आरोग्य : लवकर वयात येण्यामुळे असे उद्भवतात आरोग्याचे धोके

- Author, सिंडी लामोथ
- Role, बीबीसी फ्युचर प्रतिनिधी
मुली हल्ली आधीपेक्षा लवकर वयात येऊ लागल्या आहेत. पण त्यांच्यात होणाऱ्या या बदलाला समाजाकडून जो प्रतिसाद मिळतो, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर कायमस्वरूपी परिणाम होतो.
मला अजूनही आठवतो तो दिवस, जेव्हा एक अनोळखी माणूस माझ्या उघड्या पायांकडे डोळे विस्फारून मूर्खासारखा पाहात होता. ते उन्हाळ्याचे दिवस होते आणि मी पूर्ण 11 वर्षांचीही नव्हते.
मी आईबरोबर शेजारच्या एका लहान दुकानात गेले होते. आम्ही बिल करण्यासाठी रांगेत उभे होतो तेव्हा हा माणूस आमच्या मागे उभा होता, आणि मला वरपासून खालपर्यंत न्याहाळून बघत होता. त्याचं वय जवळपास माझ्या वडिलांइतकंच होते, पण त्याच्या नजर काही चांगली नव्हती.
मी लहान होते, माझी शारीरिक वाढ लवकर झाली होती आणि मी वयापेक्षा मोठी दिसत होते. त्यावेळी माझ्या शरीरातील वेगवान बदलांशी जुळवून घेताना स्वतःशीच माझा संघर्ष सुरू होता. माझ्यापेक्षा मोठी माणसं माझ्याकडे टक लावून बघत असताना मला भीती वाटायची आणि असुरक्षितही वाटायचं.
मी चालत असताना अनोळखी माणसं मला ऐकू जाईल अशा प्रकारे ओठांचे चंबू करून घाणेरडे आवाज काढायचे. तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढायची आणि घशाला कोरड पडायची.
आजही मी डोळे बंद केले तर मला अजूनही जवळून जाणाऱ्या वाहनांमधून ते अश्लील आवाज ऐकू येतात. मला पुन्हा एकदा मी 10 वर्षांची झाल्यासारखी वाटतं, सार्वजनिक ठिकाणी शॉर्ट्स घालायची भीती वाटायला लागली होती.

फोटो स्रोत, BBC/Alamy
इतर प्रकारच्या लैंगिक हिंसेच्या तुलनेत, सतत केले जाणारे नकोसे शेरे आणि टक लावून पाहणे, हे किरकोळ वाटू शकतं. तरीही संशोधनांमधून असं दिसून आलं आहे की, अशा प्रसंगांमुळे लहान मुलीवर त्याचा ताण येऊन त्यांना आयुष्यभर मानसिक समस्या उद्भवण्याचा धोका असतो.
#MeToo सारख्या चळवळींनी कामाच्या ठिकाणी वारंवार होणाऱ्या लैंगिक छळावर भर दिलाय. मात्र जगभरात मुली वयात येण्याचं वय घटत चाललं आहे आणि त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे लहान मुला-मुलींच्या लैंगिक छळाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. पण तरी त्याबद्दल फारशी चर्चा होत नाही.
स्तनांचा विकास प्रमाण मानून, 1970 मध्ये अमेरिकेची मुलगी वयात येण्याचं सरासरी वय जवळपास 12 वर्षं इतकं होतं. ते आता 2011 मध्ये नऊ वर्षं इतके कमी झालं आहे.
एका संशोधनात असं आढळलं आहे की, जवळपास 18% गोऱ्या मुली, 43% कृष्णवर्णीय बिगर-हिस्पॅनिक मुली आणि 31% हिस्पॅनिक मुली वयाच्या नवव्या वर्षी वयात आल्या होत्या. संशोधक अजूनही त्याच्या कारणांचे विश्लेषण करत आहेत.

