पाळी आणि मानसिक आरोग्य : खूप चिडचिड होतेय, रडू येतंय, एकट वाटतंय? मग हे वाचाच

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
पीएमएस हा शब्द ऐकलाय का तुम्ही? शहरातल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करत असाल आणि तुमची बॉस महिला असेल तर हा शब्द तुम्ही वापरला असल्याची शक्यता नक्कीच जास्त आहे. इतर कोणी कशाला, मी स्वतः अनेकदा वापरला आहे.
माझ्या आधीच्या जॉबमध्ये माझी बॉस महिला होती, आणि जरा तापट होती. काहीही झालं की फायरिंग ठरलेलं असायचं. मग माझे सहकारी (यात पुरुषही आले) आणि मी एकमेकांची समजूत घालायला म्हणायचो, "जाऊ दे, she must be PMSing." म्हणजे पीएमएसने पछाडलंय तिला.
असा कोणता हा कोडवर्ड होता? तर पीएमएस (PMS) म्हणजे प्री मेस्ट्रुअल सिंड्रोम. पाळी येण्याच्या आधी महिलांमध्ये जी शारीरिक आणि मानसिक लक्षणं दिसतात त्याला प्री-मेस्ट्रुअल सिंड्रोम म्हणतात. याला प्री-मेन्स्ट्रुअल सिड्रोम असं नाव असलं तरी ही लक्षणं पाळीतही हमखास दिसतात. ही लक्षणं काही महिलांना सौम्य जाणवतात तर काहींना याचा अतिशय त्रास होतो.
29-वर्षांची राधिका (बदललेलं नाव) एका वकिलांच्या ऑफिसमध्ये काम करते. कागदपत्रांशी संबंधित काम असल्यामुळे तिला फार लक्षपूर्वक नोंदी ठेवाव्या लागतात.
पाळी जवळ आली की तिला धडकी भरते. "बऱ्याच जणांना, अगदी महिलांनाही वाटतं की पाळी म्हटलं की फक्त शारीरिक त्रास होतो. कोणाची कंबर दुखते, कोणाच्या पायात गोळे येतात, कोणाचं पोटं दुखतं. पण मला असं काही न होताही खूप त्रास होतो असं सांगितलं तर?" ती विचारते आणि उत्तरही तीच देऊन टाकते की, "तर कोणी पटकन विश्वास ठेवणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
"मला पाळीत सहसा शारीरिक त्रास होत नाही, पण पाळी यायच्या आधी आणि पाळीच्या काळात खूप कंटाळा येतो, लहानसहान गोष्टींनी मुड जातो. राग-राग होतो. अनेकदा कामातही फोकस नसल्याने चुका होतात. काही दुखतं का विचारलं तर विशेष त्रास होत नसतो, पण मन दुखतंय असं कसं सांगणार?
पाळीच्या काळातला माझ्या व्यक्तिमत्वातला बदल इतका लक्षात येण्यासारखा असतो की माझ्याबरोबर काम करणाऱ्या मुलांना, अगदी आमच्या ऑफिसबॉयला ही कळतं. त्यावरून त्यांच्यात जोकही होत असणार. पण तिचे 'ते' दिवस चालू असतील असं म्हणत फिदीफिदी हसण्यासारखी गोष्ट नाहीये ही. मला जो त्रास होतो तो मलाच माहितेय. कधी-कधी तर इतकं टोकाचं नैराश्य असतं की बेडवरून उठू नये असं वाटतं. पण सांगणार कोणाला, लोक म्हणतील नवीन फॅड काढलं."
पण पाळी संपल्यासंपल्या राधिकाच्या मानसिक अवस्थेत बदल होतो आणि जणू काही घडलंच नाही अशा थाटात ती पूर्वीसारखीच हसती-खेळती राधिका होते.
नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ असणाऱ्या डॉ गौरी पिंप्राळकर सांगतात की, "अनेकदा महिलांची मासिक पाळी चालू असते तेव्हा त्यांना चिडचिडेपणा, अस्वस्थ वाटणं, रडू येणं अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. 70 टक्के महिलांना पाळीच्या वेळेस मूड स्विंग अनुभवायला मिळतात आणि ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे.
पण अनेकदा याहीपुढे जाऊन एखादीची मानसिक अवस्था बिकट असेल, एखादीला नैराश्य किंवा इतर मानसिक विकारांनी ग्रासलं असेल तर त्याचा परिणाम पाळीच्या चक्रावर नक्कीच होतो. पाळी अनियमित होते."

