मासिक पाळीसाठी सुट्टी घेतल्यास महिलांचा फायदा की नुकसान?

मासिक पाळी

फोटो स्रोत, Yuko Yamada/GETTY IMAGES

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

"कोरोना संकट काळात महिला डॉक्टरांनी 8 ते 12 तास पीपीई किट घालून रुग्णांवर उपचार केले. अशा काळात महिला डॉक्टरांनी जर मासिक पाळी म्हणून सुट्टी मागितली असती तर काय झाले असतं? मुळात मासिक पाळी ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. महिला कुठेही असल्या तरी त्या कामच करत असतात. त्यामुळे अगदी अपवादात्मक त्रास होत असल्यास त्यावर उपचार घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सुट्टी कशाला," असा सवाल स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सरिता पिकळे विचारतात.

तर दुसऱ्या बाजूला "मासिक पाळीच्या दिवशी त्रास होत असल्यास पगारी सुट्टी घेण्याचा महिलांचा अधिकार आहे. ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे जर महिला वेदना सहन करत असतील, मासिक पाळीत सलग 8-9 नऊ तास काम करणं तिला शक्य नसेल तर तिला सुट्टी देणे हे योग्यच आहे. एका दिवसामुळे महिला मागे पडणार नाहीत," असं मत अभिनेत्री जुई गडकरी यांनी व्यक्त केलंय.

या दोन्ही मतांची चर्चा करण्याचं कारण म्हणजे सध्या महिलांमध्ये कामाच्या ठिकाणी मासिक पाळीसाठी सुट्टी मिळवण्यावरून बराच वाद सुरू आहे.

त्याच कारण ठरला तो झोमॅटो कंपनीकडून जाहीर झालेला 'महिलांना मासिक पाळीसाठी सुट्टी घेता येईल' हा निर्णय. मग काय हा निर्णय समोर आला आणि सोशल मीडियावर नव्याने चर्चेला सुरुवात झाली.

तेव्हा महिलांना अशी सुट्टी दिल्यास खरंच कामाच्या ठिकाणी स्त्री-पुरुष असमानता वाढेल का? यामुळे महिलांच्या संधी कमी होतील का? की महिलांचा यामुळे फायदा होईल? खासगी कंपन्यांचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय आहे? स्त्रीरोगतज्ज्ञ याविषयी काय सल्ला देतात? तरुण मुलींना, महिलांना, गृहीणींना काय वाटतं? याविषयीचे सर्व दृष्टीकोन आपण या लेखात पाहणार आहोत.

वादाला कुठून सुरूवात झाली?

जगभरात काही मोजक्या कंपन्यांकडून यापूर्वीही महिलांना कामाच्या ठिकाणी मासिक पाळीसाठी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण कोरोना संकट काळात झोमॅटोसारख्या नामांकीत कंपनीकडून असा निर्णय जाहीर झाल्याने त्याबाबत ट्विटर, फेसबुक, वॉट्सअप, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया अॅप्सवर चर्चा होतेय.

झोमॅटोकडून सर्व कर्मचाऱ्यांना यासंदर्भात एक मेल पाठवण्यात आला. मासिक पाळीदरम्यान सुट्टी मागण्यास कोणताही संकोच किंवा लाज बाळगायला नको, असं झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी म्हटलंय.

अशी सुट्टी मागताना तुमच्यासोबत गैरव्यवहार झाला किंवा कुणीही याबाबत आक्षेपार्ह संवाद साधला तर त्याविरोधात महिला तक्रार करू शकतात, असंही या मेलमध्ये नमूद करण्यात आलंय. पण या सुट्टीचा गैरवापर करू नका अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

मासिक पाळी

फोटो स्रोत, Eziutka/Getty Images

भारतात यापूर्वी मुंबईतल्या कल्चर मशीन, गुढगावच्या गोजूप आणि कोलकात्यातील फ्लायमायबिज नावाच्या कंपनीने हा निर्णय घेतल्याचे समोर आलं होतं.

मासिक पाळीच्या सुट्टीवरून महिलांमध्येच मतभेद

महिलांना अशी सुट्टी मिळायला हवी की नको? यावरून महिलांमध्येही दोन गट आहेत. या निर्णयाचं समर्थन करणारा एक गट आहे तर या निर्णयामुळे महिलांचं नुकसान होईल असं मत असणारा दुसरा गट आहे.

ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनी ट्विट करून या निर्णयाच्या विरोधात आपलं मत मांडलं आहे. मासिक पाळीसाठी सुट्टी म्हणजे महिलांना मागे ढकलण्यासारखं आहे असं त्या सांगतात.

