सेक्स : प्रणयाची कला भारतीय लोक विसरत चालले आहेत का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतासारखा देश जिथं कामसूत्राची निर्मिती झाली आणि प्रेमाच्या भाषेला खजुराहो, दिलवाडा, अजंठा, एलोराच्या दगडांवर कोरण्यात आलं, तिथे आज लोक प्रेमळ संवाद आणि मोहीत करण्याची कला विसरत चालले आहेत, ही शोकांतिका आहे.
एक इंग्रजी लेखक होते साइमन रेवेन ज्यांचं म्हणणं होतं की, 'सेक्स एक ओव्हररेटेड अनुभव आहे. हा अनुभव फक्त 10 सेकंदांसाठी असतो. ते विचारायचे की कुणी भारतीय इरॉटिक साहित्याचा इंग्रजी अनुवाद करण्याचं आव्हान का उचलंत नाही.
मी हाच प्रश्न 'द आर्ट्स ऑफ सिडक्शन'च्या लेखिका डॉक्टर सीमा आनंद यांना विचारला की त्या साइमन रेवेन यांच्या वक्तव्याशी सहमत आहेत का?
सीमा आनंद यांचं उत्तर होतं,"अजिबात नाही. माझं मत आहे की सेक्ससंबंधी आपले विचार बदलले आहेत. कितीतरी शतकांपासून आपल्याला हे शिकवलं जात आहे की हे निरुपयोगी आहे. सेक्स घाणेरडी गोष्ट आहे आणि ती करू नये. आता कुणीही यापासून मिळणाऱ्या आनंदाविषयी बोलत नाही. ई.स. 325मध्ये कॅथलिक चर्चने कायदे बनविले आणि त्यात सांगितलं की शरीर वाईट आहे. शारीरिक सूख वाईट आहे आणि त्याची कामना करणं पाप आहे."
"त्यांचं म्हणणं होतं की सेक्सचा एकमेव उद्देश संतती जन्माला घालणं, हाच आहे. जवळपास त्याचवेळी भारतात वात्स्यायन गंगातीरी बसून कामसूत्राची रचना करत होते आणि सांगत होते की आनंद कसा चांगला असतो आणि तो कसा वाढवता येऊ शकतो."
पूर्व आणि पश्चिमेच्या विचारातील हा विरोधाभासावर या काळात विश्वास बसत नाही. म्हणूनच तर 'अनंग रंग' ग्रंथाचे अनुवादक डॉक्टर अॅलेक्स कम्फर्ट यांनी म्हटलेलं आहे की साइमन रेवेन यांच्या विचाराला पराभूत करायचं असेल तर लोकांना मोहित करण्याच्या कलेबद्दल अधिकाधिक सांगितलं गेलं पाहिजे.
पुरुष अग्नी तर स्त्री पाणी
असं म्हणतात की एक प्रेमी म्हणून स्त्री आणि पुरुष यांच्यात खूप अंतर असतं आणि त्यांच्या सेक्शुअॅलिटीच्या स्रोतमध्येही जमीन आस्मानाचं अंतर असतं.
सीमा आनंद सांगतात, "वात्स्यानन म्हणतात पुरुषांच्या इच्छा आगीप्रमाणे असतात ज्या त्याच्या जननेंद्रियांमधून त्याच्या मेंदूपर्यंत जातात. आगीप्रमाणे ते तात्काळ भडकतात आणि तेवढेच लवकर शांतही होतात. याउलट स्त्रियांच्या इच्छा या पाण्याप्रमाणे असतात. ज्या मेंदूत उगम पावून खाली जातात. त्यांना जागवण्यासाठी पुरुषांच्या तुलनेत जास्त वेळ लागतो आणि शांत करण्यासाठीही वेळ लागतो."

फोटो स्रोत, Getty Images
"स्त्री आणि पुरुष यांना त्यांना हवं तसं वागू दिलं तर त्यांच्या इच्छा कधीच पूर्ण होऊ शकणार नाहीत. म्हणूनच पुरुषांना स्त्रियांना मोहीत करण्याची गरज असते. जेणे करून त्या उत्तेजित होतील. माझ्या या पुस्तकाचा उद्देशही तोच आहे की मोहीत करण्याची ही कला प्रत्येकाला अवगत व्हावी."
सेक्सवर बरंच संशोधन केलेले प्रसिद्ध भारतीय सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर प्रकाश कोठारी स्त्री-पुरुषातील प्रेमातील अंतराला वेगळ्या प्रकारे समजवतात.
ते म्हणतात, "पुरुष प्रेम देतात सेक्स करण्यासाठी आणि स्त्री सेक्स करते प्रेम मिळवण्यासाठी. कमीत कमी भारताच्या संदर्भात ही बाब शंभर टक्के खरी आहे."
गंधाचं महत्त्व
स्त्री-पुरुष संबंधात शरीराला सुगंधित करण्याच्या कलेचं मोठं महत्त्व आहे. एखाद्या स्त्रीला कुण्या पुरुषाला आकर्षित करायचं असेल तर ती आपल्या केसांनी त्याला स्पर्श करेल आणि एक गंध सोडून जाईल.
सीमा आनंद सांगतात, "मला खसचा सुवास खूप आवडतो. हा सुवास तापलेल्या मातीवर पावसाच्या पहिल्या सरी पडल्यानंतर येणाऱ्या सुवासासारखा असतो. या सुवासाला ओल्या केसांमध्ये लावून त्याचा अंबाडा बांधतात. मानेवर मोगरा किंवा निशिंगधाच्या फुलांचं इत्तर लावतात. स्तनांवर केशर आणि लवंगाच्या तेलाची मालीश केली जाते."

