अमिताभ बच्चन असो की धर्मेंद्र, 'शोले'मध्ये प्रत्येकाला हवा होता दुसराच रोल

फोटो स्रोत, PENGUIN
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी.
शोले फिल्म जेव्हा रिलीज झाली होती तेव्हा मिनर्व्हा थिएटरपासून ताडदेव ब्रिजपर्यंत प्रेक्षकांची हायतोबा गर्दी लोटली होती. पिक्चर बघण्यासाठीची ती रांग एवढी मोठी असायची की मिनर्व्हाजवळच्या बस स्टॉपचं नामकरण 'शोले स्टॉप' असं झालं होतं.
मिनर्व्हा थिएटरचे मॅनेजर सुशील मेहरांचा तर दिवस सुरू व्हायचा सकाळी 8 वाजता आणि संपायचा रात्री 8 वाजता. पिक्चर एवढा तुफान चालत होता की, त्यांना घरी जायलाच मिळेना. म्हणून त्यांनी सिनेमा हॉलच्यावर असलेल्या दोन खोल्यांमध्ये आपल्या कुटुंबाची राहायची सोय केली. जेणेकरून घरी येण्याजाण्याचा ताप वाचेल.
'शोले'ने लोकांना असं काही वेड लावलं होतं की, पंजाबातून लोक दिल्लीच्या प्लाझा सिनेमापर्यंत खचाखच भरलेल्या बसेसमधून यायचे. त्या गाडीवर 'शोले स्पेशल' असं लिहिलेलं असायचं. लेखिका अनुपमा चोप्रा त्यांच्या 'शोले द मेकिंग ऑफ द क्लासिक' पुस्तकात लिहितात, '15 रुपयांचं बाल्कनीचं तिकीट 200 रुपयांना विकलं जात होतं.
भारतीय सिनेमाच्या इतिहासात 100 रुपयांपेक्षा जास्त दराने तिकीट लावून सुद्धा सिनेमा हाऊसफुल्ल होण्याची ही पहिलीच वेळ होती. एकदा तर मुंबईत एवढा तुफ्फान पाऊस पडला की, मिनर्व्हा थिएटर पाण्याने तुडुंब भरलं. थिएटरच्या लॉबीत चार फूट पाणी शिरलं. पण तेवढ्या पावसातही लोक आपल्या एका हातात आपले जोडे घेऊन दुसऱ्या हाताने पॅन्टवर करून पिक्चर बघायला थिएटरकडे जात होते. पिक्चरमधले डायलॉग लोकांच्या लक्षात होतेच पण त्यांनी साउंड इफेक्टही लक्षात ठेवले होते.'
या 'शोले'च्या जीवावर एका दिल्लीकराने घर बांधल्याच्या गोष्टीसुद्धा सांगितल्या जातात. दिल्लीच्या प्लाझा सिनेमाची तिकिटे ब्लॅकमध्ये विकणाऱ्या या माणसाने 'शोले'ची तिकिट पाच महिन्यापर्यंत 150 रुपयांना विकली. त्या कमावलेल्या पैशातून त्याने सीलमपूरमध्ये स्वत:साठी एक छोटेसे घर बांधलं आणि शोलेच्या पोस्टर्सने सजवलं.
फॉर्म्युला फिल्म क्लासिकमध्ये बदलला
मुंबईतल्या मिनर्व्हा थिएटरमधून शोले पाच वर्ष काही उतरला नाही. पिक्चर रिलीज होऊन 240 आठवडे झाले होते मात्र पिक्चरची घोडदौड वेगातचं होती. या पिक्चरने अनेकांचं आयुष्य बदललं. शोले रिलीज होऊन 47 वर्ष उलटली पण बॉक्स ऑफिसवर सक्सेसचा जो बेंचमार्क तयार झाला तो अजूनही कोणाला मोडता आला नाही.
