'सिलसिला'मध्ये न घेतल्यानंतर स्मिता पाटील यांनी यश चोप्रांना म्हटलं...

यश चोपड़ा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, वंदना
    • Role, टीव्ही एडिटर, बीबीसी भारत

जालंधरमध्ये राहणाऱ्या यश चोप्रांना 1951 साली घरून मुंबईला इंजिनिअरिंग करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. त्यांचे मोठे भाऊ बीआर चोप्रा मुंबईतले नावाजलेले चित्रपट निर्माते होते. त्यामुळे इंजिनिअरिंग शिकायला आलेल्या यश चोप्रांना आकर्षण होतं याच फिल्मी दुनियेचं.

त्यामुळे मग बीआर चोप्रांनी यश यांना अभिनेते-निर्माते आयएस जौहर यांच्याकडे काम शिकण्यासाठी पाठवलं. पण यश चोप्रांना तिथं काही काम जमलं नाही.

त्यामुळे त्यांना बीआर चोप्रांची मनधरणी करावी लागणार होती. मग यश चोप्रांनी बीआर यांचे मित्र मनमोहन कृष्ण यांचा वशिला लावला आणि ते पुन्हा आपल्या मोठ्या भावाकडे आले. त्यांनी बीआर फिल्म्ससोबत सेकंड असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम सुरू केलं.

काही वर्षांच्या मेहनतीनंतर बीआर चोप्रांनी यश चोप्रांना आपल्या बॅनरखाली पहिला चित्रपट बनविण्याची संधी दिली. पण एक अटही घातली- यश चोप्रांना आपल्या मोठ्या भावाचे मुख्य सहायक ओमी बेदी यांच्यासोबत मिळून चित्रपट 'को-डायरेक्ट' करावा लागेल.

या अटीमुळे यश चोप्रा थोड्या द्विधा मनःस्थितीत होते. पण नेमकं त्याचवेळी ओमी बेदींना दुसरीकडून स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनाची ऑफर आली आणि त्यांनी ती स्वीकारली. त्यामुळे यश चोप्रांना दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट मिळाला- धूल का फूल.

धूल का फूल

1959 मध्ये प्रदर्शित झालेला 'धूल का फूल' एका अनौरस हिंदू बाळाला वाढविणाऱ्या मुसलमान व्यक्तिची गोष्ट होती.

त्यानंतर यश चोप्रांनी बीआर फिल्मसाठी पाच चित्रपट दिग्दर्शित केले. धर्मपुत्र (1961), वक्त, इत्तेफाक आणि आदमी और इन्सान (1969) सारखे वेगळ्या धाटणीचे हे चित्रपट होते.

त्या काळाचा विचार करता हे चित्रपट अतिशय महत्त्वपूर्ण होते, त्यामध्ये तत्कालिन सामाजिक-वैचारिक घुसळण पाहायला मिळत होती.

धूल का फूल

फोटो स्रोत, BR Films

चोप्रा कुटुंबानं फाळणीची वेदना अनुभवली होती...त्यावेळेचा धार्मिक उन्माद आणि रक्तपात पाहिला होता. 'धूल का फूल' चित्रपटातलं 'तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा' हे गाणं त्यातूनच आलं आहे.

त्याकाळी जेव्हा चित्रपटाचा नायक मूर्तिमंत आदर्श असायचा, तेव्हा यश चोप्रांनी 'धूल का फूल'मध्ये राजेंद्र कुमारला ग्रे शेडमध्ये दाखवायचं धाडस केलं होतं.

राष्ट्रीय पुरस्कार

'धूल का फूल'मध्ये बीआर चोप्रांना राजेंद्र कुमारऐवजी खरंतर राजकुमारला घ्यायचं होतं.

मात्र राजकुमार यांनी पहिल्यांदाच दिग्दर्शन करणाऱ्या यश चोप्रांच्या क्षमतेवर शंका घेतली. बीआर चोप्रांनी राजकुमार यांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि राजेंद्र कुमारला हा सिनेमा मिळाला.

या सिनेमानंतर दोनच वर्षांनंतर 1961मध्ये यश चोप्रांचा 'धर्मपुत्र' रिलीज झाला. या चित्रपटात एक हिंदू कुटुंब एका अनौरस मुसलमान मुलाचा सांभाळ करतात.

यश चोपड़ा

फोटो स्रोत, Getty Images

फाळणीच्या आधी उसळलेल्या धार्मिक उन्मादातल्या कट्टरपंथी हिंदू तरूणाच्या रोलमध्ये शशी कपूरकडून यश चोप्रांनी उत्तम काम करवून घेतलं होतं. या चित्रपटाला त्यावेळी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

प्रायोगिक चित्रपट

1965 साली यश चोप्रांनी आपल्या चित्रपटांचा ट्रॅक थोडासा बदलला आणि 'वक़्त' सारखा चित्रपट केला.

मोठ्या पडद्यावर इतक्या मोठ्या कलाकारांना एकत्र आणणं, तीन भाऊ लहानपणीच हरवणं आणि तरुणपणी एकत्र येणं... यश चोप्रांनी एक नवीन ट्रेंड आणला.

