मासिक पाळी येण्यापूर्वीचा 'प्री मेंस्ट्रुअल सिंड्रोम'(PMS) म्हणजे काय?

फोटो स्रोत, iStock
- Author, डॉ. शैलजा चंदू
- Role, बीबीसी तेलुगूसाठी
"मुलीला मानसिक समस्या आहे. त्यांनी ते लपवलं आणि आमच्या मुलाशी लग्न केलं," असा आरोप अपर्णाच्या सासूने केला.
हे ऐकून अपर्णाच्या आईला प्रचंड वेदना झाल्या. त्यांनी सांगितले, "तिला मानसिक आजार नाही. तिला कधीतरी राग येतो. एवढेच."
हे उत्तर ऐकल्यावर त्यांनी थेट अपर्णाने रागात तोडलेल्या वस्तू दाखवण्यास सुरुवात केली. चहाच्या तुटलेल्या कपांना जोडायला सुरूवात केली.
त्या म्हणाल्या, "मी तुला सांगत होते श्रीमंत मुलीशी लग्न करू नको. काल तिने आपला फोन फेकला. त्याचे तुकडे झाले. किती काळ सहन करणार? "
"तिलाही स्वत: विषयी वाईट वाटते. तुम्हाला हे दिसत नाही का?"
"तिला अशी वागणूक का देत आहात? तिला एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांना दाखवा," असा सल्ला अपर्णाच्या सासूबाईंनी अपर्णाच्या वडिलांना दिला.

फोटो स्रोत, Getty Images
वेणू मध्यस्थी करत म्हणाले, "आई! तू शांत बस!"
वेणू अपर्णाच्या वडिलांना सर म्हणतो. कारण त्यांच्या निवृत्तीपर्यंत ते दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करत होते.
तुम्हाला कल्पना नाही ती काय बोलते, "उपयोगाचा नसलेला, सलत राहणारा, अकार्यक्षम. हे सगळं तरी ठिक आहे पण त्यादिवशी तिचे शब्द…"
अपर्णाच्या वडिलांनी तिच्याकडे पाहिले. त्यांना फाशीची शिक्षा दिल्यासारखे वाटत होते.
वेणू जे काही बोलतोय ते खरे आहे.
गेल्या तीन दिवसांपासून अपर्णा आणि वेणू एकमेकांशी बोलत नाहीत.
वेणूने घटनाक्रम सांगितला, त्यादिवशी ती नाईट शिफ्टहून घरी आली. मी नाष्ट्यासाठी इडली आणली पण ती शिजलेली नव्हती. कॉफीत पाणी जास्त होते.
"तू जाणीवपूर्वक असे पदार्थ बनवतो. तुला वाटते तू असे वाईट पदार्थ बनवले तर मी तुला काम सांगणार नाही," ती किंचाळली.

फोटो स्रोत, Getty Images
त्याने सांगितले, "तुला आवडले नसेल तर आपण बाहेरून मागवू." पण ती इतकी अस्थिर होती की तो काहीही बोलला तरी ती चिडचिड करत होती.
तो अतिहुशार असल्याने समस्या वाढते असं ती सांगते. शब्दाला शब्द वाढतो आणि त्यामुळे वाद वाढतो.
"तिने ताटली फोडल्यानंतर दोन आक्षेपार्ह शब्द वापरले. घाणेरड्या माझ्यापासून दूर जा. तू बिनकामाचा होतास तर लग्न का केले," असे म्हणाली.
भावनिक गुंता वाढला. खोल्या वेगळ्या झाल्या. दरवाजे बंद झाले.
अपर्णाचे शब्द वेणूच्या मनात सतत घोंगाळत होते.
"महिन्यातले अर्धे दिवस ती खूप चांगली असते आणि इतर दिवशी तिचे भयानक रूप पहायला मिळते."
"हे असे का होत आहे? मला असा राग का येतो?" असे प्रश्न तिला सारखे पडतात.

