'रेखाला पाहताना आपलं वय वाढल्याची जाणीव होते, ते जास्त त्रासदायक वाटतं'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, द्वारकानाथ संझगिरी
- Role, बीबीसी मराठीसाठी
आमची रेखा 68 वर्षांची झाली...हे आपलेपण अर्थातच एकतर्फी आहे. या पडद्यावरच्या पऱ्यांबाबत आपलेपण हे असं एकतर्फीच असतं.
विकास भल्ला, अविनाश वाधवान, कमल साधना वगैरे पडेल आणि मठ्ठ हिरोंनाही तिचं आपलेपण लाभतं. पण पडद्याबाहेरच्या प्रेमळ मंडळींच हे आपलेपण एकतर्फीच असतं.
असो.
पण भुर्रकन निघून गेलेली 68 वर्षं एक गोष्ट दाखवून गेली की काळ किती निःपक्षपाती आहे. खुबसुरत मुलीसाठीसुद्धा तो थांबत नाही.
अर्थात, काळाच्या खाणाखुणा इतरांवर जाणवतात तेवढ्या अडषष्ठी ओलांडलेल्या रेखावर अजिबात जाणवत नाहीत. आजही ती खूप सुंदर आणि तरुण दिसते.
रेखाच अधिकृत नावं भानुरेखा गणेशन. तिचे वडील जेमिनी गणेशन.
त्यांनी चार लग्नं केली. त्यातल्या पुष्पावली ह्या बायकोची रेखा मुलगी. बालपणी रेखा आणि वडिलांचा संबंध फारसा आलाच नाही.आईने तिला वाढवलं. बालपणी तिने काही दाक्षिणात्य सिनेमात भूमिका केल्या.
पण हिंदी सिनेमात ती शाळा सोडून आली तारुण्याच्या उंबरठयावर.
घरची आर्थिक घडी नीट बसवणं हा त्या मागचा उद्देश.
मला रेखाचा पहिला हिंदी चित्रपट 'सावन भादों' अस्प्ष्टपणे आठवतोय. त्यात स्पष्टपणे लक्षात ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. या सिनेमातली रेखासुद्धा आठवणीत राहील अशी अजिबात नव्हती. त्या काळात रेखाबद्दल प्रमाणबद्ध फिगर असलेल्या झीनत अमानने म्हटलं होतं, ''If i am a sweet pea, Rekha is a potato.''
रेखा त्यावेळी तशीच होती. अमिताभ आयुष्यात आल्यानंतर रेखा बदलली. झीनतला 'देव' योग आणि 'राज' योगही बदलू शकले नाहीत. अभिनयाची तिची दोस्ती झालीच नाही. झीनत अमान आज कुठे आहे, कुणास ठाऊक? रेखा मात्र चित्रपट सृष्टीच्या आसपास अजून आहे.
ही इंडस्ट्री तशी पुरुषप्रधान आहे. आणि तरीही काही प्रतिभाशाली अभिनेत्रींना समोर ठेऊन चित्रपट तयार झाले. उदाहरणार्थ- मीना कुमारी, नर्गिस, नूतन किंवा अलीकडची आलिया भट वगैरे. त्यात एक रेखाही आलीच.
नायिकांनी कसं छान छान दिसावं. सेन्सॉरची कात्री चुकवून शक्य तितकं बोल्ड व्हावं. नायकांबरोबर बागडत झकासपैकी गाणी म्हणावी आणि नायक एकाचवेळी आठ, दहा गुंडांची कशी कणिक तिंबतो ते कौतुकाने पाहावं.
फार तर अडीअडचणींना नायकाला मदत करावी. क्वचितपणे एखाद्या मेलोड्रामिक शॉटमध्ये ग्लिसरीनचे अश्रू ढाळावेत. सर्वसाधारणपणे यापेक्षा वेगळं काही करावं लागत नाही.
त्यामुळे अभिनय गुण वगैरे असले तरी दाखवायला वाव कुठला. पब्लिक सुद्धा ती काय फटाका दिसते किंवा तिला यातच खुश असायचं. सुरवातीच्या बऱ्याच काळात रेखाने हेच केलं. तिचा चेहरा फोटोजेनिक आहे, बांधा सुडौल आहे. त्यामुळे निर्मात्यांनी तिच्या फक्त ह्याचं बाबीवर भर दिला.