फोटो स्रोत, Getty Images
पाळी येणाऱ्या 80 टक्के महिलांना पीएमएसचा त्रास होतो. यात थकवा जाणवणं, जडत्व येणं अशी शारिरीक लक्षणं दिसतात तर चिडचिड होणं, मुड स्विंग्स होणं, वैताग येणं, लक्ष न लागणं अशी मानसिक लक्षणं दिसतात.
मासिक पाळीचं चक्र पुढे-मागे झालं तर त्याचाही शरीरावर परिणाम होतो. म्हणजे समजा पाळी सात-आठ दिवस पुढे गेली तर तुमच्या शरीरात जडत्व येतं कारण पाळीसाठी महत्त्वाचा असणारा हार्मोन - प्रोजेस्टेरॉन - पाणी धरून ठेवतो, त्या माहिती देतात. "त्यामुळेही पाळीच्या दिवसात आळस येणं, काही करावसं न वाटणं या गोष्टी होतात. हे अगदी साहजिक आहे."
पण या साहजिक गोष्टीला सहजरित्या घेतलं जात नाही. दोन प्रकारच्या भावना पाहायला मिळतात एकतर पीएमएसविषयी काहीच माहिती नाही, किंवा असेल तर त्याला सिरीयसली न घेता त्याची टर उडवली जाते.
म्हणजे माझ्या पूर्वीच्या ऑफिसमध्ये पीएमएस या प्रकारावरून इतके जोक झाले की मला आता पाळीच्या दिवसात काम करावसं वाटत नाहीये, किंवा आज काहीतरी हलक काम करायचं आहे. जास्त अवघड किंवा डोक्याला शॉट नको असं सांगायला नको वाटतं. उगाच ही काम टाळतेय असं समोरच्याला वाटेल असंही वाटतं. पण त्यादिवशी मी बेस्ट काम करू शकत नाही हे मात्र मी स्वतः अनेकदा अनुभवलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. याच पीएमएसचा एक भयानक प्रकार आहे पीएमडीडी (PMDD) म्हणजे प्री-मेन्स्ट्रुअल डायस्फोरिक डिसऑर्डर. यात महिलांना अनेकदा आत्महत्या करण्याचे विचार येतात.
पाळीदरम्यान टोकाचं नैराश्य येणं, पॅनिक अॅटॅक येणं अशी लक्षणं दिसतात. पाळीतल्या हार्मोन बदलामुळे कोणत्याचं गोष्टीवर आपलं नियंत्रण नाही, सगळं हातातून सुटत चाललं आहे अशी भावना मनात बळावते आणि आयुष्य संपवण्याचेही विचार येतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यात बीबीसी अशा शेकडो महिलांशी बोललं ज्यांना पाळीच्या काळात पीएमडीडीमुळे आपलं आयुष्य संपवावसं वाटतं.
यूकेतल्या डॉ. हॅना शॉर्ट यासगळ्या मानसिक तणावातून गेल्या आहेत. पाळीच्या काळात किंवा ती यायच्या जस्ट आधी नैराश्य इतकं टोकाला जातं की त्यामुळे आत्महत्या करावीशा वाटते ही मानसिक स्थिती त्यांनी अनुभवली आहे.
एका महिलेने बीबीसीशी बोलताना म्हटलं, "एकदा नाही, दोनदा नाही, मला प्रत्येक महिन्याला असं व्हायचं. विचार करा प्रत्येक महिन्याला. जणूकाही पाळीच्या चक्राप्रमाणे माझं आत्महत्येच्या विचारांचही चक्र होतं."
हॅना आता अशीच मानसिक परिस्थिती असणाऱ्या इतर महिलांची मदत करतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशनच्या आकडेवारीनुसार जगात 20 पैकी 1 महिलेला पीएमडीडीची लक्षणं दिसतात. काही महिलांमध्ये पीएमडीडीची गंभीर लक्षणं दिसतात, अशावेळेस हार्मोनल ट्रीटमेंट हा उपाय असतो, ज्यामुळे हार्मोनचं संतुलन बिघडणार नाही आणि मानसिक आरोग्य ठीक राहील. काही टोकाच्या केसेसमध्ये महिलांची गर्भाशयं काढून टाकण्याचाही उपाय केला जातो.
गंभीर स्वरूपाचा पीएमएस त्रास असणाऱ्या महिलांना अजूनही सिरियसली घेतलं जात नाही. दुसऱ्या एका महिलेने बीबीसीशी बोलताना म्हटलं, "माझी काय अवस्था होते ते मी डॉक्टरांना सांगत होते आणि त्यांनी मला झटकून टाकत म्हटलं, काही नाही पाळीचा त्रास आहे हा. सोयाबिन खा, बरं वाटेल. मी त्यांना सांगत होते की मला आत्महत्या करावीशी वाटते आणि त्यांनी मला सोयाबिन खा असा सल्ला दिला."