या चित्रपटातले सूरमा भोपाली, जेलर, कालिया आणि सांभा हे कॅरेक्टर्स कायमचे अजरामर झाले. हे तर काहीच नाही, धन्नो नावाची घोडीसुद्धा लोकांच्या अजून लक्षात आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर एकेठिकाणी म्हणतात, "भारतीय सिनेसृष्टीची जर इतिहासाकालीन विभागणी केली तर शोले इसवीसन पूर्व आणि शोले इसवीसन अशी होईल. शोलेने एका बी ग्रेड प्लॉटचं भव्य अशा बिग बजेट फिल्ममध्ये रूपांतर केलं.
भारतीय सिनेजगताला फॉर्म्युला चित्रपट क्लासिक चित्रपटात कसा बदलायचा हे सुद्धा शोलेमुळे समजलं. जाहिरात जगतातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व पीयूष पांडे यांनी या चित्रपटाला देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हटलंय. पिक्चरचा प्रत्येक डायलॉग आजही लोकांच्या तोंडात बसलाय. शोलेच्या चाहत्यांनी हा चित्रपट पन्नास, साठ नाही सत्तर वेळा पाहिल्याचा दावा केलाय.

फोटो स्रोत, PENGUIN
गब्बरसोबत हत्यारांची डील करणारी व्यक्ती फक्त 30 सेकंदांसाठी स्क्रीनवर आलेला असतो, त्याचं ही नाव लोकांना माहितीय. लोक तर गब्बरच्या वडिलांनाही विसरलेले नाहीत. कोर्टात गब्बरच्या विरोधात निकाल आलेला असतो. त्या निकालात 'गब्बर सिंग, हरिसिंगचा मुलगा' या वाक्यामुळे हे वडील लक्षात राहिले.
शोलेमध्ये छोटासाच रोल करणाऱ्या मॅकमोहनने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'न्यूयॉर्क एअरपोर्टवर पैलवानासारख्या दिसणाऱ्या एका इमिग्रेशन ऑफिसरने मला प्रश्न न विचारताचं सोडलं होतं. कारण काय ? तर त्याने शोले पाहिला होता आणि त्याला सांभा माहीत होता.'
पाटण्यात तर लोकांनी त्यांच्या ऑटोरिक्षांना 'धन्नो' नाव दिलं होतं. बऱ्याच फाईव्ह स्टार हॉटेल्समधल्या ड्रिंक्सना 'गब्बर'चं नाव दिलं होतं. सबंध भारतभरातल्या कॉलेज कॅन्टीनमध्ये, एखादा मुलगा आणि मुलगी सोबत दिसले की त्यांना 'बहुत याराना लगता है' असा टॉन्ट हमखास पडायचा.
गब्बर सिंगची व्यक्तिरेखा वास्तविक आयुष्यातून प्रेरित होती
सलीम आणि जावेद या जोडगळीने चार ओळींमध्ये मांडलेली चित्रपटाची संकल्पना रमेश सिप्पीना जाम आवडली. त्यांनी या चार ओळी 15 दिवसांत तीन तासांच्या चित्रपटात बदलण्याची जबाबदारी या जोडगळीवर सोपवली. या तिघांवरही हॉलिवूडमधील 'बच कॅसिडी', 'द मॅग्निफिसेंट सेव्हन' आणि जपानी दिग्दर्शक अकिरा कुरुसावाच्या 'सेव्हन समुराई' या चित्रपटांचा खूप प्रभाव होता.
गब्बर सिंग हे नाव खर्या डाकूच्या नावावरून घेण्यात आलं होतं. इंदूरमध्ये डीआयजी असलेले सलीम खान यांचे वडील पन्नासच्या दशकात ग्वाल्हेरच्या आसपास खेड्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका खुंखार डाकूची गोष्ट त्यांना सांगायचे. तो डाकू म्हणे पोलिसांना पकडून त्यांचे नाक-कान कापायचा.

