मासिक पाळी : ती इतकी हिंसक झाली की सख्ख्या भावाच्या मुलांना विहिरीत फेकलं, पण का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
साधारण 41 वर्षांपूर्वी चंद्रा सती लजनानी हिच्या बाबतीत घडलेली एक गोष्ट. ही बाई राजस्थानमधल्या अजमेर जिल्ह्यातल्या एका गावातली राहाणारी होती. तिने गावातल्या तीन लहान मुलांचं अपहरण करून त्यांना विहिरीत फेकलं. त्यातली दोन मुलं तर वाचली पण एका मुलाचा मृत्यू झाला.
मासिक पाळीच्या काही दिवस आधी चिडचिड होते, किंवा खूपच इमोशनल व्हायला होतं. काहीच आवडत नाही, सगळ्यांचा राग येतो किंवा सगळे आपल्या वाईटावरच टपले आहेत अशी भावना निर्माण होते. जगातल्या बहुतांश महिलांना पाळीच्या आधी अशा प्रकारच्या भावना जाणवतात.
काहींच्या तीव्र असतात, काहींच्या मॅनेजेबल, तर काहींना फारसा त्रास होत नाही. पण मासिक पाळीच्या आधी मनात वेगवेगवेगळे विचार येणं, भावनांचा आवेग दाटणं अगदीच सामान्य गोष्ट आहे, विज्ञानालाही हे मान्य आहे, इनफॅक्ट याला एक नावही आहे. पीएमएस.
प्रीमेन्स्ट्रुअल स्ट्रेस सिंड्रोम.
आता तुम्ही म्हणाल ठीके बुवा, त्यात काय? बायका असतील तर म्हणतील आम्हाला सवय आहे, आणि पुरुष असतील तर ... ते जोक करतील.
पण हा प्रीमेन्स्ट्रुअल स्ट्रेस सिंड्रोम एक मानसिक अवस्था आहे, आणि तो खूप तीव्र स्वरूपात असला किंवा अनेक वर्षं दबून राहून त्यावर इलाज झाला नाही तर मोठा मानसिक आजार बनतो. इतका टोकाचा की बाई त्या भरात खूनही करू शकते किंवा आत्महत्याही.
चंद्रा सती लजनानी हिच्या बाबतीतही असंच घडलं. घडलेली एक गोष्ट. तिने आपल्याच भावांच्या मुलांना विहिरीत फेकली.
त्यातली दोन मुलं तर वाचली पण एका मुलाचा मृत्यू झाला.
तिला अटक झाली, केस कोर्टात गेली आणि जिल्हा सत्र न्यायालयाने तिला अपहरण, खून अशा गुन्ह्यांची दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा दिली.
या महिलने त्याच्याविरोधात राजस्थान हायकोर्टाच अपील केलं. कोर्टात तब्बल 35 वर्षं ही केस प्रलंबित होती आणि यातला बराचसा काळ चंद्रा जामिनावर बाहेर होती.
पण 2018 साली राजस्थान हायकोर्टाने तिला निर्दोष सोडलं. तिचा बचाव होता की पाळी येण्याआधीच्या प्रीमेन्स्ट्रुअल स्ट्रेस सिंड्रोममुळे तिचं मानसिक संतुलन हरवलं आणि त्या भरात तिने तो गुन्हा केला.
मग पाळी येणारी कोणतीही बाई इतकी हिंसक होऊ शकते का? पाळीच्या आधी त्रास होतो म्हणून महिलेचं मानसिक संतुलन इतकं हलू शकतं की ती खरंच खून करू शकते का? या प्रश्नाची उत्तरं तर शोधूच पण आधी जाणून घेऊ या केसमध्ये नक्की काय झालं आणि राजस्थान कोर्टाने काय म्हटलं ते.
त्या दिवशी नक्की काय झालं?
राजस्थान हायकोर्टाच्या निकालपत्रात त्या दिवशीच्या घटनेचं वर्णन आहे. 11 ऑगस्ट 1981 ला दुपारी चुनीलाल नावाचे एक गृहस्थ त्यांच्या कपड्यांच्या दुकानात बसले होते. एक माणूस धावत आला आणि म्हणाला की भोजराज की नाशिया या भागात असलेल्या एका विहिरीत एका सिंधी बाईने दोन मुलगे आणि एक मुलगी अशा तीन मुलांना ढकलून दिलं आहे आणि ती तिथून पळून गेली आहे.

