कोरोनाचा एकही रुग्ण नाही, तरीही हे 10 देश का कोलमडले?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओवेन अमोस
- Role, बीबीसी न्यूज
जगभरात कोरोनानं अक्षरश: थैमान घातलंय. चीनमध्ये पहिला रुग्ण सापडला आणि पाहता पाहता अवघ्या जगाला कोरोनाच्या विषाणूनं वेढा घातला.
अमेरिका, रशिया यांसारखे शक्तिशाली देशही यातून स्वत:ला वाचवू शकले नाहीत. भारतातही काही वेगळी स्थिती नाही.
मात्र, जगातील असे काही देश आहेत, जिथे कोरोनाचा रुग्ण सापडल्याची एकही अधिकृत नोंद नाही. आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहिल्यानंतर हे फारच धक्कादायक वाटतं. पण हे खरं आहे.
कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या 10 देशांची यादी आपण पाहू, नंतर यासंदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेऊ :
- पलाऊ
- मायक्रोनेशिया
- मार्शल द्वीप समूह
- नाऊरू
- किरिबाती
- सोलोमन द्वीप समूह
- टुवालू
- समोआ
- वानुटू
- टोंगा
एकही रुग्ण नाही, तरीही 'पलाऊ' कोलमडलं का?
पॅसिफिक महासागराच्या बेटावर वसलेल्या पलाऊ देशाची बहुतांश अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. 1982 साली या देशात 'द पलाऊ हॉटेल' नावाचं हॉटेल सुरू करण्यात आलं होतं. त्यावेळी ही खूप मोठी गोष्ट होती. कारण तिकडे दुसरं कोणतंच हॉटेलच नव्हतं.
2019 साली पलाऊमध्ये जवळपास 90 हजार पर्यटकांनी भेटी दिल्याची नोंद आहे. म्हणजेच, पलाऊच्या एकूण लोकसंख्येच्या पाचपट जास्त पर्यटकांनी भेटी दिल्या.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या आकडेवारीनुसार, पलाऊच्या जीडीपीचा 40 टक्के भाग केवळ पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र, हे सर्व कोरोनाच्या आधीच्या काळातलं. मात्र, आता सर्व बदललंय.

फोटो स्रोत, द पलाऊ हॉटेल
पलाऊ देशाच्या सीमा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बंद करण्यात आल्या. यामुळे पलाऊमध्ये कोरोनानं शिरकाव केला नाही, मात्र तरीही देशाला उद्ध्वस्त केलंच. कारण पलाऊमधील हॉटेल बंद आहेत, रेस्टॉरंट, भेटवस्तूंची दुकानं इत्यादी सर्व बंद आहे. परदेशात गेलेल्या नागरिकांना क्वारंटाईनसाठीच सध्या हॉटेलचा उपयोग होतोय.
'द पलाऊ' हॉटेलचे व्यवस्थापक ब्रायन ली म्हणतात, इथला समुद्र जगातली कुठल्याही समुद्रापेक्षा अधिक सुंदर आहे. मात्र, कोरोनाच्या आधी हॉटेलच्या जवळपास 70-80 टक्के खोल्या कायमच भरलेल्या असायच्या. आता सर्वच्या सर्व रिकाम्या असतात.
हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना कामावर बोलावलं जातं. अजून कुणालाच काढलं नाहीय. पण त्यांच्या कामाचे तास कमी करण्यात आलेत.
पलाऊमधलं सरकार आपल्या परीने चांगलं काम करत असल्याचं ब्रायन सांगतात.
नुकतंच पलाऊच्या राष्ट्रपतींनी आवश्यक हवाई वाहतुकीस परवानगीची घोषणा केली. मात्र, त्यानंतर अफवा पसरल्या की, तैवानसोबत पलाऊनं 'एअर कॉरिडोर' करून पर्यटकांना येण्यास परवानगी दिली जाईल. पण या अद्याप अफवाच आहेत.
ब्रायन यांनाही वाटतं की, पर्यटकांना येण्यास एवढ्यात परवानगी दिली जाण्याची शक्यता दिसत नाही.
मार्शल द्वीप समूहातही पलाऊसारखीच स्थिती
पलाऊच्या पूर्वेला जवळपास चार हजार किलोमीटरवर असलेल्या मार्शल बेटांवरही कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मात्र, याचा अर्थ असा नाही की, तिथे काहीच परिणाम झाला नाही.
मार्शल बेटांवरील हॉटेल रॉबर्ट रीमर्समध्ये कोरोनाच्या आधी 37 खोल्यांमधील 75-88 टक्के खोल्या भरलेल्या असायच्या. आशिया आणि अमेरिकेतील पर्यटक इथे येत असतात. मात्र, सीमा बंद झाल्यानं पर्यटन क्षेत्राला फटका बसला.

