या महिलांनी शरीरावरचे केस वाढवल्यानंतर त्यांना काहींनी राक्षस म्हटलं - #Januhairy

फोटो स्रोत, Laura Jackson
- Author, मिलिसंट कूक
- Role, बीबीसी न्यूज
तुम्ही 'नो शेव्ह नोव्हेंबर' किंवा 'नो शॉवर डिसेंबर' या ट्रेंडविषयी ऐकलं असेल. नो शेव्ह नोव्हेंबरमध्ये मुलं महिनाभर दाढी करत नाहीत. तर नो शॉवर डिसेंबरमध्ये शॉवरचं घेतलं जात नाही.
अगदी त्याचप्रमाणे एक ट्रेंड नुकताच येऊन गेला. त्याचं नाव 'जानुहेअरी'. म्हणजे काही मुलींनी असा निर्णय घेतला की जानेवारीमध्ये शरीरावरचे केस काढायचे नाहीत. स्वतःच्या शरीराला आहे तसं स्वीकारणं त्याच बरोबर आत्मविश्वासाने सामोरं जाणं यासाठी या महिलांचं कौतुक होत आहे तर काही लोक त्यांच्यावर टीका करत आहेत.
गलिच्छपणाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न या मुली करत आहेत असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. या ट्रेंडमध्ये भाग घेतलेल्या चार मुलींना काय अनुभव आला याबाबत बीबीसीने त्यांना विचारलं. त्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दात.
'हा किती किळसवाणा प्रकार आहे असं लोक म्हणत' - सोनिया ठाकुर- देसाई
शरीरावर केस वाढवण्याबाबत मी थोडा संकोच बाळगत होते.
मला आठवतं जेव्हा जानेवारीमध्ये हा ट्रेंड सुरू झाला तेव्हा सर्व जण यावर यथेच्छ तोंडसुख घेत होते. हा प्रकार किती किळसवाणा आहे असं ते लोक म्हणत.
मी या ट्रेंडमध्ये मी सहभागी झाले होते पण स्वतःचे असे फोटो सोशल मीडियावर टाकायची मला भीती वाटायची.

फोटो स्रोत, Sonia Thakurdesai
शरीरावरच्या केसांबाबत मी फार भिडस्त आहे. मला वाटत होतं की जर मी हे फोटो टाकले तर लोक मला घाणेरडी म्हणतील, अशी भीती मला वाटत होती.
सुरुवातीला मला थोडा संकोच वाटला पण एक गोष्ट सांगाविशी वाटते की या मोहिमेमुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे.
या मोहिमेमुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेत सहभागी झाल्यानंतर महिलांना काय अनुभव आले, त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं या भावना त्या शेअर करत आहेत. या मोहिमेमुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. माझं शरीर जसं आहे तसं मी स्वीकारलं आहे.
कुणाला काय वाटतं याची मी पर्वा करत नाही - सबाइन फिशर
माझ्या जवळच्या लोकांनीच मला घाणेरडं म्हटलं आणि हे अनैसर्गिक आहे असंही म्हटलं. त्यामुळे मला त्रास झाला. पण कुणाला काय वाटतं याची मी पर्वा करत नाही.
लोकांना आवडावं म्हणून मी हे करत नाही तर मला आवडतं म्हणून मी हे करत आहे.

फोटो स्रोत, Sabine Fisher
चेहऱ्यावर केस आले तरी मी महिलाच आहे - क्रिस्टिल मर्चंद
मी कॅनडातील ट्रान्सजेंडर आहे. लिंग बदलाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रथमच शरीरावर केस वाढवण्याचा निर्णय घेतला.
लोक मला काय काय म्हणू लागले. भर लोकांत माझी टवाळी करू लागले. काही लोक टक लावून पाहायचे तर काही जण माझ्याकडे पाहत देखील नसत.
जेव्हा माझ्या चेहऱ्यावर केस आहेत हे लोकांनी पाहिलं तेव्हा मला शिवीगाळ होऊ लागली. त्यामुळे जानेवरी महिन्याच्या अर्ध्यातच मला माझ्या चेहऱ्यावरील केस काढावे लागले.

फोटो स्रोत, Crystal Marchand
पण हे नकारात्मक अनुभव आले असले तरी मला असं वाटतं की या प्रक्रियेतून मी खूप काही शिकले.
चेहऱ्यावर केस असले तरी मी स्त्री आहे. मला माझ्या चेहऱ्यावर केस येत असल्यापासून त्रास होत होता. आता ती शंका राहिली नाही.
लोक माझ्याविषयी काय विचार करत आहेत यापेक्षा मला अधिक महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे आत्मविश्वास वाटणं आणि आपण कोण आहोत याची जाणीव होणं. मी स्वतःवर प्रेम करते आणि पूर्णपणे व्यक्त होऊ शकते असं मला वाटतं.
मोहीम सुरू केली तरी कुणी?
21 वर्षीय लॉरा जॅकसन या विद्यार्थिनीनेच ही मोहीम सुरू केली. या मुलीचं ध्येय स्पष्ट होतं. महिलांचा आत्मविश्वास वाढावा आणि पैसा उभा करून तो चॅरिटीमध्ये द्यावा असं तिला वाटत होतं.
"एका महिलेला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोममुळे चेहऱ्यावर केस आले होते. तिच्याकडे लोक अशा नजरेने पाहत की जणू ती काही दैत्य आहे. त्या महिलेशी मी बोलले तेव्हा तिनं मला धन्यवाद दिलं. ती म्हणाली मी दैत्य आहे असं तुला वाटलं नाही म्हणून तुझे मी आभार मानते. मला तर विश्वासच बसला नाही की कुणी स्वतःला असं समजू शकते. तिचं वाक्य ऐकून माझे डोळे पाणावले," असं ती म्हणाली.

फोटो स्रोत, Laura Jackson
"या मोहिमेमुळे मुलींचा आत्मविश्वास परत येत आहे. एका 13 वर्षांच्या मुलीनं माझ्याशी संपर्क साधला आणि म्हणाली माझ्या काखेत आणि माझ्या पायांवर मोठ्या प्रमाणात केस आहेत. त्यामुळे माझ्यात आत्मविश्वासाची उणीव होती. मग ही मोहीम सुरू झाली. आता मला वाटतं की जगात मी एकटीच अशी महिला नाही. माझा या पिढीवर विश्वास आहे. ही पिढी नक्कीच मानवतेचं भलं करू शकते आणि या विश्वाचं कल्याण करू शकते अशी भावना माझ्यात निर्माण झाली आहे. इतकंच नाही तर महिला या इतर महिलांना आपली गोष्ट सांगून प्रेरणा देत आहेत. हे असं होणं खूप आवश्यक होतं आणि मी काही करू शकले याचा मला आनंद आहे," असं ती म्हणाली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








