प्राचीन ग्रीसमधली 'ती' सुंदर तरुणी जिने भर न्यायालयात निर्वस्त्र होत लढवला स्वतःविरोधातला खटला

फोटो स्रोत, Alamy
फ्रीन ही प्राचीन ग्रीसमधली सर्वात देखणी तरुणी. पण ती केवळ देखणीच नव्हती तर तेवढीच बुद्धिमानही होती. पण, तिच्या या रुपानेच तिच्यावर भर न्यायालयात निर्वस्त्र व्हायला भाग पाडलं होतं.
आफ्रोडायटी ही सौंदर्य आणि प्रेमाची ग्रीक देवता. प्रॅक्सिटेल्स नावाच्या प्रख्यात ग्रीक शिल्पकाराने इ. स. पूर्व चौथ्या शतकात या आफ्रोडायटी देवीचं शिल्प साकारलं. हे शिल्प निर्वस्त्र होतं. असं म्हणतात की हे शिल्प इतकं अप्रतिम आणि मादक होतं की 'प्रॅक्सिटेल्सने मला निर्वस्त्र कधी बघितलं?' असा प्रश्न स्वतः देवी आफ्रोडायटीनेही विचारला असता.
ज्या तरुणीकडे बघून शिल्पकाराने हे शिल्प चितारलं ती होती फ्रीन. फ्रीन ही hetaira होती. Hetaira म्हणजे अशी वेश्या जी दिसायला देखणी आणि तेवढीच हुशार, तरबेज वाक्चतुर आणि सुशिक्षित. Hetaira अनेक पुरूषांबरोबर संबंध ठेवत नसे.
तिच्या आयुष्यात एकावेळी एकच पुरूष असायचा आणि ती त्याच्यासोबत बराच काळ एकत्र घालवायची. एकप्रकारे काही काळापुरतीची सहचारिणीच. पुरुषांना केवळ शारीरिक सुखच नाही तर त्यांचं बौद्धिक मनोरंजन करण्याचंही काम या hetaira करायच्या. प्रॅक्सिटेल्स हा hetaira चा ग्राहक होता.
फ्रीनचा जन्म थेस्पाईमधला. पुढे ती अॅथेन्सला गेली. तिचं मूळ नाव होतं नेझारिट (Mnesarete). पण, तिला फ्रीन नावानेच ओळखलं गेलं. खरंतर फ्रीन शब्दाचा ग्रीक अर्थ होतो बेडूक. पण, प्रॅक्सिटेल्सने जे तिचं वर्णन केलं आहे त्यानुसार ती अत्यंत रुपवान होती. त्याने साकारलेल्या तिच्या निर्वस्त्र शिल्पावरूनही ते दिसतं. सरळ नाक, निमुळती-गोलाकार हनुवटी, छोटेसे ओठ आणि टपोरे डोळे. तिच्या फिकट रंगावरून कदाचित तिला हे नाव पडलं असावं.

फोटो स्रोत, Alamy
फ्रीन जितकी देखणी तितकीच कुशाग्र बुद्धी असणारी होती. तिच्या या बुद्धिमत्तेने तिला त्याकाळातल्या तत्त्ववेत्त्यांच्या पंक्तीत बसवलं. मात्र, दुर्दैव असं की, आधुनिक काळातील ज्या-ज्या कलाकारांनी तिच्याबद्दल लिहिलं, रेखाटलं किंवा चितारलं सर्वांनी तिच्या सौंदर्याचंच गुणगान केलं. तिच्या बुद्धिकौशल्याकडे मात्र दुर्लक्ष झालं.
फ्रीनबद्दल आम्ही जेवढी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला त्यात असं आढळून आलं की, तिच्याकडे आफ्रोडायटीच्या तोडीचं रुप तर होतंच पण त्याहूनही अधिक म्हणजे ती हुशार, विनोदबुद्धी असणारी, चिकाटी असणारी आणि स्वतःवरही विनोद करण्याची ताकद असणारी होती.
सुंदर तितकीच व्यवहारकुशल फ्रीन
त्याकाळातल्या ग्रीक स्त्रियांचं आयुष्य चूल आणि मुलांपर्यंतच असायचं. त्या सहसा घराबाहेर पडत नसत. श्रीमंत घरातल्या स्त्रिया कधी तरी घराबाहेर दिसायच्या. पण तेही नवरा किंवा घरातला कुणीतरी पुरूष सोबत असेल तेव्हाच. त्या तुलनेत फ्रीन आधुनिक वाटेल. तसं तर Hetaira यांचंच आयुष्य जरा मोकळं होतं. त्या शिकायच्या. आपल्या जोडीदाराबरोबर त्या कला आणि तत्त्वज्ञानावर चर्चा करायच्या. आधुनिक जीवनशैलीच्या निकषांवर पडताळल्यास त्या अधिक स्वतंत्र होत्या.
अॅथेनिअसच्या लिखाणात फ्रीनविषयीचे बरेच किस्से आढळतात. अॅथेनिअसने त्याकाळच्या तत्त्ववेत्यांच्या डिनर पार्टीजमध्ये घडणारे किस्से एकत्र करत The Deipnosophistai हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात फ्रीनच्या विनोदबुद्धीविषयी सांगताना त्यांनी एक घटना सांगितली आहे.
एका पार्टीमध्ये एक जण फ्रीनशी खूप लगट करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने तिला विचारलं आफ्रोडायटीचं शिल्प खरंच तुझ्याकडे बघून साकारलं आहे का? त्यावर फ्रीन लगेच म्हणाली, "ते तर काहीच नाही. तू तर फिदिआसने (प्रसिद्ध शिल्पकार) साकारलेला इरॉस दिसतोस." ग्रीक पुराणात ईरॉस आफ्रोडायटीचा मुलगा आहे. अॅथेनिअस लिहितो - विनोदबुद्धी असणारी सुंदर स्त्री म्हणजे दुर्मिळ संयोग आहे.

फोटो स्रोत, Alamy
फ्रीन जेवढी विनोदी होती तेवढीच व्यवहारकुशल आणि चाणाक्षही होती. अॅलेक्झँडरने उद्ध्वस्त केलेल्या थेब्स शहराच्या भिंती पुन्हा उभारण्यासाठी तिने निधी देऊ केला होता. मात्र, त्यावर 'अॅलेक्झँडरने उद्ध्वस्त केल्या आणि वेश्या असणाऱ्या फ्रीनने पुन्हा उभारल्या' असं कोरावं, अशी इच्छा तिने व्यक्त केली होती.
तर अशी ही फ्रीन त्याकाळातली सर्वात श्रीमंत आणि स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं ऐश्वर्य उभी करणारी स्त्री होती. मात्र, अॅथेन्सच्या न्यायालयात तिच्यावर मृत्यूदंडाचा खटला चालवण्यात आला. कदाचित एका देवतेची निर्वस्त्र मूर्ती बनवण्यासाठी ती मॉडेल होती, यामुळे देवतेचा अपमान झाला, असा हा आरोप होता.
कला जगतातला महत्त्वाचा खटला
इ. स. पूर्व चौथ्या आणि पाचव्या शतकात ग्रीसमध्ये अनेक विचारवंताविरोधात देवतांच्या अपमानाचे खटले चालले होते. अरिस्टोटल या प्रसिद्ध तत्त्ववेत्याला तर न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षाही दिली होती.
फ्रीनच्या खटल्याचे तपशील काहीही असले तरी कला जगतात हा खटला अमर झाला. अनेक दिग्गज चित्रकारांनी फ्रीन आणि त्या खटल्याचं दृश्य चितारण्याचा प्रयत्न केला आहे.
अॅथेनियसच्या म्हणण्यानुसार फ्रीनचे वकील तिचा बचाव करण्यात कमी पडले. अखेर ज्युरी फ्रीनच्या विरोधात निर्णय देणार त्या महत्त्वाच्या क्षणी इतर कुठलाही पर्याय दिसत नसल्याने तिच्या वकिलांनीच तिचा अंगरखा भर कोर्टात फाडला आणि फ्रीनचे स्तन संपूर्ण ज्युरीने बघितले.
