देबिना बॅनर्जी : 7 वर्षांचे प्रयत्न, आयव्हीएफ आणि मग नैसर्गिकरित्या गरोदर राहून आई होण्याची गोष्ट

फोटो स्रोत, Instagram/Debina Bonnerjee
गेल्या 15 वर्षांपासून हिंदी टीव्हीवर सक्रीय असणारी देबिना बॅनर्जी घराघरातला एक ओळखीचा चेहरा आहे.
आपल्या करियरच्या सुरुवातीला तिने छोट्या पडद्यावर सीतेची भूमिका वठवली होती. याच सिरीयलमध्ये रामाची भूमिका करणाऱ्या गुरमीत चौधरीशी तिने 2011 साली लग्न केलं होतं.
यावर्षी सात एप्रिलला ती पहिल्यांदा आई बनली. तिच्या मुलीचं नाव लियाना आहे. देबिना आता दुसऱ्यांदा आई बनणार आहे. पण आई होण्यासाठी तिला खूप काळ वाट पाहावी लागली.
तिचा आई होण्याचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल. लग्नानंतर तब्बल 10 वर्षं आई न बनू शकलेल्या देबिनाला समाज, कुटुंब आणि नातेवाईकांच्या अपेक्षांचं दडपण सहन करावं लागलं होतं.
तिला आरोग्याच्याही अनेक समस्या होत्या आणि आता जेव्हा ती दुसऱ्यांदा गरोदर आहे. तिने आपले अनुभव मोकळेपणाने मांडले आहे. बीबीसी हिंदीसाठी नयनदीप रक्षितने देबिना बॅनर्जीसोबत खास बातचीत केली आहे.
'लग्न झालं म्हणजे करियर संपलं असं नाही'
देबिना म्हणते, लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की या गोष्टी नका करू पण कोणी हे सांगत नाही, की एखादी गोष्ट वेळेवर केली नाही तर त्याचे काय काय तोटे असू शकतात.
अभिनयाच्या क्षेत्रात आपलं करियर घडवण्यासाठी आलेल्या देबिना म्हणते की मुंबई आल्यानंतर त्यांची प्राथमिकता त्यांचं करियर होती.
"करियरमध्ये गॅप घेतला तर पुन्हा नव्याने काम कुठून सुरू करायचं हा प्रश्न पडतो. आपल्याला वाटतं की आपण आता (आई बनण्याआधी) ज्या वेगाने काम करतोय त्या वेगाने पुन्हा काम करू शकू की नाही. माझ्या पिढीत आता विचार थोडे बदलले आहेत नाहीतर आधी हाच विचार केला जायचा की लग्न झालं म्हणजे करियर संपलं."
'आपल्या शरीराबद्दल किती कमी माहिती'
आई बनण्याचा निर्णय घेतला त्याबदद्ल त्या म्हणतात, "जेव्हा मला वाटलं की आता बाळ झालं पाहिजे तेव्हा आमचे सुरुवातीचे काही प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत.
मग मला वाटलं की मी डॉक्टरकडे जायला हवं. डॉक्टरकडे गेल्यावर मला कळलं की मला स्वतःच्या शरीराबद्दल किती कमी माहिती आहे."