PMS (PMS- Pre Menstrual syndrome) म्हणजे काय?
पीएमएस असल्यास मासिक पाळी येण्याच्या दोन आठवडे आधी मनसिक अवस्था अत्यंत वेदनादायी असते. मासिक पाळी येण्याआधी मानसिक आणि शारीरिक अवस्थेवर परिणाम होत असतो.
PMS ची लक्षणं कोणती?
थकवा, चिडचिडेपणा, संताप, संवेदनशील होणे, अन्नपदार्थ सेवन करण्यावर नियंत्रण नसणे. PMS असलेल्या महिलांमध्ये साधारणपणे ही लक्षणं दिसून येतात.
शरीर जड वाटणे, छाती भरून येणे, मानसिक तणाव, नैराश्य, आत्मविश्वास कमी होणे आणि मूड बदलत रहाणे याचाही अनुभव काही महिलांना येतो.
PMS ची समस्या का उद्भवते?
मासिक पाळीत हार्मोन्सच्या असंतुलनामुळे ही लक्षणे दिसून येतात. दर महिन्याला वेळेवर मासिक पाळी येणाऱ्या महिलांमध्ये महिन्याच्या मध्यात अंडी सोडली जातात. तेव्हापासून मासिक पाळी सुरू होईपर्यंत प्रोजेस्टेरॉन नावाच्या हार्मोनची पातळी वाढते.
त्या हार्मोन्सचा मेंदूवर परिणाम होत असल्याने महिलांच्या वर्तणुकीत फरक होऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
PMS चा स्तर कसा ओळखायचा?
रक्ताची चाचणी करून PMS चे निदान होऊ शकते. PMS असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन महिने मासिक पाळीची डेअरी सांभाळावी लागते.
लक्षणे आणि कोणत्या वेळेत ती दिसतात याची नोंद केली गेली पाहिजे.
PMS वर उपचार कसे करायचे?
सुरुवातीला औषधं न घेता इतर गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे असते. खाद्य पदार्थांमध्ये बदल, जीवन शैली बदलणे, जेवणाच्या वेळेचे योग्य नियोजन केल्यास दिलासा मिळू शकतो.
रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्सचा वापर कमी केला पाहिजे. उदाहरणार्थ, तांदूळ, पांढरा ब्रेड, मिठाई आणि बटाटे, इ.
वनौषधी उपचारही फायदेशीर आहेत. उदाहरणार्थ, गुलाब तेल, व्हिटेक्स अॅग्नस कॅस्टस एल, सेंट जॉन्स वॉर्ट यांसारख्या वनस्पती पीएमएस ट्रीटमेंटमध्ये वापरल्या जातात. त्यांच्याबरोबर व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम, मल्टी व्हिटॅमिनच्या गोळ्या वापरल्यास पीएमएसची लक्षणे कमी होतील.
या औषधांनी त्रास कमी झाला नाही तर हार्मोन थेरपी ही उपचाराची पुढील पायरी आहे. हार्मोन थेरपीचा उद्देश बीजांडकोशाची रिलीज रोखणे हा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दुर्मिळ केस आणि दुर्मिळ उपचार
प्रतिमाला उच्च शिक्षित व्हायचे आहे. ती आजारी असेल किंवा तिला ताप असेल तरी शाळेत जाण्यासाठी ती हट्ट धरत असे. प्रत्येक परीक्षेसाठी अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून नियोजनबद्ध अभ्यास करत असे. ती शिक्षकांचीही आवडती होती. ती अनेक वाद-विवाद आणि प्रश्नोत्तरांच्या स्पर्धा जिंकत असे. तिला मोठं होऊन वैज्ञानिक बनायचे होते.
पहिल्यांदा तीला मासिक पाळी आली तेव्हा काही दिवस ती ठिक होती. काही दिवसांनी तिच्यात PMS ची लक्षणं दिसू लागली. अशी लक्षणं काही महिलांमध्येच दिसून येतात. यामुळे रडायला येणे, कुटुंबियांवर ओरडणे, कॉलेजमध्ये भांडणं होणं अशी लक्षणं तीच्यामध्ये दिसून येत होती.
कुटुंबासाठीही हा मोठा धक्का होता. तीला मासिक पाळी येण्याआधी तीचे कुटुंबीय घाबरायचे.
नैराश्य अथवा टोकाचा राग येणे. पालक आणि लहान भावासोबत भांडण होणे. हे नित्याचे होते.
पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर समस्या अत्यांत तीव्र झाली. एका महिन्यात तीन आठवडे ती आजारी पडली. तिच्या सततच्या बदलत्या मूडमुळे घरगुती वस्तू सुरक्षित नव्हत्या. कुटुंबीयांनी काचेच्या वस्तू तिच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत अशा ठिकाणी ठेवल्या. पण क्रोध कमी झाला तरी अश्रू, दुःख आणि नैराश्याने तिला घेरले होते.

फोटो स्रोत, Getty Images
रागात तीच्या खोलीचा दरवाजा बंद केल्यानंतर ती केव्हा उघडेल याची काहीच खात्री नाही. ती काय करेल याची तीच्या आईला नेहमी भीती वाटायची. पालकांसाठी ही एक त्रासदायक परीक्षाच होती.
सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचार केले पण काहीच फरक पडला नाही. ती 28 वर्षांची झाली पण तीला अद्याप पदवीचे शिक्षण पूर्ण करता आलेले नाही. शिक्षणात आलेल्या अपयशामुळे तीचे नैराश्य वाढत गेले.
ती जेवत नव्हती. तीने अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सर्व उपचार अपयशी ठरत होते.
मानसोपचार वॉर्डातही तिच्यावर अनेकदा उपचार करण्यात आले. कटूता आणि क्रोध यामुळे ती आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकली नाही. ती मासिक पाळीचा तिरस्कार करत असे.
हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ज्या मुलीचे नाव काढले जात होते तिला तिचे भविष्य दिसत नव्हते. असा एकही उपचार नव्हता जो तिला दिला गेला नसेल. हारर्मोन्सचे उपचारही अपयशी ठरल्यानंतर डॉक्टरांचा एक गट तिच्याशी चर्चा करण्यासाठी आला.
आपल्याला मासिक पाळी नकोय असा तिचा आग्रह होता. जी गोष्ट मला शिक्षणापासून दूर करते आहे असे आयुष्य नको आहे असे तीचे मत होते. तीने मासिक पाळी थांबवण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, Getty Images
डॉक्टर म्हणाले एकच मार्ग आहे. ही शस्त्रक्रिया सांगताना डॉक्टरही कचरले. कारण ही शस्त्रक्रिया म्हणजे गर्भाशय आणि अंडाशय काढून टाकणे. यामुळे तीला भविष्यात कधीही आई होता येणार नाही. ती कधीही गर्भधारणा करू शकणार नाही असे तिला सांगण्यात आले. पण ती तीच्या निर्णयावर ठाम होती.
माझा काहीही आक्षेप नाही असे तीने स्पष्ट केले. तसंच मला लग्नही करायचे नाही असे तीने सांगितले.
ती म्हणाली, "या जगात खूप मुलं आहेत. मला मूल होणार नाही म्हणून जगाचे नुकसान होणार नाहीय."
प्रदीर्घ चर्चेनंतर डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. आता ती पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहे.
( लेखिका स्वत: डॉक्टर आहेत. या लेखातली सर्व पात्र काल्पनिक आहेत. विषय नीट समजावा यासाठी पात्रांचा उल्लेख करण्यात आला आहे.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