फोटो स्रोत, PENGUIN
गब्बर बाबत अजून एक गोष्ट सांगितली जाते. ती म्हणजे त्याला खाकी रंगाचा इतका तिरस्कार होता की, त्याने एकदा एका पोस्टमनला पकडून त्याचा चेहरा खराब केला होता. तो पोस्टमन सांगत राहिला की, तो पोलीस नाहीये पण गब्बरने काही त्याच ऐकलं नाही. सूरमा भोपाली ही व्यक्तिरेखा जावेद अख्तर यांना भोपाळमध्ये सापडली होती.
जय आणि वीरू ही सलीमच्या कॉलेजच्या दिवसांतील मित्रांची नावं होती. यात कॉइनचा जो सीन होता तो 'गार्डन ऑफ एव्हिल' या चित्रपटातून प्रेरित होता. सलीम आणि जावेद यांना कशाचीही हुबेहूब नक्कल करायची नव्हती. मूळ चित्रपटातला सीन आहे त्यापेक्षा भारी लिहिणं खरं तर कौशल्याचं काम होतं आणि ते त्यांनी पार पाडलं.
अमिताभला चित्रपटात कास्ट करण्याविषयी अनेकांचा विरोध असताना देखील सिप्पीनी त्याला घेतलंच. हेमा मालिनी टांगेवालीचा रोल करण्यासाठी फारशी उत्सुक नव्हती. चित्रपटातल्या साडेपाच सीन्ससाठी हेमा मालिनीला कास्ट करणं अवघड होतं. कारण हेमा त्यावेळची टॉपची अभिनेत्री होती. हेमाने तिचा रोल छोटा असल्याचं कारण जेव्हा दिलं तेव्हा 'हा संजीव आणि गब्बरचा चित्रपट आहे. पण तुझी भूमिकाही तेवढ्याच ताकदीची आहे.' असं रमेश सिप्पीनी तिला समजावलं.
आता वीरुच्या मित्राचा रोल कोण करणार असा प्रश्नही समोर आला. हा रोल शत्रुघ्न सिन्हा यांना मिळावा, अशी सर्व वितरकांची इच्छा होती. पण सलीम जावेद सुरुवातीपासूनच अमिताभ बच्चनला घेण्याच्या बाजूने होते. अमिताभचा सुपर फ्लॉप चित्रपट 'रास्ते का पत्थर' तीनदा पाहणारा आणि अमिताभ यांच्यात भरपूर क्षमता असल्याची खात्री पटलेली बहुधा सलीम भारतातली एकमेव व्यक्ती होता.
दुसरीकडे, अमिताभ बच्चनला ऑल इंडिया रेडिओच्या साऊंड टेस्ट ऑडिशनमध्ये फेल केलं होतं. आणि 'रेश्मा और शेरा' या त्यांच्या पहिल्याच चित्रपटात मुक्या माणसाचा रोल केला होता. पण प्रकाश मेहरांच्या जंजीर या सिनेमात अमिताभला घ्यायला लावून सलीम आणि जावेद या जोडगळीने अमिताभवर पुन्हा एकदा विश्वास ठेवला होता.
दुसरीकडे रमेश सिप्पी यांनीही अमिताभचा बॉम्बे टू गोवा, आनंद हे चित्रपट पाहिले होते. हे चित्रपट पाहून अमिताभच्या ऍक्टिंग स्किल्सने ते प्रभावित झाले होतेच. पण जयचा रोल आपल्याला मिळावा म्हणून रमेश सिप्पींकडे शिफारस करावी, असं अमिताभने धर्मेंद्रना सांगितलं होतंच.
गब्बरच्या भूमिकेसाठी डॅनी होता पहिली पसंती
ठाकूरच्या भूमिकेसाठी प्राण हा सर्वात मोठा दावेदार मानला जात होता. पण रमेश सिप्पींच मत होतं की, प्राणपेक्षा संजीव कुमार अर्थातच चांगला पर्याय ठरेल.