या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सोफिया फाउलर म्हणतात, आमच्या इथे आधीच पर्यटकांची कमतरता असायची आणि आता सीमा बंद असल्यानं सगळंच कोलमडलंय.
मार्शल द्वीप समूहात कोरोनामुळे 700 नोकऱ्या गेल्याची भीती वर्तवली जाते. इथल्या लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या मोठीच आहे. 1997 नंतरची रोजगारातील ही सर्वात मोठी घट आहे. यातल्या 258 नोकऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्रातल्याच आहेत.
पर्यटनापेक्षा मार्शल द्वीपसमूहात मासेमारीला सर्वात मोठा फटका बसलाय. कारण कोरोनाचा प्रसार झालेल्या देशांच्या बोटी मार्शल बेटांच्या बंदरात आणण्यास बंदी घालण्यात आलीय.
हे सर्व संपून लवकर सर्वकाही सुरळीत होईल, अशी आशा सोफिया फाउलर यांना आहे.
वानुटूमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आर्थिक घसरण
कोरोनामुळे या भागातील काही देश खरंच गरिबीच्या खाईत लोटले गेलेत. मात्र तरीही कुणालाच सीमा उघडाव्या वाटत नाहीत. कारण कोरोनाची भीती अधिक वाटतेय.
डॉ. लेन टारिवोंडा हे वानुटूमधील सार्वजनिक आरोग्य विभागेच संचालक आहेत. ते तीन लाख लोकसंख्या असलेल्या पोर्ट व्हिलामध्ये काम करतात. ते स्वत: अम्बेमधील आहेत. इथली लोकसंख्या 10 हजार आहे.

फोटो स्रोत, Science Photo Library
ते म्हणतात, "अम्बेमधील लोकांशी तुम्ही बोललात तर तुमच्या लक्षात येईल, लोक सीमाबंदीचं समर्थन करतात. कोरोना पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत सीमा उघडू नये असं लोकांचं म्हणणं आहे. कारण कोरोनाचं प्रचंड धसका या लोकांनी घेतलाय."
वानुटूमधील 80 टक्के लोक शहर आणि औपचारिक अर्थव्यवस्थेच्या बाहेर आहेत. ते शेतकरी आहेत. स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात. स्थानिक आणि परंपरागत अर्थव्यवस्थेवर जगतात. त्यामुळे त्यांना सीमाबंदीचा तितकासा फरक पडला नाही.
मात्र, तरीही वानुटू देशाची अर्थव्यवस्था धोक्यातच आहे. आशियाई विकास बँकेच्या अंदाजानुसार, वानुटूच्या जीडीपीत जवळपास 10 टक्के घट होण्याची शक्यता आहे.
1980 साली वानुटू स्वतंत्र झाला. त्यानंतर पहिल्यांदाच वानुटू अशा आर्थिक घसरणीला सामोरं जाणार आहे.
मग कोव्हिडमुक्त देश काय करू शकतात?
व्यापारी आणि कामगारांना आर्थिक मदत करून अल्पकाळासाठी उपाययोजना करता येईल परंतु "कोरोनाच्या लशीची वाट पाहाणं हा दीर्घकाळ उपाय आहे."
तोपर्यंत प्रवाशांना आणण्यासाठी एअर बबल वापरलं जाऊ शकतं. हे कितपत शक्य आहे हे माहिती नाही. ते वापरणं तितकं सोपं नाही.

फोटो स्रोत, MARIO TAMA/GETTY IMAGES
या देशांना सेल्फ आयसोलेशनशिवाय पर्याय नाही असं मत लॉवा इन्स्टिट्यूट पॅसिफिक आयलंड प्रोग्रॅमचे संचालक जोनाथन प्रिके म्हणतात.
ते म्हणाले, "या देशांनी आपल्या सीमा सुरू ठेवल्या असत्या तरी त्याचा पर्यटनासाठी फायदा झाला नसता. कारण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडने आपल्या सीमा बंद ठेवल्या होत्या."
त्यामुळेच हे दुहेरी संकट आहे. कोरोनाची भीती आणि आर्थिक संकट असा दुहेरी धोका आहे. कोरोना काळात कोणी योग्य निर्णय घेतला आणि कोणी नाही याचं योग्य उत्तर शोधण्यासाठी अनेक वर्षं लागू शकतात. अर्थात नंतर पॅसिफिक महासागरातील या देशांन सीमा बंद करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा होता असं कोणी म्हणेल असं वाटत नाही"
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