फोटो स्रोत, BBC/Alamy
यामुळे सहा ते आठ इतक्या लहान वयांच्या मुलांचा लैंगिक छळ होण्याचा धोका वाढतो. लवकर वयात येणाऱ्या मुलींचा त्यांच्या मैत्रिणींच्या तुलनेत जास्त लैंगिक छळ होतो, मग त्या आधी लैंगिक कृतींमध्ये सहभागी झालेल्या असोत किंवा नसोत.
संशोधकांच्या मते, यामागे त्यांना लक्ष्य केलं जातं, हे एक कारण असावं. आणि त्यांचे सवंगडी तसेच मोठी माणसेसुद्धा त्यांच्याकडे पाहतात.
ज्या मुले आणि मुली अशा दोघांचीही, लवकर वाढ होते, त्यांचे वर्गमित्र त्यांचा लैंगिक छळ करण्याची शक्यता अधिक असते.
बीबीसीच्या अलीकडच्या शोधात असं आढळून आलं आहे की, UKमध्ये अगदी सहा वर्षांच्या मुलांचा ट्रेनमध्ये किंवा ट्रेन स्टेशनवर लैंगिक छळ झाला आहे.

फोटो स्रोत, BBC/Alamy
अमेरिकेच्या ओरेगॉनमध्ये राहणाऱ्या 26 वर्षांच्या केरी यॉर्गेनला ती 11 वर्षांची असतानाचा एक प्रसंग आठवतो. ती कुटुंबाबरोबर एका वॉटर पार्कला गेली होती. तेव्हा एका वयस्कर माणसाने तिचा जवळच्या गरम पाण्याच्या टबपर्यंत पाठलाग केला आणि तिच्या मागे हात ठेवले.
"मी वॉटर पार्कमध्ये इकडेतिकडे पळत होते आणि तो माझा पाठलाग करत होता आणि मला गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करत होता," ती सांगते.
तू कोणत्या शाळेत जाते आणि किती वर्षांची आहेस, असे प्रश्नही त्याने तिला विचारले. "त्याला कसं उत्तर द्यावं, ते मला कळत नव्हतं कारण आपला समाज मुलींना चांगलंच वागायला शिकवतो."
यॉर्गेनला सांगते की तिला आधी असं वाटायचं की "बाई होणं काही असं असेल तर ते माझ्या वाट्याला यायला नको."
वयात येण्यामुळे सर्व किशोरवयीन मुलांसमोर आव्हानं उभी राहत असताना, आपल्या सवंगड्यांच्या आधी वयात येणाऱ्या मुली, विशेषकरून असुरक्षित असतात.
अलीकडेच 14 वर्षांच्या कालावधीत 7,000 पेक्षा जास्त महिलांच्या एका संशोधनात असं आढळून आलं की, लवकर ऋतुप्राप्तीचा संबंध (प्रथम मासिक पाळीचा रक्तस्राव होणं) प्रौढ वयातील वाढतं नैराश्य, जाणवण्याइतका छळ, खाण्याचा विकार आणि समाजविरोधी वर्तनाशी आहे.

फोटो स्रोत, BBC/Getty Images
"लवकर वयात येण्याचे मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम हे जगभरात निरनिराळ्या देशांमध्ये समान असल्याचं आढळून आलं आहे," असं संशोधनाच्या सहलेखिका आणि कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या मानसशास्त्र प्राध्यापिका जेन मेंडेल सांगते.
लवकर वयात येणाऱ्या मुलींना वयाने मोठ्या मुलांकडून आणि पुरुषांकडून आपल्या शरीराबद्दल नको असलेले लक्ष आणि शेरे यामध्ये वाढ झाल्याचा अनुभव येतो, हे याचे एक कारण असू शकतं. "वयात येण्यासंबंधी महत्त्वाची बाब म्हणजे ते इतरांच्या नजरेत येतं," मेंडेल निदर्शनाला आणून देते.
मात्र, स्तन असलेली लहान मुलगी ही लहान मूल नसते, किंवा अशी परिस्थिती हाताळण्यासाठी स्तन विकसित न झालेल्या मुलीपेक्षा अधिक सक्षम नसते.
खरतर 10व्या वर्षी माझ्या आवडत्या क्रियांच्या साठ्यांमध्ये अजूनही बार्बी बाहुलीशी खेळणं आणि माझ्या लहान भावाबरोबर डिस्ने चॅनेल पाहाणे यांचा समावेश आहे. भावनिकदृष्ट्या पुरुषांनी लक्ष देण्याच्या स्वभावाशी जुळवून घेण्यास मी तयार नव्हते.