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : मासिक पाळीदरम्यान महिलांना सुटी मिळायला हवी का?

महिलांसाठी अशी विशेष तरतूद केली जात असल्याने महिलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल, पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करत नाहीत असाही समज होईल, महिलांच्या संधी कमी होतील असं मतही महिला वर्गाकडून मांडण्यात येत आहे.

नवी मुंबईतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या वर्षा होता यांना मात्र तसं वाटत नाही. बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, " मी स्वत: साडेसहा वर्षांपासून नोकरी करत आहे. अनेकदा मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सकाळी 9.30 वाजता कार्यालयात पोहोचता येत नाही. पण वेळेत पोहोचलो नाही तर उशिरा आल्याचा शेरा दिला जातो. त्यामुळे त्या दिवसाचा अर्धा पगारही कापला जातो."

साधारण तेराव्या वर्षापासून मुलींना दर महिन्याला मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. चार ते पाच दिवस रक्तस्त्रास सुरू असल्याने अनेक मुलींना पोटात कळा येणे, कंबर दुखणे असा त्रास होतो. तर रक्तस्त्राव अधिक असल्यास वारंवार सॅनिटरी नॅपकीन बदलावे लागतात.

women

"त्या दिवसांमध्ये सलग तासनतास बसून काम करणं शक्य होत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? हे काही मुलींनी मागून घेतलेलं नाही. नाईलाजाने हा त्रास आम्हाला सहन करावा लागतो. यात आमचा काय दोष आहे," असाही प्रश्न वर्षा यांनी उपस्थित केला.

पण मासिक पाळीत काम करणं प्रत्येक मुलीसाठी आव्हानात्मक असलं तरी प्रत्येकीसाठी ते त्रासदायक असतंच असं नाही. त्या दिवसातही महिला शेतात, स्वयंपाक गृहात, कार्यालयात, फिल्डवर, क्रीडा क्षेत्रात, संरक्षण दलात काम करत आहेत.

व्हीडिओ कॅप्शन, "...पाळीदरम्यान जर मी मेयोनिज बनवलं तर ते खराब होईल."

खासगी कंपन्यांमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आजारपणाच्या काही ठरलेल्या पगारी सुट्ट्या दिल्या जातात. सरकारी सुट्ट्यांचाही समावेश असतो. महिलांना गरोदरपणासाठी कायद्याने सहा महिन्याची पगारी रजा दिली जाते.

मुंबईत डिजिटल मार्केटींगमध्ये काम करणाऱ्या निकीता पाडावे यांना वाटतं, "मासिक पाळीचा त्रास प्रत्येक महिलेला होतोच असं नाही. ज्या महिलेला त्रास होतोय ती महिला आजारपणासाठी किंवा मासिक पाळीत त्रास होतोय म्हणून सुट्टी घेऊच शकते. पण त्यासाठी सरसकट सर्व महिलांना सुट्टी देण्याची तरतूद करण्याची गरज नाही."

मासिक पाळीच्या सुट्टीमुळे महिला मागे पडतील?

कामाच्या ठिकाणी आजही स्त्री-पुरुष समानता नाही असंही महिलांना वाटतं. अनेकदा आव्हानात्मक क्षेत्रांमध्ये संधी मिळवण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागतो हे वास्तव देखील नाकारता येणार नाही. मग मासिक पाळीसाठी सुट्टी दिली तर महिलांचं नुकसान होईल का?

मुंबईत राहणारी स्मिता जैस्वाल गेल्या 13 वर्षांपासून आयटी कंपनीत काम करते. महिलांनी अशा वारंवार सवलती मागितल्या तर त्यामुळे असमानता वाढेल, असं स्मिताला वाटतं.

ती सांगते, "मासिक पाळीसाठी सुट्टी देण्याची तरतूद केली गेली तर अनेक महिला त्याचा गैरवापर करू शकतात. ज्यांना खूप त्रास होत असेल त्या तशाही सुट्टी घेऊ शकतात. पण सर्व महिलांना यात समाविष्ट केलं तर समान संधी, समान पगार महिलांना मागता येईल असं मला वाटत नाही."

मासिक पाळीसाठी सुट्टी दिली तर महिलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जातील असंही काही महिलांना वाटतं तर एका सुट्टीमुळे काही फरक पडणार नाही, असंही मत मांडणाऱ्या महिला आहेत.

अनेकींना आपली पाळी इतर जणींच्या बरोबरच येते असं वाटत, पण ते कितपत खरं आहे?

फोटो स्रोत, Science Photo Library

फोटो कॅप्शन, अनेकींना आपली पाळी इतर जणींच्या बरोबरच येते असं वाटत, पण ते कितपत खरं आहे?