जया भादुरीला जो विधवेचा रोल ऑफर करण्यात आला होता तो कागदावर पण कमीच होता. आणि फुटेजच्या बाबतीत बोलायला गेलं तर हा रोल हेमा मालिनीपेक्षाही छोटा होता.

फोटो स्रोत, PENGUIN
भूमिकेबद्दल जया फारशी उत्सुक नव्हती. पण त्यावेळी जयाशिवाय ही भूमिका दुसरं कोणीही चांगल्या पद्धतीने वठवू शकणार नाही यावर रमेश सिप्पी ठाम होते. आणि याच दरम्यान जयाची अमिताभ बच्चन यांच्याशी जवळीक वाढत होती.
या चित्रपटामुळे आपल्याला थोडा वेळ आणखीन सोबत घालवता येईल असं म्हणून अमिताभने जयाला या रोलसाठी तयार केलं. आता राहिला होता गब्बरसिंग. याच्या रोलसाठी रमेश सिप्पींची पहिली पसंती होती डॅनी डेंगझोग्पा. सिप्पींच्या या निवडीबाबत जावेद फारसे खुश नव्हते. डॅनीने त्याच वेळी फिरोज खान यांचा 'धर्मात्मा' हा चित्रपटही साइन केला होता. हा चित्रपट फ्रान्सिस फोर्ड कपोलाच्या क्लासिक 'गॉडफादर'वर आधारित होता. डॅनीला दोन्ही चित्रपट करायचे होते.
रमेश सिप्पींनी गब्बरसाठी अमजद खानला फायनल केलं
आता या अवघड परिस्थितीतून मार्ग काढावा म्हणून सिप्पींनी आपले सचिव मदन अरोरा यांच्यावर जबाबदारी टाकली. मदन यांनी फिरोज खान यांना गाठून सांगितलं की, तुम्ही तुमच्या चित्रपटाच्या तारखा थोड्या पुढं ढकला. फिरोज खान यांनी ही गोष्ट काही मान्य केली नाही. मदन, फिरोज आणि रमेश यांनी यावर खूप विचारविनिमय केला पण यावर तोडगा काही निघाला नाही. उलट झालं असं की, या सगळ्यात फिरोज खान डॅनीवर रागावले.
या सगळ्यात डॅनीने गब्बरच्या भूमिकेसाठी नकार कळवला. आणि इथूनच अमजद खानची एन्ट्री झाली. सिप्पींनी त्या काळातील लोकप्रिय खलनायक रणजीत आणि प्रेम चोप्रा यांच्याबद्दलही विचार केला होता. पण त्यांना या भूमिकेसाठी वेगळं असं जे पाहिजे होतं ते काही मिळत नव्हतं. शेवटी शेवटी तर त्यांनी प्रेमनाथला ती भूमिका देण्याचा विचार केला. पण एव्हाना प्रेमनाथचं वजन आवाक्याबाहेर गेलं होतं, आणि ते मूडी बनले होते. त्यामुळे प्रेमनाथचा विचारही वगळण्यात आला.

फोटो स्रोत, Getty Images
अमजदचा ट्रॅक रेकॉर्ड इतका काही चांगला नव्हता, पण तो थिएटरमध्ये फेमस होता. त्याला दाढी वाढवून यायला सांगितलं. भूमिकेचा सखोल अभ्यास करण्यासाठी अमजदनेही जोर लावला. रोल टेस्ट द्यायला येताना त्याने जया भादुरीचे वडील तरुण भादुरी यांचं चंबळच्या डाकूंवर लिहिलेलं 'अभिषप्त चंबल' हे पुस्तक वाचलं होतं. एका हिरोला दुसऱ्या हिरोचा रोल करायचा होता.