फोटो स्रोत, Instagram/Debina Bonnerjee
देबिना म्हणते की त्या स्वतःला शारीरिक आणि मानसिकरित्या तंदुरुस्त समजत होत्या पण तरीही काही आरोग्यविषयक समस्या उद्भवल्या तेव्हा त्यांना स्वतःबद्दल नव्याने विचार करायला भाग पाडलं."
"मला आधी वाटायचं मी सशक्त आहे, मानसिकरित्या कणखर आहे. मी चांगलं अन्न खाते, तरीही मला इतके त्रास का? कितीतरी गोष्टींची नावंही मी आधी ऐकली नव्हती उदाहरणार्थ - एंडोमेट्रियोसिस, एडिनोमायोसिस. या अशा गोष्टी आहेत ज्यावर काहीही उपचार नाहीत. त्यांच्यासहच जगावं लागतं."
देबिनाच्या मते अनेक महिलांना त्यांच्या शरीराविषयी काहीही माहिती नसते.
याचं एक उदाहरण देताना त्या म्हणतात की, "पाळीच्या दिवसात त्रास होतो, तो निम्म्याहून जास्त लोकांना नॉर्मल वाटतो. मला आधी त्रास व्हायचा नाही पण नंतर व्हायला लागला. नंतर माझ्या लक्षात आलं की मला जो त्रास होत होता तो एंडोमेट्रियोसिस, एडिनोमायोसिससारखे त्रास सुरू झाले त्यामुळे मला त्रास व्हायला लागला."
मासिक पाळीच्या काळात थोड्याफार वेदना होणं हा सामान्य गोष्ट आहे पण अतित्रास होत असेल तर तो एंडोमेट्रियोसिस नावाचा आजार आहे.
मासिक पाळीच्या काळात गर्भपिशवीजवळ रक्त जमा होतं. फर्टिलिटीच्या काळात स्पर्म मिळाले नाही तर हे रक्त शरीरातून बाहेर टाकलं जातं . बऱ्याचदा या रक्तपेशी फॅलोपियन ट्यूब, आतडी अशा ठिकाणी जमा होतात.
काही केसेसमध्ये तर या पेशी फुफ्फुसं, डोळे, मेंदू आणि मणका या भागातही आढळून आले आहेत. डोळ्यांच्या बाहुल्या हा शरीराचा एकच अवयव आहे जिथे या पेशी आढळलेल्या नाहीत.
एंडोमेट्रियोसिसचं दुखणं असेल तर मासिक पाळीच्या काळात खूप रक्तस्राव होतो. थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, तसंच मणक्याचा खालचा भाग आणि माकड हाड दुखतं.
सततचे प्रयत्न आणि त्याचे परिणाम
देबिना आणि गुरमीत यांनी 7 वर्षांपूर्वी आपल्याला बाळ होऊ देण्याचा निर्णय घेतला. 6 वर्षांपूर्वी देबिना डॉक्टरचा सल्ला घेण्यासाठी गेली.
या 6 वर्षांच्या दीर्घ काळात त्यांनी कमीत कमी 4-5 वेळा आययूआय सायकल आणि 3 वेळा आयव्हीएफ करून घेतलं. चौथ्यांदा त्या यशस्वी झाली.
देबिना म्हणते, "आणखी एक महत्त्वाची गोष्ट. या काळात कुटुंब, मित्रपरिवार, फॅन्स आणि ट्रोल्स सगळ्यांचा दबाव एकत्र आला. यामुळे मानसिक ताण वाढायला लागतो. म्हणूनच बाळ होण्याच्या देशपरदेशातल्या अनेक उपचारपद्धती सुरू झाल्या आहेत. मी पण अनेक उपचार घेतले."
इतकं सगळं करूनही जर आई बनले नाही तर त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो असंही देबिना म्हणते. "एकेक दिवस वाट पाहावी लागते, ते फार कठीण असतं."
अशा परिस्थितीत कुटुंब आणि आपल्या पार्टनरचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो असंही देबिना म्हणते. "मला सुरुवातीच्या काळात ज्या अडचणी आल्या त्या मी फक्त आईला आणि गुरमीतला सांगितल्या."

फोटो स्रोत, Instagram/Debina Bonnerjee
"गुरमीत स्वतः बिझी असायचा आणि मला म्हणायचा की तू पण त्याकडे इतकं लक्ष देऊ नको. त्याने मला खूप सपोर्ट केला तरीही मी आईसमोर किंवा त्याच्यासमोर रडायचे. पण सार्वजनिकरित्या मी कधी माझा त्रास कोणाला सांगितला नाही."
मातृत्वाचा अनुभव
आई बनण्याचा अनुभव खूपच खास आहे असं ती म्हणते. जेव्हा तिला कळलं की ती गरोदर आहे तेव्हा आधी तिचा विश्वासच बसला नाही.
"आता असं वाटतं की देव मला आधीपासूनच संकेत देत होता. पण आम्ही दोघांनी त्याचा आनंद साजरा केला नाही. कारण आधी आम्हाला यात अपयश आलं होतं. त्यामुळे आम्ही सगळे टप्पे पार पडल्यावरच आनंद साजरा करणार होतो. इतरांच्या गरोदरपणात बातमी कळताच आनंदोत्सव सुरु करतात तसं आम्ही केलं नाही. आम्ही आनंदित होतो, पण वेळ घेत होतो. 3-4 महिन्यांनंतर जेव्हा कळलं की सगळं ठीक आहे, तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला."
ट्रोलिंगवर काय मत?
देबिना बॅनर्जीला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागतं. ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे.
तिचं म्हणणं आहे. "लियानाचा जन्म झाला तेव्हाच लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली. मी तिचा कडेवर घेतलेला एक व्हीडिओ पोस्ट केला तर लोक म्हणाले, तुला बाळ धरता येत नाही. मी आई आहे, मला माझं बाळ उचलता येणार नाही का?"
पहिल्या मुलीनंतर देबिनाला लगेचच दुसऱ्यांदा गरोदर राहिली. त्यामुळे तिला हेही ऐकावं लागलं की दोन मुलांमध्ये इतकं कमी अंतर असेल तर ती दोन्ही मुलांकडे कसं लक्ष देऊ शकशील?
यावर ती म्हणते, "लियानाकडे दुर्लक्ष होईल असं का वाटतं लोकांना? ज्यांची जुळी मुलं असतात ते आपल्या मुलांना कमी-जास्त प्रेम करतात का? आईसाठी तिची मुलं वेगळी नसतात."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








