंद्रिय नेमक्या कोणत्या टिश्यूजनी तयार झालेली आहेत हे देखील आपल्याला अजून माहित नाही."

म्हणूनच 'पीनसपीडिया' गरजेचा आहे असं त्यांना वाटत नाही.

"जर तुम्ही कोणत्याही मेडिकल जर्नल किंवा आरोग्यविषयक पुस्तकात 'पीनस' असं शोधलंत, तर तुम्हाला अनेक संदर्भ मिळतील. पण जर तुम्ही 'वजायना'असं शोधलंत तर फारसे संदर्भ मिळणार नाहीत," झोई म्हणते.

पण भरपूर माहिती उपलब्ध असणं म्हणजे भरपूर ज्ञान असणं नाही, हे मारिया अधोरेखित करते.

झोई मेंडेलसन
फोटो कॅप्शन, झोई मेंडेलसन

"मला वाटतं पुरुषांना तर आणखी कमी माहिती असते. पीनसबाबत भरपूर माहिती उपलब्ध जरी असली तरी पुरुषी अहंकारामुळे ते स्वतःच्या शरीराविषयी अधिक माहिती करून घेत नाहीत. आणि स्त्रियांच्या शरीराबद्दलची तर त्याहून कमी," ती म्हणते.

पण आता महिला चौकस होत आहेत. इतक्या की जेव्हा मारिया आणि झोईने पुसीपीडिया लाँच करण्यासाठी क्राऊडफंडिंग कॅम्पेन सुरू केली तेव्हा तीन दिवसांच्या आत त्यांनी त्यांचं उद्दिष्टं गाठलं आणि 22,000 अमेरिकन डॉलरचा निधी जमा झाला. ही रक्कम त्यांच्या उद्दिष्टाच्या तिप्पट आहे.

या पैशांमुळे मारिया आणि झोईला सुरुवात करता आली. "पण त्याआधी दोन वर्षं फुकट काम करावं लागलं," पण आता लेखकांना देण्यासाठी आणि वेबसाईट अपडेट करण्यासाठी या पुसीपीडियामधून पैसे मिळणं गरजेचं आहे.

या वेबसाईटवरचा एखादा लेख आता लोकांना स्पॉन्सर करता येईल. शिवाय त्यांनी मारियाची इलस्ट्रेशन्स असणाऱ्या वस्तू विकायलाही सुरुवात केली आहे.

"योग्य पद्धतीने स्त्री शरीराचं चित्रण करण्याचा प्रयत्न मी गेली पाच वर्षं करतेय. आपल्या लैंगिकतेचा शोध घेणारं स्त्री शरीर मला दाखवायचं आहे, नग्न शरीराकडे पाहण्याचा दृष्टीकोन मला बदलायचाय. मी आतापर्यंत जे काही शिकले त्याचं एकीकरण मला पुसीपीडियामुळे करता आलं."

झोईला आता या प्रोजेक्टचा विस्तार करत यामध्ये ट्रान्सजेंडर सेक्शुअल हेल्थचाही समावेश करायचाय.

दरम्यान तिला अशी आशा आहे की लवकरच तिला तो लेख या वेबसाईटवर लावता येईल, ज्यात तिच्या मूळ प्रश्नाचं उत्तर असेल - सर्वच महिलांचं स्खलन होतं का?

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)