पण या सगळ्यामध्ये यश चोप्रांचा जर कोणता प्रायोगिक सिनेमा असेल तर तो म्हणजे 'इत्तेफाक'

अवघ्या 28 दिवसांमध्ये बनलेला हा सिनेमा मर्डर मिस्ट्री होता; त्यामध्ये ना गाणी होती, ना इंटर्व्हल.

'आराधना' अजून रिलीज झाला नव्हता आणि राजेश खन्ना तोपर्यंत सुपरस्टारपदावर पोहोचलाही नव्हता.

'इत्तेफाक' चालवण्यासाठी ही रिस्क घेतली

तेव्हा इंटर्व्हलशिवाय सिनेमा रिलीज करायला थिएटरमालक तयार नव्हते.

यश चोप्रांनी 'स्टोरी ऑफ अ डॉक्टर' नावाची वीस मिनिटांची एक डॉक्युमेंटरीचे राइट्स विकत घेतले. आधी ती डॉक्युमेंट्री चालायची आणि मग कोणत्याही मध्यंतराशिवाय 'इत्तेफाक' थिएटरमध्ये चालला.

पाहता पाहता हा सिनेमा चालायला लागला.

यश चोप्रा कायमच रिस्क घ्यायला तयार असायचे.

1970 साली त्यांनी यापेक्षाही मोठा निर्णय घेतला- बीआर चोप्रांपासून वेगळं होतं स्वतःच्या यशराज फिल्म्सची सुरूवात केली.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

मोठ्या भावापासून वेगळं होणं यातही एक रिस्क होती. पण त्यांनी निर्णय घेतला.

यशराज बॅनरचा पहिला सिनेमातही एक जोखीम होती...

27 एप्रिल 1973 मध्ये यशराज फिल्म्सचा पहिला चित्रपट 'दाग़' रिलीज झाला.

दाग एका अशा व्यक्तिची गोष्ट होती ज्याच्या आयुष्यात दोन स्त्रिया होत्या...ही एक अशी प्रेमकथा होती, जिला समाजाच्या नैतिकतेच्या निकषात बसवणं कठीण होतं...कारण त्यातल्या पात्रांचं आयुष्य त्यापेक्षा जास्त गुंतागुंतीचं होतं.

70 आणि 80 च्या दशकात यश चोप्रांनी दीवार, त्रिशूल, कभी कभी, जोशिले, मशाल, नूरी यांसारखे एकापेक्षा एक सरस चित्रपट केले.

याच काळात यश चोप्रा आणि अमिताभ बच्चन यांची जोडी जमली. या दिग्दर्शक-अभिनेता जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे ते दीवार आणि कभी-कभी या पूर्णपणे वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांचा काही भाग एकाचवेळी शूट करत होते.

यश चोप्रा-अमिताभ

फोटो स्रोत, Getty Images

दीवार हा सिनेमा अॅक्शन असलेला सिनेमा होता. आई-मुलगा, भाऊ-भाऊ यांच्या नात्यातील प्रेम, संघर्ष, तणावही त्यात होता. दुसरीकडे कभी-कभी रोमँटिक चित्रपट होता, जो त्याकाळी एक वेगळा प्रयोग होता.

'सिलसिला'ची गोष्ट

'सिलसिला' हा यश चोप्रांचा गाजलेला सिनेमा...यामध्ये अमिताभ, जया बच्चन आणि रेखा असा प्रेमाचा त्रिकोण दाखवला गेलाय.

पण या सिनेमासाठी ही मूळ कास्ट नव्हती. यश चोप्रांनी अमिताभ सोबत स्मिता पाटील आणि परवीन बाबीला साइन केलं होतं.

2012 साली आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने यश चोप्रांनी आपल्या स्टुडिओमध्ये एक ओपन इंटरव्यू दिला होता. त्यात त्यांनी 'सिलसिला'बद्दल सांगितलं होतं.

त्या इंटरव्ह्यूमध्ये यश चोप्रांनी म्हटलं, "काश्मिरमध्ये 'कालिया'चं शूटिंग चाललं होतं. मी रात्री अमिताभ बच्चनशी बोलत होतो, तेव्हाच 'सिलसिला'चा विषय निघाला. अमितने विचारलं- यशजी, तुम्ही या स्टारकास्टवर खूश आहात का? मी म्हटलं की, खूश नाहीये; पण यावर बोलून काही फायदाही नाहीये. तेव्हा अमितनं मला पुन्हा म्हटलं की, तुमच्या मनात काय आहे ते सांगा.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

मला जया आणि रेखाला घ्यायचं आहे. त्यानंतर अमितने एक मोठ्ठा पॉझ घेतला. थोड्यावेळाने त्यानं मला म्हटलं की, तुम्ही दोघींशी बोलून पाहा."

यश चोप्रा जया आणि रेखा दोघींना भेटले. त्यांनी चित्रपटाची स्टोरी ऐकल्यानंतर कोणतेही आढेवेढे न घेता 'सिलसिला' करण्यासाठी होकार दिला.

त्यानंतर जे काही झालं ते सिनेमाच्या इतिहासात नोंदवलं गेलं आहे.