याच चुनीलाल यांनी नंतर पोलिसात तक्रार दिली.
या मुलांची नावं होती उद्धवदास, देवकी आणि ओमप्रकाश. यांची वय साधारण 7 ते 10 अशी होती. उद्धवदास आणि देवकीला वाचवण्यात स्थानिकांना यश आलं, पण ओमप्रकाशचा यात मृत्यू झाला.
उद्धवदासने नंतर म्हटलं की, तिन्ही भावंड शाळेला निघाली होती, तिथे पोचल्यावर त्यांना 'सती आत्या' (चंद्रा) शाळेत आलेली दिसली.
तुम्हाला मंदिरात दाखवते असं सांगून तिने या मुलांना आधी मंदिरात नेलं आणि मग नशिया विहिरीपाशी आणलं. तिथे पोचल्यावर तिने या तिन्ही मुलांना विहिरीत ढकलून दिलं आणि तिथून पळून गेली.
ही घटना घडली तेव्हा चंद्राचं लग्नही झालं नव्हतं. तीही तरूणच होती. यथावकाश सत्र न्यायालयात केस उभी राहिली. चंद्राने म्हटलं की, तिच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. आता तिचं लग्न झालंय आणि तिला एक मुलगीही आहे, त्यामुळे तिला कोणतीही शिक्षा करू नये.
पण सत्र न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. केस राजस्थान हायकोर्टात गेली.
त्यावेळी तिच्या वकिलाने दावा केला की देवकी आणि उद्धवदास दोघेही घटना घडली तेव्हा अल्पवयीन होते, आणि लहान मुलांच्या साक्षीवर पूर्णपणे विश्वास ठेवता येणार नाही. त्यांना काहीही सांगून ते खरं आहे असं भासवता येऊ शकतं.
कोर्टात चंद्राच्या बाजूने असाही दावा केला गेला की, तिने या मुलांचा खून करण्यासाठी तिच्याकडे कोणताही हेतू नव्हता. उलट तिलाच प्रीमेन्स्ट्रुअल स्ट्रेस सिंड्रोम नावाचा मानसिक आजार आहे.
तिच्या बाजूने वकिलांनी कोर्टात म्हटलं की, तिला पाळी यायच्या काही दिवस आधी ती हिंसक व्हायची. या मुलांच्या बाबतीत तिने जे केलं, ते याच वेडाच्या भरात केलं.
भारतीय दंडविधान संहितेत एक कलम आहे. कलम 84, ज्यामध्ये म्हटलंय की एखाद्या व्यक्तीने मानसिक संतुलन हरवलेलं असताना, वेडाच्या भरात किंवा आपण काय करतोय हे कळण्याच्या अवस्थेत नसताना एखादा गुन्हा केला तर तो गुन्हा समजला जात नाही.
चंद्राच्या वकिलांनी याच कलम 84 चा फायदा तिला मिळावा आणि तिची सुटका करावी असा बचाव केला. त्यांनी असंही म्हटलं की तिला मानसिक आजार होता याचे पुरावे सरकारी वकिलांनाही सापडले होते, सत्र न्यायालयात केस चालू असताना त्यांच्यासमोर हे मुद्दे आलेही.
चंद्राच्या वकिलांनी डॉ महेश चंद्र अग्रवाल यांची साक्ष घेतली. डॉ अग्रवाल यांनी साक्षीत म्हटलं की, काही बायका त्यांची पाळी यायच्या आधी हिंसक होतात याचे पुरावे आढळले आहेत, त्यांच्या मनात या काळात आत्महत्येचेही विचार येतात. डॉ अग्रवाल यांनी असंही म्हटलं की त्यांनी चंद्रावर उपचार केले आहेत.
चंद्राच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की, तिला फिट्स यायच्या आणि मग ती कोणाच्याही अंगावर त्यांना मारायला धावायची. तिचे आईवडील तिला एका पीरबाबांकडे उपचारासाठी घेऊन जायचे. घटना घडली तेव्हा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की तिच्या तोंडातून फेस येत होता आणि ती वेड्यासारखं करत होती.
चंद्राच्या शाळेतल्या शिक्षिकेनेही साक्षीत म्हटलं की तिला शाळेतही फिट्स यायच्या, मग ती स्वतःचे कपडे फाडायची आणि विचित्र वागायची.
कोर्टापुढे दिलेल्या साक्षीत चंद्राने म्हटलं की तिला ही घटना घडल्यानंतर दोन दिवसात, म्हणजे 13 तारखेला पोलीस कस्टडीत असताना पाळी आली.