फोटो स्रोत, BBC/Alamy
ज्या संस्कृतीमध्ये मुलगी वयात आल्यानंतर तिच्यावर आपोआप लग्नासाठी तयार असल्याचा शिक्का मारला जातो, त्या संस्कृतींमध्ये मुलींची लैंगिकता ही विशेषकरून समस्यापूर्ण असते. मुलांसाठी काम करणाऱ्या UNICEF संस्थेच्या अंदाजानुसार, आज जगभरात प्रत्येक तीनपैकी एका मुलीचं ती 15 वर्षांची होण्यापूर्वीच लग्न लावून दिलं जातं. हा आकडा साधारण 25 कोटी असावा.
हे केवळ विकसनशील देशांपुरतं मर्यादित आहे, असं नाही. अमेरिकेतील बहुतांश राज्यं काही विशिष्ट परिस्थितींमध्ये अल्पवयीन मुलांना लग्न करण्याची परवानगी देतात, म्हणजे त्यांचं वय 13 वर्षं असेल तरीही.
अमेरिकेमध्ये 2000 ते 2010 या दरम्यान 2.48 लाख मुलांची लग्न ते 12 वर्षांचे व्हायच्या आधीच झाली होती, असा Unchained at a Glance या संस्थेचा अंदाज आहे. ही बिगर-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्था अमेरिकेतील महिला आणि मुलींना जबरदस्तीच्या विवाहातून सुटका करून घेण्यासाठी मदत करण्यासाठी समर्पित आहे.
लवकर विवाह होण्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात, म्हणजे अगदी मुलींच्या शिक्षणावरही यामुळे परिणा होतो आणि कधीकधी तर तिच्या आरोग्याच्याही समस्या उद्भवतात.

फोटो स्रोत, BBC/Alamy
उदाहरणार्थ, बांगलादेशातील अनेक ग्रामीण भागांमध्ये मुलींना पहिल्या पाळीचा अनुभव आल्यानंतर त्यांचं लगेचच लग्न लावून दिलं जातं. या मुली जेव्हा गरोदर राहतात तेव्हा मुलाला जन्म देताना त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता 110 मध्ये 1 इतकी असते. हा आकडा 20 ते 24 या वयोगटातील मातांपेक्षा पाचपट अधिक आहे, त्यामुळे अशा प्रकारचे मृत्यू "अस्वीकार्यपणे पण सामान्य" असतात.
आणि बालपणात विवाह होण्याशी संबंधित असलेल्या मानसिक आरोग्यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. इथियोपियामधील एका संशोधनानुसार लहान वयात लग्न लावून दिल्यामुळे मुलींमध्ये आत्महत्येचा धोका जास्त असल्याचे आढळून आलं आहे. यापैकी काही मुली तर अगदी 10 वर्षांच्याही होत्या.
या समस्येचा एक भाग असा की, काही कुटुंबांमध्ये मुलगी वयात येण्याची पहिली चिन्हं दिसू लागताच टेन्शन घेतलं जातं, अगदी तिला पहिली मासिक पाळी येण्याच्या बऱ्याच आधी. आपल्या मुलीचे कुणाशी तरी लैंगिक संबंध तयार होतील किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार होईल, अशी भीती बाळगून कुटुंब तिचं लग्न तिच्या 'संरक्षका'शी लावून देतात.
"पालक आणि त्यांच्या समाजामधील या भीतीमुळे असं वातावरण निर्माण होतं की, मुलगी जसजशी मोठी होते तसतसं तिचे जग छोटं होतं आणि तिच्या हिंडण्याफिरण्यावर अधिकाधिक निर्बंध लादले जातात," असं बिगर नफा तत्त्वावर चालणाऱ्या केअर या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेमधील लिंगविषयक तत्ज्ञ, निदाल करीम सांगतात. केअरचं काम नेपाळ आणि बांगलादेश या दोन देशांत केंद्रित आहे, जिथे ही समस्या विशेष तीव्र असल्याचं आढळून आलं आहे.