1981 साली अमिताभ-जया आणि रेखा यांचा 'सिलसिला' रिलीज झाला. त्यावेळी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर फार काही कमाई केली नाही, पण आज हा सिनेमा एक 'कल्ट' म्हणून ओळखला जातो.

स्मिता पाटील यांची नाराजी

मात्र हा 'सिलसिला' इथंच थांबला नाही. यश चोप्रांनी रेखाच्या भूमिकेसाठी परवीन बाबी आणि जया बच्चन यांच्या भूमिकेसाठी स्मिता पाटील यांना आधी साइन केलं होतं.

झालेला बदल या दोघींना कळवायचा होता. पण साइन केलेल्या कलाकारांना 'आता तुम्ही या चित्रपटाचा भाग नाहीये' हे सांगणं यश चोप्रांसाठी अत्यंत कठीण काम होतं.

यश चोप्रांनी आपलं म्हणणं परवीन बाबींपर्यंत पोहोचण्यासाठी एका कॉमन मित्राची मदत घेतली.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

परवीन तेव्हा श्रीनगरमध्ये शूटिंग करत होती, तेव्हा यश चोप्रा शूटिंग करण्यासाठी श्रीनगरलाच चालले होते.

त्या इंटरव्ह्यूमध्ये यश चोप्रांनी सांगितलं, "मी श्रीनगर एअरपोर्टवर पोहोचलो, तेव्हा परवीन तिथेच होती. ती आपल्या फ्लाइटची वाट पाहात होती. श्रीनगरचं विमानतळ लहान होतं. मला पाहून परवीन माझ्याजवळ आली आणि मला म्हटलं- यश जी, तुम्हाला मला चुकवायची गरज नाहीये. तुम्ही सिनेमासाठी जे करताय ते चांगलं आहे. पण माझ्यावर एक सिनेमा उधार राहिला."

अशाप्रकारे परवीन बाबीची समस्या सुटली. पण स्मिता पाटील यांना ही गोष्ट कळवणं बाकी होतं.

स्मिता पाटील

फोटो स्रोत, Getty Images

शशी कपूर 'सिलसिला'मध्ये काम करत होते आणि यश चोप्रांचे जीवलग मित्र होते. त्यामुळे यश चोप्रांनी शशी कपूरनाच विनंती केली की, त्यांनी स्मिताला ही गोष्ट सांगावी. थोडे आढेवाढे घेऊन शशी कपूर तयार झाले आणि त्यांनी स्मिता पाटीलला ही गोष्ट सांगितली.

काही काळानंतर एका शूटिंगदरम्यान स्मिता पाटील आणि यश चोप्रा एकमेकांसमोर आले.

आपल्या मुलाखतीत यश चोप्रांनी सांगितलं, "स्मिता माझ्याकडे आली आणि मला म्हटलं- यश जी, जर तुम्ही स्वतः मला चित्रपटात मी नसेन हे सांगितलं असतं तर मला अजिबात वाईट वाटलं नसतं. पण तुम्ही शशीककडून मला निरोप पाठवला.

स्मिता हे बोलल्यानंतर मी काय म्हणणार होतो. विचित्र वाटत होतं. कोणालाही नाही म्हणणं मला अवघडच वाटायचं

अशा तऱ्हेनं स्मिता पाटील आणि परवीन बाबीच्या जागी जया आणि रेखा यांना घेऊन 'सिलसिला' पूर्ण झाला.

स्वित्झर्लंड आणि शिफॉन साड्या

80 च्या दशकामध्ये फासले आणि विजय सारखे मारधाडपट केल्यानंतर यश चोप्रांना अपयशही झेलावं लागलंय.

1989 साली 'चांदनी'च्या निमित्तानं यश चोप्र पुन्हा रोमँटिक चित्रपटाकडे वळले. सिनेमा हिट झाला आणि त्यानंतर यश चोप्रांनी 'किंग ऑफ़ रोमान्स' म्हटलं जाऊ लागलं.

त्यानंतर त्यांनी 'डर' सारखा सायको थ्रिलरही बनवला. पण दिल तो पागल है, वीर झारा, जब तक है जान या सिनेमांच्या केंद्रस्थानी रोमान्सच होता.

धूल का फूल आणि धर्मपुत्रसारख्या चित्रपटातून सामाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या यश चोप्रांच्या नंतरच्या चित्रपटातून स्वित्झर्लंड, शिफॉन साड्या, सरसों के खेत दिसायला लागले...किंबहुना यशराज बॅनरची हीच ओळख बनली.

त्यांचे चित्रपट सामाजिक विषयांपासून दूर जात होते, पण यश चोप्रांचे चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यापासून लांब राहिले नाहीत.

यश चोप्रांनी स्वतःला काळाप्रमाणे बदललं. कदाचित त्यामुळेच 80 वर्षांपर्यंत 22 चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या यश चोप्रांचा फिल्मी सिलसिला 60 वर्षांचा होता.

नोव्हेंबर 2012 मध्ये यश चोप्रांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा सिनेमा 'जब तक है जान' रिलीज झाला. पण त्या आधीच काही दिवस 21 ऑक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)