फोटो स्रोत, Getty Images
सरकारी वकिलांचा दावा होता की चंद्राचं चरित्र चांगलं नव्हतं. ती अनेकदा रात्री उशिरा घरी यायची आणि या तीन मुलांच्या आईवडिलांचा तिच्या वागण्याला आक्षेप होता. यामुळेच चिडून जाऊन तिने मुलांना विहिरीत फेकलं. सरकारी वकिलांचा दावा होता की तिला मानसिक आजार आहेत अशी कोणतीही लक्षणं आजवर दिसली नाहीत.
मासिक पाळी प्रत्येक स्त्रीला निसर्गतः येते आणि त्यामुळे तिचं मानसिक संतुलन बिघडलं असेल अशी शक्यता नाही. नाहीतर प्रत्येक स्त्री असंच वागली असती, असंही सरकारी वकिलांनी म्हटलं.
यावर निर्णय देताना राजस्थान हायकोर्टाने म्हटलं की, "हे खरंच आहे, या महिलेने तीन मुलांना विहिरीत ढकललं आणि त्यात एका मुलाचा मृत्यू झाला. पण ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा ही आरोपी महिलेचं मानसिक संतुलन ढळलं होतं की नाही हा कोर्टापुढचा प्रश्न आहे."
कोर्टाने म्हटलं होतं की प्रीमेन्स्ट्रुअल स्ट्रेस सिंड्रोम हा खरंच मानसिक आजार आहे का, आणि यामुळे ज्या महिलेने गुन्हा केला असेल त्या आरोपीला कलम 84 च्या अंतर्गत 'वेडेपणा' हा बचाव करता येऊ शकतो का यावर आता आम्ही निर्णय देऊ.
कोर्टाने सुप्रीम कोर्टाच्या काही निर्देशांचा आधार घेत म्हटलं की, "प्रीमेन्स्ट्रुअल स्ट्रेस सिंड्रोमबद्दल देशातला कायदा फारसा विकसित नसला तरी आरोपीला हा बचाव करण्याचा हक्क आहे. सुप्रीम कोर्टाने जे मानसिक संतुलन ढळण्याबद्दल, फिट्स आल्यानंतर आरोपीची मनस्थिती काय असते याबद्दल जे निर्देश दिलेत त्यानुसार हे लक्षात येतं की आरोपी कदाचित या मानसिक आजाराने त्रस्त होती. सरकारी वकील आरोपीचं मानसिक संतुलन ढळलं नव्हतं हे सर्व शंकाच्या पलीकडे जाऊन सिद्ध करू शकले नसल्याने आम्ही सत्र न्यायालयाने दिलेला निकाल बाजूला ठेवतो आणि आरोपीची मुक्तता करतो."
पीएमएस हा बचाव मान्य करून कोर्टाने आरोपीला निर्दोष सोडण्याची ही भारतातली पहिली केस होती.
जगात अशा घटना आधी घडल्या आहेत का?
प्रीमेन्स्ट्रुअल स्ट्रेस सिंड्रोम आणि त्या अनुषंगाने येणारा मानसिक आजार जगात अनेकदा कोर्टात बचावासाठी वापरला गेला आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर ज्या वर्षी भारतात ही घटना घडली, त्याच वर्षी दोन ब्रिटिश महिलांनी प्रीमेन्स्ट्रुअल स्ट्रेस सिंड्रोमचा बचाव करून खूनाच्या आरोपातून सुटका करण्याची मागणी केली.
सॅडी क्रॅडोक नावाची लंडनमधली एक महिला बारमध्ये काम करत होती. तिने रागाच्या भरात हिंसक होऊन तिच्यासोबत काम करणाऱ्या तीन महिलांना छातीत भोसकलं. ही घटना 1980-81 साली घडली.
याच सुमारास क्रिस्टीन इंग्लिश नावाच्या एका महिलेने तिच्या प्रियकराशी भांडण झाल्यानंतर त्याला कारने चिरडून ठार केलं. तिच्याही केसमध्ये प्री मेन्स्ट्रुअल स्ट्रेस सिंड्रोमचा बचाव केला गेला होता. या दोन्ही घटनांमध्ये डॉ कॅथरिना डाल्टन यांनी साक्ष दिली.