"यामुळे केवळ सुवास येत नाही तर त्वचेचा रंगही उजळतो. विशेष म्हणजे प्रत्येक अत्तराचा वेगवेगळ्या शरीरावर वेगवेगळा सुवास येतात."
सीमा आनंद यांचा सल्ला आहे की प्रत्येक स्त्रीने आपल्या हँडबॅगमध्येही परफ्युम शिंपडलं पाहिजे. जेणेकरून जेव्हा तुम्ही बॅग उघडाल, तेव्हा तो सुगंध तुम्हाला प्रसन्न करेल.
सँडल किंवा शूजवरही परफ्यूम स्पे करायला हवा. कारण पायांमध्ये असे अनेक इंद्रिय असतात ज्यावर या सुगंधाचा बराच परिणाम होत असतो.
ताजेपणासाठी भांडणही गरजेचं
सीमा आनंद एक मजेशीर गोष्टही सांगतात. त्या म्हणतात स्त्री-पुरुष नात्याला रोमांचक आणि तजेलदार ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये कधीकधी भांडणही व्हायला हवं.
सीमा सांगतात, "वात्सायन म्हणतात, हे भांडण तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा दोघांमधलं नातं घट्ट असतं आणि परस्पर विश्वास असतो. मात्र दोघांमध्ये प्रेमच नसेल तर हे भांडण भयंकर ठरू शकतं. ज्यावर काही उपाय नसतो."

फोटो स्रोत, SEEMA ANAND
"ही भांडणं नेहमी पुरुष सुरू करतो. स्त्री रागावून ओरडते. आपले दागिने फेकते. आपल्या वस्तू तोडते आणि पुरुषाला फेकून मारते. मात्र या भांडणाचा एक नियम आहे. स्त्री आपला उंबरठा ओलांडत नाही. कामसूत्र याच कारणही सांगतो."
"पहिलं हे की पुरुष तिची मनधरणी करायला तिच्या मागे गेला नाही तर तो तिचा अपमान होईल. दुसरं या भांडणाचा शेवट तेव्हाच होतो जेव्हा पुरुष तिच्या पायावर पडून तिची माफी मागतो आणि हे तो घराबाहेर करू शकत नाही."
इश्काची अव्यक्त बोली
कामसूत्राचं म्हणणं ग्राह्य धरलं तर प्रणय निवेदनाची एक गुप्त भाषा असते आणि प्रेमाची कबुली फक्त बोलूनच दिली जात नाही.
सीमा आनंद सांगतात, "तुम्ही आयुष्यात कितीही यशस्वी झालात, तुमच्या जवळ कितीही धन-दौलत, ऐश्वर्य आलं, तुम्ही बुद्धिवान असलात, पण तुम्हाला प्रेमाची ही अव्यक्त भाषा येत नसेल तर सर्व व्यर्थ आहे. तुम्हाला कधीच कळणार नाही की तुमच्या प्रेयसीला काय म्हणायचं आहे."

फोटो स्रोत, Thinkstock
"जुन्या काळी ही कला इतकी विकसित होती की तुम्ही आपल्या पार्टनरशी एक शब्दही न बोलता संवाद साधू शकत होतात. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या जत्रेत गेलात आणि तुमची प्रेयसी दूर उभी असलेली दिसली. तर तुम्ही तुमच्या कानाच्या वर हात लावाल. याचा अर्थ तुम्ही विचारत आहात,'तू कशी आहेस',"
"जर तुमच्या प्रेयसीने कानाच्या खालच्या भागाला धरून तुमच्याकडे बघितलं तर याचा अर्थ ती तुम्हाला बघून खूप खूश झाली आहे. जर प्रियकराने एक हात हृदयावर ठेवला आणि दुसरा डोक्यावर तर याचा अर्थ तुझा विचार करून माझं डोकं फिरलंय. आपण कधी भेटू शकू?"
"अशाप्रकारे दोघांमध्ये गुप्त संवाद चालतो"
बौद्धिक गप्पाही तेवढ्याच महत्त्वाच्या
स्त्री-पुरुषाला उत्तेजित करण्यासाठी दोघांच्याही शरीरात खूप इरॉटिक नर्व्ह्स असतात. पण सर्वात जास्त उत्तेजित करतो तो मेंदू. म्हणजे बौद्धिक क्षमता.