फोटो स्रोत, BBC/Alamy
"मुलीच्या लैंगिकतेची इतरांनाच काळजी असते," निदान पुस्ती जोडतो. "मात्र मुलींना क्वचितच तयारी करण्यासाठी आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्यांचे स्वतःचे शरीर, वयात येणं, लैंगिक संबंध आणि पुनरुत्पादन यांच्याविषयी काही माहिती दिली जाते."
बालविवाह फारसे न होणाऱ्या देशांमध्येही लवकर वयात येणे, ही समस्या असू शकते.
मिनेसोटामध्ये राहणाऱ्या पॉलिन कँपस या मुक्त लेखिकेच्या मते, त्यांनी स्वतःला लहानपणी नकोसं लैंगिक लक्ष मिळाल्यावर अस्वस्थ वाटायचं. वयाच्या आठव्या वर्षी आपण ब्रेसियर घातल्याची आणि बॅगी शर्ट आणि मोठ्या आकाराच्या कपड्यांमध्ये लपवण्याचा प्रयत्न केल्याची आठवण ती सांगते.
"मला माझ्या आतमध्येच फार विचित्र वाटायचं, कारण त्या वयात माझा मेंदू आणि माझं शरीर एकमेकांशी जुळतच नव्हते," ती सांगते.

फोटो स्रोत, Getty Images
आणि या अनुभवांमुळेच पुढे आपलं शरीर बेढब झालं, असं कँपस यांना आता प्रौढपणी वाटतं. "मी आयुष्यभर बुलिमिया आजारापासून मुक्त होण्यासाठी धडपडत आहे, कारण समजा मी बराच वेळ बिंजिंग आणि पर्जिंग केलं नाही तरी मनःस्थिती - एकदा सुरू झाल्यानंतर ते जातच नाही," ती सांगते. "नेहमी एक वेळ अशी येते की माझं वजन वाढतं आणि मला आरशात माझ्या शरीराला गोलाई आल्याचं जाणवायला लागते."
वास्तवात, संशोधनांमधून असं दिसून आलं आहे की, वयात आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये लैंगिक छळ झाल्यास त्यामुळे Objectified body consciousness (OBC) होतं : एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या शरीराकडे एक वस्तू म्हणून पाहण्याच्या आणि त्याचं तसं मूल्यमापन करण्याच्या प्रवृत्तीसाठी मानसशास्त्रज्ञ हा शब्दप्रयोग वापरतात.