त्या काळात त्या पीएमएसबद्दलच्या जनजागृती करण्याचं काम करायच्या. त्यांनी प्रीमेन्स्ट्रुअल स्ट्रेस सिंड्रोमवर जेवढं काम केलं किंवा त्या बळी पडलेल्या महिलांबद्दल जनजागृती करण्याचं काम केलं, तेवढं क्वचितच कोणी त्या काळात केलं असेल.
त्यांच्या साक्षीमुळे या दोन्ही महिलांना खूनाची शिक्षा न होता, सदोष मनुष्यवधाची शिक्षा झाली. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांच्या गुन्ह्याची तीव्रता कमी समजली गेली कारण त्यांना आपण काय करतोय हे कळत नव्हतं असं कोर्टाने मान्य केलं.
प्रत्येक महिलेला इतका टोकाचा त्रास होतो का?
नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ असणाऱ्या डॉ गौरी पिंप्राळकर सांगतात की, "अनेकदा महिलांची मासिक पाळी चालू असते तेव्हा त्यांना चिडचिडेपणा, अस्वस्थ वाटणं, रडू येणं अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. 70 टक्के महिलांना पाळीच्या वेळेस मूड स्विंग अनुभवायला मिळतात आणि ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे.

मासिक पाळीचं चक्र पुढे-मागे झालं तर त्याचाही शरीरावर परिणाम होतो. म्हणजे समजा पाळी सात-आठ दिवस पुढे गेली तर तुमच्या शरीरात जडत्व येतं कारण पाळीसाठी महत्त्वाचा असणारा हार्मोन - प्रोजेस्टेरॉन - पाणी धरून ठेवतो, त्या माहिती देतात.
"त्यामुळेही पाळीच्या दिवसात आळस येणं, काही करावसं न वाटणं या गोष्टी होतात. हे अगदी साहजिक आहे."
पण या साहजिक गोष्टीला सहजरित्या घेतलं जात नाही. दोन प्रकारच्या भावना पाहायला मिळतात एकतर पीएमएसविषयी काहीच माहिती नाही, किंवा असेल तर त्याला सिरीयसली न घेता त्याची टर उडवली जाते.
पण हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. याच पीएमएसचा एक भयानक प्रकार आहे पीएमडीडी (PMDD) म्हणजे प्री-मेन्स्ट्रुअल डायस्फोरिक डिसऑर्डर. यात महिलांना अनेकदा आत्महत्या करण्याचे विचार येतात.
पाळीदरम्यान टोकाचं नैराश्य येणं, पॅनिक अॅटॅक येणं अशी लक्षणं दिसतात. पाळीतल्या हार्मोन बदलामुळे कोणत्याचं गोष्टीवर आपलं नियंत्रण नाही, सगळं हातातून सुटत चाललं आहे अशी भावना मनात बळावते आणि आयुष्य संपवण्याचेही विचार येतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी बीबीसी अशा शेकडो महिलांशी बोललं ज्यांना पाळीच्या काळात पीएमडीडीमुळे आपलं आयुष्य संपवावसं वाटतं.
यूकेतल्या डॉ. हॅना शॉर्ट यासगळ्या मानसिक तणावातून गेल्या आहेत. पाळीच्या काळात किंवा ती यायच्या जस्ट आधी नैराश्य इतकं टोकाला जातं की त्यामुळे आत्महत्या करावीशा वाटते ही मानसिक स्थिती त्यांनी अनुभवली आहे.
एका महिलेने बीबीसीशी बोलताना म्हटलं, "एकदा नाही, दोनदा नाही, मला प्रत्येक महिन्याला असं व्हायचं. विचार करा प्रत्येक महिन्याला. जणूकाही पाळीच्या चक्राप्रमाणे माझं आत्महत्येच्या विचारांचही चक्र होतं."
हॅना आता अशीच मानसिक परिस्थिती असणाऱ्या इतर महिलांची मदत करतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशनच्या आकडेवारीनुसार जगात 20 पैकी 1 महिलेला पीएमडीडीची लक्षणं दिसतात. काही महिलांमध्ये पीएमडीडीची गंभीर लक्षणं दिसतात, अशावेळेस हार्मोनल ट्रीटमेंट हा उपाय असतो, ज्यामुळे हार्मोनचं संतुलन बिघडणार नाही आणि मानसिक आरोग्य ठीक राहील. काही टोकाच्या केसेसमध्ये महिलांची गर्भाशयं काढून टाकण्याचाही उपाय केला जातो.