फोटो स्रोत, Getty Images
सीमा आनंद सांगतात, "हल्ली आपल्याकडे एका शब्दाचा खूप वापर होतोय 'सेपिओसेक्श्युअल'. याचा अर्थ काही स्त्रिया या केवळ बौद्धिक गप्पांमुळेच उत्तेजित होतात. जवळपास दोन हजार वर्षांपूर्वी वात्सायन यांनी मोहित करण्याच्या ज्या 64 कला सांगितल्या आहेत, त्यातील 12 मेंदूशी संबंधित आहेत."
"ते म्हणतात, प्रेमीयुगुलांना शाब्दिक कोडी खेळली पाहिजे. त्यांना परदेशी भाषा यायला हवी. ते एखाद्या विषयावर एकमेकांशी हुशारीने बातचीत करू शकले नाही तर ते प्रेमाच्या खेळात मागे पडतील आणि हळूहळू दोघांच्या मधलं आकर्षण कमी होईल."
10 सेकंदाचं चुंबन
सीमा आनंद यांनी आपल्या पुस्तकातली एक अध्याय पूर्णपणे चुंबनाला समर्पित केला आहे. त्या म्हणतात चुंबनाच्या क्रियेत चेहऱ्याचे 34 आणि संपूर्ण शरिराचे 112 स्नायू भाग घेतात.

फोटो स्रोत, Getty Images
सीमा आनंद यांचा सल्ला आहे, "तुम्ही दिवसभरात काही करा अथवा नका करू, पण एक गोष्ट जरूर करा. तुम्ही तुमच्या जोडीदाराचा दिवसातून एकदा किमान 10 सेकंद लांब चुंबन घ्या. मला बऱ्याच अभ्यासानंतर हे लक्षात आलं आहे की एक सामान्य चुंबन 3 सेकंदाचं असतं. त्यानंतर लोकांना वाटतं हे खूप झालंय."
"10 सेकंद खूप मोठा वेळ आहे. असं चुंबन प्रेयसीच्या कायम स्मरणात राहतं. कारण त्याचा परिणाम होतो. हे सांगतो की तुझ्यासाठी माझ्या आयुष्यात खास जागा आहे. एका चांगल्या चुंबनाचा तुमच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. यामुळे डोकेदुखी आणि रक्तदाब दूर होत असल्याचं संशोधनांती समोर आलं आहे."
पायाने लडिवाळण्याची कला
स्त्री-पुरुष यांच्या शारीरिक संबंधात पायही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, यावर खूप कमी लोकांचं लक्ष गेलं आहे. मोहित करण्याच्या या कलेत पायांचं खास स्थान आहेत, असं सीमा आनंद मानतात. आणि स्त्रियांनी आपल्या चेहऱ्यापेक्षा आपल्या पायांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images
त्या म्हणतात, "आपल्या सर्व मज्जातंतू पायात जाऊन संपतात. तो तसाही शरिरातील सर्वात संवेदनशील अंग आहे. आजकाल आपण उंच टाचांच्या चपलांनी पायांची आबाळ करतो. मला वाटतं तुम्हाला कुणाला आपल्या पायांनी आकर्षित करायचं असेल तर बसा, सँडल काढा आणि आपला पाय जरा इकडे-तिकडे हलवा. त्याला दाखवा. तसाही हा शरीरातील सर्वात सुंदर अंगांपैकी एक आहे."
"बऱ्याच जणी चेहऱ्यावर मेकअप करतील. हातांवर मेनिक्योर करतील. पण पायांकडे लक्षच देत नाही. टाचांना भेगा पडलेल्या असतील. आपल्या पायांना नेहमी सुंदर बनविण्याचा प्रयत्न करा. कारण हा आपल्या शरीरातील सर्वात सेक्सी अंग आहे."
आहार आणि सेक्स
सेक्समध्ये जेवणाचंही आपलं महत्त्व आहे. काय खावं, केव्हा खावं, किती खावं आणि कसं खावं, या सर्वांचं महत्त्व आहे.
सीमा आनंद सांगतात, "सेक्सच्या आधी जेवलात तर आपले रिफलेक्सेस मंदावतात आणि जेवण पचवण्यासाठीच शरीरातील सर्व ऊर्जा वाया जाते. सेक्ससाठी ऊर्जाही उरत नाही आणि इच्छाही."
"जेवण नेहमी सेक्सच्या नंतर करायला हवं. वात्स्यायन म्हणतात, यावेळी प्रियकर आपल्या प्रेयसीला खूप प्रेमाने जेवू घालतो. तो प्रत्येक पदार्थ चाखून बघतो, तो स्वादिष्ट असेल तरच प्रेयसीला देतो. आपण नेहमी म्हणतो, मी डेटवर चाललोय. चांगल्या हॉटेलमध्ये जेवू."
"जेवण कितीही चांगलं झालं, कितीही चांगल्या गप्पा झाल्या किंवा कितीही चांगली फ्लर्टिंग झाली तरीही प्रियकर अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. कारण जेवणानंतर शरीराच्या क्षमतेवर तर परिणाम होतोच."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