याविषयी बोलताना अभिनेत्री जुई गडकरी सांगते, "वर्षानुवर्षे महिला स्वत:ला सिद्ध करत आल्या आहेत. मी अभिनय क्षेत्रात असले तरी विविध पातळ्यांवर महिला म्हणून माझ्यासमोर आव्हानं असतात. पण मग मासिक पाळीसाठी एखादी सुट्टी महिलांना मिळाली म्हणून त्या लगेच मागे पडतील असं मला वाटत नाही. एका सुट्टीने संधी हुकाव्यात इतक्या महिला दुबळ्या नाहीत."

सोशल मीडियावरही याच मुद्द्यावरून महिलांमध्ये अधिक चर्चा होताना दिसतेय. प्रत्येक क्षेत्रातली आव्हानं वेगळी असतात.

"मला वाटतं जर मी मासिक पाळीसाठी सुट्टी घेत बसले तर माझी संधी जाऊ शकते. उदाहरणार्थ, जर एखादं मोठं प्रोजेक्ट असेल आणि त्यासाठी दररोज महिनाभर काम करावं लागणार असेल तर हे प्रोजेक्ट महिला म्हणून मला देताना उद्या विचार केला जाईल. महिला मासिक पाळीत सुट्टी घेतात म्हणून त्यांना तातडीचे आणि महत्त्वाचे प्रोजेक्ट दिले जाणार नाही," असे निकिता सांगते.

व्हीडिओ कॅप्शन, मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप किंवा कापडाला पर्याय काय?

आज मोठ्या संख्येने महिला कामासाठी घराबाहेर पडतात. संघटीत आणि असंघटीत अशा दोन्ही प्रकारच्या कामात महिलांचा मोठा वाटा आहे. पण तरीही कामाच्या आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांना आवश्यक सुविधा नाहीत.

मुंबई, पुणे, नाशिक अशा महानगरांमध्येही महिलांसाठी पुरेशी सर्वाजनिक शौचालय नाहीत. शौचालयात स्वच्छता नसल्याचं सर्वत्र दिसून येतं. मासिक पाळीसाठी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन्सही नाहीत.

खासगी आणि सरकारी दोन्ही कार्यालयांमध्ये महिलांच्या आरोग्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसतात.

डॉ. सरिता पिकळे सांगतात, "महिलांना सुट्टी देण्याऐवजी खासगी आणि शासकीय कार्यालयात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध असायला हवेत, त्यासाठी व्हेंडिंग मशिन्स असतात त्याची सोय हवी. कार्यालयात एखादी आरामाची लहान खोली हवी. या मागण्यांसाठी महिलांनी आग्रही रहायला हवं."

महिला डॉक्टर काय सांगतात ?

महिला त्यांच्या आरोग्यकडे पुरेसे लक्ष देत नाहीत असं मत स्त्री रोगतज्ज्ञांकडून मांडण्यात येतं. केवळ महिला वर्ग नाही तर सरकारी पातळीवर, खासगी कार्यालयातही महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

एकत्र महिला

फोटो स्रोत, AFP

मासिक पाळीसाठी महिलांना कामाच्या ठिकाणी सुट्टी देणे वैद्यकीय गरज आहे का? याविषयी बोलताना दिल्लीतील स्त्री रोगतज्ज्ञ जयश्री सुंदर सांगतात,

"मासिक पाळी ही नैसर्गिक आणि सामान्य प्रक्रिया आहे. जेव्हा आपण शारीरिक मेहनत जास्त करतो तेव्हाच आपल्याला आरामाची गरज असते. त्यामुळे सामान्य कार्यालयीन कामासाठी सुट्टीची आवश्यकता नाही. याउलट कामाच्या ठिकाणी महिलांना अधिकाधिक सुविधा देण्याकडे भर असायला हवा. आई झाल्यावर कार्यालयात तिच्यासाठी चांगलं वातावरण द्यायला हवं."

मुंबईतल्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सरिता पिकळे यांनाही असंच वाटतं. मुलींनी मासिक पाळीसाठी सुट्टी घेण्याऐवजी आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे असा सल्ला त्या देतात.

"मासिक पाळीसाठी टॅम्पॉन्स, सॅनिटरी नॅपकीन्स असे अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत. तरीही अपवादात्मक त्रास होत असल्यास त्यावर औषधं आणि उपचार आहेत. पण प्रत्येक महिन्याला त्रास होत असेल तर मुलींनी, महिलांनी त्यांच्या फीटनेसकडे लक्ष द्यायला हवं."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)