स्क्रिप्ट कागदावर उतरवणं हे जावेद यांचं काम होतं. पण त्यांचं अक्षर इतकं खराब होतं की, ते धड वाचताही येत नव्हतं. ते उर्दूमध्ये लिहायचे ज्याचं हिंदीत भाषांतर त्यांचे सहाय्यक खलिश करायचे. यानंतर त्यांचा एक दुसरा सहाय्यक अमरजीत या सगळ्याचा सारांश इंग्रजीत एका ओळीत लिहायचा.
गब्बरची भाषा अवधी मिश्रित खडी बोली होती. त्याचे शब्द रुक्षपणाने भरलेले होते. आणि त्यांच्या निवडीत चपलखपणा दिसून येत होता.
म्हणजे लेखकाला सांगायचं होतं की, गब्बरच्या डोक्यावर 50000 रुपयांचा इनाम आहे. ही गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखकाने गब्बरचा अहंकार निवडला. गब्बरमध्ये स्वतःबद्दलचा अहंकार इतका होता की, त्याने ही गोष्ट आपल्या एका चमच्यामार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली.
गब्बरचा डायलॉग होता, ''अरे ओ सांभा कितना ईनाम रखे है सरकार हम पर ?' 'पूरे पचास हज़ार.' 'सुना, पूरे पचास हज़ार.'

फोटो स्रोत, PENGUIN
अनुपमा चोप्रा लिहितात की 'गब्बरची भूमिका इतकी दमदार होती की अमिताभने स्क्रिप्ट ऐकली तेव्हा त्यांना गब्बरची भूमिका करायची होती. संजीव कुमार यांचंही तेच मत होतं.'
स्क्रिप्ट एवढी सुंदर झाली होती की, प्रत्येक अभिनेत्याला दुसऱ्याची भूमिका करायची होती. धर्मेंद्र, ठाकूरच्या भूमिकेने इतके प्रभावित झाले होते की त्यांना ही भूमिका स्वतःच करायची होती.
जेलरच्या भूमिकेसाठी असरानी यांची निवड झाली होती. जावेदने त्यांना या भूमिकेतील बारकावे समजावून सांगितले. सलीम जावेदने चित्रपटातल्या डाकूंची प्रतिमाच बदलून टाकली होती.
सुरुवातीच्या काळातले फिल्मी डाकू माँ भवानीची पूजा करायचे, धोतर नेसायचे, भली मोठी पगडी घालायचे आणि कपाळावर चार इंच टिळा लावायचे. सलीम जावेदने मात्र गब्बरला नवा लूक दिला. गब्बरला लष्कराच्या वेशात दाखवलं. तर वीरू आणि जय डर्टी जीन्स घातलेले दाखवले.
दक्षिणेत झालं शोलेचे शूटिंग
रमेश सिप्पींना चंबळचं खोरं आवडत नव्हतं. ठाकूरच्या घरातून अख्खं गाव दिसेल अशा जागेच्या ते शोधात होते. रमेश सिप्पींनी ही जबाबदारी आर्ट डायरेक्टर राम येडेकर यांच्यावर सोपवली.
यापूर्वी डाकूंवर आधारित कोणत्याही चित्रपटाचं शूटिंग दक्षिणेत झालं नव्हतं. येडेकर लोकेशनच्या शोधात दक्षिणेकडे निघाले. खूप साऱ्या प्रयत्नांनंतर त्यांना बंगळुरूपासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या रामनगरमची निवड केली.
आर डी बर्मन यांच्यावर शोलेच्या संगीताची जबाबदारी
चित्रपटासाठी गाण्याची जबाबदारी आर डी बर्मन यांच्यावर येऊन पडली. आर डी बर्मन यांनी पहिल्यांदा तर गाण्याचं म्युझिक तयार केलं. या चालीवर आनंद बक्षी यांनी चित्रपटाची गाणी लिहिली. चित्रपटातल्या सर्व बड्या कलाकारांची राहण्याची सोय बंगळुरूमधल्या अशोका हॉटेलमध्ये करण्यात आली होती. प्रत्येक स्टारला एक सूट आणि कार देण्यात आली.