देवतेसारखं अलौकीक सौंदर्य लाभलेल्या एका तरुणीला असं विवस्त्र बघितल्यावर कुठला पुरूष तिला दोषी ठरवेल? अॅथेनियस तर म्हणतो कायम वस्त्रांमध्ये झाकून असलेलं तिचं शरीर तर अधिकच सुंदर होतं. हा प्रसंग घडताच ज्युरीने तिला तात्काळ दोषमुक्त केलं.

फोटो स्रोत, Alamy
असंही सांगतात की फ्रीन स्वतःच निर्वस्त्र झाली. ती वाक्चतुर तर होतीच. त्यामुळे निर्वस्त्र झाल्यानंतर तिने असा युक्तिवाद केला की, इतका रुपवान देह स्वतः देवच बनवू शकतो आणि अशा देहाला दंडित करणं म्हणजे खुद्द देवाचा अपमान ठरेल. देवाच्या कोपाची भीती आणि समोर दिसत असलेलं अलौकिक सौंदर्य यामुळे उपस्थित सर्वच जण भारावून गेले आणि अखेर कोर्टाने तिची निर्दोष मुक्तता केली.
अनेक पुरूष कलाकारांना या दृश्यातून प्रेरणा मिळाणं स्वाभाविकच आहे. मात्र, त्या घटनेची सत्यता पूर्णपणे पडताळली जाऊ शकत नाही.
या घटनेविषयी पोसिडिपस या विनोदी कवीने केलेल्या वर्णनाचेही काही अंश उपलब्ध आहेत. मात्र, पोसिडिपसने आपल्या काव्यात कुठेही नग्नतेचा उल्लेख केलेला नाही. एखाद्या घटनेत इतका उत्कंठावर्धक क्षण येणं आणि एका विनोदवीराने त्यावर काहीही भाष्य न करणं, हे विवेकबुद्धीला पटणारं नाही. त्यामुळे अॅथेनियसने कदाचित आपल्या रचनेत जरा अतिशयोक्ती केली असावी, असा संशय घेण्यास वाव आहे.
फ्रीनच्या चातुर्याचे किस्से
फ्रीन केवळ वाक्चतुर नव्हती तर तिच्याकडे व्यावहारिक हुशारीही होती. पॉझॅनिस हे प्रसिद्ध ग्रीक प्रवासी आणि भूगोलवेत्ता होऊन गेलेत. त्यांनीही Descripion of Greece या त्यांच्या प्रवास वर्णनात फ्रीनच्या व्यवहारज्ञानाविषयी लिहिलं आहे.
ते म्हणतात, प्रॅक्सिटेल्सने तिला त्याने साकारलेल्या शिल्पांपैकी एक शिल्प देऊ केलं होतं. कुठलं शिल्प हवं ते तूच निवड, असंही तो म्हणाला. त्यावर तिने त्याला सर्वाधिक कुठलं शिल्प आवडतं, ते विचारलं. तो म्हणाला, माझी सर्वच शिल्प सारखी सुंदर आहेत.

फोटो स्रोत, Alamy
काही वेळाने फ्रीनचा एक नोकर धावत आला आणि म्हणाला प्रॅक्सिटेल्सच्या कार्यशाळेला आग लागली आहे आणि त्याची बरीचशी शिल्प जळून भस्मसात झाली. हे ऐकून प्रॅक्सिटेल्सला रडू कोसळलं. सॅटरचा (ग्रीक देवता) पुतळा आणि प्रेमाचा पुतळा, या आपल्या दोन सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एखादी जळाली तर नाही ना, याची भीती त्याला वाटली.
त्यावर फ्रीनने ही तिनेच केलेली गंमत होती आणि तिला प्रेमाचा पुतळा हवा असल्याचं सांगितलं.
पुतळे फ्रीनच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होते. तिला स्वतःला पुतळ्यांसाठी मॉडलिंग करायला आवडायचं. तिच्याकडे पुतळ्यांचा मोठा संग्रहही होता. इतकंच नाही तर तिचा अपेक्षाभंग व्हायचा त्यावेळीही ती पुतळ्याचंच उदाहरण द्यायची.