फोटो स्रोत, Thinkstock
लहान वयात झालेलं लैंगिक वस्तूकरण किती हानीकारक असू शकतं, याला वाढत्या संशोधनाचा आधार मिळतो. 2016चं एक संशोधन असं सुचवते की, लैंगिक छळाचा संबंध हा नैराश्याच्या लक्षणाची वाढती पातळी आणि नकारात्मक शरीर प्रतिमा यांच्याशी असतो. त्यामुळे 11 ते 13 या वयोगटातील मुलींमध्ये स्वतःचे वस्तूकरण, शरीराची लाज वाटणे, रवंथ करत खाणे आणि नैराश्य या गोष्टी मुलांपेक्षा जास्त दिसून येते, यात आश्चर्य काही नाही.
त्यांना स्वतःबद्दल लज्जा, भीती वाटणं आणि स्वतःचे वस्तूकरण, शरीराची लाज वाटणे, रवंथ करत खाणे आणि नैराश्य, आत्महत्येचे विचार येणे याचीही शक्यता अधिक असते.
लवकर वाढ होणाऱ्या मुलींना खाण्याचे विकार, कर्तव्यचुतीचा अपराधभाव आणि सवंगड्यांपेक्षा कमी शैक्षणिक यश अशा इतरही अनेक समस्या भेडसावतात.
लैंगिक मूल्यमापनाच्या प्रौढ जगतात प्रवेश करताना मुलींना आपले नव्या पद्धतीने मूल्यमापन केले जात आहे, आपल्याबद्दल मत तयार केले जात आहे आणि आपण वेगळे दिसतो, असं वाटतं असे लँसेस्टर युनिव्हर्सिटीमधील समाजशास्त्रज्ञ आणि लिंग आणि विज्ञान अभ्यासाच्या प्राध्यापिका सेलिया रॉबर्ट्स सांगतात.
"आपण मूल असण्याच्या टप्प्यापेक्षा हा मोठा बदल असतो, तुम्हाला वाईट वागणूक दिली जात नसेल तर - आपण आपल्या अधिकारात एक मनुष्यप्राणी म्हणून बहुमोल आणि महत्त्वाचं असल्याचं तुम्ही समजू लागता," त्या सांगतात. लैंगिक छळामुळे "आपण दुसऱ्यांच्या वापरासाठी असलेली वस्तू आहोत किंवा स्वतःपेक्षा दुसरीच व्यक्ती आपल्यावर वर्चस्व गाजवते, असं तुम्हाला वाटतं."

फोटो स्रोत, Getty Images
अगदी शाळांसारख्या 'सुरक्षित क्षेत्र' समजल्या जाणाऱ्या ठिकाणी, मुली अनेकदा लैंगिक छळ आणि अफवांचे लक्ष्य होतात. अमेरिकेच्या एका राष्ट्रीय सर्वेक्षणात 40% मुलांनी आणि 56% किशोरवयीन मुलींनी आपल्याबरोबर लैंगिक छळ झाल्याचं कबूल केलं. आणि याला लहान वयातच सुरुवात होते.
सहाव्या इयत्तेपर्यंत- जेव्हा मुले 11 ते 12 वर्षांची असतात - एक तृतियांशपेक्षा जास्त विद्यार्थिनींचा एखाद्या मुलाने लैंगिक छळ केलेला असतो.
मेंडेल सांगतात की, जेव्हा मुलींच्या शरीरामध्ये बदल दिसतात तेव्हा इतर मुलांना उत्सुकता वाटते किंवा ते अवघडतात - पण तेसुद्धा इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने वागू शकतात.
वयात येतानाच्या सुरुवातीच्या काळामध्ये हे विशेषकरून अवघड असू शकतं. या वयात मुले अजूनही स्वतःची ओळख कशी व्यक्त करायची त्याचा शोध घेत असतात. आणि ज्या मुलींना कधीही आपण मुलगी व्हावं, असं वाटलं नसेल अशा मुलींसाठी 'बायकी' लक्षणांबद्दलची त्यांची गृहीतकं विशेष हानीकारक असू शकते.
दरम्यान, स्वतःच्या लिंगाबद्दल खात्री नसणाऱ्या विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ होण्याचा धोका त्यांच्या सवंगड्यापेक्षा अधिक असतो : एका संशोधनामध्ये आढळून आलं की 81% ट्रान्सजेंडर तरुण आणि 72% समलैंगिक मुलींचा लैंगिक छळ झाला आहे. याच्या तुलनेत 43% भिन्नलिंगी मुली आणि 23% भिन्नलिंगी मुलांनी छळ झाल्याचं सांगितलं आहे.