फोटो स्रोत, iStock
2013 मध्ये प्रचंड वादावादीनंतर डायग्नोस्टीक अँड स्टॅटस्टीकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स यात पीएमडीडीचा समावेश केला गेला.
मासिक पाळीचा महिलांच्या मेंदूवर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होतो. नकारात्मक परिणाम काय होऊ शकतो ते वरती पाहिलंच. सकारात्मक परिणाम म्हणजे महिलांची आसपासच्या गोष्टींची, जागांची समज एकदम वाढते. त्यांची संभाषणं कौशल्यंही सुधरू शकतात.
अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फोर्मेशनच्या साईटवर प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार पीएमएस काही प्रमाणात अनुवांशिक असू शकतो. आईकडून मुलीला पीएमएसची लक्षणं मिळालेली असू शकतात.
याच अभ्यासात म्हटलंय की तीव्र पीएमएस किंवा पीएमडीडी सारख्या आजारांमध्ये अनेक स्त्रियांना कळत नाही आपण काय वागतोय. त्यांच्या स्वभावात अचानक बदल होतो, त्या टोकाची भांडण उकरून काढतात किंवा प्रसंगी हिंस्त्रही होऊ शकतात.
अनेक महिलांचे नातेसंबध यामुळे बिघडतात किंवा त्यांच्या नोकऱ्या जातात पण या महिलांना माहिती नसतं की आपल्याबाबतीत काय घडतंय.
"पीएमडीडी एक पेशी-जनुकीय आजार आहे जो शरीरातल्या हार्मोनल बदलांमुळे उद्भवतो. हा गंभीरपणे घेऊन त्यावर योग्य ते औषधोपचार झालेच पाहिजेत," शिकागोतल्या इलिनॉईस विद्यापीठात महिलांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास करणाऱ्या टोरी आयसेनलोहर-मोल सांगतात.
पण तीव्र स्वरूपाचा पीएमएस किंवा पीएमडीडीची लक्षणं नक्की कोणती यात तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नाहीये. दुसरीकडे पीएमएस/पीएमडीडीची भीती घालून फार्मा कंपन्या आपलं उखळ पांढरं करून घेतील असंही काही जणांना वाटतं.
पीएमएस/पीएमडीडी आजार असणाऱ्या महिला स्वतःला किंवा दुसऱ्याला इजा करू शकतात ही शक्यता तज्ज्ञ मान्य करतात.
हे सिद्ध करणाऱ्या काही केसेसही जगात घडल्या आहेत. भारताचंच उदाहरण द्यायचं झालं तर 2018 साली राजस्थान हायकोर्टाने एका महिलेची खुनाच्या आरोपातून सुटका केली होती. या महिलेने तीन मुलांना विहिरीत ढकललं होतं ज्यात एका मुलाचा मृत्यू झाला होता. कोर्टात डॉक्टरांनी साक्ष दिली की ही महिला तीव्र स्वरूपाच्या पीएमएस आजाराने ग्रस्त होती आणि त्यामुळे हिंसक झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
आणि म्हणूनच पाळीच्या काळात मानसिक चढ-उतार अनुभवणाऱ्या महिलांनी स्वतःकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आपल्या मनात एरवी न येणारे स्वतःला इजा करण्याचे विचार किंवा हिंसक विचार येत असतील तर ही पीएमएस/पीएमडीडीची लक्षणं असू शकतात हे ध्यानात ठेवायला हवं.
इतर कोणता मानसिक आजार नाही तर ही पीएमएस/पीएमडीडीची लक्षणं आहेत हे डॉक्टरांना पटवून सांगण्यासाठी पाळीच्या चक्राकडे काटेकोरपणे लक्ष द्यायला हवं.
डॉ गौरी पिंप्राळकर म्हणतात, "आपल्या शरीरात काय बदल होतं असतात याची जाणीव आपल्याला असते. साधं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही अत्यंत स्ट्रेसमध्ये असाल तर कधी पाळी लवकर येते, कधी कधी तर येतच नाही. म्हणजे हार्मोनचं चक्र बिघडलेलं असतं. अशा परिस्थितीत तणाव न घेणं हा उपाय आहे. स्वतःकडे लक्ष दिलंत तर आपली लक्षणं नॉर्मल आहेत की गंभीर हेही लक्षात येईल. नॉर्मल केसेसमध्ये घाबरण्यासारखं काही नाही. पण तीव्र स्वरूपाची लक्षणं जाणवली तर नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