फोटो स्रोत, DINODIA PHOTOS/GETTY IMAGE
जेव्हा 'बॉम्बे टू गोवा'या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं तेव्हा अमिताभ बच्चन यांना टू स्टार हॉटेलमध्ये राहायला लागलं होतं.
शूटिंगचं ठिकाण हॉटेलपासून तासाभराच्या अंतरावर होतं. रमेश सिप्पी आणि सिनेमॅटोग्राफर दिवेचा सगळ्यात आधी सकाळी सहा वाजता शूटिंगसाठी बाहेर पडायचे. बंगळुरूहून रामनगरमला दररोज सुमारे दीडशे लोक जायचे. संजीव कुमार उशिरा उठायचे त्यामुळे त्यांचं शूटिंग संध्याकाळी ठेवलं जायचं. पिक्चरच्या सेटवर जवळपास 200 लोकांचं जेवण बनायचं.
'शोले'ची रेकॉर्डब्रेक कमाई
मिनर्व्हा थिएटरमध्ये सलग पाच वर्ष शो हाऊसफुल्ल चालू होता. पण, रमेश सिप्पीचा 'शान' हा पुढचा चित्रपट रिलीज होणार म्हणून शोलेचे शो थांबवण्यात आले.
1975 च्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये तर शोले असून नसल्यासारखा होता. नाही म्हणायला चित्रपटाला बेस्ट एडिटिंगचा पुरस्कार मिळाला. पण तो ही नावापुरताच. सर्वात जास्त पुरस्कार मिळाले होते दिवारला.
पण बॉक्स ऑफिसवर शोलेने जो काही धुमाकूळ घातला होता त्याची बातच काही और होती. शोलेने त्याच्या पहिल्या रिलीजमध्येच 35 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या नंबरवर असणाऱ्या 'जय संतोषी माँ' या चित्रपटाने जवळपास 6 कोटींची कमाई केली. शोलेचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड पुढच्या 19 वर्षात कोणाला मोडता आला नव्हता. हा रेकॉर्ड मोडला 1994 मध्ये आलेल्या 'हम आपके है कौन' या चित्रपटाने.
जीपी सिप्पी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, संपूर्ण जगात शोले पाहणाऱ्यांची संख्या भारताच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त होती.
या चित्रपटात छोटीशीच भूमिका साकारणारे विजू खोटे. त्यांच्या मृत्यूपर्यंत तरी त्यांना त्यांच्या ऑन स्क्रीन 'कालिया' या नावानेच ओळखलं जायचं. काही वेळा असं व्हायचं की, विजू खोटे रस्त्यावरून जातं असताना लोक त्यांना ओळखायचे आणि कालिया अशी हाक मारायचे. हे नाव ऐकून खोटेंच्या मुलाला वाईट वाटायचं. तेव्हा ते त्यांच्या मुलाला सांगायचे, या नावामुळेच आपल्या आपली भाकरी मिळते.
सांभाचा रोल प्ले करणारे मॅकमोहन एकेठिकाणी म्हटलं होतं की, "या नावामुळे मी माझी खरी ओळखच गमावली. आजही जेव्हा लोक माझा ऑटोग्राफ घ्यायला येतात तेव्हा मी मॅकमोहन असं लिहिलं की लोक माझ्याकडे आश्चर्याने पाहतात. माझं खरं नावही सांभाचं आहे असं त्यांना वाटतं."
जेव्हा शोलेने आपली डायमंड ज्यूबली सेलिब्रेट केली तेव्हा रमेश सिप्पी यांनी त्यांचे सिनेमॅटोग्राफर द्वारका दिवेचा यांना फियाट कार भेट दिली. चित्रपटातल्या मुख्य कलाकारांना हिरे जडीत सोन्याचे ब्रेसलेट गिफ्ट म्हणून देण्यात आले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