ज्या गोरेतर मुलींना अनेकदा वर्णद्वेषी आणि मुलींना वस्तू मानणाऱ्या शेऱ्यांचा सामना करावा लागतो, त्यांचा होणारा छळसुद्धा अधिक गंभीर असतो.
कॅलिफोर्नियामधील एका आशियाई-अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने सांगितलं की कसं तिला ती 12 वर्षांची असताना तिच्या शरीराबद्दल कशा प्रकारचे हीन शेरे मिळत होते. आपल्या रुग्णांना आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कळेल याची चिंता वाटल्यामुळे नाव उघड न करण्याच्या अटीवर तिने याबद्दल सांगितले.
"माझ्या अगदी सुरुवातीच्या आठवणींमध्ये माझ्या वर्गामध्ये एक मुलगा होता. त्याने तर मला अगदी सहज सांगितलं होतं की तो माझ्याबरोबर सेक्स करणार आहे," ती सांगते. या टिप्पण्यांबरोबर "तुला 'त्या ठिकाणी' भरपूर केस आहेत का? कारण आशियाई लोकांना 'त्या ठिकाणी' भरपूर केस नसतात, असं मी ऐकलं आहे" अशा वर्णद्वेषी शेरेसुद्धा तिला अनेकदा ऐकवले जायचे.

फोटो स्रोत, BSIP/GETTY IMAGES
लवकर वयात येणाऱ्या मुलींमध्ये दिसून येणाऱ्या नकारात्मक मानसिक आरोग्याबरोबरच त्या मानसिकदृष्ट्या अधिक परिपक्व आणि लवकर जुळवून घेणाऱ्या असतात, असं युनिव्हर्सिटी ऑफ गॉथनबर्गमधील मानसशास्त्राच्या प्राध्यापिका थेरेस स्कूग यांना आढळलं आहे.
माझ्या स्वतःसाठी, मला असं लक्षात आलं आहे की, इतक्या लहान वयात असे अनुभव आल्यामुळे प्रौढ वयात माझ्यामध्ये अधिक सहानुभूती आणि भावनिक तीक्ष्णपणा आला आहे, विशेषतः माझ्यासारखाच अनुभव आलेल्यांबद्दल.
लवकर लैंगिक विकासाला फार मोठे अरिष्ट न मानणे महत्त्वाचे असते यावर संशोधक सहमत असतात. मुलीचे शरीर बदलत आहे समस्या नसते. त्याला समाजाचा मिळणारा प्रतिसाद ही समस्या असते. त्यामुळे आपण मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वोत्तम प्रकारे आधार कसा देऊ शकतो यावर आपण विचार केला पाहिजे, असे ते म्हणतात, रॉबर्ट्सने मांडणी केल्याप्रमाणे, "वयात येण्याचा अनुभव त्रासदायक करणाऱ्या लैंगिक भेदभाव करणाऱ्या संस्कृतींचा विरोध करा."

फोटो स्रोत, Getty Images
मुख्य लैंगिक शिक्षण आणि सामाजिक जागरूकता, सहानुभूतीची क्षमता आणि प्रबळ उर्मींवर नियंत्रण या बाबी शिकवणारे सामाजिक आणि भावनिक अध्ययनाच्या कार्यक्रमांच्या विकासात याचे उत्तर दडलेले आहे, असा स्कूग यांचा विश्वास आहे.
हा भविष्यात हस्तक्षेपाच्या प्रयत्नाचा भाग असू शकतो आणि लवकर वयात येणाऱ्या मुलींसह सर्व किशोरवयीन मुला-मुलींच्या लैंगिक छळाचा धोका कमी करण्याचे उद्दिष्ट असलेल्या धोरणासाठी वापरले जाऊ शकतो.
आपण "सामाजिकदृष्ट्या आदरपूर्वक वर्तन वाढवण्याची आणि लैंगिक रूप किंवा लैंगिक कृती याचा अर्थ मुली किंवा महिला मुले अथवा पुरुषांच्या कोणत्याही लैंगिक धिटाईसाठी सकारात्मक किंवा राजी असते असा त्याचा अर्थ होत नाही याची समज वाढवण्याची" गरज आहे.
लैंगिक छळ अजिबात सहन न करण्याचे वातावरण निर्माण करूनच आपण - मुलांवर परिणाम करणाऱ्या लैगिंक छळासह - लैंगिक छळाच्या व्यापकतेविरोधात भूमिका घेऊ शकतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