फोटो स्रोत, Getty Images
चित्रपटाचा मालमसाला तोच असायचा फक्त हिरो बदलायचे. कधी विनोद मेहेरा, कधी जितेंद्र, कधी शशी कपूर कधी धर्मेंद्र. त्या सुरवातीच्या काळात तिचं, हिंदी वाईट होत. स्क्रीन टेस्ट देताना, तिने हिंदी डायलॉग, लॅटिन स्क्रिप्ट मध्ये लिहिले होते. त्या काळात तिला फसवून घेतलेला किस खूप गाजला.
दिग्दर्शक राजा नवाथे ह्याने बिस्वजितला तिचा किस घ्यायला लावला आणि पाच मिनिटं कट म्हटलंच नाही. सेटवरची माणसं जल्लोष करत होती.
रेखा कावरीबावरी झाली. पुढे त्यातून बरेच वाद निर्माण झाले. ते चुंबनदृश्य लाईफ मॅगझिनच्या एशियन एडिशनच्या कव्हर वर छापून आलं. त्याकाळात स्क्रीनवर किस निषिद्ध असल्यामुळे, गदारोळ उठला. लाईफ मॅगझिनचा एक अमेरिकन पत्रकार रेखाची मुलाखत घ्यायला आला.
त्याकाळात सुद्धा रेखा अगदीच परवीन बाबी सारखी केवळ गोड बाहुली नव्हती. चांगला प्रसंग हाती लागला किंवा चुकून चांगली भूमिका हाती आली तर ती अभिनय गुण दाखवून जायची.
अलीकडे चॅनलच्या भाऊगर्दीत राजेंद्र कुमार हिरो असलेला 'गोरा और काला' सिनेमा मी पहिला. त्यात काळ्या राजेंद्र कुमारची नायिका रेखा आहे. रेखाने त्या चित्रपटात चक्क हेमामालिनीवरही मात केली.
पण नंतर तिने शरीरावर लक्ष दिलं. डाएट व्यायाम, आणि योगाने तिनं स्वतःमध्ये बदल घडवून आणले. केवळ शारीरिक सौंदर्यच नाही, तिने अभिनय, हिंदी यावरही अधिक लक्ष दिलं.
ही वेगळी रेखा 'मुकद्दर का सिकंदर' मध्ये दिसली. 'दो अंजाने'त तिने अभिनय गुण दाखवले.
'घर' नावाचा चित्रपट येऊन पटकन निघून गेला. त्यात रेखाला नेहमीच्या साच्यापेक्षा वेगळी घरेलू भूमिका मिळाली होती. एक लग्न झालेली स्त्री. तिच्यावर नवऱ्यासमोर बलात्कार होतो. त्यामुळे तिच्या मनावर फार मोठा आघात होतो. आपण शीलभ्रष्ट झाल्याची भावना तिला आत्महत्येकडे खेचून नेते.
स्वतःचं शील हे सर्वस्व समजणाऱ्या अस्सल भारतीय स्त्रीचं चित्रण करताना रेखा कुठेही कमी पडली नाही. खरं म्हणजे याच चित्रपटात रेखाने प्रथमच चाकोरी बाहेरचं पाऊल टाकलं आणि ते पण अत्यंत यशस्वीपणे.
'चेहरे पे चेहरे' मध्ये रेखा होती कॅब्रे डान्सर आणि फावल्या वेळात शरीर विक्रय करणारी वेश्या. संजीव कुमार बरोबरच्या पहिल्याच शॉटमध्ये त्याला पटवण्यासाठी जो मादक अभिनय रेखा करते त्यामुळे नुकताच मैत्रिणीला भेटून आलेला संजीव कुमार मोहरून गेला नाही तर अख्ख थिएटर मोहरून गेलं. त्याच चित्रपटात पुढे एक विशिष्ट्य रसायन प्यायल्यावर संजीवच्या अंगात हिंस्त्र पशू संचारतो आणि रेखाच्या पाठी लागतो तेव्हाचा तिचा भयभीत अभिनय निश्चित उच्च दर्जाचा होता.
'मुकद्दर का सिकंदर' मध्ये तिने रंगवलेली तवायफ पाहून त्या चित्रपटात नायिका म्हणून वावरणाऱ्या राखीने कबुली दिली, की रेखाने माझ्यावर मात केली.
रेखाच्या अभिनय निपुणतेचा दाखला देण्यासाठी अशी आणखीन काही उदाहरणं देता येतील. पण रेखात लपलेलं अभिनय कौशल्य एखाद्या टीप कागदासारखं टिपलं ऋषिकेश मुखर्जींनी.