गंभीर स्वरूपाचा पीएमएस त्रास असणाऱ्या महिलांना अजूनही सिरियसली घेतलं जात नाही. दुसऱ्या एका महिलेने बीबीसीशी बोलताना म्हटलं, "माझी काय अवस्था होते ते मी डॉक्टरांना सांगत होते आणि त्यांनी मला झटकून टाकत म्हटलं, काही नाही पाळीचा त्रास आहे हा. सोयाबिन खा, बरं वाटेल. मी त्यांना सांगत होते की मला आत्महत्या करावीशी वाटते आणि त्यांनी मला सोयाबिन खा असा सल्ला दिला."

फोटो स्रोत, Getty Images
2013 मध्ये प्रचंड वादावादीनंतर डायग्नोस्टीक अँड स्टॅटस्टीकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स यात पीएमडीडीचा समावेश केला गेला.
मासिक पाळीचा महिलांच्या मेंदूवर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होतो. नकारात्मक परिणाम काय होऊ शकतो ते वरती पाहिलंच. सकारात्मक परिणाम म्हणजे महिलांची आसपासच्या गोष्टींची, जागांची समज एकदम वाढते. त्यांची संभाषणं कौशल्यंही सुधरू शकतात.
अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फोर्मेशनच्या साईटवर प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार पीएमएस काही प्रमाणात अनुवांशिक असू शकतो. आईकडून मुलीला पीएमएसची लक्षणं मिळालेली असू शकतात.
याच अभ्यासात म्हटलंय की तीव्र पीएमएस किंवा पीएमडीडी सारख्या आजारांमध्ये अनेक स्त्रियांना कळत नाही आपण काय वागतोय. त्यांच्या स्वभावात अचानक बदल होतो, त्या टोकाची भांडण उकरून काढतात किंवा प्रसंगी हिंस्रही होऊ शकतात.
अनेक महिलांचे नातेसंबध यामुळे बिघडतात किंवा त्यांच्या नोकऱ्या जातात पण या महिलांना माहिती नसतं की आपल्याबाबतीत काय घडतंय.
"पीएमडीडी एक पेशी-जनुकीय आजार आहे जो शरीरातल्या हार्मोनल बदलांमुळे उद्भवतो. हा गंभीरपणे घेऊन त्यावर योग्य ते औषधोपचार झालेच पाहिजेत," शिकागोतल्या इलिनॉईस विद्यापीठात महिलांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास करणाऱ्या टोरी आयसेनलोहर-मोल सांगतात.
पण तीव्र स्वरूपाचा पीएमएस किंवा पीएमडीडीची लक्षणं नक्की कोणती यात तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नाहीये. दुसरीकडे पीएमएस/पीएमडीडीची भीती घालून फार्मा कंपन्या आपलं उखळ पांढरं करून घेतील असंही काही जणांना वाटतं.
आणि म्हणूनच पाळीच्या काळात मानसिक चढ-उतार अनुभवणाऱ्या महिलांनी स्वतःकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आपल्या मनात एरवी न येणारे स्वतःला इजा करण्याचे विचार किंवा हिंसक विचार येत असतील तर ही पीएमएस/पीएमडीडीची लक्षणं असू शकतात हे ध्यानात ठेवायला हवं.
इतर कोणता मानसिक आजार नाही तर ही पीएमएस/पीएमडीडीची लक्षणं आहेत हे डॉक्टरांना पटवून सांगण्यासाठी पाळीच्या चक्राकडे काटेकोरपणे लक्ष द्यायला हवं.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ गौरी पिंप्राळकर म्हणतात, "आपल्या शरीरात काय बदल होतं असतात याची जाणीव आपल्याला असते. साधं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही अत्यंत स्ट्रेसमध्ये असाल तर कधी पाळी लवकर येते, कधी कधी तर येतच नाही. म्हणजे हार्मोनचं चक्र बिघडलेलं असतं. अशा परिस्थितीत तणाव न घेणं हा उपाय आहे. स्वतःकडे लक्ष दिलंत तर आपली लक्षणं नॉर्मल आहेत की गंभीर हेही लक्षात येईल. नॉर्मल केसेसमध्ये घाबरण्यासारखं काही नाही. पण तीव्र स्वरूपाची लक्षणं जाणवली तर नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा."
पीएमएस/पीएमडीडी आजार असणाऱ्या महिला स्वतःला किंवा दुसऱ्याला इजा करू शकतात ही शक्यता तज्ज्ञ मान्य करतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