एकदा ती झेनोक्रॅट्स नावाच्या एका तत्त्ववेत्याच्या लगट बसून त्याला भुरळ पाडण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळेना. फ्रीनच्या बाबतीत असं खूप कमी व्हायचं. झेनोक्रॅट्स काहीच प्रतिसाद देत नसल्याचं बघून ती चिडली आणि हा पुरूष नसून पुरूषाचा पुतळा असल्याचं म्हणाली होती.
फ्रीनच्या सौंदर्यावर भाळून अनेक चित्रकारांनी तिची चित्रं रेखाटली, अनेक शिल्पकारांनी तिच्या मूर्ती साकारल्या. 'प्रिनी द एल्डर' या एका ग्रीक तत्त्ववेत्याच्या म्हणण्यानुसार प्रॅक्सिटेल्सने अॅफ्रोडाईट देवतेच्या दोन मूर्ती साकारल्या होत्या. एक वस्त्र असलेली आणि एक निर्वस्त्र.

फोटो स्रोत, Alamy
लोकांना दुसरी मूर्ती बघून धक्का बसला. त्यामुळे त्यांनी पहिली मूर्ती स्वीकारली नाही. शेजारच्या निदोसच्या लोकांनी ही दुसरी मूर्ती ठेवून घेतली. निदोसमधली ही मूर्ती निकोमेडिस नावाच्या एका रोमन राजाच्या नजरेस पडली आणि त्याला ती मूर्ती खूप आवडली.
त्याने मूर्तीच्या बदल्यात निदोसचे सर्व कर माफ करण्याचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा कुठे ही मूर्ती किती मूल्यवान आहे, हे निदोसच्या लोकांना कळलं. त्यांनी मूर्ती देण्यास नकार दिला आणि ती मूर्ती एका सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवली. पुढे ही मूर्ती बघण्यासाठी लोकांची झुंबड उडू लागली आणि अशा प्रकारे मूर्तीतून निदोसच्या लोकांना अमाप पैसा कमवून रोमन राजाचा करभरणा केला.
...आणि फ्रीन दंतकथा बनली
फ्रीनची कहाणी आणि तिच्यावर चालवण्यात आलेला खटला त्या काळातल्या काही कथा आणि लेखनावर आधारित आहेत. त्या खटल्यात नेमकं काय घडलं, याचे पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र, कला आणि साहित्य जगतात हा खटला अमर झाला. ती संपूर्ण घटनाच इतकी नाट्यमय होती की आजही अनेकांना प्रेरणा देते. अनेकांनी या घटनेवर आधारित चित्र काढली, शिल्प रचले, नाट्यकृती साकारल्या.
फ्रेन्च कवी चार्ल्स बॉडेलर, फ्रान्सेस्को डी क्युडो आणि रेनर मारिया रिल्के यांनी फ्रीनवर काव्यं रचली. एका फ्रेन्च ओपेराचं नाव फ्रीनच्या नावावरून देण्यात आलं आहे. इटलीच्या मारियो बोनार्ड यांनीही फ्रीनवर चित्रपट बनवला आहे.
पण दुर्दैव असं की हुशार, विनोदबुद्धी आणि व्यावहारिक ज्ञान असूनही फ्रीन लक्षात राहिली ती तिच्या सौंदर्यासाठी. तिची हुशारी ठसठशीतपणे अधोरेखित झालीच नाही. आधुनिक कलेतही तिची बुद्धीमत्ता प्रतिबिंबित होत नाही.
वेगळ्या शब्दात सांगायचं तर फ्रीनची बुद्धीमत्ता आणि ज्ञानाचा विसर पडला. इतकंच नाही तर तिचं सौंदर्य आणि तिची मादकताही चुकीच्या संदर्भात मांडण्यात आलं. त्यामुळे फ्रीनला केवळ कामभावनेच्या बंधनात न बांधता तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचाच नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