फोटो स्रोत, Getty Images
ऋषीदांनी 'खूबसूरत'बद्दल बोलताना सांगितलं होतं, "खूबसूरतपूर्वी मी रेखाबरोबर नमक हराम आणि आलापमध्ये काम केलं होतं. त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं की, तिच्यातल्या प्रतिभेपैकी पाच टक्के प्रतिभेचा सुद्धा उपयोग केला गेलेला नाही. घर चित्रपटाचा अपवाद वगळता आतापर्यंत तिच्या शारीरिक सौंदर्यावरच भर दिला गेला. म्हणून तिच्यातील अभिनय कौशल्याला वाव देण्यासाठी मी तिला डोळ्यासमोर ठेऊन खूबसूरतची कथा लिहली.''
'खूबसूरत' मध्ये दोन वेण्या पुढे घेणारी रेखा निव्वळ खूबसूरत दिसली नाही तर अभिनयही तिचा तेवढाच खूबसूरत होता. एका अल्लड, नटखट वाटणाऱ्या परंतु मॅच्युअर्ड मुलीची तिची भूमिका होती. शिस्तप्रियतेचा ओव्हरडोस पाजला गेलेल्या घरात बहिणीबरोबर घरात शिरते आणि धमाल उडवून देते. संपूर्ण चित्रपटात रेखाचं अस्तित्व जाणवतं. अशोक कुमार सारखा बुजुर्ग नट असून सुद्धा एकट्या रेखाने तो चित्रपट खाऊन टाकला.
अजून तरी मी 'उमराव जान' चा उल्लेख केलेला नाहीये. खरंतर ती तिच्या सर्वोत्कृष्ट भूमिकेपैकी एक. पण रेखाच्या चांगल्या भूमिकेबद्दल असं थोडक्यात लिहता येतं नाही. ती अशी नटी होती जी मला कुठल्याही भूमिकेत खटकली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
तवायफ रेखा 'जुदाई' मध्ये पदर ओढून दोन मुलांची आई होते. पण खटकत नाही कुठे आणि पुढेही वयाला साजेशा भूमिका करताना ती खटकली नाही. अगदी हृतिक रोशनच्या क्रिश आणि कोई मिल गया मध्ये सुद्धा.
तिने कलयुग, उत्सव, सारख्या कलात्मक चित्रपटात सुध्धा अप्रतिम भूमिका केल्या. एकंदरीत 180 चित्रपटात भूमिका केल्या.तिला सर्वोत्कृष्ट आभिनायसाठी 3 फिल्म फेअर अवॉर्ड मिळाली. 'उमराव जान'साठी राष्ट्रीय अवॉर्ड मिळालं.
स्क्रीनने एकदा उत्कृष्ट स्त्री अभिनित चित्रपटांचा क्रमांक लावला होता. त्यात रेखाचा 'खून भरी मांग' पहिल्या दहात होता.
संजय लीला भन्साळी तिला 'last of the greats' म्हणतो.
तिच्या अभिनयाबरोबच तिची प्रेम प्रकरणं गाजली. सुरवातीला तिच्या असहाय्यतेचा फायदा पुरुषप्रधान चित्रपट सृष्टीने उठवला.
मग ती गुंतत गेली. तिचं अमिताभ मध्ये गुंतणं खूप गाजलं. आजही गाजत. अमिताभ बच्चनने तिच्या कारकीर्दीला चांगल वळण लावलं हे नक्की.
गंमत पहा, एका पुस्तकात मी वाचलं की, अमिताभ-जया प्रेम प्रकरणाच्या वेळी त्यांना एकत्र आणायला ती आणि मेहमूद गाडीत मागे बसत आणि जया पुढे. तिथून रेखा पुढच्या सीटवर कधी गेली कळलंच नाही.
तिचं लग्न अयशस्वी ठरलं. त्यानंतर तिला खलनायिका ठरवलं गेलं. पण तिला पाहताना आम्हाला आमचं वय वाढल्याची जाणीव सतत होत राहते. ते जास्त त्रासदायक आहे. स्वप्नात तर तिला मी फ्री होल्ड जागाच देऊन टाकली आहे. पण तिथे येताना मात्र ती 'उमराव जान' किंवा 'परदेसिया ये सच है पिया' म्हणत येणारी रेखा बनूनच येते. त्या रेखाचं वय वाढूच शकत